Home Blog Page 1134

मुलींच्या वसतिगृहासाठी हातभार लावण्याची संधी

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने देणगीचे आवाहन; ३३६ गरजू व होतकरू मुलींच्या निवासाची सोय होणार
पुणे : ग्रामीण भागातून पुण्यात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या  गरजू व होतकरू मुलींसाठी विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने पुण्यात उभारण्यात येत असलेल्या वसतिगृहासाठी आर्थिक हातभार लावण्याची संधी दानशूर/संवेदनशील पुणेकरांना आहे. ३३६ मुलींच्या निवासाची सोय होणाऱ्या या वसतिगृहाच्या निर्माणासाठी पुणेकरांनी यथायोग्य अर्थसहाय्य करावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

गेल्या ६९ वर्षांत समितीने ग्रामीण भागातील हजारो मुलामुलींना उत्तम पद्धतीने घडविण्याचे काम केले आहे. गरीब मुलींच्या उच्च शिक्षणामुळे ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलन, त्यांचे सक्षमीकरण आणि त्यायोगे समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचा हा प्रयत्न आहे. आज समितीमध्ये ३२५ मुली व ४५० मुले असे एकूण ७७५ विद्यार्थी राहात असून, पुण्याच्या विविध महाविद्यालयात शिकत आहेत. मराठवाडा, विदर्भ यासह महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागातील हे विद्यार्थी आहेत. समिती म्हणजे केवळ लॉजिंग बोर्डिंग नाही तर युवा सक्षमीकरणाची चळवळ आहे येथे माफक दरात निवास, भोजन व्यवस्थेबरोबर व्यक्तिमत्त्व विकास या संकल्पनेला सर्वाधिक महत्त्व आहे. समितीत जात, धर्म, पंथ या संकल्पनेला थारा नाही. स्वच्छता, समता आणि श्रमप्रतिष्ठा या त्रिसूत्रीवर येथे काम चालते. सर्वांगीण विकासातून युवा सक्षमीकरण हे समितीचे ब्रीद आहे. देणगीदार जरी शहरी भागातले असले तरी प्रवेश फक्त ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांनाच दिला जातो.

अलीकडच्या काळात ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढले आहे हा मोठा सामाजिक बदल आहे त्यांना सुरक्षित आसरा देण्याच्या उद्देशाने समितीने ३३६ मुलींचे वसतिगृह उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये ११२ खोल्या आहेत. एका खोलीचा खर्च दहा लाख रुपये आहे. एवढी दहा लाखांची देणगी व्यक्तिगत/ कौटुंबिक/ समूहातर्फे मिळाल्यास खोलीला देणगीदारांच्या इच्छेनुसार नाव देण्याची योजना समिती राबवत आहे. या नव्या प्रकल्पासाठी दानशूरांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क – info@samiti.org, मोबाईल – ९४०४८५५५३०.

आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीवाला धोका

पुणे-आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीवाला धोका असून त्यांना तातडीने पोलिस संरक्षण द्या, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिस अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्यात की, लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना दडपशाहीचा सामना करावा लागतोय, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आ. रोहित पवार व युगेंद्र पवार हे दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी जात आहेत. संविधानिक पध्दतीने, शांतपणे व लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत.परंतु काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध वृत्तवाहिन्या व समाज माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आली. संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंविधानिक आहे.

ज्यांची भाजपला भीती वाटते त्यांना ते अटक करतात:खासदार संजय राऊत

मुंबई-

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका प्रकारे हल्ला करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांचा घोटाळा समोर आणला. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाने नवीन गोष्ट लोकांसमोर आणली आहे. मात्र, असे असले तरी अरविंद केजरीव यांना अटक करून तुम्ही एका दिवसाची बातमी बनवू शकता. तुमचे निवडणूक रोख्यांचे प्रकरण मात्र, कायम सुरू राहणार असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पूर्ण ताकतीने अरविंद केजरीवाल यांच्यासोबत उभी राहणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल यांची अटक ही पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. आणि राजकीय सूडबुद्धीने केलेली अटक आहे. निवडणूक रोखे घोटाळा भारतीय जनता पक्षावर शेकलेला आहे. खंडणीच्या माध्यमातून हप्ता वसुलीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने गुन्हेगारांकडून पैसे गोळा केले आहेत. ते प्रकरण दाबण्यासाठीच अरविंद केजरीवालांना अटक केली असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

गोवंश हत्या बंदी कायदा तुम्ही केला. गोमांसच्या आरोपाखाली तुम्ही मॉब लिंचिंग केले. मात्र हे गोमांस निर्यात करणाऱ्यांकडून तुम्ही निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून हप्ता वसूल केला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाचे निवडणूक रोखे चेक केले असता, ज्या ज्या घोटाळ्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. त्या त्या घोटाळ्यातील लोकांनी भारतीय जनता पक्षाला निधी दिला असल्याचे दिसते, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. म्हणजेच या घोटाळ्यातील पैसा तुमच्या खात्यात गेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षावर आधी गुन्हा दाखल करा, अशी मागणी देखील खासदार संजय राऊत यांनी केले आहे. निवडणूक रोख्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच तुम्ही केजरीवाल्यांना अटक केली आहे. लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही अटक करत आहात, शिबू सोरेन यांना तुम्ही अटक केली, मंत्र्यांना तुम्ही अटक करत आहोत मात्र, सर्वात भ्रष्ट सरकार हे देशात तुमचे आहे. त्यांना अटक होत नाही. जे तुमच्या पक्षात येतात त्यांना तुम्ही मंत्री करतात. आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करतात. याला हुकूमशाही म्हणतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली.

मोदी आणि अमित शहा यांना ज्यांच्यापासून भीती वाटते की, हे आम्हाला हरवू शकतात. निवडणुकीत पराभव करू शकतात, त्या सर्वांना अटक करण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देखील भगतसिंग, राजगुरू, वीर सावरकर, लाल, बाल, पाल या सर्वांना ब्रिटिशांनी अटक केली होती. कारण ब्रिटिश त्यांना घाबरत होते. मोदींचे सरकार देखील त्याच पद्धतीने काम करत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. लोकांचा उठाव होण्याची, निवडणूक हरण्याची सरकारला भीती आहे. त्यामुळे अशा पद्धतीने लोकांना तुरुंगात टाकण्याचे काम सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
अशा सर्व प्रकरणाविरोधात अण्णा हजारे यांचे आंदोलन होत होते. मात्र, आता अण्णा हजारे यांना जागे करण्याची वेळ आली असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, आता ते कुठे असतात हे मला माहित नाही. पण असे असले तरी त्यांना जागे करण्याची ही वेळ असल्याचा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले,’केजरीवाल प्रकरणी सरकारकडे कोणतेही पुरावे नाहीत,सरकारकडून लोकशाहीचा तमाशा

दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडीच्या अटकेवर, राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणतात, "भारत आघाडीने काय करायचे ते ठरवायचे आहे. मी सुरुवातीपासून म्हणत आलो आहे की या सर्वांच्या विरोधात युतीने एकत्र यायचे आहे. .. हे शून्य प्रकरण आहे... संपूर्ण प्रकरण मंजूर करणाऱ्यांच्या विधानावर आधारित आहे... कोणतेही पुरावे नाहीत... ही लोकशाहीची थट्टा आहे..."
ज्यांना तक करायला हवी त्यांच्याकडून बॉंड घेतलेत आणि लोकशाहीचा तमाशा मांडलाय ..

केजरीवाल यांनी ईडी लॉकअपमध्ये रात्र काढली,आज कोर्टात हजर करणार

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी संध्याकाळी मद्य धोरण प्रकरणी मुख्य निवासस्थानातून अटक केली होती. ईडीची टीम त्यांना दहावा समन्स बजावण्यासाठी आली होती. अटकेनंतर केजरीवाल यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. आरएमएल रुग्णालयातून आलेल्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार केले. केजरीवाल यांनी ईडी लॉकअपमध्ये रात्र काढली. आज आप केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आंदोलन करणार आहे.
आज केजरीवाल यांना उच्च न्यायालयात हजर केले जाणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे हजर होण्यापूर्वीच त्यांचे मेडिकल केले जाऊ शकते. केजरीवाल यांचा रिमांड मिळविण्यासाठी ईडी प्रयत्न करणार आहे. दिल्लीच्या मंत्री आतिशी म्हणाल्या की, केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील. तुरुंगातून सरकार चालवणार.
केजरीवाल यांच्या कायदेशीर पथकाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि तातडीने सुनावणीची मागणी केली. या प्रकरणात, आधीच ईडीच्या ताब्यात असलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांनी त्यांच्या अटकेला SCमध्ये आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवरही आज सुनावणी होणार आहे.

  • गुरुवारी, 21 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजता उच्च न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली. चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेल्यास अटक केली जाणार नाही, असे आश्वासन केजरीवाल यांनी न्यायालयाकडे मागितले होते. केजरीवाल यांना ईडीसमोर हजर राहावे लागेल, त्यांच्या अटकेला स्थगिती नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
  • संध्याकाळी 7 वाजता, ईडीची टीम 10 व्या समन्स आणि सर्च वॉरंटसह केजरीवाल यांच्या घरी (सीएम हाऊस) पोहोचली.
  • तपास यंत्रणेने अरविंद केजरीवाल यांची दोन तास चौकशी केली. त्यानंतर रात्री ९ वाजता त्यांना अटक करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरएएफच्या अनेक तुकड्या उपस्थित होत्या.
  • रात्री 11.05 च्या सुमारास ईडीच्या पथकाने अरविंद केजरीवाल यांना कारने ईडी कार्यालयात नेले.
  • केजरीवाल यांना रात्री 11.50 वाजता ईडीच्या मुख्यालयात आणण्यात आले.
  • रात्री 12 वाजल्यानंतर आरएमएल रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक अरविंद केजरीवाल यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ईडी कार्यालयात पोहोचले.
  • अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण रात्र ईडी कार्यालयात लॉकअपमध्ये काढली.

लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरू:अरविंद केजरीवाल यांची अटक बेकायदेशीरच -शरद पवार

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर भाजपवर हल्लाबोल केला आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचे शरद पवार यांनी म्हंटले आहे. त्यांनी ट्विट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री मद्य धोरण प्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती.
तसेच देशात तपास यंत्रणांचा गैरवापर करून कारवाया केल्या जात आहेत. लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम हे भाजप सरकार करत आहे. केजरीवाल यांच्या अटकेचा मी निषेध करतो. मुख्य प्रमुखाला अटक करणे हा सत्तेचा गैरवापर आहे. दहशत निर्माण करण्याचे काम सुरू आहे. या लोकशाहीवरील संकटासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे”, असे पवार म्हणाले.
शरद यांनी याबाबात प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे की, विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय एजन्सींच्या सूडात्मक गैरवापराचा तीव्र निषेध, विशेषत: सार्वत्रिक निवडणुका होत असताना. भाजपा सत्तेसाठी किती खोलवर झुकणार हे या अटकेवरून दिसून येते. या घटनाबाह्य कारवाईविरोधात ‘इंडिया’ एकजुटीने उभी आहे”, असे पवार म्हणाले.तसेच ”मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर भाजपाने कारवाई करत मोठे संकट स्वतःवर ओढावून घेतले आहे. यामुळे केजरीवाल यांनाच मोठे मताधिक्य मिळणार आहे. मागच्या वेळी विधानसभेत भाजपाल 70 पैकी तीन जागांवर विजय मिळवता आला होता, पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये तितक्याही जागा त्यांना मिळणार नाही. पण केजरीवाल यांच्या नेतृत्वात 100 टक्के जागा निवडून येतील”, असा दावा शरद पवार यांच्याकडून करण्यात आला आहे.

दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही केजरीवाल यांच्या अटकेनंतर भाजपवर हल्ला चढवला आहे. ”एक घाबरलेला हुकूमशाह, एक मृत लोकशाही बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मीडिया सर्व संस्था काबीज करणे, पक्ष फोडणे, कंपन्यांकडून हप्तेवसुली करणे, प्रमुख विरोधी पक्षाची बँक खाती गोठवणे हे त्या ‘असुरी शक्ती’साठी कमी होते, यातच आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणे त्यांच्यासाठी खूप साधी गोष्ट झाली आहे”, या शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी संध्याकाळी मद्य धोरण प्रकरणी मुख्य निवासस्थानातून अटक केली होती. ईडीची टीम त्यांना दहावा समन्स बजावण्यासाठी आली होती. अटकेनंतर केजरीवाल यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. आरएमएल रुग्णालयातून आलेल्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार केले. केजरीवाल यांनी ईडी लॉकअपमध्ये रात्र काढली. आज आप केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आंदोलन करणार आहे.

केजरीवाल यांच्या अटकेनंतर राहुल गांधी म्हणाले, डरा हुआ तानाशाह, एक मरा हुआ लोकतंत्र बनाना चाहता है।

केजरीवाल यांच्या अटकेनंतर वाढता असंतोष

नवी दिल्ली:केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे. मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला असून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील, असे दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी सांगितले. केजरीवालच तुरुंगातून सरकार चालवणार. येथे केजरीवाल यांच्या कायदेशीर पथकानेही सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे.

केजरीवाल यांच्या अटकेनंतर काही वेळातच आम आदमी पार्टीतर्फे आतिशी यांनी ही प्रतिक्रिया दिली असून आता केजरीवाल कारागृहातून आपलं कर्तव्य बजावतील, असंही त्या म्हणाल्या आहेत. तसंच, ईडीने केलेल्या या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून आम्ही आज रात्रीच सर्वोच्च न्यायालयात तत्काळ सुनावणीची मागणी केली आहे, असंही आतिशी यांनी स्पष्ट केलं आहे.

हे एक राजकीय षडयंत्र असून या प्रकरणात 500हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश होता तरीही दोन वर्षांत त्यांना एक रुपयाही हस्तगत करता आलेला नाही, अशी टीकाही आतिशी यांनी केली आहे.

अटक करून केजरीवाल यांना ED मुख्यालयात नेण्यात आले. ईडीच्या मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कार्यालयाभोवती निमलष्करी दलाच्या चार कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांचे 100 हून अधिक कर्मचारीही उपस्थित आहेत.

देशभरातून या अटकेवरून असंतोष व्यक्त होत आहे

प्रियंका गांधी शरद पवार सुप्रिया सुळे आणि अनेक नेत्यांनी यावरुन मोदींना लक्ष्य केले आहे

दिल्लीचे CM केजरीवाल यांना अटक

नवी दिल्ली;मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक झाल्याची माहिती केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील नेत्या आतिशी यांनी दिली आहे.

अबकारी कर घोटाळा प्रकणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर ईडीचे पथक गुरुवारी केजरीवाल यांच्या घरी दाखल झालं होतं.दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला होता. केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला होता.

ईडीने पाठवलेल्या समन्सप्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीच्या नोटीसनंतर अरविंद केजरीवाल यांनी चौकशीसाठी येण्यापूर्वी अटक न करण्याची हमी मागितली होती. मात्र, ती याचिका फेटाळून लावण्यात आली होती.

याचिका फेटाळून लावल्याच्या काही तासांतच ईडीचं पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी दाखल झालं होतं. तिथे दोन तास चौकशी केल्यानंतर केजरीवाल यांना अटक करण्यात आली.

कॉंग्रेसची उमेदवारी रविंद्र धंगेकरानांच … जाहीर

दुसर्‍या यादीत 57 जणांना उमेदवारी

कोल्हापूर लोकसभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित

काँग्रेसकडून नंदुरबार अमरावती नांदेड पुणे लातूर सोलापूर आणि कोल्हापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. नंदुरबारमधून गोवळ पडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडमधून वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर लातूरमधून शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे

पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. भाजपने महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर केल्याच्या नंतर काही दिवसातच आता आज महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकरांचे नाव जाहीर केले आहे.आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे धंगेकर लोकसभेच्या रिंगणात आल्याने या निवडणुकीत आणखीनच रंग भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धंगेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते.पुणे लोकसभा ही काँग्रेसची तशी परंपरागत जागा. मात्र जवळपास 10 वेळा खासदार निवडून आणणाऱ्या काँग्रेसची ही जागा मोदी लाटेत म्हणजेच 2014 साली भाजपकडे गेली.

कधीकाळी हा मतदारसंघ बॅरिस्टर गाडगीळ, जयंतराव टिळक त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली म्हणून ओळखला जायचा. पण मोदी लाटेत अनिल शिरोळे आणि त्यानंतर गिरीश बापट यांनी पुणे लोकसभेवर विजय मिळवला. मुख्यत: काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत पुणे लोकसभेत होते.

13 मार्च रोजी भारतीय जनता पक्षाने लोकसभा उमेदरांच्या नावाची घोषणा केली त्यात मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आबा बागुल यांनी उमेदवारीचा आग्रह धरला होता पण दिल्लीपर्यंत त्यांचा आग्रह पोहोचू शकला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेस मध्ये सुरुवाती पासून धंगेकर हेच नाव आघाडीवर होते.

आता खरी लढत मोहोळ विरुद्ध धंगेकर

पुणे लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेस आणि भाजपा अशा दोन विचारधारांमध्ये विभागलेला मतदारसंघ आहे.महाविकास आघाडी आणि महायुती अशी नवी समीकरणं उदयाला आल्याने त्याचाही परिणाम शहराच्या राजकारणावर झालेला दिसतोय.

यंदा आता खरी लढत मोहोळ विरुद्ध धंगेकर अशीच होणार असून अन्य उमेदवार मते खाण्यासाठी कोणाला निवडून आणण्यासाठी तर कोणाला पाडण्यासाठी उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये वडगाव शेरी, पर्वती, कोथरूड, कसबा पेठ, शिवाजीनगर, पुणे छावणी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 पैकी 1आमदार, भाजपचे चार आणि काँग्रेसचा एक आमदार आहे. तसं पाहायला गेलं तर या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व जास्त आहे. पण कॉंग्रेस मधून बंडखोरी झाली नाही तर किंवा सरळ लढत झाली तर, आणि गत 5/7 वर्षांत भाजपचे पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याची व्यवस्थीत चर्चा जनतेत घडवून आणली तर कॉंग्रेसला येथे विजय मिळविता येऊ शकतो.असा विश्वास राजकीय समीक्षक व्यक्त करत आहेत.

ईडीची टीम केजरीवालांच्या घरी,आपची टीम सुप्रीम कोर्टाच्या दारी-ED ची टीम जबरदस्तीने घरात घुसल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप

अरविंद केजरीवालांना अटकेपासून दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार


नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला आहे. काही तासांनंतर ईडीची टीम त्याच्या घरी पोहोचली. तपास यंत्रणा त्यांची चौकशी करू शकते, असे सांगण्यात येत आहे. आज दुपारी दिल्ली उच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटकेतून दिलासा देण्यास नकार दिला आहे. गुरुवारी, 21 मार्च रोजी उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून वाचवण्याची विनंती फेटाळली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केजरीवाल यांना 9 समन्स बजावले आहेत, मात्र केजरीवाल हजर झाले नाहीत.
यापूर्वी केजरीवाल यांनी न्यायालयाला सांगितले होते की, ते अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहण्यास तयार आहेत. तपास यंत्रणा त्यांना अटक करणार नाही, याची खात्री त्यांना दिली पाहिजे.
त्याचवेळी हायकोर्टाने ईडीला उत्तर देण्यास आणि नवीन अंतरिम याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. आता या प्रकरणी 22 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली उच्च न्यायालयाचे खंडपीठ गुरुवारी केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. मद्य घोटाळाप्रकरणी आजच ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले आहे. 17 मार्च रोजी त्यांना 9वे समन्स पाठवण्यात आले होते.

केजरीवाल यांनी 19 मार्च रोजी या समन्सविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर 20 मार्च रोजी सुनावणी झाली. कोर्टाने समन्स पाठवण्यासाठी ईडीला वारंवार बोलावले आहे. तपास यंत्रणेला बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांना 27 फेब्रुवारी, 26 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 17 जानेवारी, 3 जानेवारी आणि 2023 मध्ये 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबर रोजी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, ते एकदाही चौकशीसाठी गेले नाहीत.

केजरीवाल यांचे वकील म्हणाले- सीएम सुरक्षा मिळाल्यास हजर होतील,20 मार्च रोजी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि विक्रम चौधरी यांनी केजरीवाल यांची बाजू न्यायालयात मांडली. ते म्हणाले- ईडीने आप नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक केली आहे. तपास यंत्रणा केजरीवाल यांनाही अटक करू शकते.वकील म्हणाले- केजरीवाल पळून जात नाहीत. त्यांना सुरक्षा दिली तर ते पुढे येतील. जरी ईडी त्याला आरोपी, संशयित किंवा साक्षीदार म्हणून बोलावत आहे की नाही हे सांगत नाही. त्यावर न्यायालयाने म्हटले होते की, ते हजर झाल्यावरच समजेल की त्यांना आरोपी म्हणून बोलावले जात आहे की साक्षीदार म्हणून बोलावले जात आहे ते.

https://twitter.com/AapKaKejariwal/status/1770791512260931873

ED ने 17 मार्च रोजी केजरीवाल यांना दिल्ली जल बोर्ड टेंडर घोटाळा प्रकरणात मद्य धोरण घोटाळा प्रकरणासह समन्स पाठवले होते. जल बोर्ड टेंडर घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना मिळालेले हे पहिले समन्स आहे. याप्रकरणी त्यांना 18 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र ते गेले नाहीत. अशाप्रकारे ईडीने केजरीवाल यांना आतापर्यंत 10 समन्स पाठवले आहेत.

रविवारी चिंचवडला मावळ लोकसभेचा रणसंग्राम

दिशा फाऊंडेशनचा उपक्रम
बारणे, वाघेरेंसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती

पिंपरी, पुणे (दि. २१ मार्च २०२४) दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकसभेचा रणसंग्राम – मावळ लोकसभा’ या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रविवारी, २४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीचे मावळचे घोषित उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, भाजपचे पिंपरी शहराध्यक्ष शंकर जगताप, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे (शरद पवार गट), प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर हे या कार्यक्रमातील चर्चेत सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार योगेश कुटे कार्यक्रमाचे सूत्रसंवादक असणार आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुचर्चित मतदारसंघ मानला जातो. येथील विविध मुद्द्यांचा राजकीय अंगाने परामर्ष घेण्यासाठी मावळ लोकसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील विविध प्रश्न तथा समस्यांवर आधारित सविस्तर चर्चा होणार आहे. सदर कार्यक्रमासाठी सर्वांना प्रवेश असून काही जागा राखीव असणार आहेत.

मोहोळांना शुभेच्छा देण्यासाठी मुंडे पुण्यात

पुणे : पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक शहर आहे. या शहरातील उमेदवार मुरलीधर मोहोळ हे माझे युवा मोर्चातील सहकारी आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत जवळचे आहेत. म्हणूनच त्यांच्या भेटीसाठी मी येथे खास आली आहे. मोहोळ प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि दिल्लीला जातील, असा विश्वास भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. ‘पुण्याच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील’, असेही त्या म्हणाल्या.

पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कर्वे रस्त्यावरील २४ तास खुल्या संपर्क कार्यालयाला मुंडे यांनी भेट दिली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकारांशी संवाद साधताना मुंडे म्हणाल्या ‘आ. मिसाळ या माझ्या मोठ्या भगिनी तर मुरलीधर मोहोळ हे माझे छोटे बंधू असून त्यांची मोठी बहीण म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुण्यात आली आहे. त्यांना मोठा विजय प्राप्त होवो, असेही मुंडे म्हणाल्या.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘मी लोकसभेसाठी आजवर उमेदवार नव्हते, मात्र निवडणूक लढवण्याचा मला अनुभव आहे. वयाच्या १७ व्या वर्षांपासून मी प्रचार करत आहे. मला २२ वर्षांचा राजकारणाचा अनुभव आहे. ही माझी पाचवी निवडणूक आहे. पक्षाने सांगितले तर राज्यभर प्रचार करेन. परंतु, सध्या मी माझ्या निवडणुकीकडे लक्ष दिले आहे. मी माझ्या आणि मुरलीधर मोहोळ यांच्याही विजयाविषयी आश्वस्त आहे’

स्व. गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत रमल्या पंकजा !

मोहोळ यांच्या २४ तास खुल्या कार्यालयाच्या राजकीय कारकीर्दीवर प्रकाश टाकणारी छायाचित्रे लावली असून यात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याही छायाचित्रांचा समावेश यात आहे. त्यातील प्रत्येक फोटोची आठवण मुंडे यांनी जाणून घेतली.

‘नाद अनाहत’ मासिकाच्या पहिल्या अंकाचा येत्या २६ला प्रकाशन सोहळा

पुणे ता. २१: उद्गार भारततर्फे प्रकाशित होत असलेल्या ‘नाद अनाहत’ मासिकाचा प्रकाशन सोहळा येत्या मंगळवारी ( दि.२६) तारखेला पार पडणार आहे. गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता येथे हा कार्यक्रम सायंकाळी ६.३० ते ९.०० या वेळेत रंगेल. भारत वर्षाचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक पुनरुत्थान घडविणारे जननायक नरेंद्र मोदी अर्थातच ‘नाद अनाहत’चा प्रथम नरेंद्र मोदी विशेषांक यावेळी प्रकाशित होईल.
महंत शिवगिरी महाराज यांच्या शुभहस्ते तर उद्गार भारत प्रकाशनच्या संस्थापिका आसावरी पाटणकर, नाद अनाहत मासिकाचे संपादक सुजीत भोगले, व उदयनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल.
कला, संस्कृती आणि इतिहास या विषयांना वाहिलेले ‘धर्मयुग’ हे साप्ताहिक अत्यंत लोकप्रिय होते. हे साप्ताहिक बंद पडल्यानंतर या विषयांना वाहून घेतलेले एकही साप्ताहिक, पाक्षिक किंवा मासिक छापले जात नव्हते. ‘नाद अनाहत’ हे मासिक धर्म, कला, संस्कृती, इतिहास आणि अध्यात्म या विषयांनाच समर्पित असेल. या मासिकातून दर्जेदार साहित्य प्रकाशित करण्याचा आमचा प्रयत्न असून ‘नाद अनाहत’ रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास आसावरी पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर तक्रार करा

मुंबई, दि. २१ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘सीव्हिजिल सिटीझन ॲप’ विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.

हे सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

वैशिष्ट्य

सीव्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

वापर कसा करायचा

एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जाऊन सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करा. त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

अचूक कृती व देखरेख

या ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.

लाईव्ह फोटो, व्हिडिओ

या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

तातडीने होते कारवाई

या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.

डाटा सुरक्षा

या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

डिजिटल कॉपीराईटचे गुन्हे आणि सायबर सुरक्षा जागरुकतेला प्राधान्य देण्याची गरज

‘मालवेअर’च्या प्रसाराचे पायरसी वेबसाइट्स मोठे माध्यम— ब्रिजेश सिंह

आयएसबी इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्सेसचा सायबर सुरक्षेबाबतचा अहवालाचे प्रकाशन

मुंबई, दि. २१ : पायरसी वेबसाइट्स मालवेअरचा प्रसार करण्यासाठी मोठे मध्यम बनले आहेत. ग्राहक केवळ पायरेटेड मुव्ही किंवा टीव्ही शो पाहत नसून ते त्यांच्या ‘डिव्हाइस’शी तडजोड करत आहेत आणि तुमचे ‘ डिव्हाईस’ ‘दुसरे तुम्हीच’ आहात. त्यात तुमची ओळख, तुमचे बँकिंग तपशील, तुमचे मित्र आणि कुटुंबीयांचे तपशील असतो. अनेक वर्षांपासून ज्या गोष्टी संदिग्ध होत्या, त्यांचा आता या अहवालात खुलासा करण्यात आला आहे. आयएसबी (इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस) चा अहवाल या बदलाची सुरुवात आहे, असे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.

आयएसबी (इंडियन स्कूल ऑफ बिझनेस) द्वारे सायबर सुरक्षेबाबत सर्वंकष अभ्यास करण्यात आला. या अभ्यासावरील अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, दक्षिण आशियाचे अमेरिकी बौद्धिक संपदा सल्लागार जॉन कॅबेका, प्रादेशिक संचालन प्रमुख नील गणे आणि आयएसबी ‘ ‘इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्स’चे प्रा. मनीष गंगवार आदी मान्यवरांच्या हस्ते वाणिज्य दूतावास, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

यावेळी कार्यकारी संचालक मनीष गंगवार, ला ट्रोब युनिव्हर्सिटी (मेलबर्न) येथील सायबर सुरक्षा विभागाचे सहायक प्रा. डॉ. पॉल वॉटर्स, कॅरिन टेंपल यांनीही आपली मते मांडली.

‘आयएसबी इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्स’ चे प्रा. गंगवार आणि डॉ. श्रुती मंत्री, मेलबोर्नच्या ‘ला ट्रोब युनिव्हर्सिटी’ येथील सायबर सिक्युरिटीचे सहायक प्राध्यापक डॉ. पॉल वॉटर्स यांनी ‘दि पायरसी- मालवेअर नेक्सस इन इंडिया : अ परसेप्शन आणि अनुभव आणि अनुभवजन्य विश्लेषण’ या कार्यक्रमाचे आयोजन वाणिज्य दूतावास, मुंबई येथे अलायन्स फॉर क्रिएटिव्हिटी अॅण्ड एन्टरटेन्मेट (एसीई), आयएसबी इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्स (आयआयडीएस ) आणि एसीई यांनी युनायटेड स्टेट्स पेटंट अॅण्ड ट्रेडमार्क ऑफिस (यूएसपीटीओ) च्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.

अहवालातील निष्कर्ष

अहवालात प्रौढ उद्योग ५७ टक्के आणि जुगाराशी संबंधित जाहिरातीच्या ५३ टक्के तुलनेत पायरसी साइट्समध्ये प्रवेश केल्याने मालवेअर संसर्गाचा ५९ टक्के जास्त धोका उद्भवतो. ‘वायरस टोटल’ चा उपयोग करून १५० वेबसाइट्सच्या विश्लेषणात मालवेअर, संशयास्पद क्रियाकलाप, फिशिंगचे प्रयत्न आणि स्पॅम यासारख्या सायबर जोखीम असल्याचे समोर आले. मानक पायरसी संकेतस्थळांच्या तुलनेत “स्कॅम पायरसी संकेतस्थळ” उपयोग कर्त्यांना सायबर धोक्यांना समोर आणण्याचा धोका जास्त असतो.

मालवेअर वितरण पायरसी साइट संचालकांसाठी अतिरिक्त महसूल उत्पन्न करण्यासाठी भारतात ऑनलाइन पायरसी फायदेशीर राहिली आहे. भारतीय ग्राहक पायरसी साइट्सचा उपयोग करतांना त्यांच्या खऱ्या सायबर जोखमीला कमी लेखतात, पायरसी संकेतस्थळाशी संबंधित सायबर सुरक्षा धोक्यांकडे लक्ष देण्याची तातडीची गरज आहे यावर भर देतात. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या (आयएसबी ) सायबर सुरक्षा तज्ञांनी केलेल्या तळागाळातील धारणा आणि अनुभव अध्ययनात (ग्राऊंड पर्सेप्शन ॲण्ड एक्सपिरिअन्स स्टडी) मालवेअर संसर्गाचा भारतीय ग्राहकांसाठी ५९ टक्के जोखीम असलेल्या पायरसी वेबसाइट्स एक प्रमुख धोका असल्याचे समोर आले आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे १८-२४ वर्षे वयोगटातील उपयोगकर्ते जे या प्लॅटफॉर्मवर जास्त व्यस्त असतात त्यांच्यात सायबर धोक्यांबाबत कमी जागरूकता असल्याचे दिसून आले.

हे सर्वेक्षण हे २३ ते २९ मे २०२३ या कालावधीत करण्यात आले. ‘YouGov’ नॅशनल ऑम्निबसचा भाग म्हणून भारतातील १०३७ उत्तररदात्यांचा यात समावेश आहे. भारतातील प्रौढ नागरिकांच्या वारंवारतेच्या प्रमाणात लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांवर आधारित १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ऑनलाइन लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करण्यासाठी डेटाचे संतुलन करण्यात आले.

हा संपूर्ण अहवाल https://www.isb.edu/content/dam/sites/isb/India-Piracy-and-Cyber-Threats-Report-DM.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.