पुणे- “जन संघर्ष समिती पुणे यांच्या वतीने शहरामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी अलका टॉकीज चौक येथून पुणेकर नागरिक, विविध पक्ष , संस्था, संघटना आणि कार्यकर्ते यांनी मिळून लक्ष्मी रस्ता मार्गे लालमहाल पर्यंत चालत जाऊन पायी शांती मोर्चा (पीस मार्च) काढला.पुणेशहरामध्ये आणि एकंदरीत संपूर्ण देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालून समाजात धार्मिक तेढ वाढवून आणि अस्मितेच्या माध्यमातून पुण्यातील तसेच देशातील वातावरण बिघडवण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो आहे.अशा अनेक घटना पुणे शहरात नजीकच्या काळात घडलेल्या आहेत त्यापैकी निखिल वागळे, पत्रकारांवरील हल्ला, पुणे विद्यापीठातील विद्यार्थी , प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या वरील हल्ला.समाजामधील वाढणारा हिंसाचार सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना मारहाण करणे , शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमात धुडगूस घालणे .हे सर्व करुन लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणून लोकांचा आवाज दडपण्याच्या प्रवृत्ती विरोधात आवाज उठवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी शांती मोर्चा (पीस मार्च)यांचे आयोजन करून समाजामध्ये शांती आणि सौदा:र्य कायम ठेवण्याचा संदेश देण्यात आला.या मोर्चामध्ये जन संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड.रविंद्र रणसिंग, ॲड मोहन वाडेकर, विलास सुरसे, ॲड. संदीप ताम्हणकर, किशोर सरदेसाई,प्रा विकास देशपांडे, संतोष पवार, योगेश माळी, राहुल बाबर पाटील , तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रवींद्रअण्णा माळवदकर, ॲड.निलेश निकम, कॉंग्रेस पक्षाचे मोहन जोशी, माजी महापौर कमल व्यवहारे,आम आदमी पक्षाचे मुकूंद किर्दत, समाजवादी पक्षाचे अनिस अहमद, कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड अजित अभ्यंकर, कॉम्रेड दिपक पाटील, युक्रांदचे जांबुवंत मनोहर, तसेच सामाजिक कार्यकर्ते व पुणेकर नागरिक आणि जनसमुदाय यांनी सहभाग घेतला. या शांती मोर्चाला पुणेकर जनतेने उत्स्फूर्त सहभाग घेऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपला प्रतिसाद नोंदवला.तत्पूर्वी जन संघर्ष समिती पुणे यांच्या वतीने पुणे शहरामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी स्वाक्षरी मोहीम राबवून पुणेकर नागरिकांच्या सहीचे एक निवेदन पोलिस आयुक्त पुणे यांना ४ मार्च २०२४ रोजी देण्यात आले होते.पुणे पोलिस आयुक्तांच्या वतीने सहपोलीस आयुक्त श्री. प्रवीण पवार यांनी हे निवेदन स्वीकारले होते.
भारतीय संस्कृतीबद्दल तरुणांमध्ये आजही उदासीनता-मुर्तीशास्त्र अभ्यासक गो. बं. देगलूरकर
ऋता उंबरजे आणि संगीता चाफेकर लिखित कंबुजा: एन्शियंट कंबोडिया पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : कंबोडियासह आशियातील अनेक देशांच्या संस्कृतीचे मूळ भारतीय संस्कृतीमध्ये आहे. भारतीय संस्कृतीचे वैभव आपल्याला आग्नेय आशियातील वास्तुशिल्पांमध्ये बघायला मिळते, तेथील लोक आजही भारतीय संस्कृतीचे पूजन मनोभावे करतात, परंतु आपल्या देशात आपल्या संस्कृती बद्दल मात्र उदासीनता दिसून येते. ही उदासीनता दूर करण्यासाठी कंबुजा: एन्शियंट कंबोडिया सारख्या पुस्तकांचा निश्चितच उपयोग होईल, अशी भावना ज्येष्ठ मूर्ती शास्त्र अभ्यासक गो.बं. देगलूरकर यांनी व्यक्त केली.
ऋता उंबरजे आणि संगीता चाफेकर लिखित कंबुजा: एन्शियंट कंबोडिया पुस्तकाचे प्रकाशन देगलूरकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष अरविंद जामखेडकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक डॉ.अंबरीश खरे यावेळी उपस्थित होते.
डॉ.गो.बं. देगलूरकर म्हणाले, आपल्या देशाच्या महान संस्कृती बद्दल इतर देशातील तज्ञ बारकाईने अभ्यास करताना दिसतात. आपल्याला मात्र आपल्या देशातील संस्कृती बद्दल केवळ माहिती असते. ही वैभवशाली परंपरा पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी कंबुजा: एन्शियंट कंबोडिया सारख्या पुस्तकांची गरज आहे. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी घेतलेली मेहनत आणि केलेले संशोधन निश्चितच कौतुकास्पद आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून तरुण पिढीला संस्कृतीची ओळख होईल आणि त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल रस निर्माण होईल.
अंबरीश खरे म्हणाले, कंबोडिया देशाचे मूळ हे भारतीय संस्कृतीमध्ये आहे. त्या देशातील अनेक मंदिरांमध्ये भारतीय शिल्प आढळतात, परंतु भारतीय संस्कृती अभ्यासण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी जाणाऱ्या भारतीयांची संख्या मात्र आजही कमी आहे. कंबुजा: एन्शियंट कंबोडिया पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या संस्कृती बद्दल आकर्षण निर्माण होऊन त्या ठिकाणी संशोधन करण्यासाठी तसेच पर्यटनासाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या वाढेल.
अरविंद जामखेडकर म्हणाले, आपणच आपल्या संस्कृतीचा सखोल अभ्यास करत नाही. आपल्या संस्कृतीचे वैभव आपल्याला परदेशामध्ये गेल्यानंतर कळते आपण विशेषतः तरुण परदेशामध्ये केवळ पर्यटनासाठी जातात त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी कंबुजा: एन्शियंट कंबोडिया सारख्या पुस्तकाचा उपयोग होईल. मंजिरी शहाणे यांनी सूत्रसंचालन केले.
मोदींनी आसामच्या काझीरंगात केली जंगल सफारी
आसाम दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पोहोचले. पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान ते हत्तीवर बसून जंगल सफारीला गेले. यानंतर जीपमधून नॅशनल पार्कलाही भेट दिली. यावेळी उद्यानाच्या संचालिका सोनाली घोष आणि वरिष्ठ वन अधिकारीही त्यांच्यासोबत होते.
লক্ষীমাই, প্ৰদ্যুম্ন আৰু ফুলমাইক কুঁহিয়াৰ খুৱালো। কাজিৰঙা বিশেষকৈ গঁড়ৰ বাবে জনাজাত যদিও তাত বহুসংখ্যক হাতীৰ লগতে আন কেইবা প্ৰজাতিৰ জীৱ-জন্তু আছে। pic.twitter.com/PWODXTPe5T
— Narendra Modi (@narendramodi) March 9, 2024
मोदींनी जंगल सफारीदरम्यान प्राण्यांचे फोटोही काढले. X वर ही छायाचित्रे पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, प्रत्येकाने या राष्ट्रीय उद्यानात यावे. त्यांनी हत्तींना ऊस खाऊ घालतानाचा फोटोही पोस्ट केला. त्यांनी लिहिले की हे ठिकाण गेंड्यांसाठी ओळखले जाते, परंतु येथे हत्तींची संख्याही जास्त आहे.
पंतप्रधान मोदी ईशान्येच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ते आसाममधील तेजपूरला पोहोचले. काझीरंगा नॅशनल पार्कच्या गेस्ट हाऊसमध्ये रात्री मुक्काम केला. काझीरंगाला 1974 मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आणि यावर्षी काझीरंगा या यशाचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. काझीरंगा 1985 मध्ये जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यात आले.
बारामती अॅग्रोच्या कर्मचाऱ्यांनी काळजी करू नये,कारखाना आपल्या मालकीचा,बंद पडू देणार नाही,कारवाई सुडाची – रोहित पवारांनी दिला दिलासा
पुणे-‘बारामती अॅग्रो’ लिमिटेडच्या कन्नड साखर कारखान्यावर ईडीने जप्ती आणली आहे. परंतु यासंदर्भात काही अधिकृतपणे ‘बारामती अॅग्रो’ कंपनीला कळवले नाही किंवा यासंदर्भातील काही आदेशही मिळाले नाही. ही जप्ती बेकायदेशीर आहे. राजकीय सूडापोटी करण्यात आली आहे. यामध्ये गंभीर स्वरुपाच्या त्रुटी आणि चुका आढळून येत आहेत. बारामती अॅग्रोच्या कर्मचाऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. कारखाना बंद पडणार नाही, याची हमी शेतकऱ्यांना मी देतो. हा कारखाना आपल्या मालकीचा आहे. यामुळे शेतकरी आणि कामगारांनी निश्चिंत रहावे. आपली बाजू सत्याची आणि न्यायाची आहे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जप्ती बेकायदेशीर आहे. राजकीय सूडापोटी करण्यात आली आहे. यामध्ये गंभीर स्वरुपाच्या त्रुटी आणि चुका आढळून येत आहेत असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.माझ्यावरच्या कारवाईमुळे गुदगुल्या होत असतील पण निवडणुकीत जनताच वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.
पत्रात रोहित पवार यांनी पहा नेमके काय म्हटले आहे त्यांच्याच शब्दात
आम्हाला प्रसार माध्यमातून तसेच सक्तवसुली संचालनालयाने [ईडी] जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकातून (Press Release) कळालेल्या बातमीनुसार, बारामती अॅग्रो लि. चे कन्नड येथील साखर कारखान्याचे मालमत्तेवर ईडी ने प्रोविजनल जप्ती आणली आहे. परंतु, त्या अनुषंगाने असा कोणताही आदेश किंवा माहिती अधिकृतरित्या बारामती अॅग्रो लि. ला कळविण्यात आलेली नाही. सदर प्रोविजनल जप्ती ही मूलतः राजकीय सुडापोटी केलेली असून चुकीची, निराधार व बेकायदेशीर आहे आणि त्यामध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी व चुका आढळून येतात. मला बारामती अॅग्रोच्या सर्व कर्मचाऱ्यांनाही सांगायचं आहे की, याबाबत काळजी करण्याचं कारण नाही आणि शेतकऱ्यांनाही सांगायचं आहे की कारखाना बंद पडणार नाही, तो आपल्याच मालकीचा आहे. त्यामुळं कामगारांनी आणि शेतकऱ्यांनीही निश्चिंत रहावं. बारामती अॅग्रो समुहावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या लाखो लोक अवलंबून आहेत. त्या सर्व लोकांनाही आश्वस्त करतो की आपली बाजू ही सत्याची असल्याने न्यायालयात ती आपण सिदध करु, त्यामुळं आपणही कुणी चिंता करण्याचं कारण नाही.
ईडी ने बारामती अॅग्रो लि. विरुद्ध चालू केलेला तपास देखील बेकायदेशीर आहे. ईडी ने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अधिकारी, व इ. यांचे विरुदध एम. आर. ए. मार्ग, मुंबई पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या प्रथम खबर अहवालाच्या [FIR] आधारे २०१९ साली स्वतंत्र तक्रार नोंदविली होती. परंतु सदर FIR मध्ये बारामती अॅग्रो लि. व माझ्या नावाचा कोणताही उल्लेख किंवा संदर्भ नव्हता व नाही. सदर FIR च्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई या तपास यंत्रणेने दोनदा तपास करून सप्टेंबर २०२० तसेच जानेवारी २०२४ मध्ये मुंबई येथील फौजदारी न्यायालयात त्याबाबत ‘सी समरी’ अहवाल म्हणजेच क्लोजर अहवाल दाखल केला आहे, ज्यामध्ये सदर प्रकरणात कोणताही गुन्हा घडलेला नाही असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. असे असून देखील ईडी ने बेकायदेशीररित्या प्रोविजनल जप्ती केली आहे.
सदरची बाब, वेळोवेळी ईडीच्या तपास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील त्यांनी त्यांचे अधिकारक्षेत्राचे उल्लंघन करून बेकायदेशीर कारवाई केलेली आहे. कायद्याच्या तरतुदीनुसार जप्तीची कारवाई करण्यासाठी ईडी च्या अधिकाऱ्यांनी तथाकथित गुन्हा घडल्याबाबत ठोस कारणे नोंदविणे गरजेचे होते तसेच बारामती अॅग्रो लि. सदर मालमत्तेची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेत आहे असे देखील नोंदविणे गरजेचे होते. या दोन्ही बाबींची पुष्टता करण्यासाठी कोणताही आधार नसताना ही बाब स्पष्ट होते की केलेली कारवाई ही राजकीय सुडापोटी केलेली असून निराधार, चुकीची व बेकायदेशीर आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने डिसेंबर २००९ व फेब्रुवारी २०१२ मध्ये कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्री करण्यासाठी सार्वजनिक लिलावासाठी सरफेसी कायद्याअंतर्गत निविदा प्रसिद्ध केल्या होत्या; परंतु त्यास कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे, फेब्रुवारी २०१२ च्याच राखीव किमतीस दि. ३०/०७/२०१२ रोजी, पुन्हा निविदा प्रसिद्ध केली. सदर निविदा प्रक्रियेमध्ये बारामती अॅग्रो लि. ने पहिल्यांदा सहभाग घेतला होता. सदर निविदा प्रक्रिया ही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर RBI च्या आदेशानुसार नियुक्त केलेल्या अॅडमिनिस्ट्रेटर ने सरफेसी कायद्याअंतर्गत राबविली होती. व सदर निविदेमध्ये राखीव किमतीपेक्षा आणि सर्वात जास्त किमतीची बोली असल्याने बारामती अॅग्रो लि. ला सदर मालमत्ता विकण्यात आली.
त्यामुळे हे स्पष्ट होते की सदर विक्रीमध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ठरविलेल्या राखीव किंमतीशी किंवा सदर मालमत्तेच्या स्वतंत्र मुल्यांकन अहवालाशी बारामती अॅग्रो लि. चा कोणताही संबंध नव्हता व नाही. तसेच सदर मुल्यांकन अहवालावर शंका उपस्थित करण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही.
ईडी ने प्रसिद्ध केलेल्या पत्रिकेमध्ये, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन अधिकारी व संचालक यांनी बेकायदेशीररित्या काही सहकारी साखर कारखान्याची विक्री ही कमी किमंती मध्ये त्यांच्या नातेवाईकांना व इतर त्रयस्थ लोकांना केल्याचे तथाकथित आरोप सदर FIR मध्ये नमूद केल्याबाबत म्हटले आहे. परंतु, सदर FIR ही RBI च्या आदेशानुसार अॅडमिनिस्ट्रेटरच्या नियुक्ती पूर्व कालावधीच्या तथाकथित घटनांवर आधारित असून त्याचा आणि अॅडमिनिस्ट्रेटरचा व त्यांनी राबविलेल्या सदर लिलाव प्रक्रियेचा दुरान्वये संबंध नाही.
सदर FIR मध्ये जे लोक आरोपी केले गेले आहेत, त्या सर्वाविरुद्ध ईडीने कारवाई केलेली नाही व केवळ राजकीय हेतूने बारामती अग्रो लि. ला व मला लक्ष्य केले जात आहे.
ईडीच्या प्रसिद्ध पत्रिकेमध्ये खोट्या व चुकीच्या बाबींच्या आधारे त्यांनी बेकायदेशीररित्या केलेल्या प्रोविजनल जप्तीची पुष्टता केली आहे. सदर प्रकरणात ईडी ने प्रोविजनल जप्तीचा आदेश आम्हाला अधिकृत माध्यमातून कळविल्यास त्यावर आम्ही योग्य ते ‘भाष्य करू तसेच कायदेशीर मार्गाने प्रतिसाद देऊ तसेच ईडी च्या तपास कार्यात सहकार्य करत न्यायाचा लढा सुरु ठेवू. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या सर्व प्रसार माध्यमांना मी विनंती करतो की, सदर विषयातील बातम्या सत्यतेची पडताळणी करून प्रसिद्ध कराव्यात. धन्यवाद!
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्ह्यात महिला मतदान जनजागृती
विविध क्षेत्रातील महिलांचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, दि. ९: आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्ह्यात महिला मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला वर्ग तसेच नागरिकांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये तहसील कार्यालय येथे महिलांचा सन्मान करण्यात आला. शहरात तसेच महिला मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या भागात महिला प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अधिकाधिक महिलांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
शहरातील बाजारपेठेमध्ये महिलांचे पथक नेमून महिलांना व नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. केडगाव, बोरीपर्धी, रावणगाव, आलेगाव, वरवंड, डाळिंब व सहजपुर या गावांमध्येदेखील महिला मतदारांसाठी विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
आंबेगाव विधानसभा मतदार संघातील मोर्देवडी येथे महिला दिनासोबतच महाशिवरात्रीचे औचित्य साधून तपनेश्वर मंदिर येथे आलेल्या भाविकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. बारामती विधानसभा मतदारसंघातील मेडद येथे मतदान करण्यासाठी मतदान गीते व भारुडाच्या माध्यमातून महिलांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
पर्वती मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक बिबवेवाडी या दरम्यान मतदान जनजागृती फेरी आयोजित करण्यात आली. यावेळी बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्थानिक महिला, सफाई महिला कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यांनी घोषवाक्यांचे घोषणाफलक हातात घेवून मतदान करण्याविषयी जनजागृती केली.
इंदापूर तालुक्यातील भिगवण-शेटफळगढे प्रभागातील ग्रामपंचायत भिगवण येथील भैरवनाथ मंदिरात उमेद अभियानातील स्वयं सहाय्यता समूहातील महिलांनी मतदान जनजागृती शपथ घेतली. भोर विधानसभा मतदारसंघात किवत गावातील रणरागिणी महिला ग्रामसंघ तसेच वेल्हे तालुक्यातील कातवडी गावात मतदान जनजागृतीविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली. मावळ विकास गटाच्या वतीने लोणावळा येथे महिलांना मतदानाची शपथ देण्यात आली.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्यावतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी फर्ग्युसन महाविद्यालय ते बालगंधर्व रंगमंदिर या दरम्यान फेरीचे आयोजन करुन फलक तसेच घोषणांद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली. फर्ग्युसन रस्त्यावरदेखील लक्षवेधक मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली.
जिल्ह्यात विविध ग्रामपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त
आयोजित कार्यक्रमात महिलांनी मतदान करण्याविषयी शपथ घेतली.
भारत निवडणूक आयोगाच्या केवायसी, सी-व्हिजिल, वोटर हेल्पलाईन ॲप्सची माहिती देण्यात आली. आगामी निवडणुकीत लोकशाही सदृढ करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी मतदार करुन आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
सांत्वनाचे शब्द केविलवाणे ठरले,मुलीच्या पाठीवरून फिरणारे माझे हात मलाच थिटे वाटू लागले..माऊली काकांच्या नसण्याने गलबलून आले …
पुणे- जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष, राजेगावचे सरपंच प्रविण लोंढे यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेलेल्या सुनेत्रा अजीत पवारांनी खूपच भावनिक होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत , तिथे गेल्यावर , त्यांच्या घरातील दुखःद वातावरणात धीर द्यायला सांत्वन करायला गेलेल्या सुनेत्रा पवारांनी पहा नेमक्या कोणत्या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जसेच्या तसे ……

“माऊली काका गेले अन आमचा आनंद हरपला”जी व्यक्ती आदल्या दिवशी पर्यंत गावाच्या विकासासाठी धावपळ करत होती. त्यांची व माझी आज भेटही होणार होती. त्याच व्यक्तीच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वणासाठी जावे लागावे. यापेक्षा नियतीचा क्रूर खेळ दुसरा तो काय?पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष, राजेगावचे सरपंच प्रविण लोंढे यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांची आज भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी प्रविण लोंढे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांची, गावाची, राष्ट्रवादी काँग्रेसची कित्ती मोठी हानी झाली आहे ते जवळून अनुभवलं.अशा वेळी त्यांच्या बंधूंचे सांत्वन करण्यात शब्द केविलवाणे ठरले, त्यांच्या आई, पत्नी, मुलीच्या पाठीवरून फिरणारे माझे हात मलाच थिटे वाटू लागले.त्यांचे बंधू नितीन, सतीश यांचे सांत्वन करताना सदैव सोबत आहोत, असा ठाम दिलासा दिला. त्यावेळी बंधूनी सांगितले, की तुम्ही तालुक्यात दौऱ्यावर येणार म्हणून तयारी चालली होती त्यांची. दोनच दिवसांपूर्वी सार्वजनिक कामासाठी मुंबईला जाऊन आले. सारं आयुष्य त्यांनी समाजासाठी दिलं होतं. माऊलीकाका नावाने सर्वपरिचित असणारे प्रवीण लोंढे विकास माऊली होते. त्यांच्या अशा पध्दतीने जाण्याने झालेला घाव कधीच भरून येणार नाही. माऊलीकाकांच्या जाण्याने आमचा आनंद हरपला ही तिथे उमठलेली प्रतिक्रिया गलबलून टाकणारी.या दुःखातुन सावरण्याचे बळ ईश्वराने आम्हा सर्वांनाच द्यावे, या प्रार्थनेसह प्रविण लोंढे यांच्या स्मृतीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वतीने, माझ्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली. कधीही कसलीही अडचण आली तर दादा, मी या कुटुंबाच्या पाठीशी आहोत. प्रविण यांच्या पश्चात ती जबाबदारी आमची आहे, हा माझा शब्द.
महिलांनो एकमेकींचे कौतुक करा-डाॅ.निलम गोऱ्हेः
‘एमआयटी एडीटी’च्या कर्तृत्ववान महिला पुरस्कारांचे वितरण
पुणेः महिला आता कुठल्याही क्षेत्रात मागास राहिलेल्या नाहीत. मुली आज शिकत आहेत, प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमठवत आहेत. असे असले तरीही अनेक तालुक्यात मुलींची संख्या अद्यापही कमी आहे. तसेच कामाच्या ठिकाणी आजही महिलांना दुजाभावाचा सामना करावा लागतो. त्यात एक महिला सहजासहजी दुसऱ्या महिलेचे कौतुक करत नाही. त्यामुळे आज मी सर्वांना सांगेल की, महिलांनो एकमेकींचे भरभरून कौतुक करा, असे आवाहन महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती डाॅ.निलम गोऱ्हे यांनी केले.
त्या एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्याचा आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रम व त्यानिमित्त आयोजित कर्तृत्ववान महिला पुरस्कारांचे वितरण समारंभात बोलत होत्या. याप्रसंगी, मुंबई आयकर आयुक्त डाॅ.पल्लवी दराडे, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता मंगेश कराड, विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, कार्यक्रमाचे संयोजक डाॅ.नचिकेत ठाकूर, डाॅ.सपना देव, डाॅ.अतुल पाटील आदी उपस्थित होते.
गोऱ्हे पुढे म्हणाल्या, केवळ महिला दिनीच नव्हे तर प्रत्येक दिवशी पुरुषांनी महिलांवर कौतुकाचा वर्षाव करायला हवा. दुर्देवाने आजही अनेक विनोद हे महिलांवर आधारीत आहेत, त्यामुळे समाजाची मानसिकता देखील बदलायला हवी. ती मानसिकता बदलण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठ करत असलेले कार्य उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. याप्रसंगी डाॅ.दराडे म्हणाल्या, अनेक विद्वानांनी म्हटल्याप्रमाणे एक महिला शिकली तर ती दोन कुटूंबांचा उद्धार करते. त्यामुळे मुलींना शिकविण्यात पालकांनी कुचराई टाळायला हवी. तसेच शिकलेल्या महिलेने चांगल्या नोकरीला लागून पैसे कमावनेही तितकेच आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.डाॅ.सुनीता कराड यांनी आपल्या भाषणात महिला सक्षमीकरणासाठी एमआयटी एडीटीच्या कार्याची इत्यंभूत माहिती सर्वांना करून दिली. तसेच त्यांनी यावेळी पुरस्कार प्राप्त महिलांचेही भरभरून कौतुक केले. त्या म्हणाल्या, गेल्या सात वर्षांपासून दरवर्षी विद्यापीठात आम्हाला महिला दिनानिमित्ताने वेगळ्या प्रकारची ऊर्जा अनुभवायला मिळते. यंदाही रांगोळी स्पर्धा, रिल मेकिंग स्पर्धा, महिलांसाठी कायदेशिर सल्ला व समुपदेशन आदी उपक्रमांद्वारे महिला दिन साजरा करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचा प्रारंभ विश्वशांती प्रार्थना तर समारोप पसायदानाने करण्यात करण्यात आला.
चौकट
कर्तृत्ववान महिलांचा गौरवजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत प्रभावीपणे काम करणाऱ्या महिलांचा एमआयटी एडीटीतर्फे पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये प्लास्टिक सर्जन डाॅ.उज्वला दहिफळे, कॅन बायोसिसच्या व्यवस्थापकीय संचालक सौ.संदीपा कानिटकर, कमानी ट्यूबच्या प्रमुख डाॅ.कल्पना सरोज, कुल दी ग्लोबच्या संस्थापक प्राची शेवगावकर, इंडिया ऑपरेशनच्या उपाध्यक्ष नेत्रा वालावालकर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य व्यवस्थापक सोनी ठाकूर, वैज्ञानिक श्रीजा जयंत, बाल कल्याण समितीच्या प्रमुख डाॅ.रानी खेडीकर, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रा.डाॅ.सुजाता घोडके, तृप्ती जळगावकर यांचा समावेश होता.
अजित पवार यांना 4 जागा,एकनाथ शिंदे यांना 10 जागा,बाकी सर्व जागा भाजपा लढविणार ?
दिल्ली-आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपात बराच पेच निर्माण झाला आहे. भाजपाला जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात लढवायच्या आहेत तर एकनाथ शिंदे-अजित पवार हेदेखील जागांवरील दावा सोडायला तयार नाहीत. अशातच शिंदे-फडणवीस-अजितदादा यांना दिल्लीत बैठकीला बोलावण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा अमित शहा यांच्या निवासस्थानी या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जवळपास जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भाजप नेते अमित शहा यांच्यासोबत शुक्रवारी मध्यरात्री दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत राज्याच्या महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यात यश आले. दिल्लीत दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर खलबते झाले.
त्यानंतर भाजपच्या जागावाटपाच्या सूत्रावर तडजोड झाली. यामुळे भाजपच्या पुढील यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश केला जाऊ शकतो. बैठकीत अजित पवार यांना 4 जागा देण्याचे निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 10 जागा देण्यात येणार आहे. उर्वरित जागेवर भाजप निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, या बैठकीत जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीत यावर चर्चा होईल. त्यानंतर उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील नावांचा समावेश करण्यात येईल. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे एकाच विमानाने नागपूरला रवाना झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे नेते एकाच विमानाने मुंबईला दाखल झाले आहेत.
सध्या लोकसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबते सुरू असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे काही उमेदवार बदलण्याची केल्याची सूचना गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेच्या काही उमेदवारांबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना साशंकता असल्याचे समजत आहे. अजित पवार मात्र जागा वाढवण्याची मागणी करत असल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवारांना तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. वायव्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, रामटेक, पालघर, हातकणंगले या जागा भाजप स्वतःकडे घेऊ शकते, अशी सुत्रांची माहिती आहे. अजित पवार गटाला बारामती, शिरुर, रायगड, परभणी या जागा मिळू शकतात, तर शिर्डी आणि यवतमाळचे उमेदवार बदलले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुण्येश्वर जवळ मध्यरात्रीनंतर गोंधळ-अफवेमुळे भावना भडकल्याचे पोलिसांचे म्हणणे तर महापालिका म्हणाली कोणतीही कारवाई नाही
पुणे- परवा रात्री EVM मशिनच्या गोदामाचा हॉर्न वाजला आणि काल मध्यरात्रीनंतर म्हणजे आज पहाट होण्यापूर्वी कसब्यातील पुण्येश्वरमंदिराजवळील शेख सल्ला दर्ग्यावर एका अफवेने तुफान गर्दी केली , पोलिसांची धावपळ उडाली . पोलिसांनी तर सांगितलेच अशी कोणतीही कारवाई होणार नाही , आणि महापालिकेचे अतिक्रमण प्रमुख माधव जगताप यांनीही माय मराठी ला सांगितले कि आमच्याकडून कोणतीही कारवाई होणार नव्हती आणि अशा कारवाईचे नियोजन देखील नाही . पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबात सांगितले कि, कृपा करून अफवा पसरवू नका असे माझे संबधितांना आवाहन आहे. अफवा पसरविणारे माझ्या रडारवर आहेत , त्यांनी तातडीने दखल घ्यावी अन्यथा त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येईल . येथे पुण्येश्वर मंदिर आणि दर्गा आहे आणि तो अनधिकृत असल्याचा दावा यापूर्वी करत भाजपचे आमदार राणे तसेच स्थानिक नगरसेवक मोहोळ, एकबोटे,पोटे, शिळीमकर आदी नगरसेवकांच्या उपस्थितीत येथे मोठा मेळावा झाला होता .याप्रकरणी पोलिसात गुन्हाही दाखल झाला होता .
तर हिंदू काय हे देखील दाखवून देऊ, मनसेचा इशारा
मध्यरात्री अचानक दर्गा पाडणार असल्याची अफवा पसरल्याने पुणे शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे हजारोंचा जमाव रस्त्यावर उतरला होता. पोलिस आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर परिसरात शांतता निर्माण झाली. मात्र, या वादा संदर्भात काही लोक सोशल मीडियावर स्टेटस ठेवत आहे. या माध्यमातून परिसरामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली आहे मात्र आम्हाला ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला तर हिंदू काय हे देखील दाखवून देऊ, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र निर्माण सेनेचे पुणे येथील सरचिटणीस अजय शिंदे यांनी घेतली आहे.
पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द
दरम्यान पुणे शहरांमध्ये या प्रकरणामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्वांना शांत राहण्याचे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.
पुणे-सुरत थेट विमानसेवा सुरु होणार
पुणे : पुणे ते सुरत प्रवास) करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पुणे ते सुरत प्रवास सोपा होणार आहे. इंडिगो एअरलाइन्सने पुणे विमानतळापर्यंत आपली कनेक्टिव्हिटी विस्तारली आहे. कंपनीने पुणे ते सुरत अशी थेट विमानसेवा सुरू केली असून आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, गुरुवार आणि रविवारी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. 31 मार्च 2024 पासून ही थेट विमानसेवा सुरू होणार आहे.प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी आणि प्रवास त्रासमुक्त व्हावा यासाठी हा थेट विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. प्रस्थान प्रवासाला एकूण एक तास लागेल आणि परतीच्या प्रवासाला एकूण 55 मिनिटे लागतील.
पुणे ते सुरत आणि सुरत ते पुणे या प्रस्थान व परतीच्या प्रवासाची वेळा
प्रस्थान (पीएनक्यू ते एसटीव्ही) – प्रस्थान – 12:55 वाजता, आगमन – 14:00 वाजता
परतीचा प्रवास (एसटीव्ही ते पीएनक्यू) – प्रस्थान – 12:55 वाजता, आगमन – 14:00 वाजता
पुण्यातील रस्सीखेच लई भारी,अन नेत्यांची मात्र मती मारी?
पुणे: कॉंग्रेस आणि भाजपाची लढाई पुण्यातून होणार आहे,ही जागा जिंकून आणणे यासाठीची लढाई पहाणे मोठे रंजक ठरणार आहे.प्रसारमाध्यमातून मोहोळ विरुद्ध धंगेकर असे चित्र रंगविले गेले आहे ते वास्तवात आले तर तर भाजप आणि कॉंग्रेसला ते निश्चित जड जाणार आहे.पुण्याच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलला जाऊ शकतो … हे सारे माहिती असूनही नेत्यांची मती का मंद होते आहे हे कार्यकर्त्यांना समजेनासं झाले आहे. भाजपकडून मोहोळ यांना पसंती दिली गेली तर महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची जंत्री प्रचारात चव्हाट्यावर मांडली जाईल, देवदूत च्या खरेदी पासून कात्रज कोंढवा रस्त्याच्या फुगवलेल्या टेंडर पासून, पुराची आपत्ती, 24 तास पाणीपुरवठा आणि स्मार्ट सिटी चा उडालेला बोजवारा,महापालिकेत कारभार करणारे बोगस कामगार, कंत्राटी कामगारांची झालेली पिळवणूक, कोरोना काळात सोमय्या यांनी पोलिसात तक्रार करण्याचे महापौरांना दिलेले आदेश, प्रत्यक्ष झालेला भ्रष्टाचार अशा कितीतरी गोष्टी पुढे पुढे येत रहातील भूतकाळात केलेल्या कारभाराच्या जंत्रीच कसबा निकालाची पुनरावृत्ती घडवेल. आणि कॉंग्रेस ने धंगेकर यांना उमेदवारी दिली तर महापालिका अतिरिक्त आयुक्तां पासून उपअभियंता आणि कर्मचारी यांना दिल्या गेलेल्या धमक्या,शिवीगाळ कोणासाठी कशासाठी होती यावरून चर्चासत्र घडतील, मनसे तून आलेल्यांना एवढ्या तातडीने कोणत्या विशेष गुणांसाठी, आमदारकी खासदारकी अशा उमेदवारया बहाल केल्या.. यावरून मूळ कॉँग्रेसचे 30/40 वर्षे संघर्षांत वाहत राहिलेले कॉँग्रेसचे पाईक प्रश्ण उपस्थित करतील आणि त्यानुसार प्रचारात उडी घेतील असे सूत्रांना वाटते आहे. भाजपकडे मोहोळ यांच्या व्यतिरिक्त इच्छुक आहेत तसेच कॉँग्रेस कडेही आहेत. यातील कोणाला उमेदवारी दिली तर अन्य सहयोगी पार्ट्या जसे एकनाथ शिंदें ची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, शरदपवार गट, अजितपवार गट,वंचित आघाडी, आठवले रिपब्लिकन हे कोणत्या उमेदवारांना मनापासून आणि वर वर साथ देतील याचा विचारही केला गेला पाहिजे असे सूत्रांचे म्हणणे आहे, कोणाचा पूर्ण लोकसभा मतदार संघात प्रभाव आहे? विद्यमान आमदारांतले किती आमदार कोणाच्या पाठीशी जास्त ताकदीने उभे रहातील, मराठा कार्ड चा कसा उपयोग होईल? व्यापारी वर्ग कोणाच्या पाठीशी आहे, चाकरमानी, निवृत्त वर्ग कोणाला पसंती देतील अशा प्रश्नांवर कार्यकर्त्यां मध्ये खल होतो तो नेत्यांमध्ये का होतो की नाही? असा सवालही उपस्थित केला जातोय. भाजपकडे संजय काकडे, जगदीश मुळीक,राजेश पांडे इच्छुक आहेतच या शिवाय ही नावे आहेत. तर कॉंग्रेस कडे मोहन जोशी,आबा बागूल,अभय छाजेड, अरविंद शिंदे असे ही इच्छूक आहेत. कॉंग्रेस ने धंगेकर यांना उमेदवारी दिली आणि ते आलेही निवडून तर कॉंग्रेसच्या इथल्या राजकारणाचा, कॉंग्रेस भवना चा चेहरा मोहरा बदलून जाईल, इथे निष्ठेला किंमत नाही हा संदेश जाऊन, मूळची कॉंग्रेसच लयाला जाईल आणि भाजपने मोहोळ यांना उमेदवारी दिली आणि निवडूनही आले मोहोळ तर भाजप मध्येही प्रामाणिकपणे कष्ट करून काही उपयोग नाही असा संदेश जाऊन होयबा, होयबा चीच भाजप पुढील काळात दिसेल असेही सूत्रांना वाटते आहे. कोणाचे काहीही मत असू द्यात नेत्यांची मती मात्र माती खाता कामा नये, आणि विशिष्ट वर्गाचे नाही तर सर्वधर्मीय मतदारांचे हितकारक निर्णय घेणारेच, सर्वधर्मसमभाव,लोकशाही मानणारेच लोकप्रतिनिधी म्हणुन यापुढे आले पाहिजेत एवढे मात्र निश्चित.
मुंढवा – केशवनगर चौकातील भुयारी मार्गासाठी पाच कोटींची तरतूद-नाना भानगिरे यांच्या लढ्याला यश
पुणे-प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, इंधनाचा अपव्यव, प्रचंड मनस्ताप हा रोजच्या अनुभव मुंढवा केशवनगर चौकात वाहन चालकांना अनुभवायला भेटत आहे, नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनाची पुणे महापालिकेला दखल घेणे भाग पडले आहे आणि मुंढवा – केशवनगर चौकात भुयारी मार्गासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद झाली असल्याने शिवसेनेच्या आंदोलनाला यश आले आहे.
मुंढवा – केशवनगर चौकात सततच्या वाहतूककोंडीमुळे नागरिक व वाहनचालक प्रचंड हैराण झाले होते, तासनतास वाहनांच्या रांगा लागत असल्याने इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यव होतो, येथील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन शिवसेना शहरप्रमुख माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी 15 डिसेंबर रास्ता रोको आंदोलन केले व प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला, अनेक वर्षांपासून हा प्रश्न रखडला असताना राजकारण्यांनी व प्रशासनाने दुर्लक्ष केले होते, भानगिरे यांनी तातडीने आंदोलन केल्याने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी येथील भुयारी मार्गासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली.
उपनगर झपाट्याने वाढत असताना पालिकेत समाविष्ट नव्या गावांचे नागरी प्रश्न प्रलंबित आहेत, महापालिकेत प्रशासक असल्याने सर्व नगरसेवक माजी झाले आहेत, त्यामुळे दाद कोणाकडे मागायची परंतु राजकीय साठमारी बाजूला ठेऊन नाना भानगिरे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
खडकीमध्ये १कोटी६०लाख रुपयांच्याविकास कामांचे भूमिपूजन
आमदार निधीतून विशेष तरतूद
- आमदार सिद्धार्थ शिरोळे
पुणे – आमदार विशेष निधीतून छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील खडकी येथे १ कोटी ६० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन गुरुवारी करण्यात आले, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
या कामांमध्ये रस्त्याचे कॉंक्रीटीकरण, ड्रेनेज लाईन टाकणे, मैदाने विकसित करणे, नाला बंदिस्त करणे, व्यायाम शाळेसाठी साहित्य पुरविणे, रस्त्यांचे डांबरीकरण, सामाजिक सभागृह बांधणे, अभ्यासिका बांधणे. अशा कामांचा समावेश असून, खडकीत १६ ठिकाणी अशा कामांना सुरुवात झाली, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
या भूमिपूजन कार्यक्रमांच्यावेळी आनंद छाजेड, दुर्योधन भापकर, संगिताभाभी गवळी, धर्मेश शहा, कार्तिकीताई हिवरकर, नेहाताई गोरे, अजित पवार, राहुल कांबळे, मनिषाताई कांबळे, शाम काची, सचिन वाडेकर, अनिल भिसे, शोभाताई बट्टेलू, महेश करणुर, सनी गोयल, हेमाताई, अमर जाधव, राजू पिल्ले, देवेंद्र बिडलान, प्रवीण बिडलान, नितीन शिंदे, अनिरुध्द वाकिकर, मोहिनी येरूनकर, अनिता केदारी, आकाश परमवार, आनंद लोखंडे, दर्शन गुंड, रोहन मगर, संकेत कांबळे, हेरंब मारटकर, सुमित कांबळे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
शिक्षणाबरोबरच खेळाला ही महत्त्व द्या – डॉ. नीलकंठ चोपडे
पीसीईटीच्या एस. बी. पाटील आर्किटेक्चर कॉलेज मध्ये माईंड गेम्स स्पर्धा संपन्न
पिंपरी, पुणे (दि. ०८ मार्च २०२४) आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच मैदानी खेळाला ही महत्त्व दिले पाहिजे. त्यामुळे शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होते, असे प्रतिपादन पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिजाईन येथे माईंड गेम्स इनडोअर स्पोर्ट्स स्पर्धांच्या उद्घाटन डॉ. चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी टेबल टेनिस, बुध्दिबळ, कॅरम अशा विविध खेळांचे व स्पॉट स्केचिंग आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिजाईनचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग, सहभागी विद्यार्थी उपस्थित होते. पुणे व पिंपरी चिंचवड मधील आर्किटेक्चर महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
शैक्षणिक प्रगतीसह व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास योग्य प्रकारे साधण्यासाठी खेळांची उपयुक्तता आहे. यातूनच भविष्यातील सक्षम, सुदृढ, उच्च शिक्षित पिढी घडविण्यास मदत होईल, असे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे यांनी सांगितले.
पारितोषिक वितरण समारंभ आर्किटेक्ट महेंद्र ठाकूर, आर्किटेक्ट निखिलेश गरुड यांच्या हस्ते झाला. यामध्ये कॅरम स्पर्धेत अमोघ केंकरे व आदित्य पवार (पीवीपी कॉलेज), बुध्दिबळ स्पर्धेत मृण्मयी गोतमारे (एमआईटी कॉलेज), टेबल टेनिस स्पर्धेत अमोघ केंकरे व ओम तौर (पीवीपी कॉलेज) आणि स्केचिंग स्पर्धेत श्री गोगावले (आयोजन कॉलेज) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन प्रशांत साबळे, सुकन्या गावडे यांनी केले. प्राचार्य डॉ.महेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्किटेक्ट नेहा अनवाने, ऋतुराज कुलकर्णी, शिवा शिसोदिया, शिक्षकेतर कर्मचारी, स्टुडंट्स कौन्सिल तर्फे प्रथमेश जाधव, शशांक सस्ते आणि विद्यार्थ्यांनी संयोजन केले.
‘मोदी सरकार’ ऊद्योगपतींसाठी दलाली वर काम करणारे..! एसबीआय’ ने विश्वसनियता जपावी..!!
देणगीदारांची यादी’ सर्वोच्च न्यायालयास न दिल्यास.. सत्त्याग्रह आंदोलने..! काँग्रेस
पुणे दि – ८
सर्वोच्च न्यायालयाने, देशाची लिडींग राष्ट्रीयकृत बँक अशी ख्याती व विश्वसनियता असणाऱ्या “स्टेट बँक ॲाफ इंडीया” (SBI)ला “ईलेक्शन बाँड” माध्यमातून कुणाचा किती पैसा” मोदी_शहांच्या “विकसित भाजप च्या खात्यात” आला.? याची विचारणा करून, पुरेशी मुदत देऊन माहीती देण्यास सांगितले होते.मात्र, बँकींग स्वायत्तता असलेली ‘एसबीआय’ सारखी लिडींग राष्ट्रीयकृत बँक सदरची यादी ऊपलब्ध असुनही सर्वोच्च न्यायालयात देण्यास टाळाटाळ करत असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येत आहे.
बाहेरील ‘राष्ट्रविरोधी शक्तींचा पैसा’ या निवडणुक रोख्यांच्या माध्यमातुन आला आहे काय? हे तपासणे व जनतेस कळणे हे तितकेच गरजेचे व महत्वाचे आहे.सर्वोच्च न्यायालयास माहीती देणे विषयी टाळाटाळ वा दिरंगाई करणे हे बँकेचे कृत्य असंवैधानिक व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारे आहे.एसबीआय ची भुमिका कोणा राजकीय पक्षाच्या फेवर मध्ये असुन, देशद्रोहाची आहे काय ?असा परखड सवाल ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.
देशातील राष्ट्रीयकृत बँकांचे नेतृत्व करणाऱ्या “स्टेट बँक ॲाफ इंडीया”ने आपली विश्वसनियता जपावी व संविधानिक ऊत्तरदायीत्व निभावले.. अन्यथा देशातील कोट्यावधीं जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो याची गंभीर जाणीव ठेवावी असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.
“एसबीआय” ने सदर माहीती सर्वोच्च न्यायालयास मुदतीत दिली नाही तर राज्यभर काँग्रेस कार्यकर्ते” सत्त्याग्रह आंदोलने” करतील.. असा ईशारा देखील तिवारी यांनी दिला आहे
