‘एमआयटी एडीटी’च्या कर्तृत्ववान महिला पुरस्कारांचे वितरण
पुणेः महिला आता कुठल्याही क्षेत्रात मागास राहिलेल्या नाहीत. मुली आज शिकत आहेत, प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमठवत आहेत. असे असले तरीही अनेक तालुक्यात मुलींची संख्या अद्यापही कमी आहे. तसेच कामाच्या ठिकाणी आजही महिलांना दुजाभावाचा सामना करावा लागतो. त्यात एक महिला सहजासहजी दुसऱ्या महिलेचे कौतुक करत नाही. त्यामुळे आज मी सर्वांना सांगेल की, महिलांनो एकमेकींचे भरभरून कौतुक करा, असे आवाहन महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती डाॅ.निलम गोऱ्हे यांनी केले.
त्या एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्याचा आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रम व त्यानिमित्त आयोजित कर्तृत्ववान महिला पुरस्कारांचे वितरण समारंभात बोलत होत्या. याप्रसंगी, मुंबई आयकर आयुक्त डाॅ.पल्लवी दराडे, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता मंगेश कराड, विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, कार्यक्रमाचे संयोजक डाॅ.नचिकेत ठाकूर, डाॅ.सपना देव, डाॅ.अतुल पाटील आदी उपस्थित होते.
गोऱ्हे पुढे म्हणाल्या, केवळ महिला दिनीच नव्हे तर प्रत्येक दिवशी पुरुषांनी महिलांवर कौतुकाचा वर्षाव करायला हवा. दुर्देवाने आजही अनेक विनोद हे महिलांवर आधारीत आहेत, त्यामुळे समाजाची मानसिकता देखील बदलायला हवी. ती मानसिकता बदलण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठ करत असलेले कार्य उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. याप्रसंगी डाॅ.दराडे म्हणाल्या, अनेक विद्वानांनी म्हटल्याप्रमाणे एक महिला शिकली तर ती दोन कुटूंबांचा उद्धार करते. त्यामुळे मुलींना शिकविण्यात पालकांनी कुचराई टाळायला हवी. तसेच शिकलेल्या महिलेने चांगल्या नोकरीला लागून पैसे कमावनेही तितकेच आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.डाॅ.सुनीता कराड यांनी आपल्या भाषणात महिला सक्षमीकरणासाठी एमआयटी एडीटीच्या कार्याची इत्यंभूत माहिती सर्वांना करून दिली. तसेच त्यांनी यावेळी पुरस्कार प्राप्त महिलांचेही भरभरून कौतुक केले. त्या म्हणाल्या, गेल्या सात वर्षांपासून दरवर्षी विद्यापीठात आम्हाला महिला दिनानिमित्ताने वेगळ्या प्रकारची ऊर्जा अनुभवायला मिळते. यंदाही रांगोळी स्पर्धा, रिल मेकिंग स्पर्धा, महिलांसाठी कायदेशिर सल्ला व समुपदेशन आदी उपक्रमांद्वारे महिला दिन साजरा करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचा प्रारंभ विश्वशांती प्रार्थना तर समारोप पसायदानाने करण्यात करण्यात आला.
चौकट
कर्तृत्ववान महिलांचा गौरवजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत प्रभावीपणे काम करणाऱ्या महिलांचा एमआयटी एडीटीतर्फे पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये प्लास्टिक सर्जन डाॅ.उज्वला दहिफळे, कॅन बायोसिसच्या व्यवस्थापकीय संचालक सौ.संदीपा कानिटकर, कमानी ट्यूबच्या प्रमुख डाॅ.कल्पना सरोज, कुल दी ग्लोबच्या संस्थापक प्राची शेवगावकर, इंडिया ऑपरेशनच्या उपाध्यक्ष नेत्रा वालावालकर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य व्यवस्थापक सोनी ठाकूर, वैज्ञानिक श्रीजा जयंत, बाल कल्याण समितीच्या प्रमुख डाॅ.रानी खेडीकर, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रा.डाॅ.सुजाता घोडके, तृप्ती जळगावकर यांचा समावेश होता.