नागपूर -नागपूरमधून नितीन गडकरी मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. त्यांना एकूण मतदानाच्या 65 टक्के मतं मिळतील. ज्यांना नितीन गडकरी यांच्याविरोधात लढायचे आहे, त्यांनी लढण्याची हौस पूर्ण करावी, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातून नितीन गडकरीच उमेदवार असणार हे स्पष्ट केले आहे.दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, नाना पटोले यांनीच नितीन गडकरी यांच्याविरोधात लढावे, ते एकदा लढलेच आहेत, असे म्हणत गडकरींनी नाना पटोलेंचा पराभव केल्याची आठवण त्यांनी करुन दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, महायुतीच्या लोकसभा जागावाटपाबाबत अंतिम निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. जागावाटपाची प्राथमिक चर्चा उत्तम आणि समाधानकारक झाली आहे. आता 11 ते 12 तारखेपर्यंत महायुतीचे जागावाटप जाहीर होईल.
काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या कृपाशंकर सिंह या भ्रष्ट माणसाचे नाव पहिल्या यादीत होते. पण नितीन गडकरी यांचे नाव नाही. नितीन गडकरीजी भाजपाचा राजीनामा द्या. महाविकास आघाडीमध्ये या. आम्ही महाविकास आघाडीतून तुम्हाला निवडून आणतो, अशी खुली ऑफर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर लोकसभेच्या रिंगणात तगडा उमेदवार उतरवण्याची भाषा केली आहे. काँग्रेसकडे नागपूरसाठी तगडा आणि जिंकणारा उमेदवार आहे. अजून आम्ही आमचे पत्ते उघड केलेले नाहीत, असे नाना पटोले यांनी म्हटले. जागा वाटपाबद्दल लवकरच निर्णय होईल. अजून महायुतीचे जागावाटप झालेले नाही. मात्र, महायुतीच्या आधी आमचे (मविआ) जागावाटप जाहीर होईल, असे नाना पटोले यांनी सांगितले.