Home Blog Page 1173

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवान्यासाठी एक खिडकी सुविधा

पुणे, दि. ७: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी देण्यात येणाऱ्या विविध परवान्यासाठी एक खिडकी सुविधा सुरू करण्यात येणार असून निवडणूक विषयक विविध परवानग्यांसाठी संबंधितांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

नोंदणीकृत राजकीय पक्ष आणि नोंदणीकृत पक्षाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात तसेच उमेदवार किंवा प्रतिनिधींनी लोकसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात वाहन परवाना मिळविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय एक खिडकी कक्षात अर्ज करावा.

उमेदवार किंवा प्रतिनिधींनी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात वाहन परवाना मिळविण्याकरीता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज करावा. अर्जासोबत परिवहन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र, वाहनाचे आर.सी. पुस्तक, वाहनाचा विमा, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, कर भरल्याची पावती, व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, चालकाचा परवाना, पीयूसी, वाहनाच्या चारही बाजूचे छायाचित्र जोडावे.

विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात तात्पुरते पक्ष कार्यालय उघडण्याबाबत लागणाऱ्या परवान्याकरीता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय तसेच कोपरा सभा, प्रचार सभेसाठी मैदान परवाना, ध्वनीक्षेपण परवान्याकरीता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षातील पोलीस अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा. अर्जासोबत संबंधित जागा मालकांची संमती, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच पोलीस विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र जोडावे.

विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात फेरी, मिरवणूक, रोड शो, पदयात्रा, पथनाट्याचे आयोजन, ध्वनीक्षेपणाबाबत परवाना मिळण्याकरीता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षातील पोलीस अधिकारी तर लोकसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील परवान्याकरीता जिल्हास्तरीय एक खिडकी कक्षातील पोलीस अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा. अर्जासोबत पोलीस विभाग आणि वाहतूक नियंत्रण विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र जोडावे.

विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात स्टेज, बॅरिकेट आणि भाषणाकरीता उंच व्यासपीठ (रोस्ट्रम) उभारण्याबाबत लागणाऱ्या परवान्याकरीता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा. अर्जासोबत संबंधित जागा मालकांची संमती, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापत्य व विद्युत शाखा आणि अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र जोडावे.

जिल्ह्यात हेलीपॅडचे बांधकाम आणि हेलिकॉप्टर उतरविण्याबाबत लागणाऱ्या परवान्याकरीता ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखा , पुणे शहर हद्दीसाठी पुणे पोलीस आयुक्त कार्यालय आणि पिंपरी-चिंचवड हद्दीकरीता पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांच्या कार्यालयात अर्ज करावा. अर्जासोबत संबंधित जागा मालकांची संमती, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापत्य व विद्युत शाखा आणि अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र जोडावे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

पाचवी व आठवीची वार्षिक परीक्षा व नियतकालिक मूल्यांकन चाचणी ३ एप्रिल रोजी होणार

पुणे,दि. ७ : राज्यातील राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शाळा, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता ५ वी आणि ८ वी साठी ३ एप्रिल रोजी वार्षिक परीक्षा व नियतकालिक मूल्यांकन चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या कार्यालयाने दिली आहे.

इयत्ता ५ वी व ८ वीची वार्षिक परीक्षा ही द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे. या वार्षिक परीक्षांसाठी इयत्ता ५ वी ला प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, व परिसर अभ्यास हे विषय असतील तर इयत्ता ८ वी ला प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र हे विषय असतील. तसेच इयत्ता ५ वी आणि ८ वी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन योजनेतील संकलित मूल्यमापन २ म्हणजेच वार्षिक परीक्षा असणार आहे.

या परीक्षेकरिता प्रत्येक शाळांनी शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घेण्यात यावी. शाळांनी प्रश्नपत्रिका तयार करताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी त्यांच्या maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध नमुना प्रश्नपत्रिकेचा उपयोग करून प्रश्नपत्रिका तयार कराव्यात.

इयत्ता पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी ज्या विषयात उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत त्यासाठी त्यांच्या शाळेमार्फत त्या विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्याच्या आत पुनर्परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल. पुनर्परीक्षाचे आयोजनदेखील शासन निर्णयाप्रमाणे संबंधित शाळांनी करावयाचे आहे. पुनर्परीक्षा घेताना शाळांनी कोणती दक्षता घ्यावयाची याबाबतचे निर्देश संबधित शासन निर्णयात दिलेले आहेत.

नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पीएटी) शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ पासून राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता ३ री ते ८ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (एकूण १० माध्यम) करिता तीन नियतकालिक मूल्यांकन (पीएटी) चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन १ चे आयोजन करण्यात आले असून संकलित मूल्यमापन २ चे आयोजन २ ते ४ एप्रिल या कालावधीमध्ये राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये एकाच वेळी करण्यात येणार आहे.

इयत्ता ३ री, ४ थी, ६ वी, ७ वी करिता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या तीन विषयांकरिता नियतकालीक मुल्यांकन चाचणी हीच संकलित मूल्यमापन २ असेल त्यामुळे या विषयांसाठी स्वतंत्रपणे संकलित मूल्यमापन २ घेण्यात येणार नाही व उर्वरित विषयांचे संकलित मूल्यमापन २ शाळांनी त्यांच्या स्तरावर प्रश्नपत्रिका विकसित करून घ्यावयाच्या आहे.

इयत्ता ५ वी व ८ वी साठी मात्र नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पीएटी) ही संकलित मूल्यमापन २ असणार नाही. या दोन इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा ही स्वतंत्रपणे घेण्यात येईल. त्यामुळे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांनी २, ते ४ एप्रिल या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे आयोजन निश्चित केले असल्यामुळे या चाचणी नंतरच वार्षिक परीक्षेचे आयोजन शाळांनी करावे.

सर्व शाळांनी सूचनांप्रमाणे आपल्या स्तरावर इयत्ता ५ वी व ८ वी च्या वार्षिक परीक्षा शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे अंमलबजावणी करून यशस्वीपणे परीक्षा पार पाडाव्यात, यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक (समन्वय) डॉ. कमलादेवी आवटे यांनी केले आहे.

चतु:श्रृंगी येथे महिला सुरक्षा रक्षक पदांची कंत्राटी भरती

माजी सैनिक विधवा पत्नी किंवा त्यांच्या अवलंबितासाठी

पुणे, दि. ७ : माजी सैनिक महामंडळातर्फे पुणे शहरातील चतु:श्रृंगी येथे माजी सैनिक विधवा पत्नी किंवा त्यांचे अवलंबिताकडून महिला सुरक्षा रक्षक पदे भरण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून इच्छुक आणि शारीरिकदृष्ट्या योग्य असलेल्या उमेदवारांनी सर्व कागदपत्रासह १५ मार्च पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्हता दहावी पास व वय ३५ वर्षाखालील असावे. सुरक्षा रक्षक प्रशिक्षणाबाबतचे प्रमाणपत्र असावे. उमेदवाराची तीन शिफ्टमध्ये काम करण्यास तयारी असावी. निवड झालेल्या उमेदवाराला २५ हजार रूपये वेतन दिले जाईल. नियमानुसार वेतनातून रोजगार भविष्य निर्वाह निधी, उपदान आणि बोनससाठी ४ हजार ६०० रूपये वजा करण्यात येईल, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी कळविले आहे.

भारत जोडो न्याय यात्रेच्या मुंबईतील सांगता सभेतच इंडिया आघाडीचा लोकसभा प्रचाराचा शंखनाद – नाना पटोले

भारत जोडो न्याय यात्रा १२ तारखेला नंदूरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश करणार तर समारोप १७ तारखेला मुंबईत.

भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसची आढावा बैठक संपन्न.

भाजपाकडे सक्षम उमेदवार नसल्याने दुसऱ्या पक्षांच्या उमेदवारांची चोरी.

मुंबई, दि. ७ मार्च
खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करणार असून या यात्रेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. नंदूरबार येथून ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल व १७ मार्चला मुंबईत समारोप होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे. या सभेला इंडिया आघाडीचे नेते उपस्थित असतील व लोकसभा निवडणुकीचा शंखनाद फुंकला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीसाठी प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली, या बैठकीनंतर पटोले प्रसार माध्यमांशी बोलत होते, ते पुढे म्हणाले की, नंदुरबार ते मुंबई या प्रवासात अनेक कार्यक्रम होतील व त्यासाठी त्या-त्या भागातील नेत्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत. शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्याची परवानगी मागितली आहे. शिवाजी पार्क मिळेल अशी अपेक्षा असून राज्य सरकार अश्यात राजकारण करणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. भारत जोडो न्याय यात्रा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या भूमीत येत आहे. या महापुरुषांच्या विचारांना संपवण्याचे काम केंद्र व राज्यातील भाजपा सरकार करत आहे. भाजपा लोकशाही व संविधान संपवायला निघाले आहे परंतु त्यांना जशास तसे उत्तर देण्याची आमची तयारी आहे.

भारतीय जनता पक्षात आता सक्षम उमेदवार नाहीत म्हणून तर ते दुसऱ्या पक्षातील नेते चोऱ्या करून व दबावाने पळवत आहेत. भाजपाचे दोन कार्यकर्ते ईडी व सीबीआयही यासाठी कामाला लागले आहेत. भाजपा आता मोदी परिवार झाला असून जिंकण्याचा विश्वासही त्यांच्यात राहिलेला नाही. राष्ट्रीय नेतृत्व म्हणणाऱ्या नितीन गडकरी यांना उमेदवारी मिळेल की नाही हीच शंका आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत या राष्ट्रीय नेतृत्वाचे नाव असायला पाहिजे होते पण नाही. नागपूरसाठीही काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे व यावर्षी विजयी पताका फडकवू तसेच सांगलीची जागासुद्धा काँग्रेस लढणार आहे, असे नाना पटोले म्हणाले.
आजच्या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, अस्लम शेख, अमित देशमुख, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, AICC चे सचिव आशिष दुआ, बी. एम. संदीप, आ. प्रणिती शिंदे, खजिनदार डॉ. अमरजितसिंह मनहास, आ. भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.

पुणे विमानतळ नवे टर्मिनल उद्घाटन ऑनलाईनच करायचे होते तर रेंगाळत का ठेवले? – मोहन जोशी

पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन अखेरीस १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत हे ऐकल्यावर मनात येते की, ऑनलाईन पद्धतीनेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्घाटन करायचे होते तर ते आधीच का केले नाही? प्रवाशांची या नव्या टर्मिनलमुळे फार मोठी सोय होणार होती हे माहीत असूनही विमान प्रवास करणाऱ्या पुणेकरांची कुचंबणा करीत या नव्या टर्मिनलचे उद्घाटन इतके दिवस होऊ दिले नाही. या भाजपाच्या कृतीमुळे पुणेकरांमध्ये संताप उसळणे स्वाभाविक आहे असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

मोहन जोशी पुढे म्हणाले की, पुणे शहर कॉंग्रेस पक्ष आणि ‘वेक अप पुणेकर’ यांच्यामार्फत गेले अनेक महिने रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो आणि पुणे विमानतळ नव्या टर्मिनलचे लोकार्पण लगेच व्हावे यासाठी आम्ही आवाज उठवला, आंदोलने केली, घंटानाद केले. त्यामुळेच मेट्रो मार्गाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने नुकतेच केले गेले आणि आता नव्या टर्मिनलचे लोकार्पणदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत. जनआंदोलनाचे हे सारे श्रेय आहे, असे ते म्हणाले.

वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेळ नाही हे लक्षात घेता मेट्रोसाठी रेल्वेमंत्री आणि टर्मिनलसाठी हवाई वाहतूकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करता आले असते. असे सांगून मोहन जोशी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्यांच्या पक्षात दराराच एवढा मोठा आहे की, पुणे भाजपला रेल्वेमंत्री अथवा हवाई वाहतूकमंत्री हा पर्याय सुचवण्याचे धारिष्ट्य झाले नाही, हे देखील यातून दिसून येते.

राजकारणात कार्य करतांना विविध विषय, पक्षाची भूमिका आणि विधीमंडळातील आयुधांविषयी जाणून घ्या-डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे,दि.७:- राजकारणात येणाऱ्या महिलांची संख्या वाढत असतांना या क्षेत्रात काम करतांना महिलांनी विविध विषयांचा अभ्यास, पक्षाची भूमिका आणि विधीमंडळातील आयुधांविषयी जाणून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

महिला दिनाच्या औचित्याने नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात आयोजित ‘महिलांचे राजकीय सक्षमीकरण’या विषयावर आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. चर्चासत्रास प्रा. उल्हास बापट, आयएलएस विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दीपा पातूरकर, प्रा. बिंदू रोनाल्ड, ॲड. विजयालक्ष्मी खोपडे, नवलमल विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनीता आढाव, ॲड. अशोक पाळंदे उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, राजकारणात महिलांचा सहभाग वाढतो आहे. आज केवळ ८ टक्के महिला राजकारणात सक्रीय आहेत. नव्या विधेयकानुसार महिलांचे राजकारणातील प्रमाण वाढणार आहे, त्याला काही कालावधी लागेल. राजकारणात स्वत:ला सिद्ध करतांना महिलांना राजकीय क्षेत्रात सक्रीय होऊन राजकीय विचार मांडावे लागतील. राजकीय क्षेत्रातील महिलांनी विविध अहवालांचा, विचारांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अभ्यासासोबत पक्षाची भूमिका ठासून मांडण्याची कला अवगत असावी. विधीमंडळात उपयोगात येणाऱ्या आयुधांचा अभ्यासही महत्वाचा आहे. योग्य आयुधांचा अचूक वेळेला उपयोग करणेही तेवढेच महत्वाचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

समाजात कुटुंबियांच्या मतानुसार मतदान करणारी स्त्री आता स्वत:चा निर्णय घेऊ लागली आहे. महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने ही सकारात्मक बाब आहे. निवडणूक प्रक्रियेत वेगवेगळ्या स्तरावर महिलांचा सहभाग असतो. महिला उमेदवार, महिला अधिकारी, माध्यमांतील महिला अशा विविध स्तरांवर महिला आपली भूमिका बजावत असतात. लोकशाहीत महिला मतदारांची भूमिका अत्यंत महत्वाची असून महिला मतदारांनी अधिकारांबाबत जागरूक रहात आपल्या आकांक्षापूर्ततेसाठी जागरूक राहून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

राजकीय क्षेत्रात वावरतांना महिला लोकप्रतिनिधींना अनेक आव्हानांना सामारे जावे लागते, त्यांना संघर्षाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत महिलांनी धैर्याने काम करावे. लोकशाहीत आपली भूमिका इतरांपर्यंत पोहोचविणे महत्वाचे आहे. यासाठी माध्यमे महत्वाचे कार्य करत असल्याने महिलांनी माध्यमातून आपली भूमिका ठामपणे मांडणे गरजेचे आहे. माध्यमाद्वारे जनतेशी जोडले न गेल्यास राजकारणात मागे राहण्याची शक्यता असते.

पक्षासोबत विविध क्षेत्रातील संस्था, संघटना, प्रतिनिधी यांच्याशी सातत्याने होणारा संवाद उपयुक्त ठरतो. जनता आपली मार्गदर्शक आहे हे लक्षात घेऊन काम केले तर राजकीय क्षेत्रात चांगला प्रभाव पाडता येतो. विधानसभेतील महिलांची भूमिका बघत असताना तिथे तुम्ही महिला म्हणून नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडावी लागते, असेही डॉ.गोऱ्हे म्हणाल्या.

यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला. विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी व मतदानाविषयी जागरुकता दाखवावी असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विधी महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
000

भगवान प्रभू रामाचा अपमान करणाऱ्या ए. राजा यांचा तीव्र निषेध

भाजपा आ. तमिल सेल्वन यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा

मुंबई दिनांक ७ मार्च २०२४
भगवान राम यांना शत्रू म्हणत त्यांचा अपमान करणाऱ्या द्रमुक नेते, माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांच्या निषेधार्थ भाजपा आ. तमिल सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली सायन गांधी मार्केट येथे विराट निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी ए. राजा यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. भाजपा कार्यकर्त्यांकडून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणबाजीही करण्यात आली.

सनातन धर्मावर हल्ला केला जात आहे. प्रभू रामाची खिल्ली उडवली जात असताना काँग्रेस सारखे सहयोगी पक्षही मूग गिळून गप्प आहेत.भारतीय संस्कृतीचा अपमान करणे, हिंदू देवतांचा जाहीर अपमान करणे आणि देशाच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे इंडी आघाडीचे रोजचे काम झाले आहे. हे तेच लोक आहेत ज्यांना भारतीय संस्कृती नष्ट करायची आहे. या सगळ्या विरोधात ठामपणे उभा राहून जागरूक हिंदू तीव्र लढा देईल असेही भाजपा आ. तमिल सेल्वन म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

धर्मादाय संस्थांकडील निधीचा योग्य विनियोग होणे गरजेचे: खासदार मेधा कुलकर्णी

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेला ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत
पुणे : सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजोपयोगी काम होत आहे. संस्थेकडे आलेल्या निधीचा योग्य व चांगला विनियोग होणे गरजेचे असते, ते काम अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट करीत आहे. दृष्टीहिन व्यक्ती अपंगत्व असतानाही स्वत:च्या पायावर उभे राहतात. आपण अनेकदा अडचणींसमोर हात टेकतो, त्यावेळी आपण प्रत्येकाने अशा लढवय्या दृष्टीहिन व्यक्तींचे काम डोळ्यासमोर आणायला हवे, असे मत राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ.मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेला ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान व दृष्टीहिन बांधवांसाठी भोजन समारंभाचे आयोजन मंडईतील बुरुड आळी येथे करण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, पोलीस उपायुक्त स्माथना पाटील ,संदीपसिंह गिल्ल, उद्योजक युवराज ढमाले, प्रिती सुनील कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते. ट्रस्टचे सहाय्यक प्रख्यात उद्योजक प्रकाश धारिवाल व युवराज ढमाले यांच्या जन्मदिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला.

रवींद्र धंगेकर म्हणाले, धार्मिकतेकडून विधायकतेकडे या ट्रस्टने चांगली वाटचाल सुरु ठेवली आहे. वंचित लोकांकडे समाजाचे लक्ष जात नाही. त्यांना मदत देणे गरजेचे असते. म्हसोबा ट्रस्ट सारख्या सामाजिक संस्था अशा वंचितांकडे लक्ष देऊन त्यांना मदतीचा हात देत असल्याचे कार्य कौतुकास्पद आहे.

निवृत्ती जाधव म्हणाले, केवळ आर्थिक मदत न देता दिव्यांग कलाकारांची विशेष संगीत मैफल आयोजित करुन त्यांच्यातील गुण सामान्य नागरिकांसमोर सादर व्हावे, याकरिता देखील प्रयत्न करण्यात येत आहे. लुई ब्रेल अंध अपंग संस्था समाजातील दुर्बल घटकांना प्रेरित करून त्यांच्या कलागुणांना वाट मोकळी करून देत जगण्याचा सुरेख मार्ग दाखवित आहे. त्यांच्या पंखांना बळ देण्याचा प्रयत्न म्हसोबा ट्रस्ट करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.

आम्ही विधानसभेलाच अडकलोय : रवींद्र धंगेकर
मी आणि मेधा कुलकर्णी यांनी अनेक वर्षे पुणे महानगरपालिकेत एकत्र काम केले. विचारांची लढाई विचारांनी लढली. मात्र, मेधाताई नशिब काढून आल्या आहेत. त्यांनी थेट खासदारकीला उडी मारली. आम्ही मात्र अजून विधानसभेलाच अडकलोय, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

प्राचीन संहिता गुरुकुलाच्या चार अभ्यासक्रमांना दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाची मान्यता

पुणे : दिल्ली येथील राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाकडून प्राचीन संहिता गुरुकुलाच्या चार आयुर्वेद अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली प्राचीन संहिता गुरुकुल ही भारतातील खासगी क्षेत्रातील पहिलीच संस्था ठरली आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे सचिव डॉ. राजेश कोटेचा, आयुर्वेद महर्षी डॉ. मनोज नेसरी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाच्या डॉ. तनुजा नेसरी, भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी यांच्या हस्ते गुरुकुलाचे प्रमुख डॉ. हरीश पाटणकर यांनी मान्यतेचे प्रमाणपत्र स्वीकारले.
प्राचीन संहिता गुरुकुल ही आयुर्वेदातील विद्यार्थी घडविणारी संस्था असून, या संस्थेच्या सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजी अँड ट्रायकोलॉजी विथ मॉडर्न आस्पेक्ट (बेसिक, २०० तास), सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजी अँड ट्रायकोलॉजी विथ मॉडर्न आस्पेक्ट (अडवान्सड, ५०० तास), सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेदिक क्लिनिकल डायटेटिक्स, न्यूट्रिशन अँड इम्युनिटी (२०० तास), सर्टिफिकेट कोर्स इन मर्म अँड नाडी विज्ञान (२०० तास) या चार अभ्यासक्रमांसाठी ही मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठातर्फे नऊ संस्थांना प्रमाणित करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रामधून प्राचीन संहिता गुरुकुल ही एकमात्र संस्था आहे.
या यशाबद्दल डॉ. हरीश पाटणकर यांनी आनंद व्यक्त केला. ‘भारत सरकारच्या सर्वोत्तम संस्थेकडून गौरव होणे आनंदाची बाब आहे. सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज, गुरू वैद्य समीर जमदग्नी, वैद्यराज दिवाकर जुवेकर, प्राचीन संहिता गुरुकुलचे सर्व गुरूवर्य आणि ज्ञानसंकुल विद्यार्थी संघाचे सर्व विद्यार्थी यांचे खूप मोठे योगदान आहे. तसेच गुरुकुलाच्या उभारणीत आई-वडील, बंधू पंकज पाटणकर, पत्नी डॉ. स्नेहल पाटणकर यांचा मोठा वाटा आहे. डॉ. रश्मी वेद, मनीष जानी, डॉ. गायत्री संत, डॉ. गायत्री पांडव यांच्यासह वैद्य निलेश ढवळे, विवेक आंबरे, ओमप्रसाद जगताप, स्वप्नील भाकरे, केदार जोशी आणि अगणित जुने व नवे प्राचीन संहिता गुरुकुल आणि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ एन्सीएंट सायन्सेस एंड मॉडर्न टेक्नोलॉजीचे सहकारी यांची साथ लाभली

वेदांताच्या बाल्को मेडिकल सेंटरला प्रतिष्ठित कॅन्सर ग्रँड चॅलेंजेस पुरस्कार

·         25 दशलक्ष डॉलर्सचे कॅन्सर ग्रँड चॅलेंजेस पुरस्कार प्राप्त करणारा पहिला भारतीय सह-संशोधक संघ

·         कॅन्सर ग्रँड चॅलेंजेस द्वारे प्रदान करण्यात आलेला प्रतिष्ठित पुरस्कार – कर्करोग संशोधनासाठी सर्वात मोठे जागतिक निधी देणारे दोन कॅन्सर रिसर्च यूके आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यूएस द्वारे सह-स्थापित जागतिक संशोधन उपक्रम

·         BMC ही मध्य भारतात 37,000 रुग्णांना सेवा देणारी अत्याधुनिक ऑन्कोलॉजी संस्था आहे

पुणे, 7 मार्च 2024: भारतातील ऑन्कोलॉजी क्षेत्रातील एक उदयोन्मुख विभाग, वेदांताच्या बाल्को मेडिकल सेंटरने (BMC), प्रतिष्ठित कॅन्सर ग्रँड चॅलेंजेस पुरस्कार प्राप्त करणाऱ्या संघातील पहिले भारतीय सह-संशोधक बनून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या पुरस्कारासह कर्करोग संशोधनासाठी 25 दशलक्ष डॉलर्सचे अनुदान भारतातील ऑन्कोलॉजी क्षेत्रातील एक अग्रणी संस्था म्हणून BMC चे स्थान अधोरेखित करते. बाल्को मेडिकल सेंटर आणि जगभरातील इतर प्रतिष्ठित संस्थांमधील चिकित्सक, अधिवक्ता आणि शास्त्रज्ञ यांचा समावेश असलेली पुरस्कार प्राप्त टीम प्रॉस्पेक्ट कर्करोगाच्या सुरुवातीच्या गंभीर समस्येवर लक्ष देईल.

वेदांत मेडिकल रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुश्री ज्योती अग्रवाल यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “कॅन्सरविरुद्धच्या लढाईत लक्षणीय प्रगती करणाऱ्या या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल आम्हाला आमचा अभिमान वाटतो. गेल्या सहा वर्षांत, बीएमसीमध्ये, आमचे नेते, कर्मचारी आणि भागधारकांनी आम्हाला सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे, तसेच आमचे रुग्ण आणि समुदायाला सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. कॅन्सर ग्रँड चॅलेंजेसच्या या पाठिंब्यामुळे आमच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. या अशा सहकार्यामुळे आणि प्रयत्नांमुळे, आम्ही आरोग्यसेवेत सकारात्मक योगदान देऊ शकतो.”

कॅन्सर ग्रँड चॅलेंजेसद्वारे ज्यांना यंदा निधी देण्यात आला, अशा पाच जागतिक संघांपैकी टीम PROSPECT ही एक आहे. याची स्थापना 2020 मध्ये कर्करोग संशोधन यूके आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यूएस यांनी केली होती. विविध जागतिक दर्जाच्या संशोधन संघानी एकत्र येत वेगळा विचार मांडावा आणि कर्करोगाची काही कठीण आव्हानांवर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत, हा त्यामागचा उद्देश आहे. कॅन्सर रिसर्च यूके, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, कॅन्सर रिसर्च यूके आणि इन्स्टिट्यूट नॅशनल डू कॅन्सर द्वारे कॅन्सर ग्रँड चॅलेंजेसच्या माध्यमातून कॅन्सर रिसर्चमधील काही कठीण आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकूण 125 मिलियन डॉलर्स गुंतवणुकीद्वारे संघांना निधी दिला जाईल.

आमचे दूरदर्शी भागीदार आणि संशोधकांच्या नेटवर्कमुळे, कॅन्सर ग्रँड चॅलेंज हे जगभरातील चांगल्या आणि हुशार व्यक्तींना एकत्र आणते. यासाठी देशाच्या सीमांचाही अडथळा येत नाही. कारण, या सर्वांचे उद्दिष्ट कर्करोगाच्या कठीण समस्यांवर मात हे असते, असे कॅन्सर ग्रँड चॅलेंजेसचे संचालक डॉ. डेव्हिड स्कॉट म्हणाले. “ही आजपर्यंतची आमची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. यासह आम्ही जागतिक संशोधन समुदाय वाढवत आहोत. आणि कर्करोगाच्या परिणामांवर सकारात्मक परिणाम करू शकणाऱ्या नवीन संघांना निधी देत ​​आहोत.

वेदांताचे बाल्को मेडिकल सेंटर हे मध्य भारतातील आधुनिक सामुग्रीने सज्ज असलेले ऑन्कोलॉजी केंद्र आहे, जे कर्करोगाच्या उपचारांमध्ये आघाडीवर आहे. वेगवेगळ्या कर्करोगांवर उपचार आणि रुग्णांना गरजेचा असलेला धीर येथे दिला जातो. प्रगत रेडिएशन थेरपी, ब्रेकीथेरपी, न्यूक्लियर मेडिसिन, शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि इतर अनेक उपचारांसाठी ही संस्था रेफरल सेंटर म्हणून ओळखली जाते. मार्च 2018 मध्ये या केंद्राची स्थापना झाली, तेव्हापासून बीएमसीने 37,000 हून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. याव्यतिरिक्त, संस्थेला LEED प्रमाणपत्र, NABH, FSSAI, NABL, नर्सिंग एक्सलन्स, CAHO प्रमाणपत्रांसह अनेक प्रमाणपत्रे आणि मान्यता प्राप्त मिळाली आहे. हे महत्त्वपूर्ण अनुदान भारतातील गंभीर आरोग्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपाय देण्यासाठी BMC ची वचनबद्धता अधोरेखित करते.

डॉ. भावना सिरोही, वेदांत मेडिकल रिसर्च फाउंडेशन (बाल्को मेडिकल सेंटर) मधील वैद्यकीय संचालक आणि PROSPECT-इंडिया अभ्यासाच्या प्रमुख संशोधक म्हणतात, “कोलोरेक्टल कॅन्सरमधील चिंताजनक वाढ लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जीवनशैली निवडीवर भर देते. विशेषत: तरुण लोकसंख्या पाहता लवकर निदान आणि त्वरित उपचार सुलभ करण्यासाठी कर्करोग तपासणी केंद्रांची नितांत गरज आहे. या अनुदानामुळे कोलोरेक्टल कॅन्सर होण्यामागील कारणे आणि प्रतिबंधात्मक धोरणे समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करून, जागतिक कर्करोग संशोधनाला गती मिळेल.”

कोलोरेक्टल कॅन्सर (EOCRC) ही 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमधील एक महत्त्वाची जागतिक समस्या आहे. टीम PROSPECT चे उद्दिष्ट विकासाचे मार्ग शोधणे, जोखीम घटक समजून घेऊन त्याचे निराकरण करणे हे आहे. EOCRC ला प्रोत्साहन देण्यासाठी सामान्य जैविक प्रक्रियांमध्ये व्यत्यय आणणारी कारणे समजून घेणे आणि ते बदलण्याचा प्रयत्न करणे हा संघाचा प्रयत्न आहे. कोलोरेक्टल कॅन्सरचे लवकर निदान आणि त्यावर मात करण्यासाठी नवनवीन प्रकार अवलंबणे अशी यांची कार्यपद्धती आहे.

सध्या, कॅन्सर ग्रँड चॅलेंजेससमोर 13 आव्हाने असून त्यासाठी त्यांनी जगभरातील 1,200 संशोधक आणि 16 संघ एकत्र आणले आहेत. परतफेडीची भावना ही वेदांताच्या मूलभूत मूल्यांचा भाग आहे. आपल्या प्रयत्नांचे होत असलेले कौतुक हे नव्याने जोमाने काम करायला बळ देते. यामुळे समाजासाठी योगदान देणे आणि समाजावर कायमस्वरूपी प्रभाव टाकण्याचे स्वप्न पूर्ण होणे, अशक्य वाटत नाही.

खराडी ॲनेक्समध्ये महिंद्रा कोडनेम क्राऊन

विचारपूर्वक तयार केलेल्या 506 घरांसह जगण्याची नवीन भाषा शिका

पुणे, 07 मार्च 2024: महिंद्रा समुहाचा रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकासातील महत्त्वाचा विभाग महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडने (MLDL) महिंद्रा कोडनेम क्राऊन लॉन्च करण्याची घोषणा केली. वर्ल्ड ट्रेड सेंटरपासून अवघ्या 4 किमी अंतरावर, खराडी ॲनेक्समध्ये हा कॉम्प्लेक्स असेल. 5.38 एकर्स एवढ्या विस्तृत जागेवर वसलेल्या या कॉम्प्लेक्समध्ये, महिंद्रा कोडनेम क्राऊन येथे 2, 3 आणि 4 BHK घरे उपलब्ध आहेत. आलिशान राहणीमानाचा अनुभव देणाऱ्या या कॉम्प्लेक्सला 04 मार्च 2024 रोजी RERA मिळाले.

पहिल्या टप्प्यात 2 आणि 3 BHK घरांच्या दोन टॉवर्सचे आणि 500 हून अधिक घरांचा समावेश असलेल्या विशेष 4 BHK टॉवरचे उद्घाटन होईल. मालकीचे घर हे सातत्याने बदलले जात नाही, त्यामुळे जे घर घेतले जाते, ते कुटुंबाच्या सगळ्या गरजा पूर्ण करणारे आणि प्रशस्त असावे अशी अपेक्षा असते. महिंद्रा कोडनेम क्राऊन हे नेमके हाच विचार करून बांधण्यात आलेले आहे. तसेच या प्रकल्पाची रचना मोठे डेक, क्रॉस-व्हेंटिलेशन, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ शौचालये आणि इतर अशा वैशिष्ट्यांसह करण्यात आली आहे.

महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार सिन्हा म्हणाले,

“महिंद्रा कोडनेम क्राऊन हा आमचा नवीन आणि आलिशान प्रकल्प पुणेकरांसाठी सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. ग्राहकांचे जगणे समृद्ध करण्याबरोबरच त्यांच्या गरजांना प्राधान्य देणे, हेच आमचे ध्येय आहे. पुण्याच्या IT हबच्या बाजूलाच वसलेल्या आमच्या या प्रकल्पामुळे त्याचे मूल्य आणखी वाढते. तसेच आमच्या ग्राहकांना आरामदायी आणि आधुनिक जीवनशैली मिळते. कॉम्पेक्समध्ये मिळणाऱ्या सुविधा महत्त्वाच्या असतातच, पण महिंद्र कोडनेम क्राऊन येथे आम्ही घराला, घराच्या रचनेला जास्त महत्त्व देतो. जेणेकरून ग्राहकांसाठी येथे राहणे सुखावह आणि आनंदी होईल.

Mahindra Codename Crown हे पूर्व पुणे परिसरात वसलेले आहे. हे इतक्या मोक्याच्या ठिकाणी आहे, की याच्या आसपास वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल, युरो स्कूल आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यांसारख्या उच्च शैक्षणिक संस्था आहेत. यासोबतच विमान नगर, मगरपट्टा आणि हडपसरमधील आयटी हबसोबत याची उत्तम कनेक्टिव्हिटी आहे.

सरकार आल्यावर पदवीधरांना दरवर्षी 1 लाख रुपये,राहुल गांधी म्हणाले- 30 लाख तरुणांना नोकऱ्या देणार

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज दुपारी राजस्थानमध्ये दाखल झाली. रतलाम (मध्य प्रदेश) येथील सैलाना येथून बांसवाडा येथील दानपूरपर्यंत यात्रेने प्रवेश केला. खुल्या जीपमधून राहुल राजस्थानच्या सीमेवर पोहोचले. येथून ते जीपमधून बांसवाडा शहरात आले.

येथे, सुमारे 20 मिनिटांच्या रोड शोनंतर, राहुल गोविंद गुरु सरकारी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर जाहीर सभेत म्हणाले – दिल्ली रेल्वे स्टेशनवर एक तरुण कुली भेटला. तो मला म्हणाला- मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि कुली म्हणून काम करतो. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की सरकार आल्यानंतर आमचे पहिले काम वंचित वर्गाला 30 लाख नोकऱ्या देण्याचे असेल. प्रत्येक पदवीधर तरुणांना प्रशिक्षण आणि दरवर्षी एक लाख रुपये देण्याबाबतही राहुल यांनी सांगितले.

तत्पूर्वी राहुल यांचे जाहीर सभेत स्वागत करण्यात आले. जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले महेंद्रजित सिंग मालवीय यांच्यावर निशाणा साधला. त्याचवेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, भाजप फक्त सुका मेवा खायला बसला आहे. ते नेहमी घराणेशाहीबद्दल बोलतात, पण गेल्या 10 वर्षांत त्यांनी काय केले ते ते सांगत नाहीत.

तत्पूर्वी बांसवाडा शहरात तीन ठिकाणी न्याय यात्रेचे स्वागत करण्यात आले. राहुल यांची न्याय यात्रा आज संध्याकाळी गुजरातमध्ये दाखल होणार आहे.

राहुल म्हणाले- पेपर लीक झाल्यास कडक कारवाई केली जाईल
पेपर लीकवर राहुल म्हणाले – परीक्षेच्या दिवशीच पेपर लीक झाल्याचे कळते. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पेपर चोरतात आणि पेपर लीक करतात. त्यानंतर आम्हाला सांगण्यात येते आता नोकरी मिळणार नाही. हे सर्व भरतीमध्ये होते.
पेपरफुटीविरोधात कायदा आणू. यामध्ये आम्ही परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल करू. खासगी कंपन्यांसोबतचे करार बंद करून सरकारी यंत्रणांना प्राधान्य देणार. त्यानंतरही पेपर फुटल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

जात जनगणनेतून फसवणूक कशी होते हे उघड होईल
राहुल गांधी म्हणाले- भारतातील गरीब दुखावले जात आहेत. त्यांचा एक्स-रे करा आणि नंतर मी त्यांचा एमआरआय देखील करून देईन.
देशातील मोठमोठ्या संस्थांमध्ये किती आदिवासी आणि दलित आहेत याची सर्व माहिती मी समोर आणणार आहे. देशातील 10 पैकी 9 लोक तुमचे आहेत, पण तुमचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. तुमच्या खिशातील पैसा देश चालवणाऱ्या 50 टक्के लोकांच्या खिशात जातो. हे सर्व जातीय जनगणनेतून उघड होईल आणि त्यांची फसवणूक कशी होते हे 90 टक्के लोकांना कळेल.

राहुल म्हणाले- राष्ट्रपतींना थेट संदेश, तुम्ही आदिवासी आहात, तुम्ही आत जाऊ शकत नाही
राहुल गांधी म्हणाले- शेतकऱ्यांनी त्यांचे मत मांडले आणि आम्ही आमच्या जाहीरनाम्यात क्रांतिकारी काम केले आहे. त्यांना पहिल्यांदा कायदेशीर MSP मिळायला हवी. जाहीरनाम्यात दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या आम्ही पूर्ण केल्या आहेत.
जात जनगणनेबाबत राहुल म्हणाले – भारतातील संस्था, बजेट आणि पैसा पाहिला तर गरीब आणि दलित वर्गातील लोकांचा सहभाग कमी आहे.
राष्ट्रपती हे आदिवासी आहेत. राम मंदिराचे उद्घाटन झाले. तुम्ही त्यांचा चेहरा टीव्हीवर पाहिला का? ते का दाखवले नाही? कारण त्या आदिवासी आहेत. त्या भारताच्या राष्ट्रपती आहेत, पण राम मंदिराच्या उद्घाटनात राष्ट्रपती सहभागी व्हावे, असा थेट संदेश त्यांना देण्यात आला. तुम्ही आदिवासी आहात, तुम्ही आत जाऊ शकत नाही

स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीबाबत पदयात्रा संपन्न

अधिकाधिक युवा मतदारांनी मतदान करावे-उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे

पुणे,दि.७ : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, वर्शिप अर्थ फांउडेशन, निवडणुक साक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मतदारांचे स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने बालगंधर्व रंगमंदीर ते डेक्कन दरम्यान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी अधिकाधिक युवा मतदारांनी मतदान करावे; आपल्या परिसरातील सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन यावेळी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी केले.

श्रीमती तांबे म्हणाल्या, मतदान प्रक्रीयेमध्ये अधिकाधिक युवकांना सहभागी करुन मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्याच्यादृष्टीने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. निवडणुक साक्षता मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात मतदार नोंदणीच्याअनुषंगाने चांगले काम करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांना प्राधान्याने मतदान करता येणार आहे. आचारसंहिता कालावधीत निवडणुकीच्या अनुषंगाने अनुचित प्रकार घडल्यास त्याविषयी ‘सी-व्हिजिल ॲप’ वर तक्रार नोंदविता येणार आहे. आपल्या मतदारसंघातील उमेदवारांची माहिती ‘केवायसी ॲप’वर देण्यात येते.

भारत निवडणूक आयोगाच्या https://www.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा ‘वोटर हेल्पलाईन ॲप’ वर नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करता येते. प्रत्येक नव मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये असल्याबाबत यात्री करुन घ्यावी, अशी माहिती श्रीमती. तांबे यांनी दिली.

शिवाजीनगरचे सहायक निवडणूक अधिकारी दादासाहेब गीते म्हणाले, निवडणुकीच्यावेळी महिला मतदारांनी अधिकाधिक प्रमाणात मतदान करण्याच्यादृष्टीने जनजागृतीकरीता या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा. तरुण पिढीने परिसरातील सर्व घटकातील नागरिकांना जबाबदारीपूर्वक मतदान करण्याबाबत प्रोत्साहीत करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पदयात्रेदरम्यान विविध घोषवाक्यांचे घोषणाफलक घेवून मतदान करण्याचा संदेश दिला. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन केले. विद्यार्थ्यांना मतदान करण्याबाबत शपथही देण्यात आली.

मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे आगार:700 कोटींच्या कंत्राटावर डल्ला मारण्यासाठी नियमांना केराची टोपली – विजय वडेट्टीवार

मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे आगार बनले आहे. लोकनियुक्त सदस्य महापालिकेत नसल्याचा फायदा घेत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई साफ करण्याचा उद्योग सुरू केला आहे. निविदा प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करुन रस्ते विकासाच्या निविदा अंतिम केल्याचे 700 कोटींच्या घोटाळ्याचे प्रकरण आता समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सरकारने शोधला पाहिजे, अन्यथा जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचा हा उद्योग सरकारच्या आशिर्वादाने सुरूच राहणार, असा जोरदार हल्लाबोल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला पुन्हा वाचा फोडली आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ही रस्ते विकास निविदा प्रक्रिया थांबण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाने 700 कोटी रुपयांचे कंत्राट निविदा प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करुन अंतिम केले आहे. एम. एम. आर. डी.ए.ने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्यानंतर दोन्ही महामार्गावरील प्रवेश नियंत्रण प्रकल्पांतर्गत पूर्व द्रुतगती महामार्गवर एक जंक्शन आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर तीन जंक्शन यांची सुधारणा करण्याच्या कामासाठी महापालिकेने तातडीने निविदा मागवल्या होत्या.

प्राप्त निविदा 28 फेब्रुवारी, 2024 रोजी उघडण्यात आल्या. या निविदेत प्रशासकीय अंदाजित दराच्या तुलनेत सात टक्के अधिक दराने सुमारे 758 कोटी रुपयांमध्ये बोली लावणाऱ्‍या आर.पी.एस.इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीला पात्र ठरवण्यात आले. निविदा 28 फेब्रुवारी, 2024 रोजी उघडण्यात आल्यानंतर लेखा (वित्त) विभाग आणि उपायुक्त (पायाभूत सेवा) यांनी मंजुरी देण्याचे काम एका दिवसात पार पाडले. त्यानंतर 29 फेब्रुवारी, 2024 रोजी रस्ते विभागाने अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्या स्वाक्षरीने आयुक्तांच्या मंजुरीला हा प्रस्ताव पाठवला. कार्यादेश बजावण्याची कार्यवाही रस्ते विभागाकडून तात्काळ होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील निविदा अंतिम करण्याबाबतच्या कार्यवाहीचा इतिहास बघितला तर प्रशासकीय मंजुरीचा मसुदा बनवायला काही महिने लागतात. या प्रकरणात मात्र निविदा उघडल्यानंतर एका दिवसात दोन विभागांनी छाननी करुन अंतिम प्रस्‍ताव आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठविण्याची केलेली कार्यवाही संशयास्पद असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभेची आचारसंहिता येत्या काही दिवसात लागणार आहे. महापालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूकीच्या कामासाठी पाठविण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत एवढ्या जलदगतीने कार्यवाही करणे संयुक्तिक नव्हते. आयुक्तांनी अर्थसंकल्पात या कामाबाबतचा उल्लेख केला होता. त्यानंतर काही महिन्यांचा काळ गेला. ही कार्यवाही या काळात महापालिकेला करता आली असती. एवढा काळ वाया घालवून नियम धाब्यावर बसवून 700 कोटी रुपयांच्या मोठ्या कामाची निविदा अंतिम करण्याची कार्यवाही महापालिकेकडून केली गेली आहे. ही अतिशय गंभीर व संशयास्पद बाब आहे. त्यामुळे याबाबतची चौकशी करण्याबाबतचे आदेश देऊन वर्क ऑर्डर देण्याची कार्यवाही थांबवावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मोदींच्या काळात देश कर्जात बुडाला; आपण देशात नवा हुकूमशाह निर्माण केला

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपण देशात नवा हुकूमशाह निर्माण केला आहे. देशाची व्यवस्था एवढी बिघडवलेय की, कोर्टाला म्हणावे लागले की मीच आता निवडणूक अधिकारी. चंदिगडमध्ये भाजपने काय केले,भय निर्माण केले. कोर्टातदेखील अधिकारी खरे बोलत नाही. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मते मोजली तेव्हा जिंकलेला माणूस हरलेला होता आणि हरलेला माणूस जिंकला होता, हे स्पष्ट झाले.

जागतिक बँकेच्या माहितीनुसार, मोदी सत्तेत येण्यापूर्वी देशातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर 24 रुपयांचे कर्ज होते. गेल्या 10 वर्षाच्या कालावधीत दरडोई कर्जाचा आकडा 84 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, एखाद्याला 10 हजार पगार मिळत असेल आणि बँकेला 10 हजार हप्ता द्यावा लागत असेल तर आपल्याकडे काही शिल्लक राहील का? अशावेळी आपण घरदार विकायला काढतो ना? 2026 साली देश कर्जात बुडालेला असेल. आपल्याला घरातील भांडी विकावी लागतील, अशी परिस्थिती ओढावेल, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

भाजपमध्ये गेला की चोर बनतो साधू

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आज देशात तपासयंत्रणांकडून धाडी टाकल्या जात आहेत. गेल्या 10 वर्षात सरकारने किती धाडी घातल्यात याचे आकडे द्यावेत. धाडी घालणे तुमचा अधिकार आहे. पण त्यापैकी कितीजणांना कोर्टाने शिक्षा सुनावली? उलट असे दिसत आहे की, गंगेत स्नान केल्यासारखा चोर भाजपमध्ये साफ होऊन जातो.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातच्या माणसांना एक वागणूक आणि इतरांना वेगळी वागणूक दिली जाते. तुम्ही मोदींना पुन्हा सत्तेत आणले तर पुढील पाच वर्षांमध्ये सर्वच कारखाने गुजरातला गेले म्हणून समजा. मला माहिती आहे की, तुम्हाला या गोष्टी पचवणे कठीण आहे. पण इथले कारखाने पळवलेत की नाही? मग उद्या पुन्हा ते पळवले जातील. मतांच्या रुपाने तुम्ही मोदींना त्या गोष्टीचे लायसन्स द्याल. त्यामुळे भाजपला मतदान करु नका.