मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर भाजपवर हल्लाबोल केला आहे. ही अटक बेकायदेशीर असल्याचे शरद पवार यांनी म्हंटले आहे. त्यांनी ट्विट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री मद्य धोरण प्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती.
तसेच देशात तपास यंत्रणांचा गैरवापर करून कारवाया केल्या जात आहेत. लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम हे भाजप सरकार करत आहे. केजरीवाल यांच्या अटकेचा मी निषेध करतो. मुख्य प्रमुखाला अटक करणे हा सत्तेचा गैरवापर आहे. दहशत निर्माण करण्याचे काम सुरू आहे. या लोकशाहीवरील संकटासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे”, असे पवार म्हणाले.
शरद यांनी याबाबात प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे की, विरोधी पक्षांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय एजन्सींच्या सूडात्मक गैरवापराचा तीव्र निषेध, विशेषत: सार्वत्रिक निवडणुका होत असताना. भाजपा सत्तेसाठी किती खोलवर झुकणार हे या अटकेवरून दिसून येते. या घटनाबाह्य कारवाईविरोधात ‘इंडिया’ एकजुटीने उभी आहे”, असे पवार म्हणाले.तसेच ”मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर भाजपाने कारवाई करत मोठे संकट स्वतःवर ओढावून घेतले आहे. यामुळे केजरीवाल यांनाच मोठे मताधिक्य मिळणार आहे. मागच्या वेळी विधानसभेत भाजपाल 70 पैकी तीन जागांवर विजय मिळवता आला होता, पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये तितक्याही जागा त्यांना मिळणार नाही. पण केजरीवाल यांच्या नेतृत्वात 100 टक्के जागा निवडून येतील”, असा दावा शरद पवार यांच्याकडून करण्यात आला आहे.
दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही केजरीवाल यांच्या अटकेनंतर भाजपवर हल्ला चढवला आहे. ”एक घाबरलेला हुकूमशाह, एक मृत लोकशाही बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मीडिया सर्व संस्था काबीज करणे, पक्ष फोडणे, कंपन्यांकडून हप्तेवसुली करणे, प्रमुख विरोधी पक्षाची बँक खाती गोठवणे हे त्या ‘असुरी शक्ती’साठी कमी होते, यातच आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणे त्यांच्यासाठी खूप साधी गोष्ट झाली आहे”, या शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी संध्याकाळी मद्य धोरण प्रकरणी मुख्य निवासस्थानातून अटक केली होती. ईडीची टीम त्यांना दहावा समन्स बजावण्यासाठी आली होती. अटकेनंतर केजरीवाल यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. आरएमएल रुग्णालयातून आलेल्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार केले. केजरीवाल यांनी ईडी लॉकअपमध्ये रात्र काढली. आज आप केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आंदोलन करणार आहे.