Home Blog Page 1172

महिला दीना निमित्त कर्तृत्वान यशस्वी महिलांचा पुरस्काराने सन्मान

जागतिक महिला दीना निमित्त ” बिटिया फौंडेशन व झाशीची राणी प्रतिष्ठान ” च्या वतीने कर्तृत्वान यशस्वी महिलांचा सन्मान पत्रकार भवन येथे संपन्न झाला. या वेळी प्रमुख पाहुणे डॉ. जयश्री फिरोदिया ( उद्योजिका ) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

या प्रसंगी ” सेवाव्रत पुरस्कार ” डॉ. जयश्री फिरोदिया यांच्या हस्ते मधुरा वेलणकर _साटम( अभीनेत्री ) मधुरा बाचल ( शेफ, मधुरा रेसिपी ), स्मार्तना पाटील ( पोलीस अधीकारी ), वृषाली दाभोलकर ( सामाजिक क्षेत्र ), , संगीता ललवाणी ( उद्योजिका गोल्ड मार्ट ), डॉ. मनीषा नाईक ( पुणे म.न पा. आरोग्य विभाग ), पूनम ठाकरे ( फॅशन डिझाईनर ), डॉ. कविता मुरुगकर ( आर्किटेक्ट ), अश्विनी जाधव ( पत्रकार ), ऍड. लीना पाठक ( पब्लिक प्रॉसिक्युटर ), अंकिता नराळे ( ऍथलिट गोल्ड मेडलिस्ट ) या ९ महिलांना सन्मानित करण्यात आले.
तसेच ” विशेष पुरस्कार ” रुपी पौर्णिमा पवार ( अध्यक्ष, देवस्थान पहिली महिला ), तबस्सुम शेख ( प्रिन्सिपॉल, प्रेसिडेंट आर. के. फौंडेशन ), श्रद्धा सुर्वे ( महिला उद्योजिका ), या ३ महिलांचा डॉ. जयश्री फिरोदिया यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या वेळी बिटिया फौंडेशन च्या अध्यक्षा संगीता तिवारी व झाशीची राणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी सर्व महिलांचे स्वागत करूंन आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी आपल्या भाषणात मधुरम कार्यक्रमाची माहिती सांगताना मराठी भाषेत बोलावे, मराठी ही आपली भाषा असून एकमेकांशी मराठी भाषेतच संभाषण केले पाहिजे.
मधुरा बाचल यांनी मधुर रेसिपी बाबत माहिती सांगताना इतर भाषा मध्ये रेसिपी उपलध असते परंतु मराठी भाषे मध्ये उपलब्ध नव्हती, हा प्रयत्न मराठी भाषेत कोणीच केला नाही म्हणून मी मराठी भाषेत रेसिपी देणे सुरु केले. यामुळे मराठी भाषा आपली असून ते सहज रित्या समजले पाहिजे.
पुण्यातील गोल्ड व्यवसायातील एकमेव महिला उद्योजिका संगीता ललवाणी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले,महिलांनी सोन्याचे महत्व ओळखले पाहिजे. कोणते सोने कसे घ्यावे, सोने कसे खरेदी करावे व कसे विकावे या विषयी माहिती दिली, आणि महिलांसाठी मी म्हणेल त्याठिकाणी येऊन सर्वांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करीन.
प्रमुख पाहुणे डॉ. जयश्री फिरोदिया यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या, महिलांनी आपल्या करियर बरोबर आपली प्रकृती, आपला परिवार सांभाळला पाहिजे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित व्यायाम, चांगले आहार घेऊन स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे.
या प्रसंगी अभय छाजेड, रफिक शेख, रमेश अय्यर, अक्षय जैन, सुजाता शेट्टी, गौरी ढोलेपाटील
व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले तर सर्वांचे आभार वैशाली पाटील यांनी मानले. सर्व महिलांना माहेरची साड़ी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

आयुष्मान भारत योजना केवळ विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी -प्रशांत जगताप

पुणे-आयुष्मान भारत योजनेची जाहिरात आपल्या माथी मारण्यासाठी मोदी सरकार आपल्याच खिशातून कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. प्रत्यक्षात मात्र ही योजना गोरगरीब रुग्णांना नव्हे तर केवळ विमा कंपन्यांना फायदा देणारी आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी गेलेल्या रुग्णांना अक्षरशः रुग्णालयांच्या दारात पडून राहावे लागत आहे. गोरगरीब रुग्णांचे हाल होत असताना योजनेत सुधारणा करायचे सोडून मोदी सरकार केवळ जाहिरातबाजीत मग्न आहे.असा आरोप करत
मोदी सरकारच्या या निष्क्रिय धोरणाच्या विरोधात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने केईएम् हॉस्पिटल चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. विविध घोषणा देत केंद्र सरकारच्या योजनेचा व केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. “मोदी सरकारच्या घोषणा फसव्या योजना, मोदी सरकारचा गोलमाल गोरगरीब रुग्णांचे हाल, आयुष्मान भारतचा केवळ प्रचार
गोरगरीब रुग्ण झाले बेजार, मोदी सरकार डोळे उघडा” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

गेल्या एक महिन्यापासून आम्ही या योजनेच्या अंमलबजावणीचा मागोवा घेत आहोत. पुणे शहरातील सरकारी हॉस्पिटल्स वगळता एकाही हॉस्पिटल मध्ये आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार मिळत नाहीत. सरकारी हॉस्पिटल्स मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वांना उपचार मोफत मिळतात, म्हणून आयुष्मान भारत योजना ही केवळ धूळफेक असून देशाच्या नागरिकांच्या भावनांसोबत हा क्रूर खेळ आहे.

– प्रशांत जगताप

स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ आयोजित कविसंमेलन व यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार प्रदान समारंभ

पुणे-

गेली ३६ वर्षे अखंडीत यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्या वतीने कविसंमेलन व यशवंतराव चव्हाण कला व साहित्य पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित केला जात आहे.यंदाही सदर कविसंमेलन मंगळवार, दि. १२ मार्च २०२४ रोजी रात्री ९.०० वा. टिळक स्मारक मंदीर, टिळक रोड, पुणे येथे उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार  यांच्या हस्ते व राजा दीक्षित (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ)सुनिल टिंगरे प्रा. मिलिंद जोशी (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

·        कै. प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ कला जीवन गौरव पुरस्कार – विलास रकटे (ज्येष्ठ मराठी अभिनेते) – रोख रु. २५,०००/ व मानचिन्ह

·        कै. शिवाजीराव ढेरे यांच्या स्मृत्यर्थ साहित्य पुरस्कार – अनिल धाकू कांबळी (कणकवली), कविता संग्रह – इष्टक – रोख रु. ११,००१/व मानचिन्ह

·        कै. बाबासाहेब जाधव यांच्या स्मृत्यर्थ साहित्य पुरस्कार – भीमराव धुळूबुळू (मिरज) कविता संग्रह – काळजाचा नितळ तळ – रोख रु.११,००१/व मानचिन्ह

·        कै. धनाजी जाधव यांच्या स्मृत्यर्थ साहित्य पुरस्कार – गीतेश गजानन शिंदे (ठाणे) – कविता संग्रह – सीसीटीव्हींच्या गर्द छायेत – रोख रु. ११,००१/-

सदर पुरस्कार १२ मार्च रोजी होणार्‍या कवि संमेलनात देण्यात येणार आहेत. सदर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन  रामदास फुटाणेे व अशोक नायगावकर हे करणार आहेत, असे रामदास फुटाणे, विजय ढेरे,संजय ढेरे, गौरव फुटाणे यांनी जाहीर केले.

पीएमपीएमएलच्या बदली कामगारांना सेवेत कायम करण्यासाठी नाना भानगिरे आक्रमक, थेट व्यवस्थापकीय अध्यक्षांच्या दालनासमोरच मारली बैठक

पुणे -पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या बदली कामगारांना सेवेत कायम करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणारे शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी आज अत्यंत आक्रमक भूमिका घेत पीएमपीएमएल प्रशासनाला धारेवर धरले, व्यवस्थापकीय अध्यक्षांच्या दालना बाहेरच ठिय्या मांडून जोपर्यंत बदली कामगारांना सेवेत समाविष्ट करून कायम करण्यासंदर्भात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता प्रशासन करीत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा भानगिरे यांनी घेतला, त्यानंतर तातडीने पीएमपीएमएल प्रशासनाने 1895 बदली कामगारांना कायम करण्यासंदर्भातील निर्णयाबाबत येत्या सोमवारी संचालक मंडळाची तातडीची बैठक बोलावली असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशीही याबाबत सकारात्मक चर्चा करून बदली कामगारांना सेवेत कायम करण्यात येणार असल्याचे आश्वासन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना पीएमपीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष संजय कोलते यांनी दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर,पीएमपीएमएल कर्मचारी संघटनेचे नरेंद्र आवारे, श्री.पांढरे व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

 पुणे महापालिकेचे 11 हजार 601 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर-वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १४०० कोटी

पुणे -पुणे महापालिकेचे 2024- 25 या वर्षीचे 11 हजार 601 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आज महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांनी मंजूर केले. समाविष्ट गावांतील विकासासाठी 550 कोटी रुपये भरीव तरतूद करण्यात आली असून पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून येत्या वर्षभरात ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहतील असा दावा, विक्रम कुमार यांनी केला.शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर होत असताना त्यासाठी पर्यायी रस्ते निर्माण होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पुढील वर्षभरात विकास आराखड्यात प्रस्तावित असलेले व अर्धवट असलेल्या ३३ रस्‍त्यांचे (मिसिंग लिंक) भूसंपादन केले जाणार आहे.तसेच विविध ठिकाणी उड्डाणपूल, समतल विगलक (ग्रेड सेपरेटर) बांधणे यासाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद महापालिकेच्या अर्थसंकल्पात केली आहे. गेल्यावर्षीपासून महापालिकेने मिसिंग लिंकचे काम हाती घेतले आहे.

आत्तापर्यंत आठ रस्त्यांचे काम सुरु झाले आहे. अर्थसंकल्पात पथ विभागाला भांडवली कामे करण्यासाठी १०७० कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून दिली आहे. तर प्रकल्प विभागाला उड्डाणपूल, समतल विगलक, मेट्रो यासाठी ३२६ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध केली आहे.

शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर होत आहे, त्यामुळे विकास आराखड्यातील रस्त्यांचा विकास होणे आवश्‍यक आहे. पण त्यात भूसंपादनासाठी मोठी रक्कम आवश्‍यक असल्याने हे प्रकल्प रखडले आहेत.

पथ विभागाने ३३ मिसिंग लिंक निश्‍चित केल्या आहेत. तेथे जागा मालकांना टीडीआर, एफएसआय देऊन किंवा रोख मोबदला देऊन जागा ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. पथ विभागाकडे १०७० कोटीची तरतूद उपलब्ध असती तरी त्यातून मिसिंग लिंकसाठी किती तरतूद उपलब्ध आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

तसेच याच निधीतून रस्ते डांबरीकरण करणे यासाठी ६८९ कोटी, रस्ते विकसित करणे १०५ कोटी, रस्ते पुन्हा डांबरीकरण करणे, १५५ कोटी, रस्ते काँक्रिटीकरण करणे १४ कोटी अशी इतर कामे केली जाणार आहे.

पीएमपीतर्फे स्व मालकीच्या १०० सीएनजी बसेस घेतल्या जाणार आहेत, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगितले असले तरी अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद नाही. तर संचलनातील तूट देण्यासाठी ४४० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

वाहतूक कमी टाळण्यासाठीचे प्रकल्प

– विश्रांतवाडी येथे उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटसाठी ३० कोटी

– साधू वासवानी पूल ते बंडगार्डन पुलापर्यंत एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करणे १५ कोटी

– सांगवी-बोपोडी मुळ नदीवर पूल बांधण्यासाठी ६ कोटी

– बिंदुमाधव ठाकरे चौक येरवडा येथे उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटरसाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरु

– शास्त्रीनगर ग्रेडसेपरेटरसाठी १० कोटी

– खराडी बायपास चौक उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटरसाठी ५ कोटी

– खडकी रेंजहिल्स येथील रेल्वेमार्गाखालील रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी २० कोटी

– हडपसर ससाणेनगर रेल्वे उड्डाणपुलासाठी १० कोटी

– गणेशखिंड रस्त्यावर चार ठिकाणी ग्रेड सेपरेटरसाठी १० कोटी

– पुणे मेट्रोच्या कामातील खर्चाचा हिस्सा देण्यासाठी २०० कोटी

रस्त्यासाठी महत्त्वाचे भूसंपादन प्रस्ताव

– सिमला ऑफिस ते आनंद ऋषिजी चौक

– कात्रज कोंढवा गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर चौक २४ मीटर रस्ता

– वारजे शिवणे नदीकाठचा रस्ता

– वारजे जुना नाका ते गणपती माथा रस्ता

– वरील रस्त्यांसह २५ प्रकरणांसाठी १५४६ कोटी रुपयांची तरतूद आवश्‍यक, पण निधी दिलेला नाही.

मेट्रो चे नवीन रूट, पीएमपीएमएल साठी 500 बसेस, ड्रेनेज आणि रस्त्यांच्या मिस्सिंग लिंक च्या कामासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. जायका अंतर्गत सुरू असलेले एसटीपी प्लांट उभारणी, नदी काठ सुधार योजना ही कामे देखील मार्गी लावण्यात येतील. शहरातील तीन तलावांच्या सुशोभीकरणाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. कचऱ्यापासून वीज आणि हायड्रोजन निर्मिती चे प्लांट सुरू करण्यात येणार आहेत.

शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी मॉडेल स्कूल योजनेत अधिकच्या शाळा घेण्यात येणार आहेत. तसेच सर्वसामान्य लोकांना स्वस्त दरात औषधं मिळावीत यासाठी जेनेरिक स्टोरची संख्या वाढवण्यात येणार आहे.

मुख्य विभागांसाठी तरतूद

१. पाणी पुरवठा – १ हजार ५३७ कोटी रुपये
२. ड्रेनेज – १ हजार २६३ कोटी रुपये
३. घनकचरा – ९२२ कोटी ९२ लाख रुपये
४. आरोग्य – ५१६ कोटी रुपये
५. वाहतूक नियोजन व प्रकल्प – ७६४ कोटी रुपये.
६. पथ विभाग – १ हजार २७८ कोटी ९० लाख रुपये.
७. पीएमपीएमएल – ४८२ कोटी ५२ लाख रुपये
८. उद्यान – १७१ कोटी ७८ लाख रुपये.
९. विद्युत – ४३२ कोटी ४४ लाख रुपये.
१०. भवन – ५१५ कोटी ९२ लाख रुपये.
११. माहिती व तंत्रज्ञान – ४४ कोटी ५८ लाख रुपये.
१२. हेरिटेज – १९ कोटी २५ लाख रुपये.
१३. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण – १२४ कोटी ६० लाख रुपये.

असे असेल उत्पन्न

१.मिळकत कर – ३ हजार 2 कोटी
२.बांधकाम परवानगी शुल्क – २ हजार ४९२ कोटी ८३ लाख रुपये.
३. स्थानिक संस्था कर – ४९५ कोटी
४. वस्तू आणि सेवा कर – २ हजार ५०२ कोटी रुपये.
५. पाणीपट्टी – ४९५ कोटी.
६. शासकीय अनुदान – १ हजार ७१६२ कोटी रुपये
७. इतर जमा – ८३३ कोटी ६४ लाख रुपये.
८. कर्ज/ कर्ज रोखे – ४५० कोटी रुपये.

ठाणे पोलीस सुजाता शेलार ठरली महाराष्ट्राची सौंदर्यवती

लॉलीपॉप इंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट यांचा महिला सन्मान उपक्रम

पिंपरी, पुणे (दि. ७ मार्च २०२४) महिलांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित लॉलीपॉप एंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट या संस्थेच्या वतीने “महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा २०२४” या मेगा शो चे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड येथे झालेल्या या सौंदर्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून २० गृहिणींसह वैद्यकीय, पोलीस, अग्निशामक दल, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या.
यामध्ये ठाणे पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल सुजाता शेलार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांकाचा मुकुट, पंधरा हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र ज्येष्ठ कर सल्लागार शाळिग्राम तायडे आणि डॉ. प्रशांत इंनरकरयांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
द्वितीय पारितोषिक यांनिसा कलीम सय्यद यांना मुकुट, बारा हजार रुपये आणि तृतीय क्रमांक शीतल वाघमारे यांना मुकुट, दहा हजार, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इतर सर्व सहभागी स्पर्धकांना सोन्याची नथ, पैठणी आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
लहान मुलांच्या गटात प्रथम पारितोषिक दहा हजार रोख मेधावी स्वप्नील काशिद आणि द्वितीय पारितोषिक सात हजार रोख अनन्या यादव आणि तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये रोख रक्कम आरव गावफळे यांनी पटकावले.
परीक्षक म्हणून नैना वेदपाठक, डॉ. दुर्गा लाडके, डॉ. शुभम आघाटे, मेघना भालेराव यांनी काम पाहिले. ग्रूमिंग नरेश फुलेलू , क्षितिज गायकवाड आणि टीना क्षत्रिय यांनी केले. कार्यक्रमाची आऊटफिट पियांशिका फॅशनच्या ऋतुजा खडके आणि रिवाज रेंटल च्या चैत्राली मरळीकर पाटोळे यांनी केले. वेशभूषा आणि केशरचना नेहा ठाकूर यांनी केली. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कर सल्लागार शाळीग्राम तायडे आणि कॅबिलेपिल्स आणि स्किन क्लिनिकचे संस्थापक डॉ. प्रशांत इंनरकर उपस्थित होते. स्वागत लॉलीपॉप इंटरटेनमेंट संचालक संजीव जोग, सूत्र संचालन रेडिओ जॉकी आर. जे. बंड्या यांनी केले. कावेरी तांबे यांनी आभार मानले. शिल्पा मगरे गाडेकर, निकिता गायकवाड आणि प्रीती वाघमारे यांनी संयोजनात सहभाग घेतला.

उल्हासनगरची अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत आगामी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

१४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय

मुंबई, दि. ७: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील २७ गावातील नागरिकांना २०१७ च्या दरानुसार कर भरण्यासंदर्भात दिलासा देतानाच १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत येत्या मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे जाहीर करतानाच संत सावळाराम स्मारकासाठी जागा देण्याची कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

वर्षा निवासस्थानी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबईतील १४ गावे यासंदर्भात सविस्तर आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, डॉ. बालाजी कल्याणकर यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

या बैठकीत २७ गावे, कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील पुनर्विकास, १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश, उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करणे, संत सावळाराम स्मारकासाठी जागा आदी विषयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमध्ये मालमत्ता कराचा विषय प्रलंबित होता. त्यावर मार्ग काढत २०१७ च्या दराप्रमाणे आता कराची आकारणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या गावातील जी अनधिकृत बांधकामे आहेत ती संरक्षीत करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. नवी मुंबई महापालिका हद्दीत १४ गावांचा समावेश करण्याची भूमिपुत्रांची मागणी मान्य केली असून त्याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. आता या गावांमध्ये नवी मुंबई महापालिकेप्रमाणे विकास कामे होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याबाबतचा निर्णय येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वास्तूविशारद संघटनेची देखील यावेळी बैठक घेण्यात आली. त्यानुसार ठाण्याच्या धर्तीवर इमारतींच्या उंचीबाबतचा नियम कल्याण – डोंबिवली हद्दीत देखील लागू करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील टेकडीवर संत सावळराम स्मारकासाठी जागा देण्याचा निर्णय झाला असून त्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

वांद्रे पूर्वच्या शिवालिक ट्रॅन्झिट कँप रहिवाशांचेत्याच ठिकाणी तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निर्देश

  • उपमुख्यमंत्री अजित पवार आणि झिशान सिद्दीकी यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई, दि. 7 :- मुंबईतील वांद्रे पूर्वच्या गोळीबार रोडवरील शिवालिक ट्रॅन्झिट कॅम्पमध्ये 26 फेब्रुवारी रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या रहिवाशांचे त्याच ठिकाणी सुरक्षित घरांमध्ये तात्पुरते पूनर्वसन करण्यात यावे. वर्षभरात तेथेच नवीन ट्रान्झिट कॅम्प तयार करुन रहिवाशांच्या निवासाची सोय करावी. शिवालिक विकसकाने गेल्या 18 वर्षांत प्रकल्प पूर्ण न केल्याने त्याच्याऐवजी अन्य नामांकित विकसकांकडून हा प्रकल्प पूर्ण करुन रहिवाशांना न्याय मिळवून द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

स्थानिक आमदार झिशान बाबा सिद्दीकी यांच्या मागणीवरुन मंत्रालयात आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदींसह संबंधित अधिकारी आणि शिवालिक ट्रान्झिट कॅम्प रहिवाशी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत, हा प्रकल्प पूर्ण होण्यास झालेला विलंब, प्रकल्पाच्या अंमलबजावणीत येत असलेल्या अडचणी, ट्रॅन्झिट कॅम्प रहिवाशांच्या समस्या, तेथील महिला, विद्यार्थी वर्गाच्या मागण्यांचा आढावा घेतला. त्यानंतर मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शिवालिक विकसकाकडून प्रकल्प पूर्ण होण्यास झालेला विलंब अक्षम्य, रहिवाशांवर अन्याय करणारा आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी संबंधित रहिवाशी आणि गृहनिर्माण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहमतीने अन्य चांगला विकसक शोधण्याच्या पर्यायाचा विचार करावा. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करुन मान्यता घेण्यात यावी. 26 फेब्रुवारी रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या कुटुंबातील विद्यार्थी स्थानिक शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकतात. महिला स्थानिक ठिकाणी घरकाम करतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रहिवाशांचे त्याच ठिकाणी उपलब्ध ट्रॅन्झिट कॅम्पमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात यावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन अपेक्षित निर्देश दिल्याने शिवालिक ट्रॅन्झिट कॅम्पच्या रहिवाशांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक आमदार झिशान बाबा सिद्दीकी यांचे आभार मानले.

सोन्याने प्रथमच 65 हजारांचा टप्पा पार केला:10 ग्रॅमचा भाव 65,049 रुपये, चांदी 72,121 रुपये प्रति किलो

नवी दिल्ली-

सोन्याचा भाव आज (7 मार्च) पहिल्यांदाच 65,000 रुपयांच्या पुढे गेला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, 10 ग्रॅम सोने 556 रुपयांनी महागून 65,049 रुपये झाले आहे.

त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही वाढ दिसून येत आहे. ती 411 रुपयांनी महागली असून 72,121 रुपये किलोवर पोहोचली आहे. पूर्वी ती 71,710 रुपये होती. गेल्या वर्षी 4 डिसेंबर रोजी चांदीने 77,000 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

देवेंद्र फडणवीसांच्या 2016च्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला वेग

मुंबई, 7 मार्च 2024 – 
महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुमारे 9000 मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) आज उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यातून 40,000 कोटी रुपये गुंतवणूक होणार असून, 25 हजार रोजगार निर्माण होणार आहेत. यामुळे पुढच्यावर्षी 40 टक्के कृषीफिडर हे सौरऊर्जेवर येणार असून, शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे.
स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून हे देकारपत्र आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी 2016 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना प्रारंभ केली होती. त्यानंतरच्या काळात 2000 मे.वॉट पर्यंत निर्मिती करण्यात आली. आता 9000 मे.वॉट सौरऊर्जा तयार करण्यात येणार आहे, त्यामुळे 40 टक्के कृषीफिडर हे सौरऊर्जेवर येतील. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. राज्यातील असंख्य शेतकर्‍यांची दिवसा वीजेची सातत्याने मागणी होती. ही मागणी आता पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्राच्या कृषि जगतात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. अतिशय कमी कालावधीत प्रकल्पासाठी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पाचे कार्यान्वयन शक्य होणार आहे.  सर्वांत आधी सौर ऊर्जेवरील ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर राळेगण सिद्धी जि. अहमदनगर येथे साकारण्यात आली. ती कमालीची यशस्वी झाली. आता जागा उपलब्धतेसाठी महसूल यंत्रणेने केलेल्या भरीव कार्यामुळे हे शक्य झाले. विकासकांना यापुढेही सर्व शासकीय यंत्रणा मदत करतील. कुठेही अडचण आल्यास त्या सोडविण्यासाठी शासन कायम पाठीशी असेल. 
राज्यात 3600 मेगॅवॉट सौर ऊर्जा क्षमता आतापर्यंत स्थापित आहे. पण, आता अवघ्या 11 महिन्यात 9000 मेगॅवॉटची प्रक्रिया राबवून सरकारने एक नवा विक्रम घडविला आहे. सराकरने कमीत कमी कालावधीत जागा उपलब्ध करून हा प्रकल्प कार्यान्वित करणे शक्य झाले आहे. या प्रकल्पामुळे शासनावरील विविध वीज सवलतींमुळे पडणारा आर्थिक भारही कमी होणार आहे, असेही उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.     हा प्रकल्प 18 महिन्यात पूर्ण करायचा असला तरी सोबत काम केले तर 15 महिन्यातच तो पूर्ण होऊ शकतो. आता हा प्रकल्प सुरू होणार म्हणून अधिकार्‍यांनी थांबू नये. उर्वरित 50 टक्के कृषी फिडर सौरऊर्जेवर आणण्यासाठी नियोजनाच्या तयारीला तत्काळ लागा. पुढील दोन ते तीन वर्षात 8 लाख सौर ऊर्जा पंपसुद्धा शासनाला द्यावयाचे आहेत, त्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत शेतकर्‍यांना 1.25 लाख रुपये प्रतिहेक्टर वार्षिक भाडे दिले जाते. यावेळी हुडकोसोबत एक सामजंस्य करार सुद्धा करण्यात आला. यामधून 5 हजार कोटी रूपये प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मिळणार आहेत. रिलायन्ससोबत ग्रीन हायड्रोजन ऊर्जा निर्मितीसाठी सामजंस्य करारसुद्धा करण्यात आला. या करारामुळे राज्यात ग्रीन हायड्रोजन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात बुस्ट मिळणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते, तर सभागृहात अतिरिक्त मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेच्या महासंचालक कादंबरी बलकवडे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मनोज सौनिक, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी आदींसह विकासक उपस्थित होते.

पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अज्ञाताने बाळ पळविले

पुणे -पुणे रेल्वे स्थानक परिसरातून 3 वर्षाचे बाळ पाठविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याप्रकरणी कुरुडवाडी येथे राहणाऱ्या 22 वर्षीय व्यक्तीने बंड गार्डन पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पाच मार्च रोजी पुणे रेल्वे स्थानकाच्या आरक्षण केंद्रा समोरील मोकळ्या जागेत घडली आहे अशी माहिती पोलिसांनी गुरूवारी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मुलाचे आई-वडील फिरस्ती असून मिळेल ते काम करत असतात. फिर्यादी यांची पत्नी आजारी असल्याने हे दाम्पत्य नातेवाईकांना सांगून ३ वर्षीय बाळाला रेल्वे स्थानकाच्या आरक्षण केंद्रा समोरील मोकळ्या जागेत ठेऊन दवाखान्यात गेले होते.

यादरम्यान आरोपीने बाळाला पळवल्याचे फिर्यादिने सांगीतले आहे. याप्रकरणाचा पुढील सहाय्यक पोलीस निरीक्षक एस मधाळे करत आहेत

मकरंद रानडे, शेखर चन्ने, डॉ. प्रदीप कुमार व्यास- तीन राज्य माहिती आयुक्तांचा शपथविधी

मुंबई, दि.७ : महाराष्ट्र राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी मकरंद मधुसूदन रानडे, शेखर मनोहर चन्ने, डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना राज्य माहिती आयुक्तपदाची शपथ दिली.आज मंत्रालयात राज्य माहिती आयुक्तपदांच्या शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त समीर सहाय, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजगोपाल देवरा, नितीन गद्रे, माजी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहूल पांडे, नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त भुपेंद्र गुरव यांची उपस्थिती होती.

बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यावर कारवाई करू

  • पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आश्वासन
  • बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या बैठकीत आश्वासन

पिंपरी ! प्रतिनिधी –
बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर बाबी तपासून कारवाई बाबत योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कॅब, टॅक्सी, ऑटो, रिक्षा संघटना प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला दिले. आवश्यकता पडल्यास कुल कॅबला मीटर परवानगी देण्याबद्दल कायदेशीर पडताळणी करा. जरी शक्य होत असेल त्या संघटना कुल कॅब मीटरने व्यवसाय करून नागरिकांना प्रवासी सेवा देणार असतील तर ही चांगली गोष्ट आहे. यामध्ये कायदेशीर बाबी पूर्ण करा, असे आदेश यावेळी पुणे पोलीस आयुक्त यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिली.
यावेळी बाबासाहेब कांबळे(राष्ट्रीय अध्यक्ष ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन)मिलिंद भाऊ गायकवाड(राजे प्रतिष्ठान कॅप संघटना)अंकुश दाभाडे (राजे प्रतिष्ठान कॅप संघटना)अप्पाराव घुगे(सारथी वाहतूक असोसिएशन)अजय मुंडे(टॅक्सीअसोसिएशन)वर्षाताई शिंदे(मासाहेब कॅब संघटना) बिरुद्र्व पालवे,
( महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी संघटना)आनंद तांबे (राष्ट्रीय संघटक ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन)अमन कुचेकर(आधार कॅब फाउंडेशन)संजय पवार(छत्रपती कॅब संघटना)माऊली सोनवणे(राजे प्रतिष्ठान कॅब संघटना)किरण सोनवणे,दादासाहेब माने,चंद्रकांत ताकवले उपस्थित होते.
आदी या वेळी उपस्थित होते.

पोलिस आयुक्तांसमोर बाबा कांबळे यांनी विविध मागण्या मांडल्या. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये ओला उबेर व अन्य कंपन्यांमार्फत प्रवाशांना सेवा दिली जात आहे. सुमारे दीड लाखापेक्षा अधिक कॅब, टॅक्सी, ऑटो रिक्षा चालक प्रवासी सेवा देत आहेत. परंतु या सर्व चालकांची भांडवलदार कंपन्यांच्या वतीने लूट होत आहे. अत्यंत तुटपुंजे मानधन दिले जात आहे. आठ रुपये किलोमीटर असे भाडे दिले जाते. याबद्दल प्रादेशिक परिवहन विभागाने खटवा कमिटीचे अंतर्गत पंचवीस रुपये भाडेवाढ निश्चित केली आहे. परंतु या भाडेवाढीची अंमलबजावणी होत नाही. यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील दहापेक्षा अधिक मोठ्या संघटना एकत्र आले असून त्यांनी गेल्या काही दिवसापासून हा प्रयत्न सुरू केला आहे. या अंतर्गत पुणे पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन या प्रश्नांबाबत तोडगा काढण्याची मागणी केली. एक तासापेक्षा अधिक चर्चा झाली. यावर अत्यंत समाधानकारक चर्चा झाली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली आहे.

दोन दिवसापूर्वी ऑटो रिक्षा, टॅक्सी दर निश्चितीची बैठक आयोजित करूनही भाववाढी संदर्भात योग्य निर्णय झाला नाही. आरटीओ अधिकाऱ्यांसह रिक्षा चालक संघटनांच्‍या पदाधिकाऱ्यांची चर्चा त्‍यामुळे विस्‍कटली आहे. त्‍या विरोधात नाराजी व्‍यक्‍त सर्व संघटनांच्या वतीने उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पोलिसांनी संघटनांना नोटीस देऊन उपोषणाची परवानगी नाकारली. खटवा समितीच्या शिफारसीप्रमाणे पुणे आरटीओच्‍या कमिटीने कॅबसाठी 25 रुपये दर निश्चित केले आहेत. परंतु आरटीओ कमिटीचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हाधिकारी यांना ठरवलेल्या दराची अंमलबजावणी करता येत नाही. पुणे जिल्हाधिकारी व आरटीओ विभाग ओला उबेर या भांडवलदार कंपन्यांसमोर हतबल झाले आहे का, असा संतप्‍त प्रश्न ऑटो, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी उपस्‍िथत केला होता. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऑटो रिक्षा, टॅक्सी दरवाढी संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ऑटो, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सहभाग घेतला होता. या आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी व आरटीओ अधिकारी यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्‍यामुळे ऑटो, टॅक्सी चालकांच्या संघटना आक्रमक होत प्रशासनाचा निषेध केला.

ओला, उबेर आणि रॅपिडो कंपन्यांना कोणत्याही प्रकारची अधिकृतपणे परवानगी दिलेली नाही. ओला, उबेर, रॅपिडोवर चालणाऱ्या सर्वच कंपन्या या बेकायदेशीर असून यांना कोणत्याही प्रकारचा परवाना नाही, हे स्वतः पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. परंतु या कंपन्यांवरती कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी दाखवत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भांडवलदार धोरणाच्या विरोधामध्ये व आरटीओ विभागाच्या मनमानी कारवाईच्या विरोधामध्ये लढा उभारणा असल्‍याचे बाबा कांबळे यांनी सांगितले. त्याबाबत पोलिस आयुक्तांची भेट घेतली. मात्र पोलिस आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने संघटनांनी समाधान व्यक्त केले.

निवडणूक खर्चाच्या दर निश्चितीबाबत राजकीय पक्षांची बैठक संपन्न

पुणे, दि.७: लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवार निवडणूक खर्चाची दरसूची निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक खर्च समन्वयक अधिकारी सोनाप्पा यमगर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

बैठकीला अपर जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, समिती सदस्य आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निवडणूक प्रचारादरम्यान विविध बाबींवर होणाऱ्या खर्चाच्या दराबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी काही सूचना केल्या. या सूचनांच्या अनुषंगाने याबाबत गठीत केलेल्या समितीत चर्चा करून दर अंतिम करण्यात येतील, असे श्री.यमगर यांनी सांगितले.

मतदार जनजागृतीकरीता खेड येथे पथनाट्याचे आयोजन

पुणे, दि.७: ‘उत्सव लोकशाहीचा अभिमान देशाचा’ या मतदार जनजागृती मोहीमेअंतर्गत उप विभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे आणि तहसिलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड विधानसभा मतदारसंघात पंचायत समिती आणि बस स्थानक येथे पथनाट्य व व्याख्यान आयोजित करुन मतदार जनजागृती करण्यात आली.

यावेळी नायब तहसीलदार रामदास बीजे, स्वीपचे समन्वयक तथा गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले, समन्वयक अधिकारी डॉ. प्रभाकर जगताप आदी उपस्थित होते.

पात्र नवयुवा मतदारांनी मतदार म्हणून नोंदणी करावी, मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याबाबत खात्री करुन घ्यावी. लोकशाही समृद्ध करण्यासाठी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी आपले अमुल्य मतदान करावे. मतदानाच्या दिवशी अधिकाधिक मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे तसेच आपल्या जवळच्या मतदारानांही मतदान करण्यास प्रोत्साहीत करावे, असे आवाहन श्री.जंगले यांनी यावेळी केले.

नारायण करपे, विजयकुमार तांबे, मुरलीधर कोहिनकर, कल्याण पिंगळे, मच्छिंद्र शेटे, गणेश सुतार, अमर केदारी यांनी पथनाट्य सादर केले.