मुंबई-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका प्रकारे हल्ला करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांचा घोटाळा समोर आणला. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाने नवीन गोष्ट लोकांसमोर आणली आहे. मात्र, असे असले तरी अरविंद केजरीव यांना अटक करून तुम्ही एका दिवसाची बातमी बनवू शकता. तुमचे निवडणूक रोख्यांचे प्रकरण मात्र, कायम सुरू राहणार असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पूर्ण ताकतीने अरविंद केजरीवाल यांच्यासोबत उभी राहणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल यांची अटक ही पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. आणि राजकीय सूडबुद्धीने केलेली अटक आहे. निवडणूक रोखे घोटाळा भारतीय जनता पक्षावर शेकलेला आहे. खंडणीच्या माध्यमातून हप्ता वसुलीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने गुन्हेगारांकडून पैसे गोळा केले आहेत. ते प्रकरण दाबण्यासाठीच अरविंद केजरीवालांना अटक केली असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
गोवंश हत्या बंदी कायदा तुम्ही केला. गोमांसच्या आरोपाखाली तुम्ही मॉब लिंचिंग केले. मात्र हे गोमांस निर्यात करणाऱ्यांकडून तुम्ही निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून हप्ता वसूल केला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाचे निवडणूक रोखे चेक केले असता, ज्या ज्या घोटाळ्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. त्या त्या घोटाळ्यातील लोकांनी भारतीय जनता पक्षाला निधी दिला असल्याचे दिसते, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. म्हणजेच या घोटाळ्यातील पैसा तुमच्या खात्यात गेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षावर आधी गुन्हा दाखल करा, अशी मागणी देखील खासदार संजय राऊत यांनी केले आहे. निवडणूक रोख्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच तुम्ही केजरीवाल्यांना अटक केली आहे. लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही अटक करत आहात, शिबू सोरेन यांना तुम्ही अटक केली, मंत्र्यांना तुम्ही अटक करत आहोत मात्र, सर्वात भ्रष्ट सरकार हे देशात तुमचे आहे. त्यांना अटक होत नाही. जे तुमच्या पक्षात येतात त्यांना तुम्ही मंत्री करतात. आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करतात. याला हुकूमशाही म्हणतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली.
मोदी आणि अमित शहा यांना ज्यांच्यापासून भीती वाटते की, हे आम्हाला हरवू शकतात. निवडणुकीत पराभव करू शकतात, त्या सर्वांना अटक करण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देखील भगतसिंग, राजगुरू, वीर सावरकर, लाल, बाल, पाल या सर्वांना ब्रिटिशांनी अटक केली होती. कारण ब्रिटिश त्यांना घाबरत होते. मोदींचे सरकार देखील त्याच पद्धतीने काम करत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. लोकांचा उठाव होण्याची, निवडणूक हरण्याची सरकारला भीती आहे. त्यामुळे अशा पद्धतीने लोकांना तुरुंगात टाकण्याचे काम सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
अशा सर्व प्रकरणाविरोधात अण्णा हजारे यांचे आंदोलन होत होते. मात्र, आता अण्णा हजारे यांना जागे करण्याची वेळ आली असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, आता ते कुठे असतात हे मला माहित नाही. पण असे असले तरी त्यांना जागे करण्याची ही वेळ असल्याचा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.