Home Blog Page 1133

तमन्ना भाटिया दिसणार ” डेअरिंग पार्टनर्स ” मध्ये !

 पॅन इंडिया स्टार तमन्ना भाटिया ही कायम फॅशन आणि तिच्या नवनवीन प्रोजेक्ट्स मधून चर्चेत असते. नुकतच तिने तिच्या आगामी प्रोजेक्ट ची घोषणा केली या बद्दल ती म्हणते मी माझ्या आगामी प्रोजेक्ट ‘डेअरिंग पार्टनर्स’ बद्दल खूप उत्साहित आहे. ज्यामध्ये डायना पेंटीसोबत स्क्रीन शेअर करत आहे. 

‘डेअरिंग पार्टनर्स’ ही दोन जिवलग मित्रांची कथा आहे जे अल्कोहोल स्टार्ट-अपचे भागीदार म्हणून एक धाडसी प्रवास सुरू करतात. याची कथा खूप सुंदर लिहीली आहे. या प्रकल्पा बद्दल आता सगळ्यांना उत्सुकता आहे आणि ती यात काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे. 

 अर्चित कुमार आणि निशांत नाईक दिग्दर्शित ‘डेअरिंग पार्टनर्स’मध्ये जावेद जाफरी यांचीही भूमिका आहे. चित्रपटाचे लेखन नंदिनी गुप्ता, मिथुन गंगोपाध्याय आणि आर्ष व्होरा यांनी केले आहे. ‘डेअरिंग पार्टनर्स’च्या पलीकडे तमन्ना यावर्षी अनेक मनोरंजक प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. अभिनेत्रीकडे तेलगूमध्ये ‘ओडेला 2’, हिंदीमध्ये वेदा आणि तमिळमध्ये ‘अरनमानाई 4’ मध्ये ती दिसणार आहे.

देशातील व्यवस्था बदलण्यासाठी हवी ‘ तिसरी क्रांती ‘ 

माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे लिखित ‘ तिसरी क्रांती ‘ या पुस्तकाचे प्रकाशन 
पुणे. २२ मार्च २०२४ : “भारतीय राज्यघटनेवर आज हल्ले चालू झाले आहेत. सध्या देशाची राज्यघटना कुरतडून कोण्या एका समाजाचे श्रेष्ठत्व निर्माण करण्याचे काम एका शक्तीने चालू ठेवलेले आहे. या शक्तीला रोखण्यासाठी समाजव्यवस्था बदलण्यासाठी सर्व राजकीय आणि सध्याची प्रशासकीय प्रारुपे (मॉडेल्स) कालबाह्य ठरू लागली आहेत. त्यामुळे देशातील समाजव्यवस्था बदलण्यासाठी आता तिसरी क्रांती होणे गरजेचे आहे.” असे मत ‘तिसरी क्रांती’ या पुस्तकाचे लेखक आणि भारतीय पोलिस सेवेतील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी ‘ तिसरी क्रांती ‘ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी एस. एम. जोशी सभागृह येथे बोलताना व्यक्त केले.
ज्येष्ठ विचारवंत दत्ता देसाई यांच्या हस्ते सुरेश खोपडेलिखित ‘तिसरी क्रांती- चेहरे नको, व्यवस्था बदलुया’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या समारंभात लेखक या नात्याने खोपडे बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी संग्राम खोपडे व विक्रम  शिंदे हे उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य मिळाले, ही पहिली क्रांती, जगातील सर्वात मोठी व उत्कृष्ट अशी  राज्यघटना अस्तित्वात आली ही दुसरी क्रांती आहे. या दोन्ही क्रांतीमुळे सामान्यांच्या जगण्यामध्ये काहीशी भौतिक प्रगती झाली, परंतु धर्म, पंथ, जाती या नावाखाली माणसा- माणसांत भेद निर्माण केला जात आहे. त्यातून व्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात आल्याचे मत खोपडे यांनी या वेळी व्यक्त केले. देशातील लोकशाही सध्या पोकळ झाली आहे. यासाठी येथील समाजव्यवस्थाच कारणीभूत असून, सध्याच्या काळात आमदार आणि खासदार यांनाही हवे तेव्हा विकत घेता येऊ लागले आहे. ही सध्याची आपल्या लोकशाहीची अवस्था आहे. असे मत ज्येष्ठ विचारवंत दत्ता देसाई यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयू परळकर यांनी केले. आभार विक्रम शिंदे यांनी व्यक्त केले. 

“पोलीस दलात कार्यरत असताना मोहल्ला कमिट्या स्थापन करून त्याद्वारे समाजव्यवस्था बदलण्यासाठी सुरेश खोपडे यांनी प्रयत्न केला. हा प्रयोग पुढे जगातील अन्य देशांनी स्वीकारला. आपल्या देशाला याचे महत्त्व कळू शकले नाही. खोपडे हे पोलिस दलातून निवृत्त झाले असले तरी अद्यापही ते सामाजिक भान राखून आहेत. ‘तिसरी क्रांती’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी नवसमाज निर्मितीचा प्रयोग मांडला आहे.” डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ साहित्यिक

मुरलीधर मोहोळ यांनी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेट

पुणे दि.२२: पुण्यातून महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची त्यांच्या सिल्व्हर रॉक्स या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन सत्कार स्विकारला . यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी त्यांना महावस्त्र , पुष्पगुच्छ आणि श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा भेट देत निवडणुकीत भरघोस मतांनी विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी, ऊद्योजक रेखा चोरगे, माजी नगरसेविका सोनाली लांडगे, रंजना कुलकर्णी, पुणें शहर महिला सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, शिवसेना ऊपशहर प्रमुख श्रुती नाझीरकर, श्रद्धा शिंदे, सुप्रिया पाटेकर, मंगल सोनटक्के, युवराज शिंगाडे, राजू विटकर, सुधीर जोशी शिवसेना कार्यालय सचिव , संतोष लांडगे, शिवसेना ऊपशहरप्रमुख संजय डोंगरे, धैर्यशील कदम, संकेत मोरे, संजय तुरेकर, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

याभेटीवेळी उपस्थित शिवसैनिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत मोहोळ यांचा विजय मताधिक्यांचा विक्रम निश्चितपणे गाठेल अशी भावना व्यक्त केली.

पुणे शहरातील अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

पुणे, दि. २२: पुणे शहरातील पार्किंगच्या जागेचा वापर मालवाहतूक करणारी वाहने लोडिंग, अनलोडिंग करतेवेळी करत असल्याने इतर वाहनांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे यापूर्वी जारी केलेले सर्व आदेश रद्द करून प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पुणे शहरात २३ मार्च पासून सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ पर्यंत लक्ष्मी रोड वरील संत कबीर चौक ते टिळक चौक, शिवाजी रस्त्यावरील स. गो. बर्वे चौक ते जेधे चौक, बाजीराव रस्त्यावरील पूरम चौक ते गाडगीळ पुतळा चौक, केळकर रस्त्यावरील टिळक चौक ते अप्पा बळवंत चौक, कुमठेकर रस्त्यावरील टिळक चौक ते शनिपार चौक, टिळक रस्त्यावरील टिळक चौक ते जेधे चौक, जंगली महाराज रस्त्यावरील स.गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक, कर्वे रस्त्यावरील खंडोजीबाबा चौक ते पौड फाटा, महात्मा गांधी रस्त्यावरील पंडोल अपार्टमेंट चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक व नॉर्थ मेन रस्ता, कोरेगाव पार्क मधील कोरेगाव पार्क जंक्शन ते ताडीगुत्ता चौक वर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांस प्रवेश बंद करण्यात आला आहे. हा बदल अत्यावश्यक सेवेतील वाहनांना असणार नाही, असेही कळविले आहे.

विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत नो पार्किंगचे तात्पुरते आदेश जारी
विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत टिळक स्मारक मंदिर गेटच्या भिंतीलगत २० मीटर व नारळीकर इन्स्‍िटट्यूतकडून टिळक स्मारक मंदिरकडे येताना (कुमार स्टेशन व झेरॉक्स दुकान) रस्त्याच्या उजव्या बाजूस ५० मीटर तात्पुरत्या स्वरूपात नो पार्किंगचे आदेश जारी करण्यात येत आहेत.

वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात ४ एप्रिलपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात.

नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.

लोकशाही दिन रद्द

पुणे, दि. २२ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचार संहिता १६ मार्च ते ६ जून या कालावधीत घोषित केली आहे. या आचार संहिता कालावधीत पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने माहे एप्रिल व माहे मे च्या पुणे विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा लड्डा यांनी दिली आहे.

कॉंग्रेसने केली निष्ठावंताची हत्या:न्याय यात्रा काढून निष्ठावंतांवर अन्याय-आबा बागुल

कसब्यात धंगेकर पॅॅटर्न नाही तर सर्व एकत्र येऊन कॉंग्रेस पॅॅटर्न राबविला,पक्षाच्या कोणत्याही आंदोलनात सहभागी नाहीत -नियुक्त उमेदवाराबाबत आक्षेप

निष्ठावंतांना न्याय मिळत नसेल तर न्याय यात्रेला काय अर्थ?

काँग्रेसच्या धोरणाची राज्यात पायमल्ली: माजी उपमहापौर आबा बागुल यांची खंत

पुणे
एकीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे न्याय यात्रा काढत आहेत मात्र दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये निष्ठावंतावर अन्याय करण्याचे सत्र सुरू झाले आहे मग न्याय कुणाकडे मागायचा ,हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे. त्याहीपेक्षा काँग्रेसच्या धोरणाची पायमल्ली राज्यात कोण करत आहे.असा थेट सवाल पुणे लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असणारे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत केला.शिवाय कार्यकर्ते ,मतदारांशी चर्चा करून पुढील भूमिका घेणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
आबा बागुल म्हणाले की, गेली चाळीस वर्षे मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत आहे.यंदाच्या लोकसभेसाठी मी प्रबळ दावेदार असताना प्रदेश काँग्रेसने कोणत्या निकषावर मला उमेदवारी नाकारली. याचा खुलासा झाला पाहिजे.दुसऱ्या पक्षातून येवून जेमतेम दीड वर्षे होत नाही ते आमदार झाले मात्र त्यांना आता पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी देणे म्हणजे निष्ठावंत लोकांवर अन्याय करण्यासारखेच आहे.एकप्रकारे ही निष्ठेची हत्या आहे. पक्षात माझ्यासह अनेक जण निवडून येण्याची क्षमता असणारे आहेत मग त्यांना डावलून परस्पर उमेदवारी जाहीर करणे हेच मुळात खेदजनक आहे.वास्तविक यंदा पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर उमेदवारी देण्यासंदर्भात धोरण ठरले आहे.त्यानुसार एक व्यक्ती एक पद हे पाहता विद्यमान आमदारांना उमेदवारी परस्पर कशी दिली गेली.जे यापूर्वी लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत आणि जे विद्यमान आमदार आहेत त्यांना उमेदवारी देता येणार नाही. या पक्षाच्या धोरणाची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पायमल्ली केली आहे. याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले.ज्यांनी दुसऱ्या पक्षात असताना काँग्रेस नेतृत्वावर खालच्या पातळीवर टीका केली.त्यांच्यासमवेत असलेल्यांचे क्लिप उद्या व्हायरल झाल्यास त्यावर प्रदेश काँग्रेसची कोणती भूमिका राहील.असे नमूद करून आबा बागुल म्हणाले ,ज्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी काम केले.त्या निष्ठावंतांना हा धक्का आहे.त्यामुळे आम्ही निष्ठावंताची बैठक घेवून पुढील भूमिका जाहीर करणार आहोत.निष्ठेचा विचार करा आणि गटा तटाचे राजकारण बंद करा हेच मी सर्व नेत्यांना सांगत आहे. अजूनही पक्षाने माझा विचार करावा तसेच लवकरच पुढील दिशा स्पष्ट केली जाईल असेही ते म्हणाले.

मानवीहक्कासंबंधी ‘न्या.पी.एन.भगवती आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट कॉम्पिटिशन’ चे उदघाटन

भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजमध्ये आयोजन 

पुणे :भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज द्वारे आयोजित मानवी हक्क या विषयावरील ‘न्या.पी.एन.भगवती आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट कॉम्पिटिशन’ चे उदघाटन दि.२१ मार्च रोजी   झाले.श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या.एस.थुराईराज,अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचे न्या.ए.आर.मसूदी,भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विवेक सावजी,कुलसचिव जी.जयकुमार,भारती विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ.उज्वला बेंडाळे हे मान्यवर उदघाटन समारंभासाठी उपस्थित होते.प्राचार्य डॉ.उज्वला बेंडाळे,प्रा.शिवांगी सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत ५० स्पर्धक संघानी सहभाग घेतला आहे. दि.२३ मार्च रोजी समारोप होईल.समारोप कार्यक्रमास भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या.अभय ओक,नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या.अनिलकुमार सिन्हा,मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या.हूनसु अल सुऊद,अलाहाबाद  न्यायालयाचे न्या.अरुम कुमार सिंग देशवाल,केरळ उच्च न्यायालयाचे न्या.सोफी थॉमस,गुजरात उच्च न्यायालयाचे न्या.अनिरुद्ध पी.मायी उपस्थित राहणार आहेत.
‘न्या.पी.एन.भगवती आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट कॉम्पिटिशन’  चे हे बारावे वर्ष असून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या.पी.एन.भगवती यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ २०११ साली सुरु करण्यात आली.राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा नावाजली आहे.मानवी हक्कांच्या संदर्भातील राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय कायद्यांबद्दल या स्पर्धेतून जागृती घडवून आणली जाते.भारती विद्यापीठाचे संस्थापक कै.डॉ.पतंगराव कदम,कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,कार्यवाह डॉ.विश्वजित कदम,कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता कदम-जगताप,कुलगुरू डॉ.विवेक सावजी यांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले. 
‘ मानवी हक्कांच्या विस्तारात आणि संरक्षणात  न्यायालयानी  महत्वाची भूमिका बजावली असून भारताची त्यासंबंधी भूमिका अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर महत्वपूर्ण ठरली आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार हे  मानवी हक्कांच्या जपणुकीचे महत्वपूर्ण उदाहरण असून सर्वोच्च न्यायालयाने त्यासंबंधी वेळोवेळी सकारात्मक आणि संरक्षक भूमिका घेतली आहे.तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रगतीने काही वेळा मानवी हक्कांवर गदा येत असल्याचे चित्र दिसत असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स,फेशल रेकग्निशन,बायोमेट्रिक माहितीचे अनधिकृत हस्तांतरण ,सोशल मीडिया माध्यमातून होणारे शोषण यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. देखरेख ठेवणे, खासगी अधिकारांवर गदा आणणे, भेदभाव करणे दिसून येत आहे.त्याबाबत सर्वोच्च न्यायालय लक्ष ठेवून आहे. आणि मानवी अधिकारांचे उल्लंघन होणार नाही यासाठी दक्ष आहे’,असा सूर उदघाटन कार्यक्रमातील मान्यवरांच्या भाषणात उमटला. 

ललना कला महोत्सवाचे दि. २७ मार्चपासून पाच दिवस आयोजन

पुणे- महिलांमधील गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कथाकथन, क्रीडा आदी कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या निवेदिता प्रतिष्ठानचे यंदाचे रौप्यमहोत्सवी २५वे वर्ष असून, त्यांच्यातर्फे आयोजित होणाऱ्या ‘ललना कला महोत्सवा’चे यंदाचे ११वे वर्ष आहे. त्यानिमित्त यंदा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत बुधवार, दि. २७ ते रविवार, दि. ३१ मार्च २०२४ असे पाच दिवस गायन, नृत्य, पेण्टिंग, कथाकथन आणि पुरस्कार यांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार, दि. २८ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता खा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथे संपन्न होईल. याप्रसंगी उद्योजिका डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील (अकलूज) आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नर्तक पं. डॉ. नंदकिशोर कपोते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. याप्रसंगी ‘तपस एल्डर केअर संस्थे’च्या संचालिका प्राजक्त वडावकर, ‘जस्ट फॉर हार्ट’ संस्थेच्या संचालिका डॉ. मनीषा देवकर आणि रेडिओ सिटीच्या आरजे तेजू यांची विशेष उपस्थिती असेल. निवेदिता प्रतिष्ठानतर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अनुराधा भारती यांनी सांगितले.
याप्रसंगी ‘ललना कलारत्न’ पुरस्कार सोहळा संपन्न होणार असून, त्यामध्ये ‘स्टार प्रवाह’फेम बालगायिका श्रुती भांडे (वय ९, अकोला), भरतनाट्यम् नृत्यांगना मिताली नाईक (गोवा), कथ्थक नृत्यांगना डॉ. नीलिमा हिरवे (पुणे), ‘इन लाइन फ्री स्टाइल स्केटिंग’मध्ये आशियाई चॅम्पियशिप पटकाविणाऱ्या श्रेयसी जोशी (वय १५, पुणे) व स्वराली जोशी (वय १७, पुणे) आणि प्रख्यात चित्रकार रुही अन्वर कुरेशी यांचा समारंभपूर्वक गौरव करण्यात येणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यातच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, त्यामध्ये नृत्य, काव्य व चित्रकला या माध्यमातून सादर होणारा ‘पंचतत्त्व आणि स्त्री’, नाट्यछटा व कथा या माध्यमातून भारतातील शूर व धाडसी महिलांवर आधारित ‘ऐतिहासिक वीरांगना’ कार्यक्रम, भरतनाट्यम् नृत्याद्वारे ‘महिषासुरमर्दिनी व भैरवी शतकम्’ कार्यक्रम, कथ्थक नृत्याद्वारे ‘नवदुर्गा’ कार्यक्रम आणि ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ मिळाल्यानिमित्त त्यांच्यावर चित्रित गाण्यांवर आधारित ‘रंगीला रे’ हा गाणी व नृत्याचा कार्यक्रम सादर होईल.
उद्घाटनदिवसाच्या आधी बुधवार, दि. २७ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनात ‘स्त्री’चे भावविश्व उलगडून दाखविणारा मराठी गीतांचा ‘स्वप्नात रंगले मी’ हा कार्यक्रम सादर होईल.
शुक्रवार, दि. २९ मार्च रोजी दुपारी ४.०० वाजता बालगंधर्व कलादालन येथे देशातील महिला चित्रकारांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार रवि देव, डॉ. प्रसाद वाळिंबे व डॉ. आरती शिराली यांच्या हस्ते होईल. ३१ मार्चपर्यंत हे प्रदर्शन दिवसभर सर्वांसाठी खुले असेल. त्यात प्रात्यशिकेदेखील सादर होतील.
शनिवार, दि. ३० मार्च रोजी सकाळी १० ते १२.३० या वेळेत शिवाजी मराठा सोसायटीच्या जिजामाता हायस्कूल हॉलमध्ये ‘कथासखी’ ग्रुपतर्फे ‘कथाविष्कार’ हा कथाकथनाचा कार्यक्रम सादर होईल. शिवाजी मराठा सोसायटीच्या मानद सचिव प्रमिलाताई गायकवाड याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, पुणेकरांनी या सर्व कार्यक्रमांना यावे, असे आवाहन संयोजिक अॅड. अनुराधा भारती यांनी केले आहे.

‘सिमी’ संघटनेवर बंदी; केंद्रापाठोपाठ राज्य शासनानेही काढले आदेश

पुणे, दि. २२: बेकायदेशीर कृत्ये अधिनियमानुसार ‘स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. याविषयीची २९ जानेवारी २०२४ रोजीची अधिसूचना केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली असून पुढील ५ वर्षांसाठी ही बंदी असणार आहे. याविषयी राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. या कायद्याच्या तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी. तसेच संबंधितांवर न्यायाधिकरणाची नोटीस बजावण्याबाबतची कार्यवाही करावी. तसेच कार्यवाहीबाबत शपथपत्रे दाखल करून ती राज्य शासनाकडे जमा करण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

शासकीय आश्रमशाळेत मोठा दूध घोटाळा

पुणे -राज्यातील शासकीय आश्रमशाळेत मोठा दूध घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच एका निनावी व्यक्तीने आपल्याला एकूण 11 फाईल पाठवल्या आहेत. सत्ताधारी पक्षाचाच हा माणूस आहे असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.प्रसार माध्यमांशी बोलतांना रोहित पवारांनी पुढे म्हटलं की, मला पाठवण्यात आलेल्या 11 पैकी दोन फाईल मी आता दाखवत आहे. पहिली फाईल आदिवासी आश्रमशाळेतील दुध पुरवठ्याची आहे. ⁠आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना 200 मिली दूध पुरवले जाते. या दूध पुरवठ्यासाठीचा ⁠पहिला करार 2019 मध्या झाला आहे. या करारात 46.49 रुपये दर होता. चितळे, महानंद, अमूल दूधाचे दर 49.75 रुपये होते. त्या दराने दुध पुरवठा होत होता”, असे रोहित पवार म्हणाले.
पुढे बोलतांना रोहित पवार म्हणाले, ”⁠2023-24 मध्ये मात्र हा दर 146 रुपये दर झाला आहे. 164 कोटी रुपयांचे हे टेंडर आहे. एवढ्या महागड्या दराने दूध खरेदी आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी करत आहे. यामध्ये 80 कोटी रुपयांचे कमिशन दिले गेले आहे”, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला.तसेच संबंधित घोटाळ्याप्रकरणी रीतसर तक्रार करणार असल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हंटले आहे. ”शेतकऱ्याकडून 30 रुपये दराने घेतलेले दूध गरीबांच्या मुलांना 146 रुपये दराने दिले जात आहे. ⁠या विरोधात पीएमओ, सीएमओ, ॲन्टीकरप्शनकडे तक्रार देणार आहे. ⁠पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील खाजगी दूध डेअरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्याच्या दूध संघाला हे काम दिले आहे”, असे देखील रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवार यांनी केलेल्या या आरोपांमुळे मात्र मोठी खळबळ उडाली आहे. पुढे ते म्हणाले, ”आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेत दूधाखरेदीसाठी 80 कोटी रुपयांची दोन कंपन्यांना दलाली देण्यात आली. या कंपन्या कोणाच्या आहेत, कशाच्या आहेत त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आम्ही विकासासाठी सत्तेत गेलो, असे काही लोक सांगत आहेत. मात्र शेतकऱ्यांकडून दूध 30 रुपयांना घेऊन ते 143 रुपयांना विकले जात आहे”, असे रोहित पवार म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी काही आकडेवारीदेखील सादर केली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मुलींच्या वसतिगृहासाठी हातभार लावण्याची संधी

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने देणगीचे आवाहन; ३३६ गरजू व होतकरू मुलींच्या निवासाची सोय होणार
पुणे : ग्रामीण भागातून पुण्यात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या  गरजू व होतकरू मुलींसाठी विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने पुण्यात उभारण्यात येत असलेल्या वसतिगृहासाठी आर्थिक हातभार लावण्याची संधी दानशूर/संवेदनशील पुणेकरांना आहे. ३३६ मुलींच्या निवासाची सोय होणाऱ्या या वसतिगृहाच्या निर्माणासाठी पुणेकरांनी यथायोग्य अर्थसहाय्य करावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

गेल्या ६९ वर्षांत समितीने ग्रामीण भागातील हजारो मुलामुलींना उत्तम पद्धतीने घडविण्याचे काम केले आहे. गरीब मुलींच्या उच्च शिक्षणामुळे ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलन, त्यांचे सक्षमीकरण आणि त्यायोगे समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचा हा प्रयत्न आहे. आज समितीमध्ये ३२५ मुली व ४५० मुले असे एकूण ७७५ विद्यार्थी राहात असून, पुण्याच्या विविध महाविद्यालयात शिकत आहेत. मराठवाडा, विदर्भ यासह महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागातील हे विद्यार्थी आहेत. समिती म्हणजे केवळ लॉजिंग बोर्डिंग नाही तर युवा सक्षमीकरणाची चळवळ आहे येथे माफक दरात निवास, भोजन व्यवस्थेबरोबर व्यक्तिमत्त्व विकास या संकल्पनेला सर्वाधिक महत्त्व आहे. समितीत जात, धर्म, पंथ या संकल्पनेला थारा नाही. स्वच्छता, समता आणि श्रमप्रतिष्ठा या त्रिसूत्रीवर येथे काम चालते. सर्वांगीण विकासातून युवा सक्षमीकरण हे समितीचे ब्रीद आहे. देणगीदार जरी शहरी भागातले असले तरी प्रवेश फक्त ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांनाच दिला जातो.

अलीकडच्या काळात ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढले आहे हा मोठा सामाजिक बदल आहे त्यांना सुरक्षित आसरा देण्याच्या उद्देशाने समितीने ३३६ मुलींचे वसतिगृह उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये ११२ खोल्या आहेत. एका खोलीचा खर्च दहा लाख रुपये आहे. एवढी दहा लाखांची देणगी व्यक्तिगत/ कौटुंबिक/ समूहातर्फे मिळाल्यास खोलीला देणगीदारांच्या इच्छेनुसार नाव देण्याची योजना समिती राबवत आहे. या नव्या प्रकल्पासाठी दानशूरांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क – info@samiti.org, मोबाईल – ९४०४८५५५३०.

आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीवाला धोका

पुणे-आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीवाला धोका असून त्यांना तातडीने पोलिस संरक्षण द्या, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिस अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्यात की, लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना दडपशाहीचा सामना करावा लागतोय, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आ. रोहित पवार व युगेंद्र पवार हे दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी जात आहेत. संविधानिक पध्दतीने, शांतपणे व लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत.परंतु काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध वृत्तवाहिन्या व समाज माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आली. संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंविधानिक आहे.

ज्यांची भाजपला भीती वाटते त्यांना ते अटक करतात:खासदार संजय राऊत

मुंबई-

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका प्रकारे हल्ला करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांचा घोटाळा समोर आणला. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाने नवीन गोष्ट लोकांसमोर आणली आहे. मात्र, असे असले तरी अरविंद केजरीव यांना अटक करून तुम्ही एका दिवसाची बातमी बनवू शकता. तुमचे निवडणूक रोख्यांचे प्रकरण मात्र, कायम सुरू राहणार असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पूर्ण ताकतीने अरविंद केजरीवाल यांच्यासोबत उभी राहणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल यांची अटक ही पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. आणि राजकीय सूडबुद्धीने केलेली अटक आहे. निवडणूक रोखे घोटाळा भारतीय जनता पक्षावर शेकलेला आहे. खंडणीच्या माध्यमातून हप्ता वसुलीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने गुन्हेगारांकडून पैसे गोळा केले आहेत. ते प्रकरण दाबण्यासाठीच अरविंद केजरीवालांना अटक केली असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

गोवंश हत्या बंदी कायदा तुम्ही केला. गोमांसच्या आरोपाखाली तुम्ही मॉब लिंचिंग केले. मात्र हे गोमांस निर्यात करणाऱ्यांकडून तुम्ही निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून हप्ता वसूल केला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाचे निवडणूक रोखे चेक केले असता, ज्या ज्या घोटाळ्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. त्या त्या घोटाळ्यातील लोकांनी भारतीय जनता पक्षाला निधी दिला असल्याचे दिसते, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. म्हणजेच या घोटाळ्यातील पैसा तुमच्या खात्यात गेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षावर आधी गुन्हा दाखल करा, अशी मागणी देखील खासदार संजय राऊत यांनी केले आहे. निवडणूक रोख्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच तुम्ही केजरीवाल्यांना अटक केली आहे. लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही अटक करत आहात, शिबू सोरेन यांना तुम्ही अटक केली, मंत्र्यांना तुम्ही अटक करत आहोत मात्र, सर्वात भ्रष्ट सरकार हे देशात तुमचे आहे. त्यांना अटक होत नाही. जे तुमच्या पक्षात येतात त्यांना तुम्ही मंत्री करतात. आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करतात. याला हुकूमशाही म्हणतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली.

मोदी आणि अमित शहा यांना ज्यांच्यापासून भीती वाटते की, हे आम्हाला हरवू शकतात. निवडणुकीत पराभव करू शकतात, त्या सर्वांना अटक करण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देखील भगतसिंग, राजगुरू, वीर सावरकर, लाल, बाल, पाल या सर्वांना ब्रिटिशांनी अटक केली होती. कारण ब्रिटिश त्यांना घाबरत होते. मोदींचे सरकार देखील त्याच पद्धतीने काम करत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. लोकांचा उठाव होण्याची, निवडणूक हरण्याची सरकारला भीती आहे. त्यामुळे अशा पद्धतीने लोकांना तुरुंगात टाकण्याचे काम सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
अशा सर्व प्रकरणाविरोधात अण्णा हजारे यांचे आंदोलन होत होते. मात्र, आता अण्णा हजारे यांना जागे करण्याची वेळ आली असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, आता ते कुठे असतात हे मला माहित नाही. पण असे असले तरी त्यांना जागे करण्याची ही वेळ असल्याचा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले,’केजरीवाल प्रकरणी सरकारकडे कोणतेही पुरावे नाहीत,सरकारकडून लोकशाहीचा तमाशा

दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडीच्या अटकेवर, राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणतात, "भारत आघाडीने काय करायचे ते ठरवायचे आहे. मी सुरुवातीपासून म्हणत आलो आहे की या सर्वांच्या विरोधात युतीने एकत्र यायचे आहे. .. हे शून्य प्रकरण आहे... संपूर्ण प्रकरण मंजूर करणाऱ्यांच्या विधानावर आधारित आहे... कोणतेही पुरावे नाहीत... ही लोकशाहीची थट्टा आहे..."
ज्यांना तक करायला हवी त्यांच्याकडून बॉंड घेतलेत आणि लोकशाहीचा तमाशा मांडलाय ..

केजरीवाल यांनी ईडी लॉकअपमध्ये रात्र काढली,आज कोर्टात हजर करणार

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी संध्याकाळी मद्य धोरण प्रकरणी मुख्य निवासस्थानातून अटक केली होती. ईडीची टीम त्यांना दहावा समन्स बजावण्यासाठी आली होती. अटकेनंतर केजरीवाल यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. आरएमएल रुग्णालयातून आलेल्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार केले. केजरीवाल यांनी ईडी लॉकअपमध्ये रात्र काढली. आज आप केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आंदोलन करणार आहे.
आज केजरीवाल यांना उच्च न्यायालयात हजर केले जाणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे हजर होण्यापूर्वीच त्यांचे मेडिकल केले जाऊ शकते. केजरीवाल यांचा रिमांड मिळविण्यासाठी ईडी प्रयत्न करणार आहे. दिल्लीच्या मंत्री आतिशी म्हणाल्या की, केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील. तुरुंगातून सरकार चालवणार.
केजरीवाल यांच्या कायदेशीर पथकाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि तातडीने सुनावणीची मागणी केली. या प्रकरणात, आधीच ईडीच्या ताब्यात असलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांनी त्यांच्या अटकेला SCमध्ये आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवरही आज सुनावणी होणार आहे.

  • गुरुवारी, 21 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजता उच्च न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली. चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेल्यास अटक केली जाणार नाही, असे आश्वासन केजरीवाल यांनी न्यायालयाकडे मागितले होते. केजरीवाल यांना ईडीसमोर हजर राहावे लागेल, त्यांच्या अटकेला स्थगिती नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
  • संध्याकाळी 7 वाजता, ईडीची टीम 10 व्या समन्स आणि सर्च वॉरंटसह केजरीवाल यांच्या घरी (सीएम हाऊस) पोहोचली.
  • तपास यंत्रणेने अरविंद केजरीवाल यांची दोन तास चौकशी केली. त्यानंतर रात्री ९ वाजता त्यांना अटक करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरएएफच्या अनेक तुकड्या उपस्थित होत्या.
  • रात्री 11.05 च्या सुमारास ईडीच्या पथकाने अरविंद केजरीवाल यांना कारने ईडी कार्यालयात नेले.
  • केजरीवाल यांना रात्री 11.50 वाजता ईडीच्या मुख्यालयात आणण्यात आले.
  • रात्री 12 वाजल्यानंतर आरएमएल रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक अरविंद केजरीवाल यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ईडी कार्यालयात पोहोचले.
  • अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण रात्र ईडी कार्यालयात लॉकअपमध्ये काढली.