राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.डॉ.चारुदत्तबुवा आफळे ; अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्रातर्फे वयाची शतकपूर्ती केलेल्या सुधा गोविंद जोशी यांचा विशेष सन्मान
पुणे : भारतीय जीवनात सद्गुरुंचा महिमा खूप मोठया प्रमाणात व्यक्त केला आहे. मानवी जीवनात गुरुपरंपेतील पहिले स्थान हे आईला असते. प्रत्यक्षात माता सर्वांची गुरु आहे. त्यामुळे विठ्ठलाला विठू माऊली आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर माऊली असे आईचे नाम दिले आहे. यामध्ये आपली वेगळी भावना व्यक्त होत असते, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे यांनी व्यक्त केले.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्रातर्फे वयाची शतकपूर्ती केलेल्या सुधा गोविंद जोशी यांचा सिंहगड रस्ता माणिकबाग येथील त्यांच्या निवासस्थानी विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्राचे अनिल शिदोरे, विश्वनाथ भालेराव, मकरंद माणकीकर, निता पारखी, अनघा जोशी, मधुरा कुलकर्णी, सुवर्णा रिसबूड आदी उपस्थित होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे सन्मानाचे स्वरूप होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला.
ह.भ.प. डॉ. चारुदत्त आफळे म्हणाले, तब्बल १०० वर्षांपूर्वी शिक्षण व विविध भाषांवर प्रभुत्व मिळविण्याचे काम सुधा जोशी यांनी केले आहे. कुटुंबातील सदस्यांना पायावर उभे करणे हे आईचे मोठे काम आहे. मुलांना उभे करण्याकरिता आईचे समर्पण महत्वाचे असते. प्रत्येकाच्या जीवनात अपयश, नैराश्याचा फटका येतो, त्यावेळी आई आणि आईचे आशिर्वाद आधार देत असतात. मातृशक्तीच्या आधारावर आपल्या सगळ्यांचे यश असते.
अनिल शिदोरे म्हणाले, वयाचे शतक पूर्ण करणा-या सुधा जोशी यांचा जन्म २४ मे १९२३ रोजी झाला. हिंदी, मराठी, इंग्रजी, तमिळ भाषा त्यांना येतात. आजही त्या इंग्रजी व मराठी भाषेतील साहित्य वाचतात. स्वत:सोबतच कुटुंब देखील त्यांनी उभे केले. पडद्याच्या मागे राहून उल्लेखनीय कार्य करणा-या जोशी यांना सन्मानित करणारा कार्यक्रम आम्ही घेतला असून वर्षभरात असे वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबविले जातात, असेही त्यांनी सांगितले. विश्वनाथ भालेराव यांनी सूत्रसंचालन केले.