पुणे- अजित पवारांनी बारामतीकरांना म्हटले होते , यावेळी पवारांनांच निवडून द्या यावर बोलताना शरद पवार म्हणाले, मग यात चुकीचे काय ? फरक एवढाच ओरिजनल पवारांनाच बारामतीकर निवडून देत आलेत … ओरिजनल आणि बाहेरून येऊन पवार झालेले एवढाच काय तो फरक बारामतीकर समजून घेतील . पवारांच्या या ष्ट्कारावर अमोल कोल्हे , प्रशांत जगताप, अंकुश काकडे यांनी खळखळून हसत दाद दिली.शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली
बारामतीची जनता ही पवार आडनावाच्या मागे नेहमी उभी राहते. सन १९९१ मध्ये तुम्ही मुलगा म्हणून मला खासदारकीला निवडून दिले. दुसऱ्यांदा वडिलांना म्हणजे साहेबांना निवडून दिले. गेल्या तीन वेळा लेकीला निवडून दिले आता सुनेला म्हणजे सुनेत्रा पवारांना निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केले होते. त्यांच्या याच शाब्दिक डावपेचाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बिनतोड उत्तर दिले आहे.’अजित पवार यांच्या बोलण्यात चुकीचे काय आहे? बारामतीची जनता नेहमी पवार आडनावामागेच उभी राहते. मूळ पवार आणि बाहेरून आलेल्या पवार….’ असे शरद म्हणताच पत्रकार परिषदेत एकच हास्यकल्लोळ झाला. सुप्रिया सुळे या मूळ पवार असल्याचे सांगत सुनेत्रा पवार विवाहानंतर पवार झाल्याचे अप्रत्यक्ष सांगत बारामतीकर पवार आडनावामागेच उभी राहिल, अशी टोलेबाजी करून शरद पवार यांनी अजित पवार यांना बिनतोड उत्तर दिले.
शिरूर लोकसभेतील भाजप नेते अतुल देशमुख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुणे येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषेदत शरद पवार यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. महाविकास आघाडीचे जागावाटप, माढा आणि साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार, नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील सभा, विरोधकांचा प्रचार अशा मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. यावेळी अजित पवार यांच्या ‘बारामतीत पवार आडनावामागेच उभे राहा’ या विधानावर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांचा मिश्किल अंदाज पाहायला मिळाला.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील भाष्य केले. रामटेक येथील सभेत्या मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावर पवार म्हणाले, “नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची कितपत प्रतिष्ठा राखतायत हा प्रश्न मला पडतो. मोदी वगळता सर्व पंतप्रधानांनी विरोधकांचा सन्मान केला. लोकशाहीत विरोधकांना महत्व आहे आणि मोदी सांगतात एकही विरोधकांना निवडून देऊ नका. आज शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की पुतीन आणि नरेंद्र मोदी यात काहीच फरक नाही. “
धैर्यशील मोहिते पाटील दोन दिवसात शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीत शरद पवार गटात पक्षप्रवेश वाढत आहेत. जनमानसातलं स्थान लक्षात घेऊन पक्ष निर्णय घेत आहेत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. अतुल देशमुख यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.
संजय मंडलिक यांच्या वक्तव्यावर देखील शरद पवार यांनी वक्तव्य केले. राजघराण्यात दत्तक नवीन गोष्ट नाही. दत्तक झाल्यावर तो घराण्याचा प्रतिनिधी होतो. शाहु छत्रपती यांच्याबाबत जनतेमध्ये कृतज्ञता आहे आणि त्यांच्यावर टीका करणे, यातून विरोधकांची मानसिकता दिसून येते, असे शरद पवार म्हणाले.
धैर्यशील मोहिते पाटील मला भेटून गेले आहेत. ते दोन दिवसात पक्षात प्रवेश करणार आहेत. सर्वांसोबत चर्चा करुन पक्ष निर्णय घेत असतो. कुणाशीही लोकसभा उमेदवारीबाबत चर्चा नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.