मुंबई-विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निकाल कोर्टाशी विसंगत आहे. त्यांच्याकडून घटनेची पायमल्ली झाली असून आमदार अपात्रताप्रकरणी त्यांनी लवादाकडून चोरमंडळाच्या बाजूने निकाल दिल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान विधिमंडळातल्या बहुमतावर कोणताही पक्ष आणि पक्ष संघटन कोणाचे आहे ते ठरत नाही. पक्षातील संघटनेत बहुमत कोणाचे आहे, यावर पक्ष कोणाचा आहे हे ठरते. पण लवादांनी आपल्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला. कारण त्यांच्यावर दबाब होता, असे म्हणत संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्षांवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी अपात्र आमदांना पात्र ठरवले. घटनेच्या दहाव्या शेड्यूलनुसार जो पक्षांतर बंदीचा कायदा आहे. त्यानुसार, पक्षांतर केलेल्या शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवणे हे अपर्हाय होते. पण त्या घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवले. इतकेच नव्हे तर विधिमंडळीतील पक्षाच्या बहुमतावर शिवसेनाही त्यांचीच असा निर्णय देऊन स्वत:चे हसू करून घेतले.
संजय राऊत म्हणाले की, आता जे लवाद म्हणून बसलेत त्यांनी स्वत:च 10 पक्षांतरे केली आहेत, ते कधी शिवसेनेत होते, कधी राष्ट्रवादीमध्ये होते, ते कधी अन्य पक्षात होते आणि त्यानंतर ते भाजप पक्षात जाऊन विधानसभेचे अध्यक्ष झाले. या सगळ्याची सर्वोच्च न्यायालयाने काल दखल घेतल्याचे त्यांच्या निकालपत्रावरून दिसते आहे. सर्वोच्च न्यायालयाने या देशाला आशेची किरणे दाखवली आहेत. त्याच आशेच्या किरणांच्या संदर्भात आम्ही आशावादी आहोत.
संजय राऊत म्हणाले की, चोरमंडळाचे वकील रोज नवीन मुद्दे आणत असून भंपक, खोटेपणा या मुद्द्यात असतो. काल त्यांनी बनवाट कागदपत्रांचा मुद्दा मांडला. शिवसेना ही बनवाट आहे का? बाळासाहेब, त्यांनी स्थापन केलेली शिवसेना बनावट आहे का? असा सवाल करत राऊत म्हणाले की, यांना बाळासाहेबांचे अस्तित्वच मान्य नाही. हाच त्यांचा बनावटपणा असून आम्ही न्यायालयात आणि जनतेच्या न्यायालयात लढू आणि विजयी होऊ.तर बावनकुळे विधानसभेला स्वत: तिकीट मिळवू शकले नव्हते, म्हणत त्यांच्यावरही निशाणा साधला आहे.