पुणे दि.११ एप्रिल : सरहद पुणे आणि भारतीय लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने व अर्हम संस्था पुणेच्या सहकार्याने ” सरहद शौर्यथॉन – २०२४” या आंतरराष्ट्रीय कारगिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवार ३० जून २०२४ रोजी लडाख येथे झोजिला वॉर मेमोरियल ते कारगिल वॉर मेमोरियल, द्रास या दरम्यान करण्यात येणार आहे. हि मॅरेथॉन झोजिला युध्द विजय अमृत महोत्सव आणि कारगिल युध्द विजय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजीत करण्यात आली असून या मॅरेथॉनमध्ये भारतासह जगातील विविध देशातील अंदाजे २००० धावपटू भाग घेणार आहेत.
सन २०१७ पासून गेली सहा वर्षे, दरवर्षी सरहदच्या वतीने कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन यशस्वीपणे कारगिल (लडाख) येथे केले आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने सरहद संस्थेला दि. ३० जून २०२४ रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यास आमंत्रित केले आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिलांसाठी ४४ किमी झोजिला वॉर व्हीक्टरी मॅरेथॉन, २५ किमी कारगिल व्हीक्टरी रन, १० किमी आणि ७.५ किमी टायगर हिल व्हिक्टरी रन या अंतराच्या स्पर्धा तसेच पुरुष, महिला आणि शालेय व महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी ४ किमी अंतराची फिटनेस रन चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना रू.४ लाखांची रोख पारितोषिके संयोजन समिती तर्फे देण्यात येणार आहेत. वरील स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धक (बीब) क्रमांक टी शर्ट, मेडल, सहभाग सर्टिफिकेट, स्नॅक्स इ. देण्यात येणार आहे. ही स्पर्धा वर्ल्ड अॅथलेटिक्स आणि अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या नियमानुसार होतील.
हिमालयातील पर्वत रांगांमधून जाणाऱ्या आणि अतिशय आव्हानात्मक असणाऱ्या या स्पर्धा मार्गावर नियमानुसार, तांत्रिक अधिकारी, रिफ्रेशमेंट बूथ, पिण्याच्या पाण्याचे बूथ,
वैद्यकीय व्यवस्था, अद्ययावत रुग्णवाहिका, मार्गदर्शक किमी. अंतराचे बोर्डस, मोटार सायकल पायलट्स, संपूर्ण स्पर्धा मार्गावर लडाख ट्रॅफिक पोलिसांचे नियंत्रण आणि बंदोबस्त तसेच भारतीय लष्कराचे बिनतारी संदेश नियंत्रण व्यवस्था करण्यात येणार आहे.
त्या दृष्टीने पूर्व तयारी साठी भारतीय लष्कराचे लडाख मधील वरिष्ठ अधिकारी आणि सरहद, पुणे यांची संयुक्त संयोजन समिती फेब्रुवारी २०२४ मध्ये स्थापन करण्यात आली असून या समितीत सरहद संस्थेचे संजय नहार, अर्हम संस्थेचे डॉ. शैलेश पगारीया तसेच स्पर्धा संचालक सुमंत वाईकर तर तांत्रिक संचालक वसंत गोखले हे आहेत. तसेच १३ वी बटालियन जम्मू काश्मिर रायफल्स चे कर्नल अभिषेक सिंग चरक (कमांडींग ऑफिसर) व ले. कर्नल संदिप सिंग दुल्लत आणि युवराज शहा, पुणे आणि अनुज नहार, ट्रस्टी सरहद, पुणे हे समिती सदस्य आहेत. या समितीच्या ऑनलाईन झूम बैठका मागील दोन महिन्यां पासून चालू असून शौर्यथॉन ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
दिनांक १५ मार्च २०२४ रोजी मुंबई येथे स्पर्धेच्या लोगोचे आणि(www.sarhadkargilmarathon.com) या संकेत स्थळाचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यास्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक मेजर जनरल सचिन मलिक (लडाख लष्कर मुख्यालय) हे आहेत. या मॅरेथॉन मध्ये महाराष्ट्रातील धावपटूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
दिनांक ३० जून २०२४ रोजी हिमालयातील लडाख या केंद्रशासित प्रदेशात कारगील मध्ये होणाऱ्या सरहद आणि भारतीय लष्कराच्या या ऐतहासिक मॅरेथॉन स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून एका राज्याचे राज्यपाल आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांची नावे नंतर जाहीर करण्यात येतील.