पुणे- जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष, राजेगावचे सरपंच प्रविण लोंढे यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेलेल्या सुनेत्रा अजीत पवारांनी खूपच भावनिक होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत , तिथे गेल्यावर , त्यांच्या घरातील दुखःद वातावरणात धीर द्यायला सांत्वन करायला गेलेल्या सुनेत्रा पवारांनी पहा नेमक्या कोणत्या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जसेच्या तसे ……
“माऊली काका गेले अन आमचा आनंद हरपला”जी व्यक्ती आदल्या दिवशी पर्यंत गावाच्या विकासासाठी धावपळ करत होती. त्यांची व माझी आज भेटही होणार होती. त्याच व्यक्तीच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वणासाठी जावे लागावे. यापेक्षा नियतीचा क्रूर खेळ दुसरा तो काय?पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष, राजेगावचे सरपंच प्रविण लोंढे यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांची आज भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी प्रविण लोंढे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांची, गावाची, राष्ट्रवादी काँग्रेसची कित्ती मोठी हानी झाली आहे ते जवळून अनुभवलं.अशा वेळी त्यांच्या बंधूंचे सांत्वन करण्यात शब्द केविलवाणे ठरले, त्यांच्या आई, पत्नी, मुलीच्या पाठीवरून फिरणारे माझे हात मलाच थिटे वाटू लागले.त्यांचे बंधू नितीन, सतीश यांचे सांत्वन करताना सदैव सोबत आहोत, असा ठाम दिलासा दिला. त्यावेळी बंधूनी सांगितले, की तुम्ही तालुक्यात दौऱ्यावर येणार म्हणून तयारी चालली होती त्यांची. दोनच दिवसांपूर्वी सार्वजनिक कामासाठी मुंबईला जाऊन आले. सारं आयुष्य त्यांनी समाजासाठी दिलं होतं. माऊलीकाका नावाने सर्वपरिचित असणारे प्रवीण लोंढे विकास माऊली होते. त्यांच्या अशा पध्दतीने जाण्याने झालेला घाव कधीच भरून येणार नाही. माऊलीकाकांच्या जाण्याने आमचा आनंद हरपला ही तिथे उमठलेली प्रतिक्रिया गलबलून टाकणारी.या दुःखातुन सावरण्याचे बळ ईश्वराने आम्हा सर्वांनाच द्यावे, या प्रार्थनेसह प्रविण लोंढे यांच्या स्मृतीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वतीने, माझ्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली. कधीही कसलीही अडचण आली तर दादा, मी या कुटुंबाच्या पाठीशी आहोत. प्रविण यांच्या पश्चात ती जबाबदारी आमची आहे, हा माझा शब्द.