दिल्ली-आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपात बराच पेच निर्माण झाला आहे. भाजपाला जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात लढवायच्या आहेत तर एकनाथ शिंदे-अजित पवार हेदेखील जागांवरील दावा सोडायला तयार नाहीत. अशातच शिंदे-फडणवीस-अजितदादा यांना दिल्लीत बैठकीला बोलावण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा अमित शहा यांच्या निवासस्थानी या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जवळपास जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भाजप नेते अमित शहा यांच्यासोबत शुक्रवारी मध्यरात्री दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत राज्याच्या महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यात यश आले. दिल्लीत दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर खलबते झाले.
त्यानंतर भाजपच्या जागावाटपाच्या सूत्रावर तडजोड झाली. यामुळे भाजपच्या पुढील यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश केला जाऊ शकतो. बैठकीत अजित पवार यांना 4 जागा देण्याचे निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 10 जागा देण्यात येणार आहे. उर्वरित जागेवर भाजप निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, या बैठकीत जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीत यावर चर्चा होईल. त्यानंतर उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील नावांचा समावेश करण्यात येईल. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे एकाच विमानाने नागपूरला रवाना झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे नेते एकाच विमानाने मुंबईला दाखल झाले आहेत.
सध्या लोकसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबते सुरू असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे काही उमेदवार बदलण्याची केल्याची सूचना गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेच्या काही उमेदवारांबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना साशंकता असल्याचे समजत आहे. अजित पवार मात्र जागा वाढवण्याची मागणी करत असल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवारांना तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. वायव्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, रामटेक, पालघर, हातकणंगले या जागा भाजप स्वतःकडे घेऊ शकते, अशी सुत्रांची माहिती आहे. अजित पवार गटाला बारामती, शिरुर, रायगड, परभणी या जागा मिळू शकतात, तर शिर्डी आणि यवतमाळचे उमेदवार बदलले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.