पुणे- महिलांमधील गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कथाकथन, क्रीडा आदी कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या निवेदिता प्रतिष्ठानचे यंदाचे रौप्यमहोत्सवी २५वे वर्ष असून, त्यांच्यातर्फे आयोजित होणाऱ्या ‘ललना कला महोत्सवा’चे यंदाचे ११वे वर्ष आहे. त्यानिमित्त यंदा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत बुधवार, दि. २७ ते रविवार, दि. ३१ मार्च २०२४ असे पाच दिवस गायन, नृत्य, पेण्टिंग, कथाकथन आणि पुरस्कार यांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार, दि. २८ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता खा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथे संपन्न होईल. याप्रसंगी उद्योजिका डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील (अकलूज) आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नर्तक पं. डॉ. नंदकिशोर कपोते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. याप्रसंगी ‘तपस एल्डर केअर संस्थे’च्या संचालिका प्राजक्त वडावकर, ‘जस्ट फॉर हार्ट’ संस्थेच्या संचालिका डॉ. मनीषा देवकर आणि रेडिओ सिटीच्या आरजे तेजू यांची विशेष उपस्थिती असेल. निवेदिता प्रतिष्ठानतर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अनुराधा भारती यांनी सांगितले.
याप्रसंगी ‘ललना कलारत्न’ पुरस्कार सोहळा संपन्न होणार असून, त्यामध्ये ‘स्टार प्रवाह’फेम बालगायिका श्रुती भांडे (वय ९, अकोला), भरतनाट्यम् नृत्यांगना मिताली नाईक (गोवा), कथ्थक नृत्यांगना डॉ. नीलिमा हिरवे (पुणे), ‘इन लाइन फ्री स्टाइल स्केटिंग’मध्ये आशियाई चॅम्पियशिप पटकाविणाऱ्या श्रेयसी जोशी (वय १५, पुणे) व स्वराली जोशी (वय १७, पुणे) आणि प्रख्यात चित्रकार रुही अन्वर कुरेशी यांचा समारंभपूर्वक गौरव करण्यात येणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यातच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, त्यामध्ये नृत्य, काव्य व चित्रकला या माध्यमातून सादर होणारा ‘पंचतत्त्व आणि स्त्री’, नाट्यछटा व कथा या माध्यमातून भारतातील शूर व धाडसी महिलांवर आधारित ‘ऐतिहासिक वीरांगना’ कार्यक्रम, भरतनाट्यम् नृत्याद्वारे ‘महिषासुरमर्दिनी व भैरवी शतकम्’ कार्यक्रम, कथ्थक नृत्याद्वारे ‘नवदुर्गा’ कार्यक्रम आणि ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ मिळाल्यानिमित्त त्यांच्यावर चित्रित गाण्यांवर आधारित ‘रंगीला रे’ हा गाणी व नृत्याचा कार्यक्रम सादर होईल.
उद्घाटनदिवसाच्या आधी बुधवार, दि. २७ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनात ‘स्त्री’चे भावविश्व उलगडून दाखविणारा मराठी गीतांचा ‘स्वप्नात रंगले मी’ हा कार्यक्रम सादर होईल.
शुक्रवार, दि. २९ मार्च रोजी दुपारी ४.०० वाजता बालगंधर्व कलादालन येथे देशातील महिला चित्रकारांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार रवि देव, डॉ. प्रसाद वाळिंबे व डॉ. आरती शिराली यांच्या हस्ते होईल. ३१ मार्चपर्यंत हे प्रदर्शन दिवसभर सर्वांसाठी खुले असेल. त्यात प्रात्यशिकेदेखील सादर होतील.
शनिवार, दि. ३० मार्च रोजी सकाळी १० ते १२.३० या वेळेत शिवाजी मराठा सोसायटीच्या जिजामाता हायस्कूल हॉलमध्ये ‘कथासखी’ ग्रुपतर्फे ‘कथाविष्कार’ हा कथाकथनाचा कार्यक्रम सादर होईल. शिवाजी मराठा सोसायटीच्या मानद सचिव प्रमिलाताई गायकवाड याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, पुणेकरांनी या सर्व कार्यक्रमांना यावे, असे आवाहन संयोजिक अॅड. अनुराधा भारती यांनी केले आहे.