ऋता उंबरजे आणि संगीता चाफेकर लिखित कंबुजा: एन्शियंट कंबोडिया पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : कंबोडियासह आशियातील अनेक देशांच्या संस्कृतीचे मूळ भारतीय संस्कृतीमध्ये आहे. भारतीय संस्कृतीचे वैभव आपल्याला आग्नेय आशियातील वास्तुशिल्पांमध्ये बघायला मिळते, तेथील लोक आजही भारतीय संस्कृतीचे पूजन मनोभावे करतात, परंतु आपल्या देशात आपल्या संस्कृती बद्दल मात्र उदासीनता दिसून येते. ही उदासीनता दूर करण्यासाठी कंबुजा: एन्शियंट कंबोडिया सारख्या पुस्तकांचा निश्चितच उपयोग होईल, अशी भावना ज्येष्ठ मूर्ती शास्त्र अभ्यासक गो.बं. देगलूरकर यांनी व्यक्त केली.
ऋता उंबरजे आणि संगीता चाफेकर लिखित कंबुजा: एन्शियंट कंबोडिया पुस्तकाचे प्रकाशन देगलूरकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष अरविंद जामखेडकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक डॉ.अंबरीश खरे यावेळी उपस्थित होते.
डॉ.गो.बं. देगलूरकर म्हणाले, आपल्या देशाच्या महान संस्कृती बद्दल इतर देशातील तज्ञ बारकाईने अभ्यास करताना दिसतात. आपल्याला मात्र आपल्या देशातील संस्कृती बद्दल केवळ माहिती असते. ही वैभवशाली परंपरा पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी कंबुजा: एन्शियंट कंबोडिया सारख्या पुस्तकांची गरज आहे. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी घेतलेली मेहनत आणि केलेले संशोधन निश्चितच कौतुकास्पद आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून तरुण पिढीला संस्कृतीची ओळख होईल आणि त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल रस निर्माण होईल.
अंबरीश खरे म्हणाले, कंबोडिया देशाचे मूळ हे भारतीय संस्कृतीमध्ये आहे. त्या देशातील अनेक मंदिरांमध्ये भारतीय शिल्प आढळतात, परंतु भारतीय संस्कृती अभ्यासण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी जाणाऱ्या भारतीयांची संख्या मात्र आजही कमी आहे. कंबुजा: एन्शियंट कंबोडिया पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या संस्कृती बद्दल आकर्षण निर्माण होऊन त्या ठिकाणी संशोधन करण्यासाठी तसेच पर्यटनासाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या वाढेल.
अरविंद जामखेडकर म्हणाले, आपणच आपल्या संस्कृतीचा सखोल अभ्यास करत नाही. आपल्या संस्कृतीचे वैभव आपल्याला परदेशामध्ये गेल्यानंतर कळते आपण विशेषतः तरुण परदेशामध्ये केवळ पर्यटनासाठी जातात त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी कंबुजा: एन्शियंट कंबोडिया सारख्या पुस्तकाचा उपयोग होईल. मंजिरी शहाणे यांनी सूत्रसंचालन केले.