पुणे : आपण एक दिवस महिला दिन साजरा करतो, परंतु महिलांसाठी तर रोजच महिला दिन असतो. महिलांनी जर ठरवले तर दुसरे जग देखील निर्माण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. कोणतेही ध्येय गाठण्यासाठी तुमची श्रीमंती, रुप महत्वाचे नाही तर तुमची जिद्द महत्वाची आहे. ही जिद्द आपण राजमाता जिजाऊ यांच्यामध्ये पाहिली, त्यांचे विचार एकले. पण ते विचार आचरणात आणले तर घराघरात शिबवा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, असे मत सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांनी व्यक्त केले.
आम्ही पुणेकर आणि जिजामाता पुरस्कार वितरण समितीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त नवी पेठेतील पत्रकार भवन येथे ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला पंडित वसंत गाडगीळ, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, आम्ही पुणेकरचे हेमंत जाधव, जिजामाता पुरस्कार वितरण समिती अध्यक्ष मनोज पंडीत, बी.व्ही.जीचे प्रियांक जावळे आदी उपस्थित होते. यावेळी सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी, सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे, आर्किटेक्चर अर्चना देशमुख कुलकर्णी, पुणे महानगरपालिका अधिकारी अपर्णा बासरकर, डॉ.दिशा वनारसे, उद्योजिका नेहा घोलप पाटील, हिरकणी सुदाम दुर्वे या महिलांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ असे सन्मानाचे स्वरूप होते. यावेळी बी व्ही जी च्या १०८ रुग्णवाहिका साठी काम करणाऱ्या डाॅक्टर महिला अधिकाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला.
मेघराज भोसले म्हणाले, आज आपण म्हणतो महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. पण, त्या एक पाऊल पुढे राहून काम करीत असतात. घरातील आणि बाहेरील कामाची जबाबदारी सांभाळून कोणतीही अपेक्षा न करता त्या सामाजिक कार्य देखील अगदी तत्परतेने करीत असतात. अशा पुरस्कार सोहळ्यातून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.