Home Blog Page 1099

बडे मियाँ छोटे मियाँ मधील टायगर श्रॉफ च्या अभिनयाबद्दल समीक्षक आणि प्रेक्षक यांच्याकडून कौतुक 

बडे मियाँ छोटे मियाँ मधील टायगर श्रॉफ च्या अभिनयाबद्दल समीक्षक आणि प्रेक्षक यांच्याकडून कौतुक 
 बॉलीवूडचा ॲक्शनर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ नुकताच रिलीज झाला असून समीक्षक आणि प्रेक्षकांनी टायगर श्रॉफच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे. त्याचा ॲक्शन सीक्वेन्ससाठी टाइगरच कौतुक होत आहे. त्याच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केल असून टायगरने सहजतेने विनोदी वन-लाइनर्स ने प्रेक्षकांची मन जिंकली आहे. 

समीक्षक हा चित्रपट अभिनेत्यासाठी “गेम चेंजर” असल्याचे सांगत आहेत. #BadeMiyanChoteMiyan हा त्याच्या अष्टपैलुत्वाचा पुरावा आहे,” एका समीक्षकाने सोशल मीडियावर लिहिले आहे. टायगरच्या चाहत्यांनी ज्यांना प्रेमाने टायगेरियन म्हटले जाते त्यांनी सोशल मीडियावर देखील हा चित्रपट अभिनेत्याला नवीन अवतारात कसा सादर केला याबद्दल बोलले आहे. “हा टायगर श्रॉफ 2.0 आहे,” एका टायगेरियनने लिहिले, तर दुसऱ्याने चित्रपटात अभिनेता कसा “खूप चांगला” आहे याचा उल्लेख केला आहे.

 ईदच्या सुट्टीचा फायदा झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आधीच 36.33 रुपयांची कमाई केली आहे. कोटीचे एकूण कलेक्शन. 2024 चा ओपनिंग डे कलेक्शन करणारा सर्वाधिक चित्रपट म्हणूनही त्याने स्वतःची नोंद केली आहे! यापूर्वी टायगरने ‘हिरोपंती’, ‘बागी’ फ्रेंचायझी आणि ‘वॉर’सह बॉक्स ऑफिसवर राज्य केले होते. ‘हिरोपंती’ने 72.6 कोटी रुपयांची कमाई केली, तर बागीच्या फ्रँचायझीच्या तीन हप्त्यांनी बॉक्स ऑफिसवर एकूण 524 कोटी रुपयांचे कलेक्शन नोंदवले आणि त्याच्या ‘वॉर’ने 475 कोटी रुपयांची कमाई केली. आता, प्रतिक्रिया पाहता, असे दिसते की नवीनतम ॲक्शनर पूर्वीचे सर्व रेकॉर्ड्स ओलांडण्यासाठी आणि अभिनेत्याला हिट मशीन म्हणून स्थापित करण्यासाठी सज्ज आहे! 

 ‘बडे मियाँ छोटे मियाँ’नंतर टायगर ‘सिंघम अगेन’, ‘रॅम्बो’ आणि ‘बागी 4’मध्ये दिसणार आहे.

आयो लाल झुलेलाल’च्या जयघोषात चेटीचंड महोत्सवातून घडले सिंधी संस्कृतीचे दर्शन

सिंधू सेवा दलातर्फे भगवान साई झुलेलाल यांचा १०७४ वा जन्मोत्सव व सिंधी नववर्षाचा आनंदोत्सव

पुणे : ‘आयो लाल झुलेलाल’च्या जयघोषात भगवान साई झुलेलाल यांची भक्तीभावाने केलेली आरती… झुलेलाल यांच्या मनमोहक प्रतिमेचे पूजन… सिंधी गीतांची बहारदार मैफल… कलात्मक नृत्याविष्कार… चाट-सामोसा-गोड भाताचा प्रसाद… रुचकर लंगर… डोक्यावर लाल टोपी आणि साई झुलेलाल यांचे अखंड भजन अशा भावभक्तीमय वातावरणात सिंधी संस्कृतीचे दर्शन घडले. या वार्षिक महोत्सवात सहभागी प्रत्येक सिंधी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
सिंधी समाजाचे नवीन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या १०७४ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सव आयोजिला होता. येरवड्यातील डेक्कन कॉलेजच्या बँक्वेट हॉल व मैदानावर झालेल्या या महोत्सवात सहभागी प्रत्येक सिंधी बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली. संगीत, गायन, भजन आणि महाप्रसादातील विविध पदार्थ यामुळे चेटीचंड महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
मुंबईतील प्रसिद्ध गायक शुभम नाथानी, नागपूरची प्रतिभावान गायिका दृष्टी कुकरेजा, राजस्थानचे उत्कृष्ठ गायक मास्टर हर्षल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आणि जयपूर येथील विनोदवीर भाग्यश्री दर्यानीच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. सिंधी समाजात कपिल शर्मा अशी ओळख असलेल्या मोहित शेवानीने कार्यक्रमाचे संचालन केले. जनरेशन नेक्स्ट डान्स अकँडमीच्या मुलांनी मनमोहक नृत्याविष्कार सादर केले. प्रीतिभोजनाने (महाप्रसाद) महोत्सवाची सांगता झाली. पुणे, पिंपरी-चिंचवड व परिसरातील चार-साडेचार हजार सिंधी बांधव या महोत्सवात सहभागी झाले.
आसवानी प्रोमोटर्स अँड बिल्डर्सचे संस्थापक संचालक श्रीचंद आसवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत बीजे मेडिकल महाविद्यालयातील निवृत्त सहयोगी प्राध्यापक डॉ. लछमनदास फेरवानी यांच्यासह सिंधी समाजातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. तसेच मुकुल माधव फाउंडेशन व एएनपी केअर फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष अशोक वासवानी, संस्थापक सदस्य ईश्वर कृपलानी, माजी अध्यक्ष मनोहर फेरवानी, सुरेश जेठवानी, पीटर दलवानी, दीपक वाधवानी, विजय दासवानी, उपाध्यक्ष पुरुषोत्तम पर्यानी, सचिव सचिन तलरेजा, खजिनदार राजेंद्र फेरवानी, सहखजिनदार निलेश फेरवानी, जनसंपर्क अधिकारी देवेंद्र चावला, सिमरन जेठवानी, विनोद रोहानी आदी उपस्थित होते.

अशोक वासवानी म्हणाले, “सिंधी संस्कृती विषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासह सिंधी परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सिंधू सेवा दल गेली ३७ वर्ष कार्यरत आहे. चेटीचंड महोत्सवानिमित्त सर्व समाज एकत्र येतो. भगवान साई झुलेलाल यांचा उत्सव साजरा करतो. हा आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी आम्हीही दरवर्षी यामध्ये सहभागी होतो.”
या मैदानावर पहिल्यांदाच होत असलेल्या चेटीचंड महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सुरेश जेठवानी यांनी प्रास्ताविकात नमूद केले. सचिन तलरेजा यांनी आभार मानले.

श्री महालक्ष्मी मंदिरात गीतरामायणाचा आनंद सोहळा

 श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग यांच्या वतीने आयोजन
पुणे : ‘स्वये श्रीराम प्रभू ऐकती’, ‘शरयू तिरावरी’, ‘दशरथा घे हे पायसदान’, ‘राम जन्मला गं सखे’, ‘जोड झणी कार्मुका’, चला राघवा चला, आज मी शापमुक्त जाहले अशा एकाहून एक सरस गीत रामायणातील रचना सादर करीत ग. दी. माडगूळकर रचित आणि स्व.सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली अजरामर कलाकृती ‘गीतरामायण’ प्रेक्षकांच्या सहभागाने सादर झाले. 
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग यांच्या वतीने चैत्र नवरात्र महोत्सवांतर्गत  गुढीपाडवा ते श्रीराम नवमी असे सलग ९ दिवस गीतरामायणाचे आयोजन करण्यात आले आहे. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात स्वरसंवादिनी प्रस्तुत  हे गीतरामायण सुरु आहे.  प्रणव कुलकर्णी आणि सहकारी गीतरामायणाचे सादरीकरण करत आहेत.  यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा यांसह विश्वस्त उपस्थित होते.
प्रणव कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी, मंदार लिमये यांच्यासह ज्येष्ठ गायक प्रमोद रानडे, जयश्री कुलकर्णी, अभिजित पंचभाई हे गीतांचे सादरीकरण करत आहेत.  मकरंद पंडित (हार्मोनियम), श्रीधर मोडक, तुषार दिक्षित (सिंथेसायझर), निलेश कुलकर्णी (तबला), सागर चव्हाण (तालवाद्ये) असा उत्तम वाद्यवृंद कार्यक्रमास साथसंगत करीत आहे. संपूर्ण गीतरामायणाचे  निवेदन अक्षय वाटवे करत आहेत.

अमिता अग्रवाल म्हणाल्या, दिनांक १६ एप्रिल पर्यंत दररोज सायंकाळी ७.३० ते ९ यावेळेत गीतरामायणाचे सादरीकरण सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात होत आहे. तसेच श्रीरामनवमी निमित्त बुधवार, दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ विविध कार्यक्रम होणार आहेत. विशेष अर्चना, अभिषेक, राजभोग, श्रीरामजन्म सोहळा दुपारी १२ वाजता मंदिरात होईल. 

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात;चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

मुंबई, दि. 11 : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार आहेत. नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा चार जिल्हयांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.

पुण्यात 82 लाखांहून अधिक मतदार

पुण्याची एकूण मतदार संख्या 82 लाख 82 हजार 363 आहे. तर मुंबई उपनगरची एकूण मतदार संख्या 73 लाख 56 हजार 596 इतकी आहे. ठाण्याची एकूण मतदार संख्या 65 लाख 79 हजार 588, नाशिक जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 48 लाख 08 हजार 499 इतकी आहे. तर नागपूरची एकूण मतदार संख्या 42 लाख 72 हजार 366 इतकी आहे.

रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया आणि सिंधुदुर्गात महिला मतदारांची संख्या अधिक

चार जिल्ह्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक आहेत. रत्नागिरीची एकूण मतदार संख्या 13 लाख 03 हजार 939असून यामध्ये 11 तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 31 हजार 012 आहे तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 72 हजार 916 इतकी आहे. नंदुरबारची एकूण मतदार संख्या 12 लाख 76 हजार 941 असून यामध्ये 12 तृतीयपंथीची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 37 हजार 609 आहे तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 39 हजार 320 इतकी आहे. गोदिंया जिल्हयातही महिला मतदारांची संख्या जास्त आहे. गोंदियाची एकूण मतदार संख्या 10 लाख 92 हजार 546असून यामध्ये 10 तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 5 लाख 41 हजार 272 आहे तर महिला मतदारांची संख्या 5 लाख 51 हजार 264 इतकी आहे. सिंधुदुर्गची एकूण मतदार संख्या 6 लाख 62 हजार 745असून यामध्ये 1 तृतीयपंथीची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 3 लाख 30 हजार 719 आहे तर महिला मतदारांची संख्या 3 लाख 32 हजार 025 इतकी आहे.

राज्यात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे अशा पाच टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे. राज्यात 8 एप्रिल 2024 पर्यंत एकूण 9 कोटी 24 लाख 91 हजार 806 मतदारांची नोंद आहे. यामध्ये 4 कोटी 80 लाख 81 हजार 638 पुरुष मतदार तर 4 कोटी 44 लाख 04 हजार 551 महिला मतदार आणि 5 हजार 617 तृतीयपंथी मतदार आहेत.

5 जिल्ह्यात 30 लाखांहून अधिक मतदार

अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये 30 लाखांहून अधिक मतदार आहेत. अहमदनगरमध्ये एकूण मतदार 36 लाख 47 हजार 252 आहेत. सोलापूरमध्ये एकूण मतदार 36 लाख 47 हजार 141 आहेत. जळगावमध्ये एकूण मतदार 35 लाख 22 हजार 289 आहेत. कोल्हापूरमध्ये एकूण मतदार 31 लाख 72 हजार 797 आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण मतदार 30 लाख 48 हजार 445 आहेत.

बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या 10 जिल्ह्यांमध्ये 20 लाखांहून अधिक मतदार आहेत.

अजित पवारांचे विधान चुकीचे नाहीच /पुतण्याच्या विधानावर काकाचा षटकार;सुप्रिया ओरिजनल पवार आणि …

पुणे- अजित पवारांनी बारामतीकरांना म्हटले होते , यावेळी पवारांनांच निवडून द्या यावर बोलताना शरद पवार म्हणाले, मग यात चुकीचे काय ? फरक एवढाच ओरिजनल पवारांनाच बारामतीकर निवडून देत आलेत … ओरिजनल आणि बाहेरून येऊन पवार झालेले एवढाच काय तो फरक बारामतीकर समजून घेतील . पवारांच्या या ष्ट्कारावर अमोल कोल्हे , प्रशांत जगताप, अंकुश काकडे यांनी खळळून हसत दाद दिली.शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली

बारामतीची जनता ही पवार आडनावाच्या मागे नेहमी उभी राहते. सन १९९१ मध्ये तुम्ही मुलगा म्हणून मला खासदारकीला निवडून दिले. दुसऱ्यांदा वडिलांना म्हणजे साहेबांना निवडून दिले. गेल्या तीन वेळा लेकीला निवडून दिले आता सुनेला म्हणजे सुनेत्रा पवारांना निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केले होते. त्यांच्या याच शाब्दिक डावपेचाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बिनतोड उत्तर दिले आहे.’अजित पवार यांच्या बोलण्यात चुकीचे काय आहे? बारामतीची जनता नेहमी पवार आडनावामागेच उभी राहते. मूळ पवार आणि बाहेरून आलेल्या पवार….’ असे शरद म्हणताच पत्रकार परिषदेत एकच हास्यकल्लोळ झाला. सुप्रिया सुळे या मूळ पवार असल्याचे सांगत सुनेत्रा पवार विवाहानंतर पवार झाल्याचे अप्रत्यक्ष सांगत बारामतीकर पवार आडनावामागेच उभी राहिल, अशी टोलेबाजी करून शरद पवार यांनी अजित पवार यांना बिनतोड उत्तर दिले.

शिरूर लोकसभेतील भाजप नेते अतुल देशमुख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुणे येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषेदत शरद पवार यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. महाविकास आघाडीचे जागावाटप, माढा आणि साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार, नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील सभा, विरोधकांचा प्रचार अशा मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. यावेळी अजित पवार यांच्या ‘बारामतीत पवार आडनावामागेच उभे राहा’ या विधानावर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांचा मिश्किल अंदाज पाहायला मिळाला.

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील भाष्य केले. रामटेक येथील सभेत्या मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावर पवार म्हणाले, “नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची कितपत प्रतिष्ठा राखतायत हा प्रश्न मला पडतो. मोदी वगळता सर्व पंतप्रधानांनी विरोधकांचा सन्मान केला. लोकशाहीत विरोधकांना महत्व आहे आणि मोदी सांगतात एकही विरोधकांना निवडून देऊ नका. आज शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की पुतीन आणि नरेंद्र मोदी यात काहीच फरक नाही. “
धैर्यशील मोहिते पाटील दोन दिवसात शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीत शरद पवार गटात पक्षप्रवेश वाढत आहेत. जनमानसातलं स्थान लक्षात घेऊन पक्ष निर्णय घेत आहेत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. अतुल देशमुख यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.
संजय मंडलिक यांच्या वक्तव्यावर देखील शरद पवार यांनी वक्तव्य केले. राजघराण्यात दत्तक नवीन गोष्ट नाही. दत्तक झाल्यावर तो घराण्याचा प्रतिनिधी होतो. शाहु छत्रपती यांच्याबाबत जनतेमध्ये कृतज्ञता आहे आणि त्यांच्यावर टीका करणे, यातून विरोधकांची मानसिकता दिसून येते, असे शरद पवार म्हणाले.

धैर्यशील मोहिते पाटील मला भेटून गेले आहेत. ते दोन दिवसात पक्षात प्रवेश करणार आहेत. सर्वांसोबत चर्चा करुन पक्ष निर्णय घेत असतो. कुणाशीही लोकसभा उमेदवारीबाबत चर्चा नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विनम्र अभिवादन

पुणे दि.११: महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सिल्व्हर रॉक्स या निवासस्थानी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त डॉ. जेहलम जोशी यांसह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्ताने महिला शिक्षणाबरोबरच समाजात सुधारणा व्हाव्यात, तसेच सत्यशोधक विचार व शेतकरी, मजूर, गोरगरीब लोक यांना समानतेच आणि सन्मानाचे जीवन जगता यावं म्हणून त्यांनी जे प्रयत्न केले त्याच्यासाठी पुढच्याही काळामध्ये कामाची खूप गरज आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांमधून दुज्या भावाच्या विरोधामध्ये स्त्रियांचे अधिकार म्हणजेच मानव अधिकार आणि मानव अधिकार म्हणजे स्त्रियांचे अधिकार ही मुहूर्त मेढ किंवा हा जो विचार अलीकडच्या काळात जागतिक स्तरावरती सर्व देशांनी स्वीकारलेला आहे, त्याचं बीज जे आहे ते भारतामध्ये महात्मा जोतीराव फुले यांनी रोवलेले आहे. मानवतावादी विचाराचं रूप महाराष्ट्र, भारताबरोबर संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचा काम ज्या विचारवंतांनी केलं त्याच्यामध्ये महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अभूतपूर्व असं योगदान आहे.

महात्मा फुलेंनी भिडे वाड्यामध्ये जी शाळा सुरू केली होती त्याच देखील जतन करण्याचा निर्णय सरकार मधल्या सर्व सन्माननीय प्रतिनिधींनी घेतलेला आहे. मुलींच्या शिक्षणाला चालना द्यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि विशेषतः उच्च आणि तंत्रशिक्षण ज्या मुली घेत आहेत त्यापैकी आठ लाखाच्या आत ज्यांचे उत्पन्न आहे त्यांच्यासाठी पूर्णपणे फी माफी करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवरती अजून असंच कार्य समृद्ध होण्यासाठी काम व्हावं, बालविवाह सारखे प्रश्न कायमचे संपावेत यासाठी म्हणून मी महात्मा ज्योतिराव फुले यांना शतशः अभिवादन करते, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

अर्जुन-सावीला मिळाले प्रेक्षकांचे भरभरून प्रेम, ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’चा ४०० भागांचा टप्पा पार

कलर्स मराठीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. ही मालिका घराघरात पोहोचली असून सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रेक्षक या सगळ्यांवरच भरभरून प्रेम करत आहेत. या प्रेमामुळेच आज ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेने ४०० भागांचा टप्पा गाठला आहे.

या मालिकेतील अर्जुन-सावीवर प्रेक्षकांनी कायमच प्रेम केले. कधी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, तर कधी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दोघांवर अनेक संकटेही आली, मात्र त्या प्रत्येक संकटावर त्यांनी एकमेकांना साथ देत मात केली. प्रत्येक वेळी सावी अर्जुनच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. प्रेक्षकांना अर्जुन आणि सावी कायमच आपलेसे वाटले.

प्रेक्षकांच्या या प्रचंड प्रेमाच्या बळावरच या मालिकेने यशस्वी ४०० भाग पूर्ण केले. सावी आणि अर्जुनच्या आयुष्यात आणखी काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहा “पिरतीचा वनवा उरी पेटला”, सोम – शनि, रात्री 10:00 वा. कलर्स मराठीवर प्रदर्शित होत आहे .

विशाखापट्टणम् येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड येथे भारतीय नौदलासाठीच्या पहिल्या फ्लीट सपोर्ट जहाजाचा स्टील कटिंग सोहळा संपन्न

नवी दिल्‍ली-

संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्या उपस्थितीत आज, 10 एप्रिल 2024 रोजी विशाखापट्टणम् येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड येथे (एचएसएल) भारतीय नौदलासाठीच्या पाच फ्लीट सपोर्ट जहाजांच्या तुकडीतील पहिल्या जहाजाचा स्टील कटिंग सोहळा संपन्न झाला. इस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हॉईस अॅडमिरल राजेश पेडणेकर, एचएसएलचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक सीएमडीई हेमंत खत्री(निवृत्त) यांच्यासह भारतीय नौदल आणि एचएसएलमधील अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पाच फ्लीट सपोर्ट जहाजांच्या तुकडीच्या संपादनासाठी ऑगस्ट 2023 मध्ये एचएसएल कंपनीशी करार करण्यात आला होता आणि ही जहाजे 2027च्या मध्यापर्यंत भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. भारतीय नौदलात रुजू झाल्यानंतर ही फ्लीट सपोर्ट जहाजे समुद्रातील जहाजांच्या मदतीच्या माध्यमातून भारतीय नौदलाच्या सागरी क्षमतेत मोठी भर घालतील. सुमारे 40,000 टनांहून अधिक विस्थापन क्षमता असलेली ही जहाजे समुद्रात कार्यरत जहाजांसाठी इंधन, पाणी, शस्त्रास्त्रे तसेच इतर साठा वाहून नेऊन त्याचा पुरवठा करतील जेणेकरून त्या जहाजांना या बाबींसाठी बंदराकडे परत यावे न लागता अधिक दीर्घकाळ सागरी कारवाया सुरु ठेवता येतील. यामुळे नौदलाच्या जहाजांची धोरणात्मक पोहोच आणि गतिशीलता  यात अधिक सुधारणा होईल. दुय्यम भूमिका सांभाळताना ही जहाजे, मानवतावादी मदत तसेच आपत्ती निवारण कार्यांसाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी तसेच नैसर्गिक संकटांच्या काळात सागरातील जहाजांना मदत साहित्याचे त्वरित वितरण करण्यासाठी सज्ज ठेवता येतील.

संपूर्णतः स्वदेशी संरचना तसेच जहाजबांधणीसाठी आवश्यक बहुतांश उपकरणांचा स्वदेशी उत्पादकांकडून पुरवठा यामुळे हा जहाज बांधणी प्रकल्प भारतीय जहाजबांधणी उद्योग क्षेत्राला नवी चालना देईल. या प्रकल्पाची संकल्पना केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड या उपक्रमांना अनुसरून आहे.

अल्पवयीन मुलाने मजेखातर चोरल्या तब्बल १० दुचाक्या आणि १ ट्रॅक्टर

पुणे- मौजमजेसाठी चोरी करणा-या एका अल्पवयीन मुलाच्या ताब्यातुन पुणे पोलिसांनी तब्बल १० मोटारसायकल, ०१ कॅप्टन कंपनीचा ट्रॅक्टर असा एकुन ५,१५,०००/- रु किं. चा मुद्देमाल जप्त केला आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’
दिनांक १०/०४/२०२४ रोजी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर चे हद्दीमध्ये वरिष्ठांचे आदेशाने पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस अंमलदार हे गुन्हे प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना त्यांना पेट्रोलिंग दरम्यान कॅनाल रोड, खानमज्जीद जवळ एका लाल रंगाच्या मोटारसायकल हिचे सह एक संशयीत मुलगा थांबलेला मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव, पत्ता व गाडीच्या कागद पत्रां बाबत विचारणा केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने त्याचेवर संशय आला. त्यामुळे त्यास अधिक चौकशीकामी वारजे पोलीस स्टेशन येथे घेवुन आले असता सदर बाबत वरिष्ठांना माहिती देवुन तपास पथकाचे अधिकारी यांनी त्याचे कडे अधिक विचारपुस केली असता नमुद संशयीत मुलगा हा विधीसंघर्षीत बालक असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याचे ताब्यातील मिळुन आलेली दुचाकी ही वारजे माळवाडी पोलीस ठाणे गुरनं ८६/२०२४ भादंवि कलम ३७९ मधील वारजे जकात नाका पुणे भागातून त्याने चोरी केलेली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेकडे त्याचे पालकांचे समक्ष अधिक विचारपुस केली असता त्याने यापुर्वी आजुबाजुच्या परीसरातुन अजुन काही गाड्या चोरी केल्याचे सांगितले. तसेच सदरच्या गाड्या चोरी का केल्या त्याबाबत त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सदरच्या गाड्या ह्या फक्त मौजमजेसाठी चोरी केली असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचे ताब्यातुन वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले एकुन १० मोटार सायकल व ०१ कॅप्टन कंपनीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात येवुन त्यांचे कडून वारजे माळवाडी, हिंजवडी, सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, अलंकार, पर्वती या पोलीस स्टेशन कडील एकुन ११ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास रामेश्वर पार्वे, पोलीस उपनिरीक्षक वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०३ संभाजी कदम,सहा पोलीस आयुक्त कोथरुड विभाग भिमराव टेळे वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक रणजीत मोहिते, पोलीस उप निरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार प्रदिप शेलार, भुजंग इंगळे, मनोज पवार, विजय भुरुक, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, संभाजी दराडे, अजय कामठे, सत्यजित लोंढे यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राजपत्रित अधिसूचना 12 एप्रिल रोजी जारी होणार

12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याची  अंतिम तारीख 19 एप्रिल 2024

लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी  उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 94 लोकसभा मतदारसंघांसाठी राजपत्रित अधिसूचना उद्या म्हणजेच 12.04.2024 रोजी जारी केली जाईल. मध्य प्रदेशातील, या आधी निवडणूक स्थगित झालेल्या, 29-बैतुल लोकसभा मतदारसंघा साठी स्वतंत्रपणे अधिसूचना देखील 12.04.2024 रोजी जारी केली जाईल.

मध्य प्रदेशातील, निवडणूक स्थगित झालेल्या 29-बैतुल (अनुसूचित जमातीसाठी राखीव) या लोकसभा मतदारसंघासह, 94 लोकसभा मतदारसंघांमध्ये 07.05.2024 रोजी मतदान होईल. मध्य प्रदेशातील 29-बैतुल या लोकसभा मतदारसंघासाठी,  दुसऱ्या टप्प्यात  मतदान होणार  होते. मात्र, बहुजन समाज पक्षाच्या  उमेदवाराच्या मृत्यूमुळे मतदान  पुढे ढकलण्यात आले  होते.

आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण-दीव, गोवा, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात समाविष्ट असलेली राज्ये/केंद्रशासित प्रदेश आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे  वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेत महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

पुणे- स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांची जयंती पर्वती येथील अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरवात  अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा.सौ. प्रमिला गायकवाड, खजिनदार विजयसिंह जेधे यांचे हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगी सत्यशोधक समाजाचे संस्थापक व महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर विचारवंत व समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि जातिभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरु करून महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची  मुहूर्तमेढ रोवली. ‘शेतकऱ्याचा असूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. आपण सर्वांनी महात्मा फुलेंच्या कार्याचा व विचारांचा  आदर्श घेण्याची गरजही कार्यक्रमासाठी  मा.सौ. प्रमिला गायकवाड यांनी या वेळी  व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी  मा.सौ. प्रमिला गायकवाड, विजयसिंह जेधे,प्राचार्य डॉ.शुभदा घोलप,डॉ.विलास पाटील,प्रा.सागर गावंडे,डॉ.रविराज सोरटे,श्री.नितीन मुकणे,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शास्त्रीय उपशास्त्रीय संगीताने रंगली संगीत मैफल-विदुषी सानिया पाटणकर यांची गायन सेवा 

  श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट आयोजित श्री जंगली महाराज १३४ वा पुण्यतिथी उत्सव ;
पुणे :  ‘कानन कुंडल बहुजन पालक श्री ओंकार’ अशा यमन रागातील खयाल, ‘सखी आज तेरी पिया विन याद आये’ असे विरह गीत, ‘जब से पिया परदेस गमन किया’ अशा प्रकारचे भावपूर्ण गीत यांसह विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन करणारे अभंग अशा शास्त्रीय आणि उपशास्त्रीय प्रकारच्या सादरीकरणाने सद्गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवात विदुषी सानिया पाटणकर यांची संगीतमय मैफल रंगली. 
श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजित सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३४ व्या पुण्यतिथी उत्सवात  सानिया पाटणकर यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतमय मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. 
‘मेरे जोगी’ या बंदिशीने तसेच ‘सखी पिया की याद आये’ या सरगमने सानिया पाटणकर यांनी संगीत मैफिलीची सुरुवात केली. विविध प्रकारच्या ताना, ठुमरी आणि रागाने सजलेल्या त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या स्वरूपात दाद दिली. ‘सखी आज तेरी पिया विन याद आये’, ‘जब से पिया परदेस गमन किया’ यांसह यमन रागातील विविध प्रकारच्या गाण्यांनी त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. 
त्यानंतर त्यांनी ‘रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी’, ‘विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा’ अशा विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन करणाऱ्या गीतांनी संगीत मैफल सजवली. उत्तर भारतामध्ये सादर करण्यात येणाऱ्या होळी हा संगीत प्रकार  त्यांनी ‘सकल ब्रिज धूम मचाये रे’  हे राधा कृष्णाचे प्रेम संगीत सादर करून रसिकांची दाद मिळवली. माधव लिमये ( हार्मोनियम), कार्तिक स्वामी ( तबला) तसेच अपूर्वा देशपांडे, अद्वया आपटे, नितीन महाबळेश्वरकर आणि मुकुंद जोशी यांनी गायनामध्ये साथ संगत केली.

सरहद शौर्यथॉन – २०२४” या आंतरराष्ट्रीय कारगिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन ३० जून रोजी लडाख येथे

पुणे दि.११ एप्रिल : सरहद पुणे आणि भारतीय लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने व अर्हम संस्था पुणेच्या सहकार्याने ” सरहद शौर्यथॉन – २०२४” या आंतरराष्ट्रीय कारगिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवार ३० जून २०२४ रोजी लडाख येथे झोजिला वॉर मेमोरियल ते कारगिल वॉर मेमोरियल, द्रास या दरम्यान करण्यात येणार आहे. हि मॅरेथॉन झोजिला युध्द विजय अमृत महोत्सव आणि कारगिल युध्द विजय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजीत करण्यात आली असून या मॅरेथॉनमध्ये भारतासह जगातील विविध देशातील अंदाजे २००० धावपटू भाग घेणार आहेत.

सन २०१७ पासून गेली सहा वर्षे, दरवर्षी सरहदच्या वतीने कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन यशस्वीपणे कारगिल (लडाख) येथे केले आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने सरहद संस्थेला दि. ३० जून २०२४ रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यास आमंत्रित केले आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिलांसाठी ४४ किमी झोजिला वॉर व्हीक्टरी मॅरेथॉन, २५ किमी कारगिल व्हीक्टरी रन, १० किमी आणि ७.५ किमी टायगर हिल व्हिक्टरी रन या अंतराच्या स्पर्धा तसेच पुरुष, महिला आणि शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी ४ किमी अंतराची फिटनेस रन चे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांना रू.४ लाखांची रोख पारितोषिके संयोजन समिती तर्फे देण्यात येणार आहेत. वरील स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धक (बीब) क्रमांक टी शर्ट, मेडल, सहभाग सर्टिफिकेट, स्नॅक्स इ. देण्यात येणार आहे. ही स्पर्धा वर्ल्ड अॅथलेटिक्स आणि अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या नियमानुसार होतील.

हिमालयातील पर्वत रांगांमधून जाणाऱ्या आणि अतिशय आव्हानात्मक असणाऱ्या या स्पर्धा मार्गावर नियमानुसार, तांत्रिक अधिकारी, रिफ्रेशमेंट बूथ, पिण्याच्या पाण्याचे बूथ,

वैद्यकीय व्यवस्था, अद्ययावत रुग्णवाहिका, मार्गदर्शक किमी. अंतराचे बोर्डस, मोटार सायकल पायलट्स, संपूर्ण स्पर्धा मार्गावर लडाख ट्रॅफिक पोलिसांचे नियंत्रण आणि बंदोबस्त तसेच भारतीय लष्कराचे बिनतारी संदेश नियंत्रण व्यवस्था करण्यात येणार आहे.

त्या दृष्टीने पूर्व तयारी साठी भारतीय लष्कराचे लडाख मधील वरिष्ठ अधिकारी आणि सरहद, पुणे यांची संयुक्त संयोजन समिती फेब्रुवारी २०२४ मध्ये स्थापन करण्यात आली असून या समितीत सरहद संस्थेचे संजय नहार, अर्हम संस्थेचे डॉ. शैलेश पगारीया तसेच स्पर्धा संचालक सुमंत वाईकर तर तांत्रिक संचालक वसंत गोखले हे आहेत. तसेच १३ वी बटालियन जम्मू काश्मिर रायफल्स चे कर्नल अभिषेक सिंग चरक (कमांडींग ऑफिसर) व ले. कर्नल संदिप सिंग दुल्लत आणि युवराज शहा, पुणे आणि अनुज नहार, ट्रस्टी सरहद, पुणे हे समिती सदस्य आहेत. या समितीच्या ऑनलाईन झूम बैठका मागील दोन महिन्यां पासून चालू असून शौर्यथॉन ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

दिनांक १५ मार्च २०२४ रोजी मुंबई येथे स्पर्धेच्या लोगोचे आणि(www.sarhadkargilmarathon.com) या संकेत स्थळाचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यास्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक मेजर जनरल सचिन मलिक (लडाख लष्कर मुख्यालय) हे आहेत. या मॅरेथॉन मध्ये महाराष्ट्रातील धावपटूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

दिनांक ३० जून २०२४ रोजी हिमालयातील लडाख या केंद्रशासित प्रदेशात कारगील मध्ये होणाऱ्या सरहद आणि भारतीय लष्कराच्या या ऐतहासिक मॅरेथॉन स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून एका राज्याचे राज्यपाल आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांची नावे नंतर जाहीर करण्यात येतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत आढावा बैठक; एकजुटीने प्रचार करण्यासाठी विविध विषयांवर झाली सकारात्मक चर्चा.

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सहभाग

पुणे दि.११: आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिजाई या निवासस्थानी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक चर्चेद्वारे प्रचाराचा आढावा घेतला. या बैठकीला शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह माजी आमदार शरद सोनवणे, सुधीर कुरुमकर, बाळासाहेब चांदेरे, सुधीर जेव्हरे, पूजा रावेतकर, सारिका पवार, निलेश गिरमे यांसह अन्य शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बारामती, शिरूर, मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रश्नांची निरसन केले. जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येण्यासाठी सर्व शिवसैनिक एकजुटीने प्रचारात सहभागी होतील आणि महायुतीच्या उमेदवाराचे काम करतील अशी ग्वाही शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिली.

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रचारावेळी शिवसेना महिला आघाडीला देखील सामावून घ्यावे. लवकरच शिवसेना महिला आघाडीच्यावतीने जिल्हयात अनेक ठिकाणी महिला मेळावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्या भागात ज्या पक्षाची ताकद आहे त्या भागात त्या पक्षाकडे संयोजन द्यावे. अशा सूचना शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केल्या.

महात्मा फुले जयंतीदिनी पुण्यात तयार झाली तब्बल ‘दहा हजार किलोची मिसळ’

क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने आयोजन ; अयोध्येत विश्वविक्रमी शिरा बनविण्यासाठी वापरलेली भव्य कढई पहिल्यांदाच मिसळ करण्याकरिता पुण्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी वापरली

पुणे : तब्बल १५ बाय १५ फूट आणि ६.५ फूट उंच अशा तब्बल २५०० किलो वजनाच्या भव्य कढईमध्ये पुण्यात १० हजार किलो मिसळ तयार करण्यात आली. क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी हा उपक्रम गंज पेठेतील महात्मा जोतीबा फुले वाडा येथे राबविण्यात आला.

अयोध्येत तब्बल ७ हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा साकारण्याकरिता वापरलेल्या कढईत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी ही १० हजार किलो मिसळ तयार केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, मुरलीधर मोहोळ, बाळासाहेब शिवरकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाला भेट देत एकत्रितपणे मिसळीचा आस्वादही घेतला. बाळासाहेब अमराळे, प्रल्हाद गवळी, श्रीधर चव्हाण, नंदा पंडित, सारंग सराफ, सुशीला नेटके, विजय रजपूत, एकनाथ ढोले, सुनीता काळे, संतोष पंडित, पीयूष शहा, रुपेश चांदेकर, महेंद्र मारणे ,रवी चौधरी आदींनी आयोजनात सहभाग घेतला.

उपक्रमामध्ये १० हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी १००० किलो, कांदा ८०० किलो, आलं २०० किलो, लसूण २०० किलो, तेल ७०० किलो, मिसळ मसाला १४० किलो, लाल मिरची पावडर ४० किलो, हळद पावडर ४० किलो, मीठ ५० किलो, खोबरा कीस १४० किलो, तमाल पत्र ७ किलो, फरसाण २५०० किलो, पाणी १०००० लिटर, कोथिंबीर १२५ जुडी, लिंबू १००० नग इत्यादी साहित्य वापरण्यात आले. तसेच मिसळ खाण्याकरिता डिस्पोजेबल डिश ५० हजार, पाणी पिण्यासाठी डिस्पोजेबल ग्लास ५० हजार यांसह स्लाईड ब्रेड १.५ लाख नग असे साहित्य वापरण्यात आले आहे.

पुणेकरांनी कोणताही नव्याने सुरु केलेला उपक्रम हा समाजातील इतरांकरीता आदर्श ठरत असतो. त्यामुळेच यंदा सलग दुस-या वर्षी आगळ्या – वेगळ्या पध्दतीने लोकसहभागातून एकूण २० हजार किलो मिसळ तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे. लोकसहभाग असला की कितीही मोठी अवघड गोष्ट ही अगदी सहज मार्गी लागते, अशी हजारो उदाहरणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत या समाजात पहायला मिळतात. याच धर्तीवर लोकसहभागासाठी लोकांनी एकत्र येण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती घडवली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांच्या जयंती निमित्त पुणेकरांच्या सहभागातून ही दहा हजार किलोची मिसळ बनविण्यात आली. दिनांक १४ एप्रिल रोजी पुणे रेल्वे स्टेशन रस्ता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे देखील १० हजार किलो मिसळ व ताक तयार करुन अभिवादनाकरीता येणा-या बांधवांना वाटप करण्यात येणार आहे. दि. १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७ पासून हे वाटप केले जाईल.

पुण्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांनी उपक्रमात सहभाग घेतला आहे. मिसळ हे निमित्त आहे, एकत्र येण्याचे आणि महापुरुषांना वंदन करण्याचे. तरी सर्वांनी या उपक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

– क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने महात्मा फुले यांची जयंतीदिनी गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे तब्बल १५ बाय १५ फूट आणि ६.५ फूट उंच अशा तब्बल २५०० किलो वजनाच्या भव्य कढईमध्ये पुण्यात १० हजार किलो मिसळ तयार करण्यात आली.