Home Blog Page 1121

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत खडकवासला विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

पुणे-दि, २७ मार्च – आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रमुख उपस्थितीत खडकवासला मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

यावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विकासकामे, पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोर्चेबांधणी यांसह निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

‘महायुती’ देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने झटून काम करण्याचे आवाहन करत मा. अजितदादांनी विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले. यावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

नितीन गडकरी यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. सुनील मेंढे यांचे उमेदवारी अर्ज दाखल

नागपूर-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पाचे सरसेनापती असलेल्या नितीन गडकरी यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूर येथे केले. नागपूर मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष महायुतीचे उमेदवार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या विशाल जाहीर सभेत श्री.फडणवीस बोलत होते. या सभेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेल, रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी खासदार जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेनंतर महायुतीने विधान भवन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रचंड शक्तिप्रदर्शन करत काढलेल्या भव्य मिरवणुकीने श्री. गडकरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना श्री.गडकरी यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी “नितीन गडकरी हे पंतप्रधान मोदींचे सरसेनापती आहेत” अशा शब्दांत श्री.गडकरी यांचा गौरव केला. ते म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत मोदी सरकारने केलेले कार्य हा एक ट्रेलर आहे. देशाला विकसित, सामर्थ्यशाली बनवण्यासाठी अजून बरेच काही घडायचे आहे. मोदींजींच्याच नेतृत्वाखाली पुढच्या पाच वर्षांत गरीबीमुक्त, बेरोजगारी मुक्त व समता युक्त भारत घडवायचा आहे. पंतप्रधान मोदींनी 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याचा संकल्प केला आहे त्याची मुहूर्तमेढ पुढच्या पाच वर्षांत रोवली जाणार असून त्यासाठी मोदीजींना सलग तिस-यांदा पंतप्रधान बनवायचे आहे, असा निर्धार श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनीही बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. प्रफुल्ल पटेल आदी नेत्यांची उपस्थिती होती.

भारतीय जनता पार्टीतर्फे 21 हजार ‘ नमो संवाद’ सभांचे आयोजन

भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांची माहिती

मुंबई- भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात स्टार प्रचारकांच्या सभांबरोबरच पक्ष संघटनेच्या शक्ती केंद्र पातळीवरील 21 हजार ‘नमो संवाद’ सभांचे आयोजन केले जाणार आहे. ‘नमो संवाद’ सभांच्या माध्यमातून भाजपा चे 1 कोटी मतदारांपर्यत पोहोचण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी बुधवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री.पाटील बोलत होते. प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते. 2014 पूर्वीचा भारत आणि आत्ता मोदी सरकारच्या काळात घडलेल्या नवभारताचे तुलनात्मक चित्र सर्वसामान्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न या दरम्यान केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले .
श्री. पाटील यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहीमेत राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील अनेक महत्वाचे नेते सहभागी होतील. त्याच्या बरोबरीने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी ‘नमो संवाद’ सभांचे आयोजन केले जाणार आहे. मतदानाच्या टप्प्यांनुसार या ‘नमो संवाद’ सभांचे वेळापत्रक बनवण्यात येणार आहे. 21 हजार शक्ती केंद्रांवर होणा-या या सभांमध्ये ३०० पेक्षा अधिक वक्ते सहभागी होणार असून दररोज 7 ते 8 सभा होणार असल्याचे श्री.पाटील यांनी नमूद केले.ते म्हणाले की, भाजपाचे विविध मोर्चे व प्रकोष्ठ यांच्या माध्यमातून फेरीवाले, व्यापारी, शिक्षक अशा समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत.ग्रामीण भागामध्ये ‘नमो चौपाल’ तर युवा पिढीशी संवाद साधण्यासाठी ‘कॉफी विथ युथ’ असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

‘संवाद पुणे’चे सुनील महाजन यांचा एकसष्ठीनिमित्त दि. ३० रोजी नागरी सत्कार

पुणे-पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये गायन, वादन, नृत्यसंगीत, नाटके, बालमहोत्सव आदींचे गेली ४० वर्षे आयोजन करणाऱ्या ‘संवाद पुणे’चे संस्थापक अध्यक्ष सुनील महाजन यांचा वयाच्या एकसष्ठीनिमित्त भव्य नागरी सत्कार शनिवार, दि. ३० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होत आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते सत्कार संपन्न होईल.
याप्रसंगी डॉ. सदानंद मोरे, डॉ. मोहन आगाशे, शेखर गायकवाड, रामदास फुटाणे, ल. म. कडू,श्रीमती लीला गांधी, पं. सुरेश तळवलकर, राजेश पांडे, डॉ. अभिजित वैद्य,आनंद माडगूळकर, डॉ. संजय चोरडिया, वसंतराव मस्के, उल्हासदादा पवार, मोहन जोशी,श्रीमती आशा काळे,कृष्णकुमार गोयल,हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी चित्रफीत दाखविली जाणार असून, गौरव विशेषांकाचे प्रकाशन केले जाणार आहे. या कार्यक्रमानंतर ‘रंग–तरंग’ गीत, संगीत, नृत्य सांस्कृतिक सोहळा संपन्न होईल. यामध्ये नृत्य सहभाग अभिनेत्री शर्वरी जमेनीस, वैशाली जाधव, ऋतुजा जुन्नरकर, वैष्णवी पाटील यांचा असून, गायक जितेंद्र भुरुक, त्यागराज खाडिलकर, योगिता गोडबोले, सुजित सोमण, अश्विनी कुरपे हे आहेत. मिलिंद कुलकर्णी, स्नेहल दामले, योगेश सुपेकर हे निवेदक असतील, अशी माहिती सचिन इटकर, निकिता मोघे, केतकी महाजन-बोरकर यांनी दिली.

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने सुधारित केलेली अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepuppss.in आणि https://www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असल्याची माहिती परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, माध्यमनिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दि. 6 मार्च 2024 रोजी परिषदेच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली होती. अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल, असेही परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज: नाना पटोले

भाजपा सरकारमुळे सीमेवरील जवान व शेतात राबणारा शेतकरीही असुरक्षित.

भंडारा-गोंदियाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे, चंद्रपूरमधून आ. प्रतिभा धानोरकर, गडचिरोली-चिमूर मधून डॉ. नामदेव किरसान व रामटेकमधून रश्मी बर्वे यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

मुंबई, दि. २७ मार्च
लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्वाची आहे. मागील १० वर्षात भारतीय जनता पक्षाने देश बरबाद केला आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी पुलवामा येथे ४० जवान शहीद झाले परंतु या स्फोटाचा तपास अजून लागलेला नाही. या स्फोटासाठी वापरण्यात आलेली स्फोटके नागपूरहून पाठवल्याच्या बातम्याही आल्या पण पाच वर्ष झाली अजून या स्फोटामागे कोण होते, याचा शोध लागला नाही. भाजपा सरकारच्या काळात देशातील सैनिक सुरक्षित नाही आणि शेतकरीही सुरक्षित नाहीत असा हल्लाबोल करत लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी नाना पटोले बोलत होते, ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदींनी २०१४ साली जनतेला भरमसाठ आश्वासने दिली, सत्तेत आल्यानंतर महागाई कमी करू, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु, शेतमालाला दिडपट भाव देऊ, परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करू परंतु यातील एकही आश्वासन मोदींनी पूर्ण केले नाही. उलट जीएसटीच्या माध्यामातून जनतेला १० वर्ष लुटले आहे. शेतकऱ्याच्या शेतात वीज नाही, पण शौचालयावर मोदीचा फोटो, खताच्या पिशवीवर मोदीचा फोटो झळकतो. १० वर्षात मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी काहीच केले नाही आणि आता पुन्हा मोदींच्या नावाने मते मागत आहेत. भाजपाचे नेते मतं मागायला आल्यावर, १० वर्षात त्यांनी काय काम केले, याचा जाब विचारा.

खासदार राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून इतिहास रचला आहे. कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटर व आता मणिपूर ते मुंबई ६७०० किलोमीटरची यात्रा काढली. या यात्रेतून त्यांनी गरीब, वंचित, शेतकरी, महिला, तरुण, कामगार यांचे दुःख समजून घेतले व २५ गॅरंटी दिल्या आहेत. प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर पहिली सही शेतकरी कर्जमाफीवर करण्याचे आश्वासन दिले आहे. गरीब महिलांना दर वर्षाला १ लाख रुपये, तरुणांना प्रशिक्षणाची गॅरंटी, ३० लाख सरकारी रिक्त पदे भरणार तसेच पेपरफुटीला लगाम घालणारा कायदा आणला जाईल अशी आश्वासने दिलेली आहेत. डॉ. प्रशांत पडोळे यांना विक्रमी मतांनी निवडून द्या, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले आहे.

यावेळी माजी मंत्री सतिश चतुर्वेदी, अनिस अहमद, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इंडिया आघाडीतील मित्रपक्षांचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामटेक लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. माजी मंत्री सुनील केदार, नागपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रविंद्र मुळक, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केला.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा सुरेश धानोरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी आ. अभिजीत वंजारी यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले.
गडचिरोली-चिमूर मतदार संघातून इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘ईशरे’,पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी आशुतोष जोशी २ एप्रिल रोजी शपथग्रहण सोहळा

पुणे :

इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग इंजिनीअर्स (ईशरे), पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी आशुतोष जोशी यांची २०२४-२५ या वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. आशुतोष जोशी आणि त्यांच्या केंद्रीय कार्यकारिणीचा (सीडब्ल्यूसी) शपथग्रहण सोहळा दि.२ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता नोव्होटेल, विमाननगर, पुणे येथे होणार आहे.ईशरे, पुणे शाखेचे मावळते अध्यक्ष नंदकिशोर कोतकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये या क्षेत्रातील मान्यवर व्यावसायिकांचा समावेश आहे.चेतन ठाकूर,सुभाष खनाडे ,अमित गुलवाडे, नंदकिशोर कोतकर ,सुजल शाह ,विमल चावडा ,रितेश खेरा,विशाल पवार,प्रमोद वाजे,नीलेश गायकवाड,अरुण चिंचोरे,नीरज मग्नानी,कौस्तुभ वाणी,डॉ.शिकलगार नियाज दिलावर,सुबोध मुरकेवार,मानस कुलकर्णी,डॉ.अंशुल गुजराथी,रशिदा शब्बीर,शशिधर,सिंपल जैन,महेश मोरे,उल्हास वतपाळ,देविका मुथा,हर्षदा राणे,प्रमोद सीजी (जैन),दिलीप झा,तुळशीदास चौधरी यांचा समावेश या कार्यकारिणीमध्ये आहे.

‘ईशरे’,पुणे चॅप्टरचा हा ३२ वा शपथग्रहण सोहळा आहे.२ एप्रिल १९९३ मध्ये पुणे चॅप्टर ची स्थापना झाली. हीटिंग, रेफ्रिजरेशन ,व्हेंटिलेशन , एअर कंडिशनिंग या क्षेत्रातील अभियंते ,व्यावसायिकांना मार्गदर्शन करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे काम ही संस्था करते.

“माझे शरीर जेलमध्ये आहे, पण माझा आत्मा जनतेमध्ये ….

दारू घोटाळ्याच्या तपासात ईडीने गेल्या 2 वर्षांत 2500 हून अधिक छापे टाकले आहेत. ते या तथाकथित दारू घोटाळ्यातील पैशांचा शोध घेत आहेत परंतु आतापर्यंतच्या एकाही छाप्यात त्यांना एक पैसाही सापडलेला नाही

दिल्ली- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल बुधवारी पुन्हा एकदा दिल्ली आणि देशवासीयांसाठी संदेश घेऊन आल्या आहेत. ईडीच्या ताब्यात असूनही मुख्यमंत्री केजरीवाल यांना दिल्लीतील जनतेची कशी काळजी वाटत आहे, हे त्यांनी सांगितलं.

सुनीता केजरीवाल म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी संदेश दिला आहे की, “माझे शरीर जेलमध्ये आहे, पण माझा आत्मा जनतेमध्ये आहे. डोळे बंद करा, मी तुमच्या अवतीभवती असल्याची जाणीव होईल.”

“मुख्यमंत्र्यांना डायबेटीस आहे आणि त्यांची शुगर लेव्हल बरोबर नाही, तरीही त्यांचा निर्धार पक्का आहे. केजरीवाल यांनी मला सांगितलं की, दोन वर्षांत अडीच हजार छापे टाकूनही ईडीला एक पैसाही मिळाला नाही. 28 मार्च रोजी न्यायालयात मुख्यमंत्री पुराव्यासह तथाकथित दारू घोटाळ्याबाबत खुलासा करणार आहेत आणि पैसा कुठे आहे हे सांगणार आहेत.”

सुनीता केजरीवाल मंगळवारी संध्याकाळी अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी ईडी कार्यालयात गेल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला दोन महत्त्वाचे संदेश पाठवले. मुख्यमंत्र्यांचा संदेश प्रेसद्वारे जनतेपर्यंत पोहोचवताना सुनीता केजरीवाल म्हणाल्या, मी मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.

“अरविंद केजरीवाल यांनी मला आणखी एक गोष्ट सांगितली की, या तथाकथित दारू घोटाळ्याच्या तपासात ईडीने गेल्या 2 वर्षांत 2500 हून अधिक छापे टाकले आहेत. ते या तथाकथित दारू घोटाळ्यातील पैशांचा शोध घेत आहेत परंतु आतापर्यंतच्या एकाही छाप्यात त्यांना एक पैसाही सापडलेला नाही. त्यांनी मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि सत्येंद्र जैन यांच्या घरांवरही छापे टाकले पण त्यांना एक पैसाही मिळाला नाही.”

“ईडीने आमच्या घरावरही छापा टाकला, त्यात त्यांना फक्त 73 हजार रुपये सापडले, त्यामुळे प्रश्न पडतो की मग या दारू घोटाळ्यातील पैसा कुठे आहे? मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल न्यायालयासमोर याचा खुलासा करणार आहेत. या दारू घोटाळ्यातील पैसा कुठे आहे? याचं सत्य ते पुराव्यासह संपूर्ण देशाला सांगतील” असं देखील सुनीता केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

केजरीवालांना पुढची तारीख ३ एप्रिल ….

दिल्ली- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणात बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाकडून अटक आणि कोठडीतून दिलासा मिळाला नाही. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली असून 2 एप्रिलपर्यंत उत्तर मागितले आहे. याप्रकरणी आता 3 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

मद्य धोरण प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या न्यायालयात केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि ईडीच्या वतीने एएसजी एसव्ही राजू यांनी सुमारे दीड तास युक्तिवाद केला.

एएसजी राजू म्हणाले की, आम्हाला सविस्तर उत्तर दाखल करायचे आहे. मुख्य प्रकरणात आम्हाला 3 आठवडे देण्यात आले होते. या प्रकरणात देखील आम्हाला आमचे उत्तर दाखल करण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे.

केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, हे विलंबाचे डावपेच आहेत. यावर आताच निर्णय घ्यावा, अशी विनंती आम्ही हायकोर्टाला करत आहोत. तुम्ही ते स्वीकारा किंवा नकार द्या. त्यावर हायकोर्टाने सांगितले की, आम्ही दुपारी 4.30 वाजता निकाल देऊ.

केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आपच्या कायदेशीर कक्षाने जिल्हा न्यायालयात निदर्शने करण्याचे आवाहन केले होते. यावर दिल्ली हायकोर्टाने ‘आप’ला इशारा दिला आणि म्हटले- कोर्टाच्या आवारात निदर्शने झाली तर त्याचे गंभीर परिणाम होतील.

दुसरीकडे, सुनावणीपूर्वी ईडीने आपचे गोवा-महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंगला यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकला. मद्य धोरणातून मिळालेला पैसा गोवा निवडणुकीत वापरल्याचा दावा एजन्सीने केला आहे. या लिंकच्या अनुषंगाने या प्रकरणाकडे पाहिले जात आहे.

गांधी भवन मधील ‘रोजा इफ्तार’ मधून सर्व धर्मीय स्नेहाचे दर्शन !

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दल या संघटनांच्या वतीने आयोजित ‘रोझा इफ्तार ‘ कार्यक्रमातून  सर्वधर्मीय सामंजस्य आणि स्नेहाचे दर्शन घडले .
  बुधवार,दि.२७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता गांधीभवन,कोथरूड येथे ‘रोजा इफ्तार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘निर्भय बनो आंदोलन’ चे एड .असीम सरोदे,रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे,रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे लुकस केदारी,इस्लाही सोशल मीडिया फाउंडेशन चे अध्यक्ष पैगंबर शेख,पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे अध्यक्ष फिरोज मुल्ला , फादर  पीटर डिक्रुझ , मौलाना इसहाक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी , सचिव संदीप बर्वे, विश्वस्त अन्वर राजन , प्रशांत कोठडीया, माजी  पोलिस अधिकारी मिलिंद गायकवाड, डॉ. प्रवीण सप्तर्षी, नीलम पंडित, प्रसाद झावरे हे देखील उपस्थित  होते.युवक क्रांती दलाचे कार्यवाह जांबुवंत मनोहर,संघटक अप्पा अनारसे,पुणे शहराध्यक्ष मुस्कान परवीन बाबासाहेब, सुदर्शन  चखाले यांनी स्वागत केले.
बंधूता निर्माण करण्याचा संकल्प: डॉ. कुमार सप्तर्षी
डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ उपवासाचा काळ हा आत्मशुद्धीचा काळ आहे. रोझा इफ्तारचे आयोजन हे महात्मा गांधींच्या एकतेच्या विचाराशी सुसंगत आहे. सर्वांनी एकत्र राहणे ही भारताची गोडी आहे, ती जगाला कळाली आहे ‘.अॅड. असीम सरोदे म्हणाले, ‘ सर्वधर्मीय सण एकत्र साजरे झाले तर एकात्मता वाढेल ‘.
कोथरुड मशिदीचे मौलाना इसहाक यांनी रमझान चे महत्व विषद केले.राहुल डंबाळे म्हणाले, ‘ कोथरूड भागात होणारा इफ्तार कार्यक्रम नवी दिशा देणारा आहे. अशा कार्यक्रमाने एकता वाढीस लागेल ‘.
लुकास केदारी म्हणाले, ‘ या कार्यक्रमामुळे दया, क्षमा, शांती वाढीस लागेल. समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन फॅसिस्ट वृत्ती लांब ठेवल्या पाहिजेत ‘.
फिरोज मुल्ला म्हणाले, ‘ गांधी भवन हे एकात्मतेचे केंद्र आहे. हे पुन्हा दिसून आले ‘.
‘आज देशामध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य तोडण्यासाठी काही राजकीय शक्ती अफवा, गैरसमज आणि असत्य पसरवत आहेत. त्याला बळी पडलेले लोक ठिकठिकाणी हिंसाचार करीत आहेत. या गंभीर वास्तवाचे भान ठेवून आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य बळकट केले पाहिजे, असे पैगंबर शेख यांनी सांगितले.

हिंदू धर्म प्रतिगामी नाही : उदयनाथ महाराज 

‘नाद अनाहत’ मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन
पुणे ता. २७: व्यापक परंपरा लाभलेला हिंदू धर्म अनादी काळापासून विश्वकल्याण आणि शांतीचा संदेश देत आहे. हिंदू मुळातच सहिष्णू असून काळानुरूप अनेक बदल या धर्माने स्वीकारले आहे. त्यामुळे हिंदू धर्म प्रतिगामी कधीच नव्हता आणि नाही असे मत ‘शिव कैलास’ असवली येथील महायोग आश्रमाचे सर्वेसर्वा ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज यांनी येथे व्यक्त केले. 
उद्गार भारत भारततर्फे काल ‘नाद अनाहत’ मासिकाचा प्रकाशन सोहळा उदयनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी क्षेत्र सिद्ध जोगेश्वरी बन येथील महंत शिवगिरी महाराज, सोमनाथ महाराज, वाणिज्य विषयक अभ्यासक डॉ. अनिल कुलकर्णी, प्रकाशनच्या संस्थापिका आसावरी पाटणकर, संपादक सुजीत भोगले, मार्गदर्शक शशांक महाजन यांच्या हस्ते ‘नाद अनाहत’ मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले.  
यावेळी कुलकर्णी म्हणाले की, धार्मिक ध्रुवीकरणाने भारताचे विभाजन झाले. त्या आधी अनेक परकीय आक्रमणे हिंदू धर्मावर झाली. स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे हिंदूंना कायम दुय्यम, कमी लेखले गेले. राजकीय वर्चस्वाच्या छुप्या हेतूने काहींनी एकत्र येऊन हिंदू म्हणजे प्रतिगामी, बुरसटलेले, अंधश्रद्धा मानणारे असा समज पसरवण्यास सुरुवात केली. प्रसंगी इतिहासातही छेडछाड करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. दुर्दैवाने, काही अंशी त्यांचा हेतू साध्य करण्यात त्यांना यशही आले. अशा डाव्या विचारसरणीचा आणि स्वतःला सो कोल्ड पुरोगामी म्हणून घेणाऱ्या पूर्वग्रहदूषित विचारांचा पगडा इतका वाढला की, सनातन धर्माच्या प्रचार-प्रसार करणारे वक्ते, साहित्यिक यांना व्यासपीठ मिळणेही बंद झाले. प्रसारमाध्यमातूनही याच विचारसरणीचा प्रभाव वाढू लागला. 
ते पुढे म्हणाले की, गेल्या १० वर्षात खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी विचारांना बळ मिळायला सुरुवात झाली. आज धार्मिक ध्रुवीकरण करण्याची कुवत डाव्या विचारसरणीत नसली तरी जाती जातीत फूट पाडून लोकांची मने दुभंगून टाकण्याचा कुटील डाव काही अपप्रवृत्तींकडून रचला जात आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण हिंदू धर्माला वाहिलेले मासिक सुरू करण्याचे धाडसी पाऊल आसावरी पाटणकर आणि सुजित भोगले यांनी उचलले आहे. यातून सनातन धर्म, इतिहास, संस्कृती, कला याची सर्वांगीण माहिती पुरविणारे दर्जेदार लेख रसिक वाचकांना उपलब्ध होतील, अशी मला खात्री आहे असेही कुलकर्णी यांनी सांगितले. 
यंत्र, तंत्र, मंत्र याच्या संयोगाने पुढे जाणारे हे युग असून हिंदू धर्माने हे सूत्र स्वीकारले पाहिजे. हिंदू धर्माने कायमच जनकल्याणाचा संदेश दिला आहे. विदेशी राष्ट्रांमध्ये आपल्या धर्माचे आकर्षण वाढत असताना आपल्या राष्ट्रात मात्र हिंदू धर्माविषयी द्वेष पसरवला जाणे ही दुर्दैवी बाब आहे. अशा परिस्थितीत उद्गार भारतने ‘नाद अनाहत’ची सुरुवात करून शिवधनुष्य हाती घेतला आहे. यात त्यांना यश येऊ दे. संयमी आणि उत्कृष्ट लेखातून समाजाला प्रकाशाकडे नेणारे हे मासिक ठरू दे. हा अंक देशभर नव्हे तर जगभर प्रसिद्ध होऊ दे. अशा शब्दात महंत शिवगिरी महाराज यांनी मासिकाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
मराठीतील धर्मयुग म्हणजे ‘नाद अनाहत ‘कला, संस्कृती आणि इतिहास या विषयांना वाहिलेले ‘धर्मयुग’ हे साप्ताहिक अत्यंत लोकप्रिय होते. हे साप्ताहिक बंद पडल्यानंतर या विषयांना वाहून घेतलेले एकही साप्ताहिक, पाक्षिक किंवा मासिक छापले जात नव्हते. ‘नाद अनाहत’ हे मासिक धर्म, कला, संस्कृती, इतिहास आणि अध्यात्म या विषयांनाच  समर्पित असेल. या मासिकातून दर्जेदार साहित्य प्रकाशित करण्याचा आमचा प्रयत्न असून ‘नाद अनाहत’ रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास आसावरी पाटणकर, सुजीत भोगले यांनी व्यक्त केला आहे.

राशी खन्ना ला योद्धा नंतर करायचे आहेत अजून ॲक्शन चित्रपट ! 

 युवा पॅन-इंडिया स्टार राशि खन्ना हिने अलीकडेच सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर ” योद्धा ” मध्ये कमालीची मनोरंजक कामगिरी केली आहे. राशी ने विविध शैलींचा अभ्यास करून ही भूमिका साकारली आहे. राशी का ला योद्धा नंतर अजून ॲक्शनर्सचा भाग व्हायचे आहे असं सांगितलं आहे.
 राशीची विशलिस्ट इथेच थांबत नाही कारण तिला पडद्यावर पौराणिक पात्र साकारायचे आहे. “बाहुबली मधील अनुष्का शेट्टीसारखी व्यक्तिरेखा साकारायला मला आवडेल. एका सरकारी अधिकाऱ्याच्या भूमिकेबद्दल कौतुकाचा वर्षाव केल्यानंतर राशी एक उत्तम अभिनेत्री आहे हे दाखवून दिल आहे. 

अष्टपैलू अभिनेत्री कामाच्या आघाडीवर, सध्या अनेक मनोरंजक प्रकल्पांची वाट पाहत आहे. पॅन इंडियाचा युवा स्टार विक्रांत मॅसीसोबत ‘द साबरमती रिपोर्ट’ आणि ‘टीएमई’मध्ये दिसणार आहे. तिच्याकडे तमिळ चित्रपट ‘अरनमानाई 4’ आणि तेलुगू चित्रपट ‘तेलुसू काडा’ देखील तिच्या श्रेयावर आहे.

इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvITs) – सार्वजनिक मालकीच्या माध्यमातून राष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासगाथेत सहभागी

InvITs आज विविध पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये ४ लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करत असून पुढील दशकात त्यात ६-८ लाख कोटी रुपयांची भर होण्याची शक्यता आहे.गुंतवणुकीच्या विविध प्रमाणासह InvITs द्वारे पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचा नियमन केलेला, पारदर्शक आणि तरल मार्ग आहे.

इंडिया ग्रिड ट्रस्टने जून २०१७ मध्ये सूचीबद्ध झाल्यापासून डिसेंबर २०२३ पर्यंत प्रति युनिट ८२.४१ रु. पासून ४,६६७ कोटी रु. वितरित केले आहेत.इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvITs) २०१४ मध्ये भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आले आणि गेल्या दशकात पोर्टफोलिओ विविधीकरणासाठी निवडीचे साधन म्हणून उदयास आले आहेत. ते उच्च जोखीम-समायोजित एकूण परतावा प्रदान करतात.

आज भारतात सेबी कडे नोंदणीकृत 24 InvITs असून त्यांनी २०१९ पासून इक्विटीमध्ये १ लाख कोटी रु.हून अधिक निधी उभारला आहे. २४ पैकी १४ InvlT खाजगीरित्या सूचीबद्ध आहेत आणि ४ सार्वजनिकरित्या सूचीबद्ध आहेत. सार्वजनिकरित्या सूचीबद्ध असलेले ४ InvITs चे एकत्रित बाजार भांडवलमूल्य २५,००० कोटी रु. इतके आहे.

गेल्या दशकभरात भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून २०१७ पासून ६७ लाख कोटी रु. हून अधिकची गुंतवणूक झाली आहे. याशिवाय, सरकारच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन (NIP) आणि राष्ट्रीय मुद्रीकरण योजनेसह (NMP), पायाभूत मालमत्ता विकास आणि त्याचे मुद्रीकरण या लक्षणीय वाढीचे साक्षीदार आहेत.  इन्फ्रा डेव्हलपमेंट मूल्य साखळीमध्ये InvITs च्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे विकसकांना खेळते भांडवल आणि गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या आकर्षक संधी मिळतात. हे वातावरण त्यांच्या वाढीसाठी खूप पोषक आहे.

गतकाळात गुंतवणूकदारांनी निवडक विकसक किंवा OEM च्या किंवा कर्जाच्या माध्यमातून  इक्विटी मालकीद्वारे देशाच्या पायाभूत विकासात भाग घेतला. तथापि, InvITs ने ही गोष्ट बदलली आहे आणि अंशात्मक गुंतवणुकीवर आणि किमान तिमाही/अर्धवार्षिक उत्पन्नासह थेट मालमत्तेच्या मालकीची संधी सादर केली आहे.

किमान ८०% उत्पन्न निर्माण करणाऱ्या पायाभूत मालमत्तेची मालकी असताना आणि त्यांच्या गुंतवणूकदारांना अर्ध-वार्षिक/त्रैमासिक किमान ९०% निव्वळ वितरण करण्यायोग्य रोख प्रवाह (NDCF) वितरीत करताना, उच्च पातळीवरील प्रशासन आणि पारदर्शकतेसह कार्य करणे InvITs साठी आवश्यक आहे. ७०% च्या लीव्हरेज कॅपसह आणि AAA- रेटिंगच्या अधीन, InvITs कडे पायाभूत सुविधांच्या मालमत्तेमध्ये अति-लाभ टाळण्याची क्षमता असते आणि रोख प्रवाहाबाबत अधिक दृश्यमानता देते. यामुळे गुंतवणूकदारांना अतिरिक्त दिलासा मिळतो आणि सार्वजनिकरित्या व्यापार केलेल्या युनिटद्वारे, त्यांच्या आवडीच्या गुंतवणुकीच्या आकारात पायाभूत सुविधा मालमत्तेत गुंतवणूक करण्याची एक आदर्श संधी मिळते.

इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी मेघना पंडित म्हणाल्या,

InvITs हे एक अद्वितीय गुंतवणूक प्लॅटफॉर्म आहेत. ते विकसकांना नवीन विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांचे भांडवल मुक्त करण्याची संधी देत असले तरी ते गुंतवणूकदारांना  आपल्या देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकास गाथेत सहभागी होण्याची आणि स्थिर परतावा मिळवण्याची संधी देतात.

कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि पारदर्शकतेच्या उच्च मापदंडांसह कार्यरत राहून InvITs  ते निर्माण करत असलेल्या निव्वळ वितरण करण्यायोग्य रोख प्रवाहांपैकी किमान ९०% गुंतवणूकदारांना परत करणे अनिवार्य आहे आणि पोर्टफोलिओमध्ये किमान ८०% उत्पन्न निर्माण करणारी मालमत्ता असणे गरजेचे आहे. आपल्या चांगल्या-गुणवत्तेची मालमत्ता, रेटिंग आणि अंदाजे रोख प्रवाह यासह InvITs हे गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक गुंतवणूक पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे.”

सदाशिव पेठेतील खोदाई लेखी परवानगीसह चलन भरूनच: महावितरणकडून स्पष्टीकरण

पुणे, दि. २७ मार्च २०२३: सदाशिव पेठमधील दोन वितरण रोहित्रांच्या वीजपुरवठ्यासाठी नवीन भूमिगत वीजवाहिनी टाकण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाकडून सर्वप्रथम चलन भरून लेखी परवानगी घेण्यात आली होती. यासंदर्भात नकाशा देखील सादर करण्यात आला होता असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी, की सदाशिव पेठ येथील दोन वितरण रोहित्रांचा व पर्यायाने प्रामुख्याने घरगुती व वाणिज्यिक अशा २७४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पाहणीमध्ये ११ केव्ही भूमिगत वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने वीज खंडित झाल्याचे दिसून आले. या दोन रोहित्रांना इतर वाहिनीद्वारे पर्यायी स्वरूपात वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र उन्हाळ्यामुळे वीज भार वाढत असल्याने नादुरुस्त वीजवाहिनी बदलणे आवश्यक झाले. त्यासाठी नादुरुस्त भूमिगत ११ केव्ही वाहिनीच्या जागी नवीन वाहिनी टाकण्यासाठी महानगरपालिकेकडे ९० रनिंग मीटर रस्ता खोदाईची परवानगी मागण्यात आली होती.

खोदाईसाठी दि. ११ मार्चला महावितरणकडून खोदाई शुल्काचे ५ लाख ४८ हजार ६४० रुपये (चलन क्र. १६१७०) जमा करण्यात आले. त्यानुसार पथ विभागाने दि. १३ मार्च रोजी लेखी परवानगी दिली व त्यात दि. १५ मार्च ते ३१ मार्चच्या कालावधीत संबंधित ठिकाणी खोदाई करून नवीन वीजवाहिनीचे काम पूर्ण करावे असे नमूद केले आहे. महावितरणकडून दि. २२ मार्च रोजी वाहतूक कमी झाल्यानंतर सायंकाळी खोदाईसह नवीन वीजवाहिनी टाकण्याचे कामास सुरवात करण्यात आली. मात्र ५० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर पालिकेच्या सूचनेनुसार ते सध्या थांबविण्यात आले आहे. त्यामुळे प्रथम चलन भरून व त्यानंतर लेखी परवानगी घेऊनच संबंधित ठिकाणी खोदाई केल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस भवनातील बैठकीस आबा बागुल गैरहजरच

     पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे लोकसभा निवडणुकीच्या नियोजना संदर्भात आज दु. १२.०० वा., शहर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली व त्यानंतर दु. १.०० वा., महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.या बैठकीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर,माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, ॲड.अभय छाजेड, कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी, संजय बालगुडे, दत्ता बहिरट, अजित दरेकर, अमीर शेख, त्याचबरोबर शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) विभाग प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, कल्पना थोरवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर आदींसह महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

     या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या नियोजना संदर्भात महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विधानसभा निहाय निवडणुक कचेरी टाकणे, शहर व विधानसभा निहाय समन्वय समिती तयार करणे, दि. २९ मार्च रोजी सायं. ५.०० वा., इंडिया फ्रंट आघाडीतील घटक पक्षांसोबत बैठकीचे आयोजन, पत्रकामध्ये कोणकोणत्या मुद्दांचा समावेश असावा, महाविकास आघाडीचे विधानसभा निहाय निरिक्षक नेमणे तसेच निवडुकीच्या दृष्टीने विविध कमिट्या तयार करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.