अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेला ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत
पुणे : सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजोपयोगी काम होत आहे. संस्थेकडे आलेल्या निधीचा योग्य व चांगला विनियोग होणे गरजेचे असते, ते काम अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट करीत आहे. दृष्टीहिन व्यक्ती अपंगत्व असतानाही स्वत:च्या पायावर उभे राहतात. आपण अनेकदा अडचणींसमोर हात टेकतो, त्यावेळी आपण प्रत्येकाने अशा लढवय्या दृष्टीहिन व्यक्तींचे काम डोळ्यासमोर आणायला हवे, असे मत राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ.मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेला ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान व दृष्टीहिन बांधवांसाठी भोजन समारंभाचे आयोजन मंडईतील बुरुड आळी येथे करण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, पोलीस उपायुक्त स्माथना पाटील ,संदीपसिंह गिल्ल, उद्योजक युवराज ढमाले, प्रिती सुनील कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते. ट्रस्टचे सहाय्यक प्रख्यात उद्योजक प्रकाश धारिवाल व युवराज ढमाले यांच्या जन्मदिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला.
रवींद्र धंगेकर म्हणाले, धार्मिकतेकडून विधायकतेकडे या ट्रस्टने चांगली वाटचाल सुरु ठेवली आहे. वंचित लोकांकडे समाजाचे लक्ष जात नाही. त्यांना मदत देणे गरजेचे असते. म्हसोबा ट्रस्ट सारख्या सामाजिक संस्था अशा वंचितांकडे लक्ष देऊन त्यांना मदतीचा हात देत असल्याचे कार्य कौतुकास्पद आहे.
निवृत्ती जाधव म्हणाले, केवळ आर्थिक मदत न देता दिव्यांग कलाकारांची विशेष संगीत मैफल आयोजित करुन त्यांच्यातील गुण सामान्य नागरिकांसमोर सादर व्हावे, याकरिता देखील प्रयत्न करण्यात येत आहे. लुई ब्रेल अंध अपंग संस्था समाजातील दुर्बल घटकांना प्रेरित करून त्यांच्या कलागुणांना वाट मोकळी करून देत जगण्याचा सुरेख मार्ग दाखवित आहे. त्यांच्या पंखांना बळ देण्याचा प्रयत्न म्हसोबा ट्रस्ट करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.
आम्ही विधानसभेलाच अडकलोय : रवींद्र धंगेकर
मी आणि मेधा कुलकर्णी यांनी अनेक वर्षे पुणे महानगरपालिकेत एकत्र काम केले. विचारांची लढाई विचारांनी लढली. मात्र, मेधाताई नशिब काढून आल्या आहेत. त्यांनी थेट खासदारकीला उडी मारली. आम्ही मात्र अजून विधानसभेलाच अडकलोय, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.