पुणे, दि. २२: पुणे शहरातील पार्किंगच्या जागेचा वापर मालवाहतूक करणारी वाहने लोडिंग, अनलोडिंग करतेवेळी करत असल्याने इतर वाहनांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे यापूर्वी जारी केलेले सर्व आदेश रद्द करून प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
पुणे शहरात २३ मार्च पासून सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ पर्यंत लक्ष्मी रोड वरील संत कबीर चौक ते टिळक चौक, शिवाजी रस्त्यावरील स. गो. बर्वे चौक ते जेधे चौक, बाजीराव रस्त्यावरील पूरम चौक ते गाडगीळ पुतळा चौक, केळकर रस्त्यावरील टिळक चौक ते अप्पा बळवंत चौक, कुमठेकर रस्त्यावरील टिळक चौक ते शनिपार चौक, टिळक रस्त्यावरील टिळक चौक ते जेधे चौक, जंगली महाराज रस्त्यावरील स.गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक, कर्वे रस्त्यावरील खंडोजीबाबा चौक ते पौड फाटा, महात्मा गांधी रस्त्यावरील पंडोल अपार्टमेंट चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक व नॉर्थ मेन रस्ता, कोरेगाव पार्क मधील कोरेगाव पार्क जंक्शन ते ताडीगुत्ता चौक वर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांस प्रवेश बंद करण्यात आला आहे. हा बदल अत्यावश्यक सेवेतील वाहनांना असणार नाही, असेही कळविले आहे.
विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत नो पार्किंगचे तात्पुरते आदेश जारी
विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत टिळक स्मारक मंदिर गेटच्या भिंतीलगत २० मीटर व नारळीकर इन्स्िटट्यूतकडून टिळक स्मारक मंदिरकडे येताना (कुमार स्टेशन व झेरॉक्स दुकान) रस्त्याच्या उजव्या बाजूस ५० मीटर तात्पुरत्या स्वरूपात नो पार्किंगचे आदेश जारी करण्यात येत आहेत.
वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात ४ एप्रिलपर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात.
नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.