पुणे -राज्यातील शासकीय आश्रमशाळेत मोठा दूध घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच एका निनावी व्यक्तीने आपल्याला एकूण 11 फाईल पाठवल्या आहेत. सत्ताधारी पक्षाचाच हा माणूस आहे असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.प्रसार माध्यमांशी बोलतांना रोहित पवारांनी पुढे म्हटलं की, मला पाठवण्यात आलेल्या 11 पैकी दोन फाईल मी आता दाखवत आहे. पहिली फाईल आदिवासी आश्रमशाळेतील दुध पुरवठ्याची आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना 200 मिली दूध पुरवले जाते. या दूध पुरवठ्यासाठीचा पहिला करार 2019 मध्या झाला आहे. या करारात 46.49 रुपये दर होता. चितळे, महानंद, अमूल दूधाचे दर 49.75 रुपये होते. त्या दराने दुध पुरवठा होत होता”, असे रोहित पवार म्हणाले.
पुढे बोलतांना रोहित पवार म्हणाले, ”2023-24 मध्ये मात्र हा दर 146 रुपये दर झाला आहे. 164 कोटी रुपयांचे हे टेंडर आहे. एवढ्या महागड्या दराने दूध खरेदी आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी करत आहे. यामध्ये 80 कोटी रुपयांचे कमिशन दिले गेले आहे”, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला.तसेच संबंधित घोटाळ्याप्रकरणी रीतसर तक्रार करणार असल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हंटले आहे. ”शेतकऱ्याकडून 30 रुपये दराने घेतलेले दूध गरीबांच्या मुलांना 146 रुपये दराने दिले जात आहे. या विरोधात पीएमओ, सीएमओ, ॲन्टीकरप्शनकडे तक्रार देणार आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील खाजगी दूध डेअरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्याच्या दूध संघाला हे काम दिले आहे”, असे देखील रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवार यांनी केलेल्या या आरोपांमुळे मात्र मोठी खळबळ उडाली आहे. पुढे ते म्हणाले, ”आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेत दूधाखरेदीसाठी 80 कोटी रुपयांची दोन कंपन्यांना दलाली देण्यात आली. या कंपन्या कोणाच्या आहेत, कशाच्या आहेत त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आम्ही विकासासाठी सत्तेत गेलो, असे काही लोक सांगत आहेत. मात्र शेतकऱ्यांकडून दूध 30 रुपयांना घेऊन ते 143 रुपयांना विकले जात आहे”, असे रोहित पवार म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी काही आकडेवारीदेखील सादर केली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.