Home Blog Page 1168

विकसित भारत ॲम्बेसेडर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी मांडला २०४७ मधील विकसित भारताचा रोडमॅप

महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवी प्रवासाचेही मांडले व्हिजन

विकासपूरक धोरणामुळे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य-देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. ९ : विकसित भारत ॲम्बेसेडर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०४७ मधील विकसित भारताचा रोडमॅप मांडला आणि त्यासोबतच महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवी प्रवासाचे व्हीजनही त्यांनी मांडले. पायाभूत सुविधा आधारित विकास, शाश्वत विकास, औद्योगिक विकास, सामाजिक विकास आणि विकासाला पूरक सुरक्षेचे वातावरण या पाच पैलूंच्या आधारे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य होईल, असा विश्वास श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.

भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे आयोजित ‘विकसित भारत ॲम्बेसेडर-विकसित पुणे’ कार्यक्रमात ते बोलत होते.  कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ,  सिद्धार्थ शिरोळे, हितेश जैन, डॉ.सुधीर मेहता, मनोज पोचट, क्रितीका भंडारी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, हरित ऊर्जेवर भर, सायबर सुरक्षेसाठी देशातील सर्वोत्तम प्लॅटफॉर्म निर्मिती, एआयच्या क्षेत्रात रोजगार निर्मितीद्वारे  महाराष्ट्रदेखील वेगाने विकासाकडे वाटचाल करत आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीला ७५ वर्षे होतील, तेव्हा महाराष्ट्र २ ट्रिलियन आकाराची अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे. जगातील सर्वांत मोठा सौर ऊर्जा वितरणाचा करार महाराष्ट्राने केला आहे. येत्या काळात राज्यात सोलर पार्क उभारण्यात येणार आहेत. शीतगृहांची संख्याही वाढविण्यात येत आहे.

राज्यात नवी रुग्णालये उभारण्यावर भर देण्यात येत आहे.  पुणे ते संभाजीनगर नवा महामार्ग तयार करण्यात येत असल्याने  नागपूरहून पुण्यात ६ तासांत येणे शक्य होईल. जेएनपीटीहून तीन पटीने मोठा असलेले वाढवण बंदरही विकसीत करण्यात येत आहे. महाराष्ट्र परकीय गुंतवणूकीतही देशात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच देशातील सर्वोत्तम सायबर सुरक्षेची यंत्रणा उभी केली जात आहे. शिक्षण क्षेत्रावरही विशेष लक्ष केंद्रित करून नोकऱ्यांमध्येही वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एकूणच भारत जगाच्या आर्थिक विकासाचे महत्वाचे केंद्र होत असतांना देशाच्या विकासाचे महाराष्ट्र हे ‘ग्रोथ इंजिन’ आहे, असे त्यांनी सांगितले.

सशक्त आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे देशाचा वेगवान विकास

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली  गेल्या १० वर्षात झालेल्या विविध धोरणांमधील क्रांतीकारी सुधारणा, विकसीत होणाऱ्या क्षमता, सर्व क्षेत्रात वेगाने होणारे अनुकूल परिवर्तन आणि वेगवान माहिती प्रसाराच्या आधारावर देशाची वाटचाल विकसीत अर्थव्यवस्था असलेल्या महाशक्तीच्या दिशेने होत आहे. १० वर्षापूर्वी जगातल्या सर्वात नाजूक अर्थव्यवस्था असलेल्या पहिल्या ५ देशापैकी  एक भारत होता आणि आता जगातल्या सशक्त अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. ‘क्रीडा क्षेत्र ते अंतरिक्ष’ आणि ‘विज्ञान ते स्टार्टअप्स’ या सर्व क्षेत्रांमध्ये भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लवकरच भारत जगातील तीसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल.

देशाच्या दरडोई उत्पन्नवाढीचा दर ४.५ टक्यावरून ८.४ टक्क्यावर गेला आहे. महागाईचा दर दोन आकडी संख्येवरून ५ टक्क्यापर्यंत खाली आला आहे. परकीय गुंतवणूक आणि निर्यातीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मोठे प्रकल्प पूर्ण होण्याचा सरासरी कालावधीही कमी होत आहे. धोरणांमधील आमुलाग्र बदल आणि पारदर्शक प्रशासनाच्या बळावर देशाने ही प्रगती साधली आहे. डिजिटल इंडिया, गतीशक्ती, मेक इन इंडिया, खेलो इंडिया, महिला केंद्रीत विकास योजना अशा अनेक धोरणांमुळे आणि योजनांमुळे ही प्रगती होत आहे, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले.

विकासात सामान्य माणसाच्या सहभागाने देश बलशाली

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंत्योदयाचा आणि गरीब कल्याणाचा विचार मांडला. देशात ६० कोटी नागरिकांचे बँक खाते उघडून त्यांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणले.  पीएम मुद्रा योजनेच्या माध्यमातून ३० कोटीहून अधिक महिलांची स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू झाली. लोकसंख्येला कौशल्य विकासाद्वारे मनुष्यबळात परिवर्तीत करणे प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेतून अनेक गरजूंना विम्याचं कवच देणे, ,  ‘ई-नाम’ योजनेतून अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांना एकमेकांशी जोडणे, अशा अनेक जनकल्याणारी योजना राबवून सामान्य माणसाला देशाच्या विकासात सहभागी करून घेण्यात आले. यामुळे ९ वर्षात २५ कोटी नागरिक दारिद्र्यरेषेच्यावर आले.

बँकींग क्षेत्रातील सुधारणांद्वारे अर्थव्यवस्थेला चालना

बँकींग क्षेत्रात रेकग्निशन, रिकॅपिटलायजेशन, रिझोल्युशन आणि रिफॉर्म  या ४ आर धोरणामुळे  पारदर्शकता आली. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा नफा १ लाख कोटी इतका झाला आहे. आज जगात मंदी असतांनाही देशाच्या विकासाचा दर चांगला आहे. डिजीटल व्यवहारात देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे. पायाभूत सुविधांवर होणारा खर्च २ लाख कोटींवरून १० लाख कोटींपर्यंत पोहोचला आहे. ग्रामीण भागात दररोज ९१ किलोमीटर लांबीचे रस्ते होत आहेत. विमानतळांची संख्या दुप्पट झाली असून देशान विमान निर्मिती होत आहे. पुण्यासाठी येत्या काळात आणखी एक विमानतळ उभारण्यात येणार असून या कामाची सुरुवात लवकरच होईल, अशी ग्वाही श्री.फडणवीस यांनी दिली.

एमएसएमईचे अर्थव्यवस्थेत मोठे योगदान

देशात एमएसएमईसाठी  ३ लाख ६७ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीमुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले. त्यांचे योगदान आपल्या जीडीपीमध्ये ३० टक्के झाले आहे. भारताची निर्यातदेखील वाढली आहे. देश परकीय गुंतवणुकीत पुढे जात असताना महाराष्ट्र त्यात अग्रेसर आहे. वाहन उद्योगाचा तिसरा मोठा बाजार भारत आहे आणि मोबाईल निर्मितीही भारतात होत आहे.

स्वदेशी, संस्कृती आणि सुरक्षिततेवर भर

देशाचा विकास साधतांना सांस्कृतिक पुनरुत्थानाला महत्व देण्यात आले आहे. राम मंदिराची उभारणी, कर्तव्य पथाचे नामकरण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळांच्या विकासाद्वारे देशाच्या गौरवाचे जतन व संवर्धन करण्यात येत आहे.  महिला केंद्रित धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. जनधन, आधार आणि मोबाईलच्या आधारे भ्रष्टाचारमुक्त नवी व्यवस्था करण्यात आल्याने योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. १० कोटी अपात्र लाभार्थी वगळल्याने देशाचे २ कोटी ७५ हजार कोटी रुपये वाचले असून त्याचा लाभ सामान्य लाभार्थ्यांना देता आला. कोविड संकटात स्वतःची लस तयार करणे, चांद्रयान-३ चे प्रक्षेपण, युक्रेन-रशिया युद्धातील डिप्लोमसी, जगात पोहोचलेले योगा आणि तृणधान्य  यामुळे देशाची शक्ती आणि वैभव जगाला कळले. आयएनएस विक्रांत सारखी विमानवाहू नौका देशात तयार होत आहे.

विविध क्षेत्रातील प्रगती पाहता पुढील ५ वर्ष देशाला यशोशिखरावर पोहोचविणारी असतील. यात सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. यादृष्टीने विकसित भारत ॲम्बेसेडर कार्यक्रमाला महत्व आहे. आपण केलेले एक चांगले काम  देशाला पुढे जाणार असल्याने नागरिकांनी देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन श्री.फडणवीस यांनी केले.

श्री.जैन यांनी विकसित भारत ॲम्बेसेडर कार्यक्रमाची माहिती दिली. हा कार्यक्रम लोकसहभागावर आधारित असून स्वच्छता, विकास, पर्यटन आदी विविध पैलूंचा यात समावेश होतो. हा कार्यक्रम आपल्या उज्वल भवितव्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.मेहता यांनी स्वागतपर भाषणात कार्यक्रमामागची संकल्पना मांडली. मतदान करणे आणि विकसित भारतासाठी क्रियाशील भूमिका या दोन बाबी महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.

पीएमपीसाठी ५०० गाड्यांची खरेदी

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची प्रमुख सार्वजनिक सेवा असलेल्या पीएमपीसाठी महापालिकेकडून विजेवर धावणाऱ्या ५०० गाड्यांची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या वाढणार असून, प्रवाशांना जलद सेवा मिळण्यास मदत होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील किमान १० लाख प्रवाशांची पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक सेवा आहे. त्या तुलनेत पीएमपीच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे ताफ्यातील गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने स्वयंसेवी संस्था, प्रवासी संस्थांकडून होत होती. ही बाब लक्षात घेऊन पुढील वर्षभरात नव्याने ५०० गाड्या खरेदी करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

१७७ गाड्यांची खरेेदी पहिल्या टप्प्यात

पीएमपी प्रशासनाने गेल्या काही महिन्यांत काही गाड्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबतचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीतही मंजूर झाला असून, गाड्या खरेदीची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत त्या संदर्भातील निविदा प्रक्रिया प्रसिद्ध होणार असून, १७७ गाड्यांची खरेेदी पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात सध्या विजेवर धावणाऱ्या ४७३ गाड्या आहेत. येत्या काही दिवसांत १७७ गाड्या दाखल होणार असून त्यामुळे ही संख्या ६५० एवढी होणार आहे. त्यामध्ये नव्याने घोषणा केल्याप्रमाणे ५०० गाड्यांची भर पडणार आहे. प्रस्तावित ५०० गाड्यांमध्ये १०० गाड्या विजेवर धावणाऱ्या, तर ४०० गाड्या सीएनजीवरील असतील, असे महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.

बारामतीचा उमेदवार जाहीर करतो असे म्हणत शरद पवारांनी केली सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा

पुणे-खासदार सुप्रिया सुळेंचे संसदेतील काम उत्तम आहे, त्यामुळे आज मी तुमच्यासमोर बारामतीचा उमेदवार जाहीर करतो असे म्हणत शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली आहे. आमदार संग्राम थोपटेंनी आपल्योसोबत राहावे, शरद पवार पाठिशी असल्यावर विकास काय असतो, ते मी दाखवून देईन असंही ते म्हणाले.

भोरमधील महाविकास आघाडीच्या सभेत बोलत होते.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी भोरमध्ये आघाडीच्या सभेचं आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी या सभेचे नियोजन केले होते. त्यामध्ये बोलताना शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे बारामतीमध्ये आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी सरळ लढत होणार आहे.

माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांचा गेल्या 40 वर्षांपासून राजकीय संघर्ष आहे. त्यांचा हा संघर्ष पुढच्या पीढीमध्ये म्हणजे अजित पवार आणि संग्राम थोपटेंमध्येही असल्याचं अनेकवेळा दिसून येतो. आता बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार शरद पवारांनी भोरच्या सभेच्या आधी अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि हा 40 वर्षाचा संघर्ष मिटवला.

प्रचारसभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, “संग्राम थोपटे यांच्या हाती तुम्ही या भागाचं नेतृत्व दिलं आहे. तुमचं जे काही दुखणं असेल ते दूर करण्याची जबाबदारी तुम्ही त्यांच्यावर टाकली आहे. आज तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की, संग्राम थोपटे….तुम्ही जे काही या तालुक्यासाठी कराल, जिल्ह्यासाठी कराल, राज्यासाठी कराल त्यामध्ये हा शरद पवार तुमच्या पाठीशी कायम राहील. यापूर्वी आपले रस्ते वेगळे होते. मात्र इथून पुढे आता शरद पवारांचा पाठिंबा असल्यानंतर विकासाबाबत, राजकारणाबाबत काय परिवर्तन होऊ शकतं हे दाखवल्याशिवाय राहणार नाही,” अशा शब्दात शरद पवार यांनी संग्राम थोपटे यांना भविष्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मोठी जबाबदारी देण्याचं आश्वासन दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. निवडणूक आयुक्तांचा राजीनामा अशा वेळी आला आहे, जेव्हा देशात काही आठवड्यांत लोकसभेची निवडणुक होणार आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यामागील कारणाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असताना निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आला आहे. मात्र, निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

दरम्यान, शुक्रवारीच निवडणूक आयोगाने केंद्रीय गृह मंत्रालय आणि रेल्वे अधिकाऱ्यांसोबत सुरक्षेबाबत बैठक घेतली होती, ज्यामध्ये देशभरात सुरक्षा जवानांच्या तैनातीबाबत चर्चा झाली होती. लोकसभा निवडणुकांव्यतिरिक्त, निवडणूक आयोगाला आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका घ्यायच्या आहेत. निवडणूक आयोगाचे पथक सर्व राज्यांचा दौरा करुन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात व्यस्त आहे. एप्रिल-मे मध्ये देशात लोकसभा निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज आहे.

अरुण गोयल हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 18 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांची नियुक्ती वादग्रस्त ठरली. त्यांच्या नियुक्तीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले हते. दरम्यान, सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सरकारला विचारले होते की, ”व्हीआरएस घेण्याच्या दुसऱ्याच दिवशी अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्याची घाई काय होती? कायदामंत्र्यांनी निवडलेल्या नावांच्या यादीतून चार नावे निवडली. त्यानंतर ही फाईल 18 नोव्हेंबरला विचारार्थ ठेवण्यात आली आणि त्याच दिवशी ती पुढे पाठवण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्याच दिवशी पंतप्रधानांनीही त्यांच्या नावाची शिफारस केली. 

छोटा शेख सल्ला दर्ग्याच्या परिसरातील नविन मस्जिद इमारतीचे बेकायदा बांधकाम स्वतःहुन काढून घेण्याचा ट्रस्टींनी जाहीर केला निर्णय

पुणे-कसबा पेठेमध्ये असलेल्या छोटा शेख सल्ला दर्ग्याच्या परिसरातील बेकायदा बांधकाम स्वत:हून काढून घेण्याचा निर्णय दर्ग्याच्या विश्वस्तांनी शनिवारी (ता. ९) जाहीर केला. पोलिस आयुक्तालयात शनिवारी पार पडलेल्य्या बैठकीत हा निर्णय विश्वस्तांनी घेतला.

महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, दर्ग्याचे विश्वस्त बैठकीस उपस्थित होते.

कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिराजवळ छोटा शेख सल्ला दर्गा परिसरातील बेकायदा बांधकामावर कारवाई केली जाणार असल्याची बातमी शुक्रवारी रात्री पसरली. त्यानंतर दर्ग्याच्या परिसरात मोठा जमाव जमला होता. परिसरात घोषणाबाजी करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला. या परिसरात कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

छोटा शेख सल्ला दर्ग्याच्या परिसरातील नविन मस्जिद इमारतीचे विना परवाना झालेले वाढीव बांधकाम स्वतःहुन काढण्यासाठी ट्रस्टने तयारी दर्शविली आहे. आताच छोटा शेख सल्ला दर्ग्याच्या ट्रस्टींनी एक निवेदन सादर केलंय, त्यामध्ये त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं असून त्यांनी नागरिकांना दर्गा ट्रस्टला व प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

या निवेदनामध्ये त्यांनी असं म्हंटलंय की,

आम्ही छोटा शेख सल्ला दर्ग्याचे ट्रस्टी आज दि. 9 मार्च 2024 रोजी आम्ही संयुक्तरित्या जाहीर प्रकटन करतो की, छोटा शेख सल्ला दर्गा येथील नविन मस्जिद मान्य नकाशा प्रमाणे जागेवर वाढीव / अनाधिकृत विट बांधकाम, दरवाजे / खिडक्या, निष्कासन अनुषंगाने आम्ही मनपा व पोलिस प्रशासनासोबत चर्चा केल्यानंतर सदर वाढीव बांधकाम काढण्यास आम्ही सहमती देत आहोत व ते मनपा आदेशाप्रमाणे आम्ही स्वतः निष्कासित करून देण्यास सदरची ट्रस्ट तयार आहे.

1. छोटा शेख सल्ला दर्गा येथील दर्ग्याच्या कोणत्याही स्ट्रक्चरला कारवाई दरम्यान हानी अथवा इजा पोहचणार नाही तसेच सन 1927 साली गॅझेट झालेल्या जुन्या मशिदीला कोणतीही इजा पोहचणार नाही.

2. दि. 30 मार्च 2019 रोजी मनपाने वर्क स्टॉप नोटीस दिल्यानंतर त्या परिसरातील नविन मस्जिद इमारतीचे विना परवाना झालेले वाढीव बांधकाम फक्त निष्कासित करण्यात येईल.

3. भविष्यात सदरची न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान ट्रस्टच्या बाजुने न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आता झालेल्या क्षतीची पुर्ती प्रशासन करेल.

4. सदर बांधकाम परवानगीकरिता भविष्यामध्ये जे अर्ज प्राप्त होतील त्यावर नियमानुसार प्रशासनामार्फत सकारात्मक विचार करून कायदेशिर निर्णय घेण्यात येतील.

5. जर ट्रस्टी यांनी विनंती केली तर कायदेशिर अस्तित्वात असलेल्या स्ट्रक्चरचे नुतनीकरणाकरिता सीएसआर मार्फत मनपा प्रशासन सर्वतोपरी मदत करेल.

सर्व नागरिकांना विनंती आहे की, दर्गा ट्रस्ट व प्रशासनाला आपण सर्व मिळुन सहकार्य करूया.

आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली आहे मात्र आम्हाला ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला तर हिंदू काय हे देखील दाखवून देऊ, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र निर्माण सेनेचे पुणे येथील सरचिटणीस अजय शिंदे यांनी जाहीर करत या वादात उडी घेतली होती .

पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द

दरम्यान पुणे शहरांमध्ये या प्रकरणामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती . या सर्व पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या . या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि सर्वांना शांत राहण्याचे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले .

या सर्व पार्श्वभूमीवर ट्रस्ट ने घेतलेली भूमिका स्वागतार्ह आणि समंजस व शांततापूर्ण वातावरणासाठी पूरक अशी मानली जाते आहे.

१८ डिसेंबर २०१८ ची मुख्य सभा -542 अनधिकृत धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी तोडगा काढू -महापौर

नूतनीकरणाला मदत करणार – महानगरपालिका

न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रशासन काम करेल. बांधकामाच्या परवानगीबाबत अर्ज आल्यानंतर नियमानुसार प्रशासनाकडून सकारात्मक विचार करण्यात येईल. विश्वस्तांनी विनंती केल्यास कायदेशीर अस्तित्वात असलेल्या बांधकामाच्या नूतनीकरणासाठी सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) महापालिका प्रशासन सर्वपोतरी मदत करेल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.

सात जेसीबी आणि २० डंपर तैनात -महापालिका तयारीतच होती
दर्ग्याच्या परिसरात अनधिकृत बांधकाम काढून घेण्यासाठी महानगरपालिकेने ट्रस्टला २२ फेब्रुवारीला नोटीस बजावली होती. अतिक्रमण काढण्यासाठी सात दिवसांनी मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतीत अतिक्रमण न काढल्याने महापालिकेने कारवार्इची तयार सुरू केली. त्यासाठी सात जेसीबी व सुमारे २० डंपरची व्यवस्था टिळक पुलाजवळ करून ठेवण्यात आली होती. गेल्या चार दिवसांपासून महानगरपालिकेत गोपनीय पद्धतीने याचे नियोजन सुरू होते. याबाबत कुठेही वाच्यता न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

शहराचे सौंदर्य राखण्याची गॅरंटी कोण घेणार? या विद्रुपीकरणावर विक्रमी कारवाईचे धारिष्ट्य दाखवाल काय ?

आबा बागुलांचा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना सवाल

पुणे-वृत्तपत्रे आणि टीव्ही यासह विविध ठिकाणी होर्डिंग बाजी करत भाजपच्या जाहिरातींच्या अतिमाऱ्यामुळे लोक वैतागले असताना आता कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना छेडले आहे. आणि शहराच्या विद्रुपीकरणावर विक्रमी कारवाईचे धारिष्ट्य दाखवाल काय ?शहराचे सौंदर्य राखण्याची गॅरंटी कोण घेणार? असे सवाल केले आहेत.जाल तिथे मोदींचा चेहरा दिसेल अशी जाहिरातबाजी आणि पर्यटनाची पुरपूर हौस भागवणारी कारकीर्द पंतप्रधान मोदी यांची दिसून आली आहे या पार्श्वभूमीवर आता बागुलांनी आणि एकूणच विरोधकांनी शहरभरातील रस्तोरस्ती भाजप भिंतीवर जाहिराती करून त्या खराब करत असल्याकडे आणि हे सारे परवान्याशिवाय चालू असल्याकडे लक्ष वेधले आहे.

या संदर्भात बागुल यांनी असे म्हटले आहे कि,’ एकीकडे शहराचे सौंदर्य जपण्याचे आवाहन होत असताना दुसरीकडे फ्लेक्स,बॅनर्स आणि आता एका राजकीय पक्षाकडून भिंती रंगविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू असूनही प्रशासनाचे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.वास्तविक शहराचे सौंदर्य जपण्याची ‘गॅरंटी’ दिली पाहिजे ;पण शहराचे विद्रुपीकरण  करण्यास प्रशासनच एकप्रकारे खतपाणी घालत आहे.त्यामुळे उद्या हेच विद्रुपीकरण हटविण्यासाठी  करदात्या पुणेकरांच्या रकमेचाच चुराडा होणार आहे.मग प्रश्न असा बेकायदेशीररीत्या बॅनर्स, भिंती रंगविणारे नामानिराळे होतील आणि त्यांनी केलेले विद्रूपीकरण हटविताना जनतेचा पैसा खर्च करणे योग्य कि वेळीच असे बॅनर्स व भिंती रंगविण्याचे उद्योग रोखणे,अशा प्रकाराला अटकाव घालणे? याचे उत्तर आपण पुणेकरांना दिले पाहिजे. त्यामुळे आपणास विनंती आहे की ,तातडीने एका राजकीय पक्षाकडून प्रचारासाठी भिंती रंगविण्याचा प्रकार तात्काळ रोखून संबंधितांवर कारवाई करावी.

ओटीटी वर हवा मेरी ख्रिसमस चित्रपटाची 

 कतरिना कैफ आणि विजय सेतुपती-स्टारर ‘मेरी ख्रिसमस’ आला ओटीटी वर प्रेक्षकांनी केलं तोंडभरून कौतुक 

कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर ‘मेरी ख्रिसमस’ आता नेटफ्लिक्स वर आला असून याने चित्रपट गृहात खूप कौतुक आणि प्रेम मिळवलं आहे. सर्वाधिक चर्चेत असलेल्या थ्रिलर्सपैकी एक म्हणून उदयास आलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आला आहे असून श्रीराम राघवन दिग्दर्शित हा OTT प्लॅटफॉर्मवरील ट्रेंडिंग चित्रपटांपैकी एक ठरला आहे. 

चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यावर समीक्षकांची प्रशंसा मिळालेला हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांची मन जिंकूनझळकतो आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. एका प्रेक्षकाने लिहिलं “ हा चित्रपट आणि त्यांची केमिस्ट्री. मॅच मेड इन हेवन ” दुसऱ्या एका चाहत्याने नमूद केले, “कतरिना कैफपासून माझी नजर हटवू शकत नाही  ती चित्रपटात देवदूत दिसली आणि तिचा अभिनय चित्तथरारक आहे” आणि दुसरी टिप्पणी वाचली, “काल रात्री पाहिले आणि ते खूप मनोरंजक आहे  खूप प्रेम ” 
https://www.instagram.com/reel/C4PhWgJSOp1/?utm_source=ig_web_copy_link
 श्रीराम राघवनच्या दिग्दर्शनात पहिल्यांदाच चाहत्यांनी कतरिना कैफला अशा प्रकारात पाहिलं. या चित्रपटाने अभिनेत्रीच्या अष्टपैलुत्वावर तसेच तिच्या अभिनय कौशल्यावर प्रकाश टाकला. या चित्रपटाचे त्याच्या रोमांचक कथेसाठी कौतुक करण्यात आले होते, परंतु कॅटरिनाची विजय सेतुपतीसोबतची केमिस्ट्री चर्चेची ठरली. श्रीराम राघवन दिग्दर्शित सिनेमॅटिक तेजस्वी ठरले कारण त्याने IMDb वर 8.8 रेटिंग मिळवले.

मुंबई भाजपकडून सहा डिजिटल प्रचार रथाचे उद्घाटन

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात मोदी सरकारच्या विकासकामांची माहिती दिली जाणार

मुंबई दिनांक ९ मार्च २०२४
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाने प्रचारात आघाडी घेतली असून मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते आज सहा डिजिटल प्रचार रथाला झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. दादर येथील मुंबई भाजपा कार्यालयाच्या आवारात प्रचार रथ शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

डिजिटल प्रचार रथाच्या माध्यमातून मुंबईतील सहाही लोकसभा क्षेत्रातील मुंबईकरांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांची माहिती पोहोचवली जाणार आहे. उद्घाटन प्रसंगी आमदार प्रसाद लाड, महामंत्री संजय उपाध्याय, सर्व नगरसेवक, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, अन्य पक्षांच्या तुलनेत भाजपाने प्रचाराच्या सर्वच आघाड्यांवर आघाडी घेतली असून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत भाजपा पोचली आहे.

मुंबईतील महिला बचत गट अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका अशा सर्व घटकांची संपर्क आणि संवाद साधण्याचे काम सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्षाने केले आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक पोलिंग स्टेशनवर सुपर वॉरिअरची सक्षम व्यवस्था उभी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता मेहनत घेत आहे. निवडणूक संचालन समितीची बैठका होत आहेत. विरोधक झोपेत असताना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते झटून कामाला लागले आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक संचालन समितीच्या बैठका यशस्वी होत आहेत. योजनांच्या लाभार्थ्यांची संवाद साधला जात आहे.
विकसित भारत म्हणजे ती घोषणा अथवा नारा नाही तर १४० कोटी भारतीयांचे स्वप्न आहे.
२०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याचे शंभरावे वर्ष पूर्ण करेल त्यावेळी भारत अविकसित किंवा विकसनशील नसेल तर विकसित देश असेल. हे १४० कोटी भारतीयांचे स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत यात्रा सुरू आहे असेही ते म्हणाले.

मुंबईकरांसाठी भारतीय जनता पक्ष नेहमीच पुढे राहिला आहे शहरात शंभरहून अधिक ठिकाणी आधार कार्ड, मेडिकल चेकअप, डिजिटल इंडिया यासारखे उपक्रम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून यशस्वीरित्या राबविण्यात आले आहेत. अनुसूचित जाती जमाती बांधवांसाठी भारतीय जनता पक्ष पुढे राहिला आहे. काम करणाऱ्या महिलांना वसतिगृह, युवकांशी, अल्पसंख्यांक बांधवांशी स्नेहसंवाद असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुंबईकरांच्या सेवेसाठी सगळ्यात पहिला कुठला पक्ष पोहोचला असेल तर तो मोदीजींचा भारतीय जनता पक्ष आहे.
लोकसभा निवडणुकीची पहिली यादी सुद्धा भारतीय जनता पक्षाने जाहीर केली. माहिती घटक पक्षांबरोबर प्रचाराला थेट सुरुवात म्हणून आजचा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे एक करोड चाळीस लाख मुंबईकरांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांना पोहोचवण्याचा संकल्प मुंबई भारतीय जनता पार्टीने केला. दरम्यान सहा भाजपा जिल्हाध्यक्ष निवडणुकीचे संयोजक आहेत. नगरसेवक, पदाधिकारी स्थानिक पातळीवर सक्रिय आहेत. भारतीय जनता पक्षाने पाच वर्ष प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली आहे म्हणूनच ‘अबकी बार चारसो पार’ असे आम्ही आत्मविश्वासाने म्हणत आहोत असेही मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.

महिला दिन आणि शिवरात्रीच्या मुहूर्तावर महिला कारागृहात झाला एका बालकाचा नामकरण सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम

पुणे-महिला दिन आणि शिवरात्रीच्या मुहूर्तावर महिला कारागृहात एका बालकाचा नामकरण सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला . या संदर्भात कारागृहाच्या वतीने देण्यात आलेली माहिती अशी कि,’ कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता ,विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांचे प्रेरणेने दि. ८.०३.२०२४ रोजी महिला दिनाचे औचित्य साधुन येरवडा मध्यवर्ती कारागृह व रोटरी क्लब ऑफ खडकी, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने येरवडा महिला कारागृहात कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, यांचे प्रमुख उपस्थितीत महिला बंद्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.
येरवडा महिला कारागृहामध्ये सरासरी २७५ ते ३०० महिला बंदी बंदिस्त असतात. महिला दिनाचे निमित्ताने महिला बंद्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी स्वाती साठे यांचे हस्ते महिला कारागृहात बसविण्यात आलेल्या वॉशिंग मशिनचे उद्घाटन करण्यात आले. तसेच रोटरी क्लब ऑफ खडकी, पुणे यांचमार्फत महिला बंदीच्या आरोग्याच्या दृष्टिने वॉटर प्युरीफायर देण्यात आले. दि. ११.११.२०२३ रोजी महिला कारागृहात एका बाळकृष्णाचे आगमन झाले. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत बाळाचा नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला. महिला दिन व महाशिवरात्री, हा योग साधून या छोटया बाळाचे शिवा असे नामकरण करण्यात आले.


स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदरच्या विविधरंगी कार्यक्रमात श्री गणेश वंदना, लावणी, कथ्थक, झुंबा, देवी गोंधळ, मंगळागौर, शिवतांडव, बंगला डान्स, नटरंग, भारुड, बाईपण भारी देवा व विविधतेतून एकतेचा संदेश देणारा फॅशन शो अशा विविध रंगी कार्यक्रमाचे यावेळी महिला बंद्याकडून उत्कृष्टपणे सादरीकरण करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शनपर भाषण करताना स्वाती साठे, यांनी महिला बंदीच्या या कार्यक्रमाचे खूप कौतूक केले. तसेच सिध्ददोष महिला बंदींना यानिमित्ताने विशेष माफी जाहीर केली. यावेळी येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ, डॉ. भाईदास ढोले, पल्लवी कदम, उपअधीक्षक रविंद्र गायकवाड, वरिष्ठ तुरुंगाधिकारीआनंद कांदे, , तसेच श्रीमती पुनम किशनचंदानी, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ खडकी, पुणे, श्रीमती उमा अग्रवाल, शिखा गुप्ता, रुपल पटेल, सोमा बेडेकर, शितल तेजवाणी, सुनिती गोयल मंजु प्रसाद उपस्थित होते.
रतन खिलारी, वैशाली मारकड, पौर्णिमा पालोदकर, महिला तुरुंगाधिकारी, रुणाक्षी गवळी, शिक्षिका, हिना सय्यद, सामाजिक कार्यकर्ता, सोनाली जाधव, वनिता वाघमारे, मनिषा गुडेकर, सीमा तुपे, सुनिता बनकर, रुखसाना शेख, स्नेहा कांबळे, माधुरी पुसदकर, तृप्ती धुमाळ, मुक्ता सूर्यवंशी, प्रतिभा पाटील, नजमा फुलमामडी, वर्षा मोकाटे, योगीनी शेलार, सोनाली सावंत, गीता बादणे, महिला शिपाई यांनी सदरच्या सदाबहार कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रजनी मोटके, शिक्षिका यांनी तर आभार प्रदर्शन उपअधीक्षक पल्लवी कदम यांनी केले.

“केंद्राची आयुष्मान भारत कार्ड व ई-श्रम कार्ड योजनेचा कैद्यांना लाभ देण्यास प्रारंभ

भारतातील सर्वप्रथम प्रयोग सातारा जिल्हा कारागृहामध्ये बंदीसाठी –विविध उपक्रमांचे उद्घाटन अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते

सातारा-समता फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा कारागृहामध्ये आज विविध कार्यक्रमांची, शिबिरांची आखणी करण्यात आली. सदर कार्यक्रम व उद्घाटन प्रसंगी कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक श्री अमिताभ गुप्ता, भा.पो.से. यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विविध कार्यक्रमाचे उद्घाटन व आयुष्यमान भारत कार्ड व ई-श्रम कार्ड यांचे वाटप देखील केले. यावेळी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख व कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, समता फाउंडेशनची टीम व इतर अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते.

ऑनलाइन ई-मुलाखत कक्ष –

कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक श्री अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून कारागृहातील बंद्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी सहजतेने बोलता यावे, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व ई-मुलाखत सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्हा कारागृहातील बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी प्रत्यक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क, संवाद साधता यावा यासाठी ई-मुलाखत कक्षाचे उद्घाटन श्री गुप्ता यांच्या हस्ते आज करण्यात आले. सदर कक्षामध्ये ई-मुलाखतसाठी दोन लॅपटॉप उपलब्ध करण्यात आले आहेत. ज्यामध्ये बंद्यांचे नातेवाईक ऑनलाईन लिंकद्वारे कनेक्ट होऊन बंदी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलिंग सिस्टीमद्वारे प्रत्यक्ष संवाद साधू शकतात व पाहू देखील शकतात. तसेच न्यायालयामध्ये प्रत्यक्ष हजर करण्यासाठी देखील दोन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग युनिट उपलब्ध करण्यात आलेले आहेत. 

आयुष्यमान भारत कार्ड –

सातारा जिल्हा कारागृहात आजपर्यंत एकूण 71 बंदींचे आयुष्मान भारत कार्ड काढण्यात आले आहे यामुळे कारागृहातून बंदी सुटल्यानंतर त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना एकूण 5 लाख रुपयांच्या आतील आजारांवर उपचार मोफत घेता येणे शक्य होणार आहे.

ई – श्रम कार्ड –

कारागृहातील बंद्यांचे ई-श्रम कार्ड देखील काढण्यात आलेले आहे. सातारा कारागृहातील आज एकूण 10 बंदींचे ई-श्रम कार्ड काढण्यात आले आहे. या कार्डमुळे कारागृहातील बंदी कारागृहातून सुटल्यानंतर खाजगीमध्ये काम करत असताना त्याला कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास त्यामध्ये 1 लाखापर्यंतचा विम्याची सवलत त्याला मिळणार आहे. तसेच अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाखापर्यंत या कार्डमार्फत कुटुंबीयांना मदत मिळणार मिळू शकते. 

स्कीन चेकअप कॅम्प –

सातारा जिल्हा कारागृहामध्ये एकूण 330 बंदी असून या बंद्यांचे स्किन चेक अप करणे आवश्यक असते. त्याबाबत सातारा कारागृह अधीक्षक यांनी समता फाउंडेशनचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम अगरवाल यांच्याशी संपर्क साधून अशा प्रकारचे स्किन कॅम्प घेण्याबाबत विनंती केली होती. त्याच अनुषंगाने आज कारागृहात स्कीनचे कॅम्प घेऊन कारागृहातील सर्व बंद्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणी शिबिराचे उद्घाटन अपर पोलीस महासंचालक श्री अमिताभ गुप्ता यांनी केले. यामध्ये एकूण 24 बंद्यांना त्वचारोग निदानानुसार मोफत औषधोपचार करण्यात आले. डॉक्टर श्री विजय सुतार व सौ कविता सुतार यांनी बंद्यांची तपासणी करून उपचार केले.

आय चेक-अप कॅम्प –

कारागृहात असणाऱ्या वयोवृद्ध बंदयांच्या डोळ्याबाबतच्या समस्या अनेक वेळा असतात. यासाठी देखील समता फाउंडेशनच्या वतीने कारागृहात आय चेकअप कॅम्प घेण्यात आला. यामध्ये कारागृहातील बंद्यांचे चेकअप करून एकूण 34 बंद्यांना योग्य ते औषध उपचार करण्यात आले. या चेक-अप नंतर ज्या बंदींना चष्मा लागला असेल, त्यांना मोफत चष्म्याची वाटप देखील लवकरच करण्यात येणार आहे. सदर नेत्र शिबिरासाठी डॉक्टर निकिता देशमुख यांनी बंद्यांची तपासणी व उपचार केले.

भजन साहित्याचे वाटप –

कारागृहातील बंदयांच्या मनोरंजनासाठी तसेच भक्ती संगीतासाठी, भजन व कीर्तनासाठी समता फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून भजनाचे विविध साहित्य बंद्यांना भेट देण्यात आले. यामध्ये मृदुंग, पेटी, टाळ, तबला इत्यादी साहित्य भेट म्हणून देण्यात आले.

खेळ साहित्याचे वाटप –

कारागृहातील बंदींना गुन्हापासून परावृत्त करण्यासाठी तसेच सतत गुन्ह्यांची चर्चा व विचार करू नये व त्यांचा वेळ खेळामध्ये जावा यासाठी समता फाउंडेशन यांच्याकडून विविध खेळांच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये कॅरम, हॉलीबॉल, चेस अशा विविध खेळांच्या साहित्याची भेट बंद्यांना देण्यात आली.

महिला बंद्यांसाठी सॅनिटरी नॅपकिन –

या कारागृहात अनेक महिला बंदी विविध गुन्ह्यांमध्ये बंदिस्त आहेत. त्यांची देखील वैद्यकीय तपासणी स्किन कॅम्प आय कॅम्प इत्यादी तपासण्या नियमित करण्यात येऊन त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्यात येत असते. समता फाउंडेशन यांच्याकडून कारागृहातील महिला बंदीसाठी सॅनिटरी नॅपकिन भेट देण्यात आले.

महाराष्ट्र कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक श्री अमिताभ गुप्ता यांनी कारागृह विभागामध्ये पदार्पण केल्यापासून बंद्यांसाठी विविध योजना, सेवा, सुविधा, सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्येच कारागृहातील बंदींना दरमहा दहा हजार रुपये स्वतःवर खर्च करणे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व ई-मुलाखतद्वारे नातेवाईकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, बंद्यांना झोपण्यासाठी मॅट्रेसची सुविधा उपलब्ध करून देणे अशा अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहे. यामुळे कारागृहातील बंध यांचे खरोखरच सुधारणा आणि पुनर्वसन होण्यास विलंब लागणार नाही अशी बंद्यांच्या मनात चांगली भावना निर्माण होत आहे.

कांचन अधिकारी यांच्या नव्या आशयघन ‘जन्मऋण’ चित्रपटाचे पोस्टर सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लॉन्च!

मुंबई: अत्यंत जिव्हाळ्याचा आशयघन विषय घेऊन प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक कांचन अधिकारी  ‘जन्मऋण’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लोकसभा खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लॉन्च करण्यात आले. ‘आभाळमाया’ या लोकप्रिय मालिकेतील मराठी प्रेक्षकांच्या मानत रुंजी घालणारी जोडी शरद आणि सुधा जोशी अर्थात अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांचा अष्टपैलू अभिनय पाहण्याची पर्वणी २२ मार्च पासून पुन्हा एकदा या चित्रपटामुळे प्रेक्षकांना मिळणार आहे.

या चित्रपटाविषयी बोलताना सुनील तटकरे म्हणाले, “कांचन अधिकारी यांच्या या चित्रपटाने अत्यंत वेगळ्या आणि संवेदनशील विषयाला हात घातला आहे. अभिनेते पद्मश्री मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांचा लाजवाब अभिनय, उत्कृष्ट सामाजिक आशयाच्या कथेसोबत कोकणाचे मोहक रूप प्रेक्षकांनी या चित्रपटातून नक्की अनुभवावे”

अंधकारमय शून्यात हरवलेली सुकन्या कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावरील आर्तता आणि शांत, संयमी, सारं काही निसटून गेल्याने कष्टी झालेल्या मनोज जोशींच्या चेहऱ्यावरील भाव चित्रपटातील आशयाची खोली दर्शवतात. नव्या क्षितिजाकडे वाटचाल करण्यासाठी निघालेला अभिनेता तुषार आरकेच्या चेहऱ्यावरील आनंद कुतूहल जागवतो. तांबडं फुटलेलं आकाश आणि त्यात झेपावलेलं विमान चित्रपटाच्या गहिऱ्या आशयाची ओळख करून देते. पुसटश्या काळ्या गोल कडेच्या आत लाल गडद रंगावर सफेद ‘जन्मऋण’चा लोगो भलताच उठावदार दिसत असून तो आईवडिलांच्या नितळ शांत संयमी प्रेमाचे प्रतीक वाटतो. सुंदर खेड्यातील परिसर-घरे यातील स्थळकाळाची खूणगाठ करून देतात.

आई वडील मुलांना जन्म देतात व मुलं मोठी झाली तरी पालकांच मुलांवरच प्रेम तसंच असतं अगदी त्यांच्या म्हातारपणी सुद्धा. पण मुलांच्या बाबतीत मात्र वेगळेपणा दिसून येतो. आई बापाची मुलांना अडगळ होऊन जाते व मग सुरू होते ती पालकांची शोकांतिका. मग अशा अवस्थेत पालकांनी काळाची पावलं ओळखून अगोदरच कोणत्या खबरदाऱ्या घ्यायच्या? आपल्या मालमत्तेचे रक्षण आपल्या अंतकाळापर्यंत कसे करायचे? मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्यात होणारे बदल कसे ओळखायचे? नातेसंबंधाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देणारा चित्रपट ‘जन्मॠण’ घेऊन येत आहेत लेखिका, निर्माती, दिग्दर्शक कांचन अधिकारी.

या चित्रपटात मनोज जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, तुषार आर.के., अनघा अतुल, शशी पेंडसे, प्रज्ञा करंदीकर, धनंजय मांद्रेकर, दर्पण जाधव, विराज जोशी, कपील पेंडसे, सिद्धेश शिगवण आणि पाहुणे कलाकार म्हणून खास भूमिकेत हिंदी मालिका-चित्रपट अभिनेते महेश ठाकूर, निहारिका रायजादा यांनी काम केले आहे. जन्म ऋणचे कथा – संवाद कांचन अधिकारी, मंजुश्री गोखले यांचे असून डीओपी सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून अखंड कोंकणचे सौन्दर्य खुलले आहे. संगीतकार वैशाली सामंत आणि गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत यांच्या संगीत सुरावटीने ही कथा ह्रदयाला थेट भिडते. २२ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या समवेत नाना पाटेकर साताऱ्यातील कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चेला ऊत

सातारा दि.९: मौजे दरे (ता. महाबळेश्वर) येथील बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. बांबू, टसर रेशीममुळे पूरक रोजगाराची मोठी संधी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

दरे येथे झालेल्या कार्यक्रमास राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीस व रेशीम उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दरे तर्फ तांब येथे बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्प साकारण्यात आला आहे. शेतकरी, तसेच महिला व युवकांना कृषी व वनउपज उत्पादनासाठी पूरक रोजगार  मोठी संधी उपलब्ध होणार आहे. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत कोयना धरणातील गाळ काढण्यात येणार आहे.

टसर (वन्य) रेशीम शाश्वत रोजगार व संवर्धन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

सह्याद्री पर्वतरांगातील शेतकऱ्यांसाठी टसर रेशीम शेती वरदान ठरेल -मुख्यमंत्री

टसर (वन्य) रेशीम शाश्वत रोजगार व संवर्धन प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, जंगल भागातील शेतकरी महिला व युवकांना टसर रेशीम शेती नाविन्यपूर्ण शाश्वत उद्योग आहे. ऐन झाडाची लागवड रोजगार हमी योजनेतून करता येते. कुठेही नांगरण करायचे नाही, पाण्याची आवश्यकता नाही, औषध फवारणी नाही त्यामुळे सह्याद्री पर्वतरांगांमधील शेतकऱ्यांसाठी टसर रेशीम शेती एक वरदान ठरणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख,उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज उपस्थित होते.

जल पर्यटन प्रकल्पामुळे पर्यावरणपूरक विकासासह स्थानिकांच्या रोजगारास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा दि. ९ (जिमाका): गोड्या पाण्यातील देशातील सर्वात मोठे कोयना जल पर्यटन केंद्र आहे. या माध्यमातून पर्यावरणपूरक विकास आणि स्थानिकांना रोजगारास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

जिल्ह्यातील मुनावळे  (ता. जावळी) येथे कोयना जलाशय (शिवसागर) तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटन शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, ज्येष्ठ सिने अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, एमटीडीसीच्या व्यवस्थापक श्रीमती शर्मा, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक आणि जयंत शिंदे, महाराष्ट्र पर्यटन विकास प्रकल्पाचे सल्लागार सारंग कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सह्याद्रीच्या कुशीत प्रचंड निसर्ग सौंदर्य लपलेले आहे. त्याला चालना देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता होती. त्यासाठी ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट काढल्याने या परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे. मासेमारी, बोटिंग, जल पर्यटनासाठी या बाबीचा फायदा होणार आहे. मात्र, विकास करत असताना तो कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणपूरक असला पाहिजे. पाणी  प्रदूषित होता कामा नये. तसेच स्थानिक लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, अशा सूचना पर्यटन विभागाला आपण दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जल पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यास आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मोठा वाव आहे.

स्थानिक बोट व्यावसायिकांना बोट खरेदीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगून ते म्हणाले, या भागाच्या विकासासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आपटी ते तापोळा तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा रघुवीर घाटातील रस्ता या बाबीही प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  रोजीरोटीसाठी गावापासून आई-वडिलांपासून, कुटुंबापासून, तरुणांना दूर जावे लागते. त्यांना रोजगारासाठी गाव सोडून जावे लागू नये, उलट गाव सोडून गेलेले पुन्हा आपल्या घरी यावेत, त्यांना स्थानिक स्तरावरच रोजगार उपलब्ध व्हावेत हा आपला उद्देश आहे. विकासात्मक काम करणारे शासन असल्यामुळे राज्यात अनेक पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. 1 लाख 37 हजार कोटीचे प्रकल्पांचे दावोस येथील उद्योग परिषदेमध्ये करार झाले आहेत. 3 लाख 93 हजार कोटींचे उद्योग राज्यात येत आहेत. 5 लाख कोटींची गुंतवणूक आपण राज्याच्या विकासासाठी आणली आहे. उद्योग वाढीसाठी उद्योगांना सर्वतोपरी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी जल पर्यटन प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच रोजगार मिळावा, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, मुनावळे गावचे सातबारे खातेदारांच्या नावावर करून मिळावेत, अन्य उर्वरित रखडलेले प्रकल्पही मार्गी लावावेत, जलाशयात मासेमारी परवाने मिळावेत, अशा मागण्या केल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस पर्यटन विकास विभागाच्या कोयना जल पर्यटन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्यासह अन्य मान्यवरांनी काउंटरवर तिकीट खरेदी केले. या कार्यक्रमात स्थानिक तरुणांना प्रातिनिधीक स्वरूपात रोजगाराची नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, सरपंच श्री. भोसले,  विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

भाजपची 10 वर्षांत विकासाची पाटी कोरी:पुण्यात भींती रंगवून विद्रुपीकरण सुरू, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आंदोलन

पुणे -गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या सरकारने खरंतर जनतेसमोर विकासाचा पाढा वाचायला हवा. मात्र 10 वर्षे सत्ता उपभोगूनही विकासाची पाटी कोरीच असल्याने भारतीय जनता पार्टीला निवडणुकीत मते मागण्यासाठी पुणे शहर रंगवून विद्रूप करण्यापलीकडे गत्यंतर उरले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने केली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या मतांच्या राजकारणासाठी सुंदर पुणे शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. पुणे शहराच्या या विद्रुपीकरणाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात मित्र मंडळ चौक पर्वती येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी जगताप म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. दहा वर्षात देशावर वाढलेला कर्जाचा बोजा, ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढलेली बेरोजगारी, महागाई, भारतातून बाहेर गेलेले उद्योगधंदे, महिलांच्या विरोधात होणाऱ्या अत्याचारात झालेली वाढ, शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या, ढिसाळ निर्यात धोरणाने बळीराजाचे झालेले नुकसान अशा सर्वच बाबतीत मोदी सरकार संपूर्ण अपयशी ठरले आहे.

डोक्यावर अपयश घेऊन लोकांसमोर मत मागायला लाज वाटते म्हणून भारतीय जनता पार्टीने “दिवार लेखन” अभियान राबवत शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी भाजपच्या घोषणा रंगवून सुंदर पुणे शहर विद्रूप करण्याचे उद्योग सुरू केले आहेत. या शहर विद्रुपीकरणाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करून निषेध व्यक्त करत आहे, असे ते म्हणाले.

मानवी जीवनात गुरुपरंपरेतील पहिले स्थान आईला 

राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.डॉ.चारुदत्तबुवा आफळे ;  अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्रातर्फे वयाची शतकपूर्ती केलेल्या सुधा गोविंद जोशी यांचा विशेष सन्मान
पुणे : भारतीय जीवनात सद्गुरुंचा महिमा खूप मोठया प्रमाणात व्यक्त केला आहे. मानवी जीवनात गुरुपरंपेतील पहिले स्थान हे आईला असते. प्रत्यक्षात माता सर्वांची गुरु आहे. त्यामुळे विठ्ठलाला विठू माऊली आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर माऊली असे आईचे नाम दिले आहे. यामध्ये आपली वेगळी भावना व्यक्त होत असते, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे यांनी व्यक्त केले.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्रातर्फे वयाची शतकपूर्ती केलेल्या सुधा गोविंद जोशी यांचा सिंहगड रस्ता माणिकबाग येथील त्यांच्या निवासस्थानी विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्राचे अनिल शिदोरे, विश्वनाथ भालेराव, मकरंद माणकीकर, निता पारखी, अनघा जोशी, मधुरा कुलकर्णी, सुवर्णा रिसबूड आदी उपस्थित होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे सन्मानाचे स्वरूप होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. 

ह.भ.प. डॉ. चारुदत्त आफळे म्हणाले, तब्बल १०० वर्षांपूर्वी शिक्षण व विविध भाषांवर प्रभुत्व मिळविण्याचे काम सुधा जोशी यांनी केले आहे. कुटुंबातील सदस्यांना पायावर उभे करणे हे आईचे मोठे काम आहे. मुलांना उभे करण्याकरिता आईचे समर्पण महत्वाचे असते. प्रत्येकाच्या जीवनात अपयश, नैराश्याचा फटका येतो, त्यावेळी आई आणि आईचे आशिर्वाद आधार देत असतात. मातृशक्तीच्या आधारावर आपल्या सगळ्यांचे यश असते.

अनिल शिदोरे म्हणाले, वयाचे शतक पूर्ण करणा-या सुधा जोशी यांचा जन्म २४ मे १९२३ रोजी झाला. हिंदी, मराठी, इंग्रजी, तमिळ भाषा त्यांना येतात. आजही त्या इंग्रजी व मराठी भाषेतील साहित्य वाचतात. स्वत:सोबतच कुटुंब देखील त्यांनी उभे केले. पडद्याच्या मागे राहून उल्लेखनीय कार्य करणा-या जोशी यांना सन्मानित करणारा कार्यक्रम आम्ही घेतला असून वर्षभरात असे वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबविले जातात, असेही त्यांनी सांगितले. विश्वनाथ भालेराव यांनी सूत्रसंचालन केले.