शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी नुकताच भाजपवर केसाने गळा कापण्याचा आरोप केला होता. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपने शिवसेनेचा नेहमीच सन्मान केल्याचा दावा केला होता. तसेच आम्ही 105 जण असलो तरी आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याची आठवणही त्यांनी रामदास कदम यांना करवून दिली होती. त्यांच्या या टीकेचा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी शुक्रवारी समाचार घेतला. भाजपने पाठिंबा दिल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला शिंदे गटाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही 105 आमदार असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याच्या भाजपच्या दाव्यात तथ्य आहे. पण एकनाथ शिंदे यांनी उठाव केलाच नसता तर भाजपच्या 105 जणांना आजही विरोधात बसावे लागले असते हे ही तेवढेच खरे आहे. त्यामुळे कुणीही कुणाचेही श्रेय लाटण्याचे प्रयत्न करू नये, असे शिंदे गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठणकावून सांगितले आहे.
काय म्हणाले होते रामदास कदम?
महायुतीतील जागावाटपाच्या मुद्यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधला होता. महाराष्ट्र भाजपतील काही जण अत्यंत घृणास्पद काम करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या नेत्यांचे कान उपटले पाहिजेत. प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवायचा असतो. पण जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले, त्यांचा केसाने गळा कापू नका. असे केल्यास भाजपविषयी जनतेत वेगळा संदेश जाईल, असे रामदास कदम म्हणाले होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडून आपल्या मुलाला मुद्दाम जाणीवपूर्वकपणे त्रास दिला जातोय असा आरोप रामदास कदमांनी केला रवींद्र चव्हाण हे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. चव्हाणांच्या विषयावरुनच बोलताना रामदास कदमांनी भाजपा नेत्यांना थेट, ‘भाजपाने केसाने गळा कापू नये,’ असा इशारा दिला होता व . ‘माझं नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवा,’ असं सूचक विधान करत त्यांनी भाजपा नेत्यांना वरिष्ठांनी समज द्यावी असं म्हटलं होते.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
रामदास कदम यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री केल्याची आठवण करवून दिली होती. ते म्हणाले होते की, रामदास कदम यांना मी गत अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांना अशा प्रकारची विधाने करण्याची सवय आहे. ते टोकाचेही बोलतात. बऱ्याचदा रागानेही बोलतात. पण भाजपाने शिवसेनेचा नेहमीच सन्मान केला आहे. आम्ही 105 जण आहोत. त्यानंतरही आम्ही आमच्यासोबत आलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. कारण, आम्हाला खरी शिवसेना सोबत आल्याचे समाधान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमचं पूर्ण समर्थन आहे.