कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे चक्केश्वराची पूजा
पुणे : बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड, शिव मुखवटा आणि फुलांची आरास करण्यात आली. तसेच मुख्य मंदिरावर १२ ज्योर्तिलिंगांच्या प्रतिमा देखील मंदिरात दर्शनासाठी लावण्यात आल्या होत्या.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार अॅड.रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उप प्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अॅड. शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे उपस्थित होते.
जागतिक महिला दिन व महाशिवरात्र यंदा एकत्र आल्याने यावेळी ओंकार पौरोहित्य आणि भजनी मंडळातर्फे रजनी जरांडीकर,रेखा शिवनकर, सुषमा समुद्र, माधुरी शिकारखाने, अलका कुलकर्णी, मेधा चौधरी, अंजली बुधकर, वृषाली कुलकर्णी, शोभा पोटे, सुवर्णा तिखे, व स्वाती ढमढेरे या ११ भगिनींनी ११ आवर्तने रुद्रपठण केले.
सुकामेवा, फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करुन साकारण्यात आलेली ही चक्केश्वराची पूजा पाहण्याकरीता भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली. प्रमोद भगवान यांनी साकारलेला शंकराचा मुखवटा विशेष आकर्षण ठरला. मंदिराचे व्यवस्थापक विक्रम मोटकर व निलेश धर्माधिकारी, विनायकराव झोडगे, नंदू चिप्पा, शोभा गादेकर, प्रताप बिडवे, युवराज पवार या सेवेकऱ्यांनी ही चक्क्याची शंकराची पिंड आणि आरास तीन तासात साकारली. पुरुषोत्तम वैद्य गुरुजी यांनी पौरोहित्य केले.
युवराज गाडवे म्हणाले, महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात दरवर्षी चक्केश्वराची पूजा करण्यात येते. यावर्षी १०१ किलो चक्का वापरुन शंकराची पिंड साकारण्यात आली. बदाम, द्राक्षे, नारळ यांसह विविध प्रकारच्या फळे, फुलांचा वापर देखील करण्यात आला आहे. या चक्क्याचे श्रीखंड करुन हा प्रसाद मंदिरात येणा-या भाविकांना देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.