विविध क्षेत्रातील महिलांचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, दि. ९: आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्ह्यात महिला मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला वर्ग तसेच नागरिकांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये तहसील कार्यालय येथे महिलांचा सन्मान करण्यात आला. शहरात तसेच महिला मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या भागात महिला प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अधिकाधिक महिलांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
शहरातील बाजारपेठेमध्ये महिलांचे पथक नेमून महिलांना व नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. केडगाव, बोरीपर्धी, रावणगाव, आलेगाव, वरवंड, डाळिंब व सहजपुर या गावांमध्येदेखील महिला मतदारांसाठी विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
आंबेगाव विधानसभा मतदार संघातील मोर्देवडी येथे महिला दिनासोबतच महाशिवरात्रीचे औचित्य साधून तपनेश्वर मंदिर येथे आलेल्या भाविकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. बारामती विधानसभा मतदारसंघातील मेडद येथे मतदान करण्यासाठी मतदान गीते व भारुडाच्या माध्यमातून महिलांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
पर्वती मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक बिबवेवाडी या दरम्यान मतदान जनजागृती फेरी आयोजित करण्यात आली. यावेळी बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्थानिक महिला, सफाई महिला कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यांनी घोषवाक्यांचे घोषणाफलक हातात घेवून मतदान करण्याविषयी जनजागृती केली.
इंदापूर तालुक्यातील भिगवण-शेटफळगढे प्रभागातील ग्रामपंचायत भिगवण येथील भैरवनाथ मंदिरात उमेद अभियानातील स्वयं सहाय्यता समूहातील महिलांनी मतदान जनजागृती शपथ घेतली. भोर विधानसभा मतदारसंघात किवत गावातील रणरागिणी महिला ग्रामसंघ तसेच वेल्हे तालुक्यातील कातवडी गावात मतदान जनजागृतीविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली. मावळ विकास गटाच्या वतीने लोणावळा येथे महिलांना मतदानाची शपथ देण्यात आली.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्यावतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी फर्ग्युसन महाविद्यालय ते बालगंधर्व रंगमंदिर या दरम्यान फेरीचे आयोजन करुन फलक तसेच घोषणांद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली. फर्ग्युसन रस्त्यावरदेखील लक्षवेधक मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली.
जिल्ह्यात विविध ग्रामपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त
आयोजित कार्यक्रमात महिलांनी मतदान करण्याविषयी शपथ घेतली.
भारत निवडणूक आयोगाच्या केवायसी, सी-व्हिजिल, वोटर हेल्पलाईन ॲप्सची माहिती देण्यात आली. आगामी निवडणुकीत लोकशाही सदृढ करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी मतदार करुन आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.