Home Blog Page 1124

निवडणूकीच्या विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना करा- डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि. २६: महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने परस्पर समन्वयाद्वारे निवडणुकीच्या विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि निवडणुका मुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठीचे नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित पुणे विभागाच्या निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, महसूल उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आदी उपस्थित होते.

डॉ.पुलकुंडवार म्हणाले, आदर्श आचारसंहिता आणि भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी निवडणूक आराखडा योग्यरितीने तयार करावा आणि त्यात सूक्ष्म बाबींचाही समावेश असावा. आंतरजिल्हा आणि आंतरराज्य समन्वयासाठीदेखील योग्य नियोजन करावे. पैशाचा आणि बळाचा वापर होऊ नये आणि नागरिकांना निर्भयपणे मतदान करता येईल यादृष्टीने प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात.

युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहीत करावे. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्यासोबत मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधण्याविषयी व्यापक जनजागृती करावी. उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेता सकाळी आणि सायंकाळी दोन तास मतदानासाठी गर्दी होईल हे लक्षात घेऊन आवश्यक व्यवस्था करावी. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील समस्या जाणून घ्याव्यात, असे निर्देशही विभागी आयुक्तांनी दिले.

यावेळी पुणे विभागातील जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आपल्या जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि प्रतिबंधात्मक कार्यवाहीवर विशेष लक्ष देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

लोकसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या हस्ते प्रकाशन

माध्यमांना निवडणूक विषयक संदर्भांसाठी पुस्तिका उपयुक्त

पुणे, दि. २६: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या हस्ते यशदा येथे करण्यात आले.

यावेळी भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, आयोगाच्या वरीष्ठ स्वीप सल्लागार अनुराधा शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.

पुणे जिल्हा माहिती कार्यालयाने वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आदी प्रसिद्धी माध्यमांसाठी उपयुक्त संदर्भ असलेल्या या पुस्तिकेची निर्मिती केली आहे. निवडणूक आचारसंहितेबाबत तरतुदी, निवडणूक वार्तांकनासाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्त्वे, न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल स्टँडर्डस् ऑथॉरिटीच्या (एनबीडीएसए) मार्गदर्शक सूचना, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाची (आयएमएआय) स्वैच्छिक आचारसंहिता आदींबाबत सविस्तर माहिती या पुस्तिकेत दिली आहे. राजकीय जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीचे कामकाज (एमसीएमसी), पेड न्यूजबाबत तरतुदी आदी उपयुक्त माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे.

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीतील महाराष्ट्राची मतदानाबाबतची ठळक बाबी तसेच पुणे जिल्ह्यातील निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये यांचा पुस्तिकेत समावेश आहे. सन १९५१ च्या निवडणुकीपासून २०१९ च्या निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघातील उमेदवार त्यांना झालेले मतदान, मतदार संख्या, वैध मतांची संख्या, मतदानाची टक्केवारी यांचाही पुस्तिकेत समावेश असल्याने ही पुस्तिका माध्यम प्रतिनिधींना संदर्भासाठी उपयुक्त आहे.

माध्यमांच्या माहितीसाठी जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांचे समन्वय अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक, मतदार मदत कक्ष, जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष यांचे दूरध्वनी क्रमांक, आयोगाच्या विविध तंत्रज्ञान सहाय्यित उपयोजक (ॲप), पोर्टल आदींची माहितीही यात देण्यात आली आहे.

‘तितिक्षा हास्यगौरव दादा कोंडके स्मृती पुरस्कार’ चेतन चावडा यांना प्रदान तर तितिक्षा काव्य करंडकचा प्रथम मानकरी मृण्मयी काळे .

पुणे: ” प्रत्येकात एक कवी लपलेला असतो त्याचा शोध घेता आला पाहिजे. आजू बाजूच्या घडामोडींचा, वास्तवाचं बारकाईने निरीक्षण केल्यास त्याचे भाव सहज कवितेतून उमटतातं. कविता स्वतः जगते आणि कवी व कवयित्रीला जगवतात.”असे विचार बोल्ड कवी म.भा. चव्हाण यांनी व्यक्त केले.
तितिक्षा इंटनॅशनलच्या वतीने ‘कथा लेखणीची..प्रचिती संस्कृतीची’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय सहजारोग्य साहित्यिक, सांस्कृतिक अभियान अंतर्गत आयोजित भव्य काव्य करडंक स्पर्धा २०२४ मध्ये ते बोलत होते.
या वेळी मिसेस युनिव्हर्स डॉ. प्रचिति पुंडे, काकडे देशमुख शिक्षण संस्थेचे प्रमुख शरदचंद्र काकडे देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक मधुसूदन घाणेकर, ज्येष्ठ साहित्यिक व प्रकाशक वि.ग. सातपुते, नाट्यदिग्दर्शक सतीश इंदापूरकर, कवी म.भा. चव्हाण, गुलाब सम्राट बाबा ठाकूर, अ‍ॅड. रविंद्र भवार ,सोल्यूशनमाइंड चे सर्वेसर्वा श्री.सुजित दातार आणि लेखक, दिग्दर्शक व सिनेकलाकार चेतन चावडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी तितिक्षा काव्य करंडकचा प्रथम क्रमांक बालकवी मृण्मयी काळे हिने पटकविला. द्वितीय पल्लवी पवार आणि गणपत तरंगे व महादेव लांडगे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. तसेच विवेकानंद काव्यलेखन स्पर्धा, तितिक्षा मंदाश्री काव्यगौरव पुरस्कार, तितिक्षा माई गौरव पुरस्कार, तितिक्षा अमृत गौरव, तितिक्षा समाजभूषण पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच मिसेस.यश वालिया, कलावती सुर्वे, अंजली महाजन, प्रियंका बोरकर, सुनिता मुरलीधरन, सुपर्णा वाबळे, आरती केरकर आदि महिलांचा नारी सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले. त्याच प्रमाणे चेतन चावडा यांना ‘तितिक्षा हास्यगौरव दादा कोंडके स्मृती पुरस्कार २०२४’ ने गौरविण्यात आले.
म.भा. चव्हाण म्हणाले,” कवितेत दुःख, सुख, विरह, आनंद, हास्य या सारख्या रसांचा समावेश असतो. ती आपल्यापेक्षा वेगळी नसते. कल्पना आणि वास्तव यांचा समन्वय साधत ती जन्माला येते. याची भाषा हदयापासून हदयापर्यंत पोहचणारी असते. मनातील असंख्य विचारांना शब्दात मांडत ते रसिकापर्यंत पोहचविण्याचे कार्य कवी करतो.”
मधुसूदन घाणेकर म्हणाले, “स्वतःचे समाधान झाल्याशिवाय कविता पूर्ण होत नाही. कवित ही जगण शिकविते. त्यामुळे जो कवितेत जगतो तो उत्तम कवि असतो.”
वि.ग. सातपुते म्हणाले लिहीते व्हा. भावनांना शब्दरूपात व्यक्त करण्याच उत्तमोत्तम माध्यम म्हणजे कविता असते. ही अंतःकरणातून आली पाहिजेत. तसेच रचनेत काव्य मुक्त असायला हवे तेंव्हाच ती कविता प्रभावी होत असते. जो पर्यंत कवितेला आशय विषय, भाव, लय कळत नाही तो पर्यंत कवितेतून काय म्हणायचं आहे कळत नाही.
या नंतर तितिक्षा समाजभूषण पुरस्काराचे मानकरी..डॉ.अमित तथा आम्रपाली लक्ष्मी मोहिते.
..डॉ. प्रचिती पुुंडे, प्रिया दामले व चेतन चावडा यांनी  आपले विचार मांडले.
सूत्रसंचालन सुवर्णा जाधव व योगेश हरणे यांनी केले.

राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत ‘पुनीतबालन ग्रुप’च्या आरती पाटीलला दोन कांस्य पदके

पुणे : – पुनीत बालन ग्रुप’ची पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटील हिने टाटा नगर (झारखंड) येथे झालेल्या ६ व्या ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२३-२४ स्पर्धेत’ एकेरी आणि महिला दुहेरीत दोन कांस्य पदके पटकावली. कर्नाटकातील पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटीलचा नुकताच ‘पुनीत बालन ग्रुप’शी करार झाला. त्यानुसार आंतरराष्ट्रीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटीलच्या खेळातील करिअरसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. पाटील ही एक भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू असून ती सध्या महिला एकेरी SU5 साठी पॅरा-बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत १० व्या क्रमांकावर आहे.
कर्नाटकातील नंदगड गावात जन्मलेल्या आरतीने २००८ मध्ये धावपटू म्हणून खेळायला सुरुवात केली. तेंव्हाच २००९ मध्ये तिने रॅकेट उचलण्याचा निर्णय घेतला आणि तेंव्हापासून बॅडमिंटनपटू म्हणून तिच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तिने आत्तापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदके जिंकली आहेत. नुकत्याच झारखंडमधील टाटा नगर येथे झालेल्या ६ व्या ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२३-२४’ या स्पर्धेत तिने एकेरी आणि महिला दुहेरीत दोन कांस्य पदके पटकावत आणखी एक उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल क्रिडा क्षेत्रात तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.

आरती पाटील ही एक प्रतिभावान आणि होतकरु खेळाडू आहे. ६ व्या ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत’ तिने हे दाखवून दिलं असून या दैदिप्यमान विजयाबद्दल तिचं मनःपूर्वक अभिनंदन! आपल्यातील पूर्ण क्षमता पणाला लावून ती खेळत असते. भविष्यातही ती अशाच प्रकारे यशाची वेगवेगळी शिखरं पार करील, असा विश्वास आहे आणि आम्ही तिच्या पाठीशी सदैव उभे राहू!
पुनीत बालन
अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप

विजेची मूलभूत गरज असूनही पश्चिम महाराष्ट्रात ८.८७ लाख घरगुती ग्राहकांकडे १२४ कोटींची थकबाकी

पुणे, दि. २६ मार्च २०२४दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक व मूलभूत गरज झालेल्या विजेचा वापर करून देखील सद्यस्थितीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ८ लाख ८७ हजार घरगुती ग्राहकांकडे १२४ कोटी ६१ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. त्यानंतर अर्थार्जनाच्या व्यवसाय व उद्योगांसाठी वीज आवश्यक असताना १ लाख ८ हजार व्यावसायिकांकडे ३७ कोटी ९५ लाख तसेच १६ हजार ५७० उद्योगांकडे १८ कोटी ६५ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.

वीजबिलांच्या वसूलीवरच महावितरणचा संपूर्ण आर्थिक डोलारा अवलंबून आहे. त्यामुळे वीजबिलाची थकीत रक्कम प्रत्येक ग्राहकांकडे कमी अधिक असली तरी सध्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक १० लाख १२ हजार ३५० ग्राहकांकडे १८१ कोटी २२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे पश्चिम महाराष्ट्रात दौऱ्यावर असून थेट शाखा कार्यालयांपर्यंत वीजबिल वसूलीचा आढावा घेत आहेत. सोबतच मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार (पुणे), श्री. सुनील पावडे (बारामती) व श्री. परेश भागवत (कोल्हापूर) यांच्यासह सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचारी आणि विशेष पथके थकबाकी वसूलीसाठी ‘ऑन फिल्ड’ आहेत.

महावितरण स्वतः वीजनिर्मिती करीत नाही. तर विविध वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करून ती मागणीनुसार सर्व वर्गवारीतील ग्राहकांना पुरवठा करते. ग्राहकांना दिलेल्या वीजबिलांमधील सुमारे ८० ते ८५ टक्के रक्कम ही वीजखरेदी, पारेषण खर्च आदींवर खर्च होते. त्यानंतर कंत्राटदारांची देणी, नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचे वेतन, कार्यालयीन खर्च, विविध कर, दैनंदिन देखभाल व दुरुस्तीचे कामे आणि व्याजासह कर्जांचे हप्ते अशा दरमहा देणी द्यावी लागतात. ‘ना नफा, ना तोटा’ (रेव्हेन्यू न्यूट्रल) तत्त्वाने वीजसेवा देणाऱ्या महावितरण सध्या ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीमुळे आर्थिक संकटात आहे. त्यामुळे वीजबिलांच्या थकबाकी वसूलीला वेग देण्यात आले आहे.

वीज ही अन्न, वस्त्र व निवारा किंबहूना त्यापेक्षाही महत्वाची गरज झालेली आहे. घरामध्ये टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, विविध उपकरणे, डिश टिव्ही, दोन ते तीन मोबाईल, विद्युत वाहने, ऑनलाईन शिक्षण व कामे इत्यादी प्रामुख्याने विजेवरच अवलंबून आहेत. मात्र इतर खर्चाच्या तुलनेत ग्राहकांकडून केवळ वीजबिल नियमित भरण्यास फारसे प्राधान्य दिले जात नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे थकबाकी देखील वाढत आहे. सध्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा- १३३ कोटी ९३ लाख रुपये (६,६६,०१४), सातारा- ८ कोटी ८६ लाख (८८,३२७), सोलापूर- २२ कोटी ७८ लाख (१,४८,०५३), कोल्हापूर- ७ कोटी ९१ लाख (३८,००५) आणि सांगली जिल्ह्यात ७ कोटी ७२ लाख रुपयांची (७१,९४१) थकबाकी आहे.

वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई तसेच नियमानुसार पुनर्जोडणी शुल्काचा भरणा, वीज नसल्याने गैरसोय होणे आदी टाळण्यासाठी थकीत वीजबिलाची रक्कम ताबडतोब भरावी, असे आवाहन प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे. वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही ऑनलाइनद्वारे थकीत व चालू वीजबिल भरण्याची सोय www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध आहे. सोबतच ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

थकबाकीदारांनी भरले पुनर्जोडणी शुल्काचे ५८ लाख रुपये – महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरु आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केला असेल तर नियमानुसार थकबाकीची संपूर्ण रक्कम तसेच पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी भरणे आवश्यक आहे. लघुदाब वर्गवारीतील सिंगल फेजसाठी २१० रूपये व थ्री फेजसाठी ४२० रुपये तसेच उपरी व भूमिगत वीजवाहिन्यांद्वारे दिलेल्या वीजजोडण्यांच्या पुनर्जोडणीसाठी सिंगल फेजसाठी प्रत्येकी ३१० रुपये व थ्री फेजसाठी प्रत्येकी ५२० रुपये (अधिक जीएसटी) असे शुल्क आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रातील १७ हजार ३३९ ग्राहकांना थकबाकीची रक्कम भरल्यानंतर वीजपुरवठा पुन्हा जोडून घेण्यासाठी नियमानुसार ५७ लाख ६७ हजार रुपयांचे पुनर्जोडणी शुल्क भरावे लागले आहे.

जैन तेरापंथ धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांचा पुणे दौरा 

आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीच्या वतीने आयोजन; सद्भावना, नैतिकता, नशामुक्तीसाठी करणार मार्गदर्शन
पुणे : जैन तेरापंथचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांचा पुणे दौरा दि. २८ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत होणार आहे. या पुणे दौर्‍यानिमित्त त्यांचे अभिवादन करण्यासाठी शुक्रवार, दि.२९  मार्च रोजी भव्य अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गंगाधाम चौकापासून वर्धमान सांस्कृतिक केंद्रापर्यंत भव्य यात्रा काढण्यात येणार आहे. नशामुक्त भारत आणि  नशामुक्त पुणे या अभियानांतर्गत या दौर्‍यामध्ये आचार्य श्री महाश्रमणजी  मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीचे संजय मरलेचा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला पं. वसंतराव गाडगीळ, संजय मरलेचा, धनपतराज कटारिया, सुरेंद्र कोठारी, दिनेश खिंवसरा, सुमन मरलेचा, पपीता मरलेचा उपस्थित होते. अभिवादन रॅलीमध्ये मोठ्या संख्येने जैनबांधव सहभागी होणार आहेत.

अभिवादन यात्रेनंतर दि. ४ एप्रिल पर्यंत दररोज सकाळी ९.३० वाजल्यापासून आचार्य श्री महाश्रमणजी यांचे प्रवचन होईल. मंगळवार, दि. २ एप्रिल रोजी कोंढव्यातील तेरापंथ भवन या वास्तूमध्ये येथे आचार्य
श्री महाश्रमणजी यांचा प्रवेश होणार आहे.

आचार्य श्री महाश्रमण जी यांनी जनकल्याण आणि राष्ट्राच्या चारित्र्य निर्माणासाठी पदयात्रा करत सद्भावना, नैतिकता, व्यसनमुक्तीचा संदेश दिला आहे. आतापर्यंत नेपाळ, भूतान, भारतातील२३ राज्यात ६० हजार कि.मी. पेक्षाही अधिक पदयात्रा त्यांनी केली आहे. त्यांच्या प्रेरणेने लाखो लोक व्यसनमुक्त झाले आहेत.

दि. २८ मार्च रोजी खड़की आलेगांवकर शाला, दि. २९ मार्च ते २ एप्रिल वर्धमान सांस्कृतिक भवन आणि २ एप्रिल तेरापंथ भवन, दि. ३ एप्रिल रोजी मगनकुंज, कल्याणी नगर आणि दि. ४ एप्रिल रोजी वाघोली येथे कार्यक्रम होणार आहेत. आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समिति एवं समस्त तेरापंथ समाज पुणे, श्री भिक्षु मेमोरियल फाउंडेशन, तेरापंथ युवक परिषद, तेरापंथ महिला मंडळ, तेरापंथ प्रोफेशनल फोरम, अनुव्रत समिती आणि सर्व तेरापंथ समाज यामध्ये सहभागी झाला आहे.

सुधीर मुनगंटीवार :चंद्रपुरात महायुतीचा पहिला उमेदवारी अर्ज

चंद्रपूर-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या लढत होणार आहे. सुधीर मुनगंटीवार हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आज पर्यंत कधीही एवढ्या प्रचंड मतांनी उमेदवार निवडून आला नसेल, तेवढ्या मतांनी मुनगंटीवार निवडून येणार असल्याचा विश्वास या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वेळी व्यक्त केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यावेळी इतिहास रचला जाणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. वास्तविक सुधीर मुनगंटीवार हे या मतदारसंघासाठी इच्छुक नव्हते. मला केंद्रात नव्हे तर राज्यातच लोकांची कामे करायची आहे, असे त्यांनी आधीच सांगितले होते. मात्र, तरी देखील भाजपच्या पहिल्याच यादीत सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे विरोधकांनी देखील भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. मात्र, आता पक्षाने उमेदवारी दिली असून पक्षाने दिलेले आदेश हे सर्वतोपरी मान्य करत सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रचाराला जोरदार सुरुवात केली. त्यानुसार त्यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2019 मधील मागील निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला होता. सुरेश धानोरकर यांच्या रूपाने महाराष्ट्रात काँग्रेसचे एकमेव खासदार विजयी झाले होते. मात्र, त्यांचे निधन झाल्याने यावेळी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या वेळी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा राज्यात सर्वत्र दिसून येत आहे.

देशाचे नेतृत्त्व ठरवणारी निवडणूक – फडणवीस

ही राज्याची निवडणूक नसून देशाचे नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचे? याची निवडणूक आहे. ही निवडणूक सुधीर मुनगंटीवार किंवा काँग्रेसच्या उमेदवार यांच्यात नसून ही निवडणूक देशात मोदींचे राज्य आणायचे की राहुल गांधींना पंतप्रधान करायचे, याची निवडणूक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सुधीर मुनगंटीवार यांना दिलेले मत हे नरेंद्र मोदी यांना दिलेले मत आहे. तर काँग्रेसच्या उमेदवाराला दिलेले मत हे राहुल गांधी यांना दिलेले मत आहे. देशात राहुल गांधींची स्थिती काय आहे, हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी गेले त्या-त्या ठिकाणी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. तेथील काँग्रेसमध्ये फूट पडली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. देशाच्या सर्वच कानाकोपऱ्यात एकच नाव ऐकू येईल आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी यांचा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून देशांमध्ये पहिल्यांदा गरीबांचा विचार करणारे नेतृत्व लाभले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तुम्ही एकाच जातीच्या नावावर निवडणूक लढवणार असाल तर इतर जातीच्या लोकांनी कोणाकडे जायचे? असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. मतदारांनी डोळ्यातील अश्रू पाहून मतदान करायचे का? विकासाची दिशा पाहून मतदान करायचे? हे ठरवण्याची ही वेळ असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तुलना करायचीच असेल तर केलेल्या कामाची तुलना करा, विचारांची तुलना करा, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिभा धानोरकर यांच्यावर टीका केली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी, विचार करून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे. सर्व मतदार संघाची सेवा मी पूर्ण शक्तीने आणि तळमळिने करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माझी लढाई काँग्रेसच्या उमेदवारासोबत नाही. मी आजपर्यंत जेवढे भाषणे दिली, त्यातील 99 टक्के भाषणे ही विकासावर दिली असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्याच आधारावर मी मतदारांकडे मते मागण्यासाठी जाणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत चंद्रपूर मतदार संघातून काँग्रेसचे सुरेश धानोरकर विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे हंसराज अहीर यांचा पराभव केला होता. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र महाडोळे रिंगणात होते.

  • सुरेश धानोरकर (काँग्रेस) – 5,59,507 (विजयी)
  • हंसजार अहीर (भाजप) – 5,14,744
  • राजेंद्र महाडोळे (वंचित बहुजन आघाडी) – 1,12,079

ज्योती मेटे यांचा अप्पर सहनिबंधक पदाचा राजीनामा:बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार

बीड लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीच्या उमेदवार म्हणून ज्योती विनायकराव मेटे निवडणूक लढणार आहे. त्यातच त्यांनी त्यांच्या अप्पर सहनिबंधक पदाचा राजीनामा दिला असून आपण राजकारणात सक्रिय सहभागी होण्यासाठीच पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती त्यांनी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या बीडमध्ये दाखल झाल्या असून त्यांनी स्व. विनायक मेटे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आपण बीड लोकसभा मतदारसंघातून लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने या जागेवर ज्योती मेटे यांनी उमेदवारी द्यावी, असा आग्रह शरद पवार यांच्याकडे केला आहे. ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची दोन वेळा या संदर्भात भेट देखील घेतली ओ. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या ज्योती मेटे याच उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत शरद पवार यांनी त्यांचा निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र, असे असले तरी ज्योती मेटे यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणूक:काँग्रेसचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल

नागपूरमधून विकास ठाकरे 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी होतील, वडेट्टीवार यांचा दावा

नागपूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात विकास ठाकरे लढत देत आहेत. नागपूर काँग्रेसमधील नेत्यांमध्ये असलेले अंतर्गत मतभेद विसरून काँग्रेसचे सर्व नेते एकत्र आलेले या निमित्ताने दिसून आले. विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार देखील उपस्थित होते. या निमित्त नागपूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे तगडे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे गडकरी यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने कोणाला तिकीट दिले जाते याबाबत चर्चा रंगली होती. मात्र काँग्रेसने अंतर्गत गटबाजी बाजूला ठेवत विकास ठाकरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार ठाकरे यांनी आज आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार नाना पटोले यांचा पराभव केला होता. यावेळी नाना पटोले यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे काँग्रेसने नाना पटोले यांच्या ऐवजी आता विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस प्रचंड बहुमताने विजय होईल, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूर हा काँग्रेसचा गड आहे. काही वर्षांसाठी येथे लोकांनी परिवर्तन केले होते. मात्र, यावेळी नागपूर हा काँग्रेसचा गड असून हा गड काँग्रेसच्या मागे प्रचंड ताकतीने उभा राहणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. हा विजय काँग्रेसच्या विजयामध्ये पहिल्या नंबरला असेल, असा मला विश्वास असल्याचेही ते म्हणाले. विकास ठाकरे हे किमान एक लाख मतांनी निवडून येतील असा विश्वास आपल्याला असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.…लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत नागपूर मतदार संघातून भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांचा पराभव केला होता. या ठिकाणी बहुजन समाज पक्षाकडून मोहम्मद जमाल रिंगणात होते.नितीन गडकरी (भाजप) – 6,60,221 (विजयी)नाना पटोले (काँग्रेस) – 4,44,212मोहम्मद जमाल (बहुजन समाज पक्ष) – 31,725अशी मते मिळालेली होती .

श्री कसबा गणपती शिवजयंती उत्सव समितीच्या जिवंत देखाव्यात मॉरिशसच्या राजदूत होणार सहभागी


पुणे २५:- तिथीप्रमाणे साजरा होणाऱ्या शिवजयंती निमित्त श्री कसबा गणपती चौक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने यंदाचे वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण प्रित्यर्थ राज्याभिषेकाचा जिवंत देखावा साकारण्यात येत आहे यामध्ये सुमारे 100 हून अधिक कलाकार हे आपल्या कलेद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणार आहेत या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या उत्सवांमध्ये कुठलाही व्यावसायिक कलाकार सहभागी असणार नाही सर्व कलाकार हे कसबा पेठ परिसरातील नागरिक आहेत मॉरिशियसहुन खास शिवजयंती निमित्त आलेल्या मॉरिशियसच्या राजदूत वृश्नी रावजी या त्यांची कला सादर करणार आहेत गणपती मंदिराच्या समोर दिनांक 28 मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता या भव्य दिव्य सोहळ्याची सुरुवात होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार प्रसिद्ध व्यावसायिक व श्रीमंत भाऊ रंगारी ट्रस्टचे मुख्य विश्वस्त पुनीत बालन ज्येष्ठ इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे हे उपस्थित असतील या कार्यक्रमासाठी परमपूज्य गणेशनाथ महाराज त्रंबकेश्वर यांचे आशीर्वाद यावेळी लाभणार आहेत अशी माहिती समितीचे विश्वस्त पुष्कर तुळजापूरकर यांनी दिली या जिवंत देखाव्याचे दिग्दर्शन व संकल्पना महेश मोळावडे, सयाजी शेंडकर यांनी केलेले आहे

धुलीवंदन आले अंगाशी-‘त्या’ अल्पवयीन मुले आणि पालकांवर कठोर कारवाई ;पुणे पोलिसांचे RTO ला पत्र

पुणे- धुलीवंदनाच्या दिवशी अल्पवयीन मुलांना गाडी चालविणेसाठी देणा-या पालकांविरुध्द पुणे पोलिसांनी मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा तर दाखल केलाच त्यांची वाहने जप्त केलीच, कायद्यातील तरतुदीनुसार १ वर्षासाठी वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला ….पण आता त्याही पुढे जाऊन या मुलांना वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत वाहन परवानाच देऊ नये असे पत्र पोलिसांनी RTOला दिले आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दि २५/०३/२०२४ रोजी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ पुणे श्री. संभाजी कदम यांचे आदेशानुसार धुलिवंदन सणानिमीत्त तुकाई नगर सर्कल सिंहगड कॉलेज रोड पुणे येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान दोन अल्पवयीन मुले त्यांचे ताब्यातील मोटरसायकल चालविताना मिळुन आल्याने त्यांचेकडे विचारपुस केली असता दोघांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे व दोघेही अल्पवयीन असल्याचे दिसुन आले. दोन्ही अल्पवयीन मुलांना मोटरसायकल चालविणेसाठी ताब्यात देणारे त्यांचे पालक/गाडीचे मालक यांना मुले अल्पवयीन असल्याचे माहीत असताना सुध्दा त्यांचे नावावरील व ताब्यातील वाहने अल्पवयीन मुलांना चालविणेसाठी दिलेने पोलीस अंमलदार श्रावण शेवाळे यांनी दिले तक्रारीवरुन सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे मोटार वाहन कायदा सन १९८८ चे कमल ३,५,१९९ (अ) अन्वये दि. २५/०४/२०२४ रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयातील वाहने जप्त करण्यात आलेली असुन मोटार वाहन कायदयातील तरतुदीनुसार अल्पवयीन मुलांना त्यांचे वयाचे २५ वर्षापर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मंजुर करु नये याकरीता प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांना पत्र देण्यात आले आहे. मोटार वाहन कायदयातील तरतुदीनुसार जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा परवाना एक वर्षासाठी रद्द करणेकामी प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांना पत्र देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परि ३ पुणे संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, भिमराव टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, विजय कुंभार, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक, सुरेश जायभाय, पोलीस अंमलदार श्रावण शेवाळे, दिपक गबदुले, होमगार्ड सोनवणे यांनी केली आहे.
तरी पालकांनी आपले अल्पवयीन पाल्यांना अगर वाहनाचे मालकांनी आपले वाहन अल्पवयीन मुलांना तसेच वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविणेकरीता ताब्यात देवु नये असे पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा वरीलप्रमाणे कायदेशीर कारवाई करुन वाहने जप्त करुन पुढील कारवाई करण्यात येईल

खजिना विहीर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर चोरीप्रकरणी सखोल चौकशी करा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे दि.२५: सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील देवाच्या मूर्ती आणि मखर चोरीस जाणे ही अत्यंत गंभीर घटना आहे. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्फत सखोल तपास करण्यात यावा. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. याबाबतचे सविस्तर लेखी निवेदन त्यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना पाठविले आहे.

दिनांक आठ मार्चच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करून येथील देवाच्या मूर्ती आणि मखर यांची चोरी केल्याची घटना घडल्याचे विविध माध्यमांतून समोर आले आहे या प्रकरणाची डॉ. गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेत त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ शनिवारवाड्यासमोर मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी

पुणे- आम आदमी पक्षाच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ देशभर तीव्र आंदोलने करण्यात येत असतानाच पुण्यातहीशनिवारवाडा चौक येथे आम आदमी पक्षाच्या वतीने मोदी सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याची होळी करून निषेध करण्यात आला.सत्याचा असत्यावर विजय या हेतूने देशभरात होलिका दहन केले जाते, त्यामुळे आम आदमी पक्ष पुणे च्या वतीने देखील आज मोदी सरकारच्या असत्य वागण्याचा निषेध म्हणून मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले असे आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.

m

या आंदोलनात मुकुंद किर्दत,सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर तसेच सुरेखा भोसले, सतीश यादव, अक्षय शिंदे, अमित म्हस्के, किरण कांबळे, नौशाद अन्सारी, अमोल मोरे, शंकर पोटघन, बालाजी कंठेकर, समीर आरवाडे, अभिजीत गायकवाड, प्रशांत कांबळे, सुनील सावडी, बाळासाहेब भारती, विक्रम गायकवाड, मनोज एरंडकर, ॲन अनिष, संजय कटारनवरे, श्रीकांत चांदणे, शाहीन अत्तार, अली सय्यद, सुनील विठ्ठल भोसले, इकबाल तांबोळी, ज्ञानेश्वर गायकवाड, रितेश निकाळजे, तानाजी शेरखाने, स्वप्निल गोरे, निखिल खंदारे, ॲड. गुणाजी मोरे, उमेश दीक्षित, ॲड.अमोल काळे, तुकाराम शिंदे, सेंथील अय्यर, असगर बेग, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, शहाजी मोळके, सुरज सोनवणे, सुनील शहाबाजी भोसले, कुमार धोंगडे, संदीप सूर्यवंशी, अविनाश केंदळे, संतोष काळे, ॲड.बाळासाहेब पोखर, मनोज शेट्टी, श्रद्धा शेट्टी, शंकर थोरात, शीतल कांडेलकर, किरण कद्रे, सुरेखा भोसले, ऋषिकेश मारणे, शिवाजी डोलारे, ॲड. गणेश थरकुडे, अनिल कोंढाळकर, अप्पा कोंढाळकर, प्रीतम कोंढाळकर, मायकल मस्करेन्हास, आरती करंजावणे छाया भगत, संदेश दिवेकर, शशीभूषण होले, शेखर शिवाजी ढगे, उमेश बागडे,पाडळे रवींद्र, ॲड.गुनाजी मोरे, अनिस वर्गीस, ॲड.कुणाल घारे, सचिन कोतवाल, मिलिंद सरोदे, अविनाश भाकरे हे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

यावेळी किर्भादत म्रहणाले कि,’तीय जनता पक्षाला ४१ कंपन्यांकडून त्यांच्यावर ईडी, सीबीआय या सारख्या तपास यंत्रणेद्वारे टाकल्या गेलेल्या छाप्यानंतर २,४७१ कोटी रुपयाचे डोनेशन्स दिले गेल्याचे एसबीआय ने दिलेल्या माहिती दिसून येत आहे. इतक्यात मोठ्या प्रमाणात तपास यंत्रणांनी धाडी घातल्यानंतरचं कंपन्यांनी भाजप सरकारला डोनेशन का दिले असा प्रश्न यामुळे आता निर्माण होत आहे? भाजप व तथाकथित मद्य घोटाळ्यातील अर्विंदो फार्मा यांचे संबंध उघड झाले आहेत. सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे हा घोटाळा असल्याचे म्हंटल्यावरही भाजपाला मिळणाऱ्या डोनेशनची कोणत्याही प्रकारे चौकशी अद्याप झाली नसल्याचे दिसून येत असल्याने भ्रष्टाचाराचा सूत्रधार भारतीय जनता पार्टी आहे असे आम आदमी पक्षाचे राज्यप्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे म्हणाले, आपल्या देशाचे राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभाखाली “सत्यमेव जयते” असे लिहिलेले असते परंतु मोदी सरकारच्या असत्य कारभारामुळे सर्व देशवासीयांना मोदी सरकारचे काम हे असत्यमेव जयते या विचारानेच सुरू आहे अशी भावना निर्माण झालेली आहे.

मोदी सरकारच्या वतीने सर्वसामान्य जनतेला अनेक सुविधा मोफत उपलब्ध करून देणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर आत्तापर्यंत कोणतेही आरोप सिद्ध करण्यात यश आलेले नाहीत, त्यामुळेच निराशेपोटी मोदी सरकार केजरीवालां विरोधात कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न करत आहे. असे धनंजय बेनकर आप,शहर अध्यक्ष यांनी म्हंटले आहे.

विठ्ठल रुख्मिणी मंदिरात चोरी

पुणे- सदाशिवपेठेतील खजिना विहीर जवळील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात ८ मार्च रोजीच्या पाहते ३ वाजता तिघांनी चोरी केल्याची माहिती आज येथे पोलिसांनी दिली आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाचे आणि गाभाऱ्याचे कुलूप तोडून देवांच्या मूर्ती मखर असा ४१ हजार ५०० रुपयांचा ऐवज तिघा चोरट्यांनी चोरून नेला . विश्राम्भाग पोलीस ठाण्यातील फौजदार गणेश फरताडे अधिक तपास करत आहेत .

रामदास पुजारी यांना बाबुराव बागुल राज्यस्तरीय पुरस्कार

पुणे-  जेष्ठ कवी व सेवानिवृत्त वनाधिकारी रामदास पुजारी यांच्या साहित्यविश्व प्रकाशन, पुणेने प्रकाशित केलेल्या  ‘ उद्याच्या श्वासासाठी’ या कवितासंग्रहास जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूरकडून देण्यात येणारा राज्यस्तरीय बाबुराव बागुल पुरस्कार जाहीर झाला आहे. तसे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे व सरचिटणीस डॉ. रविंद्र तिरपुडे यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे.    नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृह येथे ३१ मार्चला होणाऱ्या महामंडळाच्या दहाव्या वर्धापनदिन कार्यक्रमात, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.     ‘उद्याच्या श्वासासाठी’ या कवितासंग्रहामध्ये पर्यावरणविषयक सुंदर कवितांचा समावेश आहे. श्री. पुजारी यांच्या ‘आई माझं जग ‘  या कवितासंग्रहाच्या दोन आवृत्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांनी आपल्या दिवंगत शिक्षकाविषयीचे ‘देवमाणूस’ हे संकलित पुस्तक तसेच स्व. वडिलांविषयीची ‘ ही घडीपत्रिकाही प्रकाशित केली आहे.     विविध वृत्तपत्रे, मासिके व दिवाळी अंकांतून श्री पुजारी यांचे लेख,कविता,प्रवासवर्णने, पुस्तक परीक्षणे प्रकाशित झाली आहेत. त्यांची  वृक्षलागवड,पर्यावरणविषयक जनजागृतीपर घोषवाक्ये पुण्यात विविध ठिकाणी प्रसारित करण्यात आलेली आहेत. त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार २०२१, राष्ट्रीय प्रबोधनयात्री पुरस्कार २०२३ व इतर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. वनविभागाचे प्रसिद्धी अधिकारी म्हणूनही त्यांनी बराच काळ काम पाहिले आहे.