पुणे दि.११: महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सिल्व्हर रॉक्स या निवासस्थानी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त डॉ. जेहलम जोशी यांसह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्ताने महिला शिक्षणाबरोबरच समाजात सुधारणा व्हाव्यात, तसेच सत्यशोधक विचार व शेतकरी, मजूर, गोरगरीब लोक यांना समानतेच आणि सन्मानाचे जीवन जगता यावं म्हणून त्यांनी जे प्रयत्न केले त्याच्यासाठी पुढच्याही काळामध्ये कामाची खूप गरज आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांमधून दुज्या भावाच्या विरोधामध्ये स्त्रियांचे अधिकार म्हणजेच मानव अधिकार आणि मानव अधिकार म्हणजे स्त्रियांचे अधिकार ही मुहूर्त मेढ किंवा हा जो विचार अलीकडच्या काळात जागतिक स्तरावरती सर्व देशांनी स्वीकारलेला आहे, त्याचं बीज जे आहे ते भारतामध्ये महात्मा जोतीराव फुले यांनी रोवलेले आहे. मानवतावादी विचाराचं रूप महाराष्ट्र, भारताबरोबर संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचा काम ज्या विचारवंतांनी केलं त्याच्यामध्ये महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अभूतपूर्व असं योगदान आहे.
महात्मा फुलेंनी भिडे वाड्यामध्ये जी शाळा सुरू केली होती त्याच देखील जतन करण्याचा निर्णय सरकार मधल्या सर्व सन्माननीय प्रतिनिधींनी घेतलेला आहे. मुलींच्या शिक्षणाला चालना द्यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि विशेषतः उच्च आणि तंत्रशिक्षण ज्या मुली घेत आहेत त्यापैकी आठ लाखाच्या आत ज्यांचे उत्पन्न आहे त्यांच्यासाठी पूर्णपणे फी माफी करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवरती अजून असंच कार्य समृद्ध होण्यासाठी काम व्हावं, बालविवाह सारखे प्रश्न कायमचे संपावेत यासाठी म्हणून मी महात्मा ज्योतिराव फुले यांना शतशः अभिवादन करते, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.