भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांची माहिती
मुंबई- भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात स्टार प्रचारकांच्या सभांबरोबरच पक्ष संघटनेच्या शक्ती केंद्र पातळीवरील 21 हजार ‘नमो संवाद’ सभांचे आयोजन केले जाणार आहे. ‘नमो संवाद’ सभांच्या माध्यमातून भाजपा चे 1 कोटी मतदारांपर्यत पोहोचण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी बुधवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री.पाटील बोलत होते. प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते. 2014 पूर्वीचा भारत आणि आत्ता मोदी सरकारच्या काळात घडलेल्या नवभारताचे तुलनात्मक चित्र सर्वसामान्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न या दरम्यान केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले .
श्री. पाटील यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहीमेत राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील अनेक महत्वाचे नेते सहभागी होतील. त्याच्या बरोबरीने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी ‘नमो संवाद’ सभांचे आयोजन केले जाणार आहे. मतदानाच्या टप्प्यांनुसार या ‘नमो संवाद’ सभांचे वेळापत्रक बनवण्यात येणार आहे. 21 हजार शक्ती केंद्रांवर होणा-या या सभांमध्ये ३०० पेक्षा अधिक वक्ते सहभागी होणार असून दररोज 7 ते 8 सभा होणार असल्याचे श्री.पाटील यांनी नमूद केले.ते म्हणाले की, भाजपाचे विविध मोर्चे व प्रकोष्ठ यांच्या माध्यमातून फेरीवाले, व्यापारी, शिक्षक अशा समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत.ग्रामीण भागामध्ये ‘नमो चौपाल’ तर युवा पिढीशी संवाद साधण्यासाठी ‘कॉफी विथ युथ’ असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.