श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग यांच्या वतीने आयोजन
पुणे : ‘स्वये श्रीराम प्रभू ऐकती’, ‘शरयू तिरावरी’, ‘दशरथा घे हे पायसदान’, ‘राम जन्मला गं सखे’, ‘जोड झणी कार्मुका’, चला राघवा चला, आज मी शापमुक्त जाहले अशा एकाहून एक सरस गीत रामायणातील रचना सादर करीत ग. दी. माडगूळकर रचित आणि स्व.सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली अजरामर कलाकृती ‘गीतरामायण’ प्रेक्षकांच्या सहभागाने सादर झाले.
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग यांच्या वतीने चैत्र नवरात्र महोत्सवांतर्गत गुढीपाडवा ते श्रीराम नवमी असे सलग ९ दिवस गीतरामायणाचे आयोजन करण्यात आले आहे. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात स्वरसंवादिनी प्रस्तुत हे गीतरामायण सुरु आहे. प्रणव कुलकर्णी आणि सहकारी गीतरामायणाचे सादरीकरण करत आहेत. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा यांसह विश्वस्त उपस्थित होते.
प्रणव कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी, मंदार लिमये यांच्यासह ज्येष्ठ गायक प्रमोद रानडे, जयश्री कुलकर्णी, अभिजित पंचभाई हे गीतांचे सादरीकरण करत आहेत. मकरंद पंडित (हार्मोनियम), श्रीधर मोडक, तुषार दिक्षित (सिंथेसायझर), निलेश कुलकर्णी (तबला), सागर चव्हाण (तालवाद्ये) असा उत्तम वाद्यवृंद कार्यक्रमास साथसंगत करीत आहे. संपूर्ण गीतरामायणाचे निवेदन अक्षय वाटवे करत आहेत.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, दिनांक १६ एप्रिल पर्यंत दररोज सायंकाळी ७.३० ते ९ यावेळेत गीतरामायणाचे सादरीकरण सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात होत आहे. तसेच श्रीरामनवमी निमित्त बुधवार, दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ विविध कार्यक्रम होणार आहेत. विशेष अर्चना, अभिषेक, राजभोग, श्रीरामजन्म सोहळा दुपारी १२ वाजता मंदिरात होईल.