पुणे ता. २१: उद्गार भारततर्फे प्रकाशित होत असलेल्या ‘नाद अनाहत’ मासिकाचा प्रकाशन सोहळा येत्या मंगळवारी ( दि.२६) तारखेला पार पडणार आहे. गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता येथे हा कार्यक्रम सायंकाळी ६.३० ते ९.०० या वेळेत रंगेल. भारत वर्षाचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक पुनरुत्थान घडविणारे जननायक नरेंद्र मोदी अर्थातच ‘नाद अनाहत’चा प्रथम नरेंद्र मोदी विशेषांक यावेळी प्रकाशित होईल.
महंत शिवगिरी महाराज यांच्या शुभहस्ते तर उद्गार भारत प्रकाशनच्या संस्थापिका आसावरी पाटणकर, नाद अनाहत मासिकाचे संपादक सुजीत भोगले, व उदयनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल.
कला, संस्कृती आणि इतिहास या विषयांना वाहिलेले ‘धर्मयुग’ हे साप्ताहिक अत्यंत लोकप्रिय होते. हे साप्ताहिक बंद पडल्यानंतर या विषयांना वाहून घेतलेले एकही साप्ताहिक, पाक्षिक किंवा मासिक छापले जात नव्हते. ‘नाद अनाहत’ हे मासिक धर्म, कला, संस्कृती, इतिहास आणि अध्यात्म या विषयांनाच समर्पित असेल. या मासिकातून दर्जेदार साहित्य प्रकाशित करण्याचा आमचा प्रयत्न असून ‘नाद अनाहत’ रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास आसावरी पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.