पुणे, दि.७: ‘उत्सव लोकशाहीचा अभिमान देशाचा’ या मतदार जनजागृती मोहीमेअंतर्गत उप विभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे आणि तहसिलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड विधानसभा मतदारसंघात पंचायत समिती आणि बस स्थानक येथे पथनाट्य व व्याख्यान आयोजित करुन मतदार जनजागृती करण्यात आली.
यावेळी नायब तहसीलदार रामदास बीजे, स्वीपचे समन्वयक तथा गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले, समन्वयक अधिकारी डॉ. प्रभाकर जगताप आदी उपस्थित होते.
पात्र नवयुवा मतदारांनी मतदार म्हणून नोंदणी करावी, मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याबाबत खात्री करुन घ्यावी. लोकशाही समृद्ध करण्यासाठी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी आपले अमुल्य मतदान करावे. मतदानाच्या दिवशी अधिकाधिक मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे तसेच आपल्या जवळच्या मतदारानांही मतदान करण्यास प्रोत्साहीत करावे, असे आवाहन श्री.जंगले यांनी यावेळी केले.
नारायण करपे, विजयकुमार तांबे, मुरलीधर कोहिनकर, कल्याण पिंगळे, मच्छिंद्र शेटे, गणेश सुतार, अमर केदारी यांनी पथनाट्य सादर केले.