Home Blog Page 1123

मराठा समाज उमेदवार देणार स्वतःनिवडून येण्यासाठी, कि फडणवीसांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ? जरांगेंना सवाल

पुणे- पुण्याच्या लोकसभेत अगदी सरळ सरळ फाईट आहे. ती म्हणजे भाजप आणि कॉंग्रेस च्या उमेदवारात,म्हणजेच मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात.कोणी म्हणतो यातील कोणी ज्याची ग्रुपिंग मोठी त्याला महत्व देणारे, तर यातील कोणी एक कायम भेद न करता सर्वात मिसळतो,आणि प्रामाणिकतेला महत्व देतो..अगदी बडा..आणि सामान्य यांच्यातील हि लढाई आहे असेही अनेकांना वाटते,आता खरे खोटे देव जाणो.पण सरळ लढाई सरळ राहिली तर..आता काही ना सोशल मीडियातील भूल भूलय्याने उतावळा करून पायावर धोंडा मारून घ्यायला तयार करून च ठेवलेले होते ते ठेचकाळत इकडे तिकडे फिरत आहे. आता याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक आंदोलन करणारे,सरकारला जेरीस आणणारे मनोज जरांगे पाटील यांच्या नावाखाली येथे मराठा समाज एकवटतो आहे. असे म्हणतात कि जरांगे पाटलांनी मराठा उमेदवार उभे करायला सांगितलेत. जरूर सांगितले असतीलही.आणि त्यामागे पाटलांचा काही उद्देश देखील असू शकेल.अर्थात तो सगळीकडे समान तत्वावर लागू होईल काय हा प्रश्न आहेच.पण पाटलांचा नेमका उद्देश लक्षात येणे महत्वाचे आहे. पाटील आणि फडणवीस यांच्यातील फाईट सर्वश्रुत आहे. अर्थात हि राजकीय फाईट देखील नाही मराठा आरक्षण विषयाने तिची सुरुवात होऊन ती टोकाला पोहोचली.लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर आता प्रयेक लोकसभा मतदार संघात जर जरांगे पाटलांनी मराठा उमेदवार उभे करायचे ठरवले असेल तर अर्थात तिरंगी फाईट तर निश्चित आहे. ती म्हणजे भाजप महायुती आणि कॉंग्रेस महाविकास आघाडी यांच्यात या तिसऱ्या उमेदवाराची भर पडेल.आणि हि भर पडली तर मराठा उमेदवार विजयी होईल कि फडणविसांचा म्हणजे भाजपाचा उमेदवार विजयी होईल कि आघाडीचा यावर प्रत्येक ठिकाणी वेग वेगळे मंथन होऊ शकेलही पण सरार्स पहिले तर फडणवीसांची मते एकगठ्ठा आहेत, भाजपची मते कुठे हलत नाहीत असे म्हणतात.मग कुणाच्या मतांची विभागणी होईल तर ती आघाडीच्या होईल हे स्पष्ट आहे.अर्थात दोघाच्या मतांना छेद देऊन मराठा उमेदवार जिथे निवडून येऊ शकतोच तिथे तो येईलही पण असे मतदार संघ कोणते हे देखील समजायला हवेत आणि तिथेच उमेदवार द्यायला हवेत असाही विचार मांडला जाऊ शकतो.

एकूणच मराठा नेते जरांगे पाटील आणि ठीक ठिकाणच्या स्थानिक नेत्यांना स्वतः निवडून येण्यासाठी आपण निवडनुक लढवतो आहे हे प्रथम पटवून द्यावे लागणार आहे. अन्यथा त्यांचा फायदा अन्य उमेदवारांना होऊ शकतो काय याचा हि विचार राजकीय स्तरावर होईल असे वाटते आहे. एकीकडे मतांची विभागणी होऊ नये म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याशी शर्थीच्या वाटाघाटी चाललेल्या असताना,दुसरीकडे MIM सारखे पक्ष काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार असताना आता जरांगे पाटलांनी असे उमेदवार उभे केले तर ते महाविकास आघाडीला धक्का देतील कि फडणविसांच्या युतीला धक्का देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बाबा सिद्दीकीच्या 2024 च्या इफ्तार पार्टी मध्ये कलाकारांची मांदियाळी 

 बाबा सिद्दीक यांचा वार्षिक इफ्तार ही एक अनोखी परंपरा झाली असून यंदाची इफ्तार पार्टी नुकतीच पार पडली. मोठ्या दिमाखात या इफ्तार पार्टीत बॉलिवुड सोबतीने अनेक इंडस्ट्रीतील बड्या लोकांनी हजेरी लावली होती. झगमगती इफ्तार खाण्याचे अनोखे बेत डोळ्यांना दिपवणारी सजावट आणि बरच काही असा हा इफ्तार पार्टी चा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. 

 इफ्तार पार्टी ही खास ठरते ती अनेक कलाकारांच्या उस्थितीने ! बॉलिवुड आणि मराठी इंडस्ट्रीतील कलाकार , राजकीय नेते अश्या अनेक बड्या स्टार्सनी ही इफ्तार खास केली. सगळ्यांचा लाडका भाईजान ‘सलमान खान’ ने स्वतःच्या उपस्थितीने इफ्तार पार्टीत चार चाँद लावले. दिग्गज सलीम खान आणि खान दान परिवार या इफ्तार पार्टीत आले आणि त्यांच्या परिवाराची चर्चा झाली. लाडक्या मुली अलविरा आणि अर्पिता आणि जावई अतुल आणि आयुष यांच्यासोबत आपला धडाकेबाज नातू निर्वाण यांच्यासोबत एक सुंदर ‘हम साथ साथ है’ क्षण पुन्हा तयार केला.

 विजय वर्मा ची अनोखी स्टाईल , खो गये हम कहां’ स्टार सिद्धांत चतुर्वेदी या दोघांची जोडी रेड कार्पेट वर सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ठरली. हा दिवस आणखी एका गोष्टी साठी खास झाला कारण बॉलिवुडचा OG अभिनेता इमरान हाश्मी आणि त्याचा लाडका मुलगा याने बाबा आणि झीशान सिद्दीक यांच्या सोबतीने रेड कार्पेटवर इमरान चा वाढदिवस साजरा केला.
 पूजा हेगडेचे , अण्णा ‘सुनील शेट्टी’ शिल्पा शेट्टी आणि त्यांचा शमिता या सगळ्यांचा फॅशन ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. श्री.प्रफुल्ल पटेल (राज्यसभा सदस्य) यांनी त्यांच्या प्रचंड उपस्थितीने या कार्यक्रमाला शोभा दिली. सैफ बेलहासा होल्डिंग्जचे अब्जाधीश संस्थापक/अध्यक्ष डॉ. सैफ बेल्हासा यांनीही सिद्दीकीच्या इफ्तारमध्ये दुर्मिळ उपस्थिती लावली – मोगल जगातील 100 सर्वात शक्तिशाली अरबांपैकी एक आहे आणि जगातील सर्वात शक्तिशाली अरबांच्या यादीत आहे. 
 GenZs कडून आम्ही ‘एक लिव्हर’ म्हणजे ओरहान अवत्रामणी उर्फ ​​”ओरी” आणि ‘बिजली’ पलक तिवारी यांनी रेड कार्पेटवर अनोखी जादू निर्माण केली. प्रीती झिंटा , श्वेता तिवारी यो यो हनी सिंग, हुमा कुरेशी, श्रिया सरन, सुनील ग्रोवर, शहनाज गिल, करण टाकर, हिना खान, करण कुंद्रा, करण सिंग ग्रोव्हर, कुब्रा सैत, गौहर खान, फायटरचे ऋषभ साहनी, जन्नत जुबेर, फैसू, एमसी स्टेन, अवाज दरबार, मुनावर फारुकी, अष्टपैलू अंकिता लोखंडे आणि पती विकास जैन आणि बिग बॉसची संपूर्ण टीम आणि या सारख्या अनेक कलाकारांनी ही संध्याकाळ खास केली.

दंड आकारून बांधकामे नियमित करणे चुकीचे -हायकोर्ट

बेकायदा कामे करा आणि नंतर दंड भरून त्या कामांना कायदेशीर ठरवा हि कसली प्रथा ?

मुंबई : कोणतीही परवानगी न घेता बांधकाम करा आणि महापालिकेने नोटीस बजावल्यावर बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज करा, ही बाब नित्याची झाली आहे. भलामोठा दंड आणि शुल्क आकारून संपूर्णपणे बेकायदा असलेली बांधकामे नियमित करा, ही गोष्ट मान्य करण्यासारखी नाही.ती चुकीचीच आहे .नियमित करण्याची परवानगी देणाऱ्या विशेषाधिकारामुळे कायदा मोडण्याचा परवाना मिळत नाही, असे बजावत उच्च न्यायालयाने सिडकोच्या मालकीच्या जमिनीवर उभी असलेली इमारत ताेडण्याचे आदेश नवी मुंबई महापालिकेला दिले.

सरकारी संस्थांचे भूखंड बळकावणे व त्यावर बेकायदा बांधकाम करणे, ही डोकेदुखी एकट्या नवी मुंबईची नाही. राज्यातील सर्वच महापालिकांची आहे. बेकायदा बांधकामांवर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटली तयार असायला हवे, असे न्या. गौतम पटेल व न्या. कमल खटा यांच्या खंडपीठाने म्हटले. याचिकादाराने कोणत्या अधिकारांतर्गत याचिका केली, हे स्पष्ट न केल्याने खंडपीठाने स्वयंप्रेरणेने याचिका दाखल करून घेतली.

काय आहे प्रकरण?
संबंधित सोसायटीतील २९ फ्लॅटपैकी २३ फ्लॅट विकले असून पाच रिकामे आहेत. न्यायालयाने सर्व फ्लॅटधारकांना नोटीस बजावली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. परंतु, दिलासा देण्यास नकार दिला.
दंड आकारून, नुकसान भरपाई घेऊन बेकायदा बांधकामे नियमित करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

फ्लॅट खाली करा, इमारत जमीनदोस्त करा
बेकायदा बांधकाम केल्यावर किंवा परवानगी नाकारल्यावर बांधकाम नियमित करण्यासाठी परवानगी मागू शकत नाही, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. या प्रकरणात, संपूर्ण बांधकाम बेकायदा आहे.
फ्लॅटधारकांना नोटीस बजावण्यात आल्याने त्यांनी सहा आठवड्यांत फ्लॅट खाली करावे. त्यानंतर दोन आठवड्यांनी इमारत जमीनदोस्त करावी, असे आदेश न्यायालयाने पालिकेला काही दिवसांपूर्वी दिले.

मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे साठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रचंड समीक्षक आणि व्यावसायिक प्रशंसा मिळविणारी बॉलिवूडची आयकॉन राणी मुखर्जी हिला नुकत्याच झालेल्या झी सिने अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

राणीने तिच्या मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे या चित्रपटासाठी हा पुरस्कार जिंकला, जिथे तिने एका उत्साही स्त्रीची भूमिका केली जी आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी देशाचा सामना करते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला आणि हा विश्वास परत आणला की कंटेंट सिनेमा लोकांना महामारीनंतरच्या जगात थिएटरकडे खेचू शकतो. राणीने जगभरातील मोठ्या पडद्यावर धमाल सुरूच ठेवली आहे। 
रेड कार्पेटवर सॅटिन ब्राऊन रंगाच्या साडीत राणी खूपच सुंदर दिसत होती. तिने एक जबरदस्त डायमंड नेकलेस, खुले केस आणि न्यूड मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला.

पुरस्कार मिळाल्यावर राणी म्हणाली, “हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे. हे माझे इंडस्ट्रीतील 27 वे वर्ष आहे आणि माझ्या कामाचा गौरव आणि सन्मान होत आहे हे पाहून बरे वाटते. MCVN हा चित्रपट खूप खास आहे कारण तो एका आईची आणि तिच्या ताकदीची कथा आहे. ही कथा मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याची खात्री करणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते, कारण ही प्रत्येक भारतीय स्त्रीची, प्रत्येक आईची कथा आहे. मी विशेषतः माझ्या दिग्दर्शिका आशिमा छिब्बरचे आभार मानू इच्छिते ज्यांनी माझ्याद्वारे ही कथा मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. आशयाचे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत नसताना, अशा वेळी माझ्या पाठीशी उभे राहून या चित्रपटाला पाठिंबा दिल्याबद्दल मी माझे निर्माते झी स्टुडिओ – शारिक, भूमिका आणि एम्मा एंटरटेनमेंट – निखिल, मधु, मोनिशा यांचे आभार मानू इच्छिते. या चित्रपटाच्या निर्मितीत मोठे योगदान देणाऱ्या एस्टोनियन क्रूचेही मी आभार मानू इच्छिते. 2023 हे चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचे वर्ष ठरले आहे कारण MCVN सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून प्रचंड आदर आणि प्रेम मिळाले आहे. तुमच्या प्रेमाचेच फळ आहे की मला हा सन्मान मिळाला आहे. आमचे सहकारी आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आम्हाला पुरस्कार मिळतात. MCVN ला इतकं प्रेम दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. मी खूप खूप आभारी आहे.

50 लाख रुपयांची रोकड पकडली…

पुणे :पोलिसांना नाकाबंदी दरम्यान उर्से टोल नाका येथे एका कार मध्ये 50 लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याला या रकमेबाबत योग्य माहिती देता आली नसल्याने रोकड जप्त करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांनी हद्दीमध्ये नऊ ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे देखील नाकाबंदी करण्यात आली आहे. मंगळवारी उर्से टोलनाका येथे शिरगाव पोलीस वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एका स्कॉर्पिओ मध्ये 50 लाख रुपये रोख रक्कम मिळाली .

पोलिसांनी संबंधित चालकाकडे रकमेबाबत खुलासा मागितला. मात्र त्यास योग्य खुलासा करता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी ती रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात असल्याचेही पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले.

शरद पोंक्षे – स्नेह पोंक्षे लवकरच घेऊन येणार नवीन चित्रपट

शरद पोंक्षे… मराठी कलाक्षेत्रातील एक दिग्गज नाव. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून आपण त्यांचा दर्जेदार अभिनय पाहिला आहे. मात्र आता शरद पोंक्षे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच शरद पोंक्षे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा पुत्र म्हणजेच स्नेह पोंक्षे करणार आहे. सध्यातरी या चित्रपटाचे नाव ठरलेले नसले तरी या चित्रपटाच्या निमित्ताने वडिल-मुलाची जोडी मात्र एकत्र काम करणार आहे. या चित्रपटाच्या टीमने प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेऊन चित्रपटाचा शुभारंभ केला.

वि. एस. प्रोडक्शन्स व मोरया प्रोडक्शन यांच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची पूर्व तयारी सध्या ‘प्रॅाडक्शन नं १’ या नावाने होत असून रोहिणी विजयसिंह पटवर्धन या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत तर शरद पोंक्षे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन स्नेह पोंक्षे याने केले आहे. ही जोडी नक्की कोणत्या विषयावर चित्रपट घेऊन आपल्या समोर येणार आहेत, हे फार औत्सुक्याचे ठरणार आहे.

याबद्दल निर्माते शरद पोंक्षे म्हणतात, ‘’एका नवीन भूमिकेतून तुमच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे मुलाच्या सोबतीने ही वेगळी भूमिका साकारत आहे. यापूर्वी स्नेहने पाच वर्षं सह दिग्दर्शक म्हणून काम केले आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. मला खात्री आहे, तो ही जबाबदारी उत्तमरित्या पेलेल.’’

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, ” लवकरच हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहोत. आम्ही सुद्धा या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहोत. चित्रीकरणाला सुरूवात होणार असून विषय, शीर्षक, कलाकार हे लवकरच आम्ही जाहीर करू. पदार्पणातच वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे, त्याचा विशेष आनंद आहे.’’

80 टक्के लोक जर अजित पवारांसमवेत..तर मग पक्ष चोरला कसे म्हणता ? सुनेत्रा पवार

भोर : पक्षातले 80 टक्के लोक जर अजित पवारांसमवेत आले आहेत. लोकशाही आहे तर मग पक्ष चोरला किंवा सोडून गेला, चुकीचं वागला असं कसं काय म्हणता येईल. जर लोकशाहीच्या गप्पा आपण मारतो तर लोकशाही नक्की कशाला म्हणायचं?, असे प्रश्न करत सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच शरद पवार, सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदार संघाचा दौरा सुरु आहे. सध्या सुनेत्रा पवार या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सारोळे गावात छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन त्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधत सुनेत्रा पवार यांनी अडीअडचणी जाणून घेतल्या.
अजितदादांनी नेहमीच गटतट न पाहता, पक्षपातीपणा न करता नेहमीच लोकांच्या कामांना महत्व दिलं आहे.. विकासाशी बांधिलकी जपणाऱ्या अजितदादांच्या विचाराचा खासदार व्हावा यासाठी घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी सुनेत्रा पवार यांनी केलं.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण दिवसभरात भोर तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन नागरीकांच्या भेटीगाठी घेतल्या.आणि लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जेणेकरून भविष्यात त्यावर काम करता येतील.

नथूरामची भूमिकाही केलीय त्यांनी.. अमोल कोल्हेंच्या डॉयलॉगबाजीवर काय म्हणाले अजित पवार ..

पुणे- शिरूर लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील हेच घड्याळ चिन्हावर लढतील, ते सामान्य जनतेच्या कामाला येणारे नेते आहेत , अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत , ते छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केल्याचे सांगतात पण त्यांनी नथुराम गोडसेची देखील भूमिका केलीय .. कॉंग्रेस वाल्यांना असे चालणार आहे काय ?असा सवाल करत आज अजित पवार यांनी आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाच्या वेळी मोदी शहांचे भरभरून कौतुक करत आढळरावांची उमेदवारी जाहीर केली आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली .

‘सध्याचा खासदार डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी घाम गाळावा लागतो. चित्रपट, मालिका तेवढ्यापुरते पाहू; पण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या हाकेला धावून जाणारा माणूस खासदार म्हणून निवडून द्यावा लागतो,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर मंगळवारी टीकास्त्र सोडले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पवार यांनी शिरूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली.मंचर येथील कार्यक्रमात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि शेकडो कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके यांच्या उपस्थितीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये प्रवेश झाला.’आढळरावांची घरवापसी झाली आहे. कोल्हे यांना मी शिवसेनेतून ‘राष्ट्रवादी’त आणून खासदार केले. त्यांची घरवापसी करायची झाली, तर शिवसेना, मनसे असे अनेक पक्ष शोधावे लागतील, असा टोला पवार यांनी लगावला. ‘नेता पराभूत होत नसेल, तर कलाकाराला समोर उभे करावे लागते. याचप्रमाणे मी कोल्हे यांना आढळरावांच्या विरोधात उभे केले. आढळरावांचा पराभव करताना आमच्या तोंडाला फेस आला होता,’ अशी कबुली देऊन आता त्याच आढळरावांना पुन्हा निवडून आणण्याचे आवाहन पवार यांनी केले.

शिवाजीराव आढळराव पाटील आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

पुणे-शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं.शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतील, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. त्यानंतर आज अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाचे आढळराव पाटील अशी लढत आता बघायला मिळणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर आगामी निवडणुकीत पुन्हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशी लढत बघायला मिळण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची निवड केली जात आहे. काही ठिकाणी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जागावाटप निश्चित करण्यात येत आहे. या घडामोडी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. विशेष म्हणजे शिरुर लोकसभा मतदारसंघाबाबत गेल्या काही दिवसांपासून सस्पेन्स वाढला होता. कारण या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे हे खासदार आहेत. त्यामुळे या जागेवर अजित पवार गटाचा दावा होता.महायुतीच्या नेत्यांची जागावाटपाची चर्चा झाली त्यावेळी अजित पवार यांनी या जागेवर दावा सांगितला. दुसरीकडे शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील हे या जागेसाठी आग्रही होते. ते या मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. त्यांची या मतदारसंघात ताकदही आहे. त्यामुळे शिवसेनेला ही जागा मिळावी, अशी त्यांची मागणी होती. पण महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर आढळराव पाटील यांनी घड्याळ चिन्हावरही निवडणूक लढण्यासाठी अनुमती दर्शवली. यासाठी पडद्यामागे जोरदार हालाचाली घडल्या.दरम्यान, आढळराव पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी आढळराव पाटील यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर आढळराव पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटात सहभागी होतील, अशी चर्चा सुरु होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. आढळराव पाटील यांचा आज अजित पवार गटात प्रवेश झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू

पुणे दि. २६: भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम १७(३)(ए) व (बी) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध लागू केले आहेत. पोटनिवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून ६ जूनपर्यंत हे निर्बंध राहणार आहेत.

या कालावधीत नागरिकांना स्वत:जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास व बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांच्यावर निवडणूक कालावधीत त्यांच्याकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही याची जबाबदारी राहील.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000

‘हायवे मॅन’ सिनेमाप्रमाणे गडकरीही निवडणुकीत फ्लॉप होणार, देशाला गांधी विचाराची गरज..

प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसचे एक पाऊल पुढे, पवार व ठाकरेंनी आंबेडकरांचा प्रस्ताव मान्य करावा: नाना पटोले

महाविकास आघाडीतील दोन जागांवरील पेच चर्चेतून सुटेल, सांगली व भिवंडी काँग्रेसच्या परंपरागत जागा.

नागपूर/मुंबई, दि. २६ मार्च

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही, त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली व भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत, या जागांवर काँग्रेस पक्षाकडे चांगले उमेदवार आहेत. सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही. असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मित्र पक्षांनीही तो प्रस्ताव मान्य करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशाचे संविधान व लोकशाही टिकवणे हे सर्वांचे काम आहे. आताची निवडणूक ही देश वाचवण्यासाठी आहे. भाजपाचा पराभव करणे हाच मुख्य उद्देश आहे. महाविकास आघाडी या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव करेल. मागील १० वर्षात भाजपाने खोटी आश्वासने देऊन देशाला बरबाद केले त्याचा उगम हा नागपुरच आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, शेतकऱ्याला उद्ध्वस्त केले आहे. देशावर कर्जाचा मोठा डोंगर करून ठेवला आहे. जनतेमध्ये मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे त्यामुळे मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही असे चित्र सगळीकडे आहे.

नागपूरमध्ये भाजपाचा उमेदवार कोण आहे हे महत्वाचे नाही. ही लढाई विचाराची आहे. हायवे मॅन चित्रपट फ्लॉप झाला, मोदींवर काढलेला चित्रपटही फ्लॉप झाला पण मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट मात्र सुपरहिट झाला होता. आज जनतेला गांधी विचाराची आवश्यकता आहे. विकासाच्या नावाखाली नागपूरचे बेहाल करुन ठेवले आहेत. नेमका कोणाचा विकास झाला? कुठे गेले मिहान? मालवाहतुक करणारी विमाने उतरतील आणि शेतकऱ्यांना फायदा होईल, या आश्वासनांचे काय झाले. नागपूर शहरात सिमेंटचे रस्ते बनवले आहेत, आधीच नागपुरात जास्त तपमान व आता सीमेंटचे रस्ते यामुळे तापमान आणखी वाढणारच. स्थानिक मुद्द्यांबरोबरच राष्ट्रीय मुदद्यांवरही या निवडणुकीत भर दिला जाणार आहे. काँग्रेस पक्षात एकजूट असून नागपूरमधून काँग्रेस व महाविकास आघाडीचा उमेदवार २.५ लाख मताधिक्क्याने विजयी होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीच्या विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी व्हरायटी चौकातील गांधी पुतळ्याला आदरांजली अर्पण करण्यात आली व नंतर अर्ज दाखल करण्यात आला. विकास ठाकरे यांचा अर्ज दाखल करतेवेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुनिल केदार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतिश चतुर्वेदी, अनिस अहमद, आ. अभिजीत वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव रामकिसन ओझा, प्रफुल्ल गुडधे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वीप नोडल अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन

पुणे, दि. २६: भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने यशदा येथे लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीबाबत स्वीप नोडल अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, आयोगाच्या वरीष्ठ स्वीप सल्लागार अनुराधा शर्मा आदी उपस्थित होते.

कमी मतदान टक्केवारी असलेल्या मतदारसंघातील मतदानात वाढ करणे, शहरी नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने स्वीपअंतर्गत हाती घेण्यात आलेले उपक्रम यांची माहिती देण्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यात राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत कार्यशाळेत विचारमंथन करण्यात येणार आहे.
0000

गद्दारी:हेच आढळरावांचे क्वालिफिकेशन…

पुणे- काल ज्यांच्यावर अगदी हीन भाषेत टीका केली आज त्यांच्याच पक्षात जाऊन निवडणूक लढवायची हे गद्दारीचे क्वालिफिकेशन आढळराव यांचे असल्याचे शिक्कामोर्तब आज होईल . एवढेच नव्हे तर ज्यांचे बरेच काही खालच्या भाषेतील वक्तव्ये ऐकून अजितदादा कधी संतापत त्यांनाच आज पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची नामुष्की अजीत दादांवर आली आहे .या पार्श्वभूमीवर डॉक्टर , अभिनेता असूनही एक प्रामाणिक , जनहिताची कळकळ असलेला, कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग नसलेला नेता म्हणूनच अमोल कोल्हेंना जनता स्वीकारेल असे पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे. ते म्हणाले कि,’होय तेच शिवाजीराव आढळराव पाटील ज्यानीं अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली, राष्ट्रवादी संपवण्याची भाषा केली त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये उपलब्ध आहेत. त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याची नामुष्की अजितदादा पवार यांच्यावर आली, मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम असती तर आयात उमेदवार घेण्याची वेळच आली नसती अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी टीका केली.
अशा गद्दार आढळराव पाटलांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून मतदार निवडून देणार नाहीत. तर कर्तुत्वान डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा खासदार होणार असा विश्वासही प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला, शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांनी आढळराव पाटलांसह अजित पवारांना देखील चिमटे काढले आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नावाची अजितदादा पवार यांच्याकडून घोषणा… इतर जागा नावे २८ मार्चला

पुणे दि. २६ मार्च – दिनांक २८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर केले जाईल. आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत सांगितले.दरम्यान रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणा अजितदादा पवार यांनी आज पुणे येथे केली.आज पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर आदींसह पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीच्या ४८ जागा असून त्यामध्ये जवळपास कुणी कोणत्या जागा लढवायच्या याबाबत मागेच ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता ९९ टक्के काम झाले आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार जाहीर करणे क्रमप्राप्त होते. पहिल्या टप्प्यात विदर्भातील निवडणूक होणार आहे. आंबेगाव येथे शिवाजीराव आढळराव पाटील हे २० वर्षापूर्वी पक्षातून गेले होते ते आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. दुसरी जागा तिथेच जाहीर करेन असे सांगतानाच बाकीच्या जागा २८ मार्चला जाहीर करणार आहोत असे अजितदादा पवार म्हणाले. पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळी ४८ जागा होत्या. आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने लढलो होतो. त्यामध्ये भाजपच्या २३ जागा निवडून आल्या. शिवसेनेच्या १८ जागा निवडून आल्या आणि ४ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या एक नवनीत राणा यांना पुरस्कृत केले होते. तर एमआयएमची एक जागा अशा निवडून आल्या होत्या. मात्र माध्यमांमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी फक्त तीन जागा लढवणार अशा पध्दतीने गैरसमज पसरवण्याचे काम करण्यात आले. आमच्या महायुतीत कुणाचेही गैरसमज नाहीत. मित्रपक्षांनी २३ जागा निवडून आणल्या आहेत तेवढ्या जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती. त्यात एकत्र बसून अतिशय व्यवस्थित मार्ग काढलेला आहे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर एक – एक लोकसभा आणि आमदारांवर एक एक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. बाकीची टिम आमची काम करणारच आहे. शिवाय जिथे महायुतीचे उमेदवार असतील तिथे मंत्री व आमदारांनी उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे असेही ठरल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले.जाहीरनाम्यावर काम सुरू आहे तो लवकरच दिला जाईल. स्थानिक प्रश्न आहेत तेही त्या जाहीरनाम्यात यावेत अशी भूमिका आहे. स्टार प्रचारक यादीवर एकत्र बसून चर्चा झाली आहे त्यामुळे ती यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.राज्यातील लोकसभा प्रचारक म्हणून राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे हे अगोदरच जाहीर करण्यात आले आहे. अशा पध्दतीने आम्ही लोकांसमोर जाणार असून लोकांचा विश्वास आम्ही जिंकू आणि नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचे बळ त्यांच्या पाठीशी उभे करु असा निर्धार करण्यात आल्याचेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.लोकशाहीत कुणालाही भेटण्याचे आणि बोलण्याचा अधिकार आहे. माझ्यावर टिका होते आहे आणि तुम्हीही करु शकता माझी भूमिका ही फक्त विकासाला, देश प्रगतीपथावर पुढे चालला आहे. आज जगात देशाचे नाव वाढत आहे. प्रतिष्ठा मिळाली आहे असेही अजितदादा पवार यांनी ठणकावून सांगितले.

कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

मुंबई, दि. २६ : राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात या निवडणुकीचे मतदान दि. १९ एप्रिल, दि. २६ एप्रिल, दि. ७ मे, दि. १३ मे व दि. २० मे, २०२४ अशा पाच टप्प्यात होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

या आदेशानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे.

ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.

कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहणार आहे. उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांना या सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी लागणार आहे.

मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येणार आहे, अशा सूचनाही या आदेशाद्वारे देण्यात आल्या आहेत.