Home Blog Page 1097

लेखन संस्कृतीच्या प्रसारासाठी डॉ. बाबासाहेबांच्या आंबेडकर सिग्नेचर एडिशन पेन महत्वाचे ठरेल – डॉ. सुरेश गोसावी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सिग्नेचर एडिशन पेनचे उद्घाटन

पुणे, : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मौलिक विचारांचा वारसा युवा पिढीपर्यंत पोचवण्यासाठी आणि वाचनाप्रमाणेच लेखन संस्कृतीच्या प्रसारासाठीही डॉ. बाबासाहेबांच्या सिग्नेचर एडिशनच्या पेनचे विशेष महत्त्व आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले. नव्या शैक्षणिक धोरणातील विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी या उपक्रमातून प्रेरणा मिळेल, असेही ते म्हणाले.

येत्या १४ एप्रिलला असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधत पुण्यातील ‘रायटिंग वंडर्स’ या संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सही असलेल्या विशेष पेनची निर्मिती करण्यात आली आहे. या सिग्नेचर एडिशनचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, रायटिंग वंडर्सचे सुरेंद्र करमचंदानी, डिक्कीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, प्रसिद्ध अभिनेते आणी दिग्दर्शक प्रविण तरडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव विजय खरे, रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सदस्य अँड. मंदार जोशी व प्रमोद करमचंदानी, मनोज उर्फ दादा खत्री यांच्या हस्ते शुक्रवारी येथे संपन्न झाले. याप्रसंगी आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. भांडारकर रस्त्यावरील पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी या विशेष पेनने स्वाक्षरी करून या पेनचे औपचारिक अनावरण केले.

डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले, ‘पेन म्हणजे लेखणी हे सर्वांत मोठे शस्त्र आहे. स्वतः बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत विपुल लेखन केले. आज लेखनाची माध्यमे बदलली असली, तरी कागदावर पेनने लिहिण्याची बाब आजही एक विशेष आनंद व समाधान देणारी आहे. हे लक्षात घेऊन डिक्कीच्या माध्यमातूनही बाबासाहेबांच्या या पेनचा आणि त्यामागील विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जाईल’.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या सिग्नेचर एडीशन पेनसाठी उच्च दर्जाच्या प्रिमिअम जर्मन रिफीलचा वापर केला आहे. दोन टोन मेटल बाॅडी असून, डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा आणि स्वाक्षरी या पेनवर कलात्मक पद्धतीने कोरली आहे. हे पेन ४५० रुपयांत तर डायरी २८० रुपयांत उपलब्ध करण्यात आली आहे. डायरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संक्षिप्त चरित्र आणि छायाचित्र आहे. हा विशेष पेन आणि डायरी एका सुंदर गिफ्ट सेट मध्ये देखील उपलब्ध असेल. हे सर्व साहित्य फर्गसन रस्त्यावरील व्हीनस ट्रेडर्स जवळील ‘रायटिंग वंडर्स’ येथे उपलब्ध असेल. अशी माहिती सुरेंद्र करमचंदानी यांनी दिली.

परशुराम वाडेकर म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीचा अमृत महोत्सव नजिक आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सिग्नेचर एडिशन पेनची निर्मिती महत्त्वाची आहे. १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीदिनी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणार्या सर्वांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ यांसोबत विद्यार्थ्यांसाठी वह्या आणाव्यात. गरजू विद्यार्थ्यांना या वह्यांचे तेथे वाटप करण्यात येईल. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात देशभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. हा विशेष पेन येत्या १४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एका स्टॉलच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध असेल असेही वाडेकर यांनी सांगितले.

डॉ. विजय खरे यांनी ‘नव्या पिढीसमोर बाबासाहेबांचे सर्व साहित्य तर उपलब्ध आहेच, आता सिग्नेचर एडिशनच्या रूपाने त्यांच्या लेखणीचा आदर्शही उपलब्ध असल्याचे सांगितले.
ॲड मंदार जोशी यांनी प्रज्ञासूर्य बाबासाहेबांच्या वैचारिक वारशाचे जतन आणि प्रसार होण्यासाठी या सिग्नेचर एडिशन पेनचे साह्य होईल, अशी आशा व्यक्त केली.
विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

मोदी नसते तर राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला नसता:राज ठाकरेंकडून मोदींचे कौतुक; राहुल गांधींना कडगुळाची उपमा, राऊतांवर निशाणा

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला नसता, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदींचे कौतुक केले आहे. निकालानंतरही अनेक प्रलंबीत कामांप्रमाणे राम मंदिराचे काम प्रलंबीत राहिले असते, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी ते माध्यमांशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळातील पहिल्या पाच वर्षातील ज्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्याता देखील मी विरोध केला. मात्र ज्या गोष्टी मला पटल्या, त्याबाबत मी कौतूकही केले होते, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मला भूमिका बदलणे आवश्यक वाटले त्यामुळे मी भूमिका बदलली, असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना देखील मी काही मागितले नव्हते आणि कौतुक करतानाही मागितले नाही. जे मला आवश्यक वाटले ते मी केले, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यात आपल्याला धर्मावर राजकारण करायचे नाही. मात्र 1992 पासून 2024 पर्यंत रखडलेली एखादी गोष्ट, ज्यामध्ये अनेक कार सेवकांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली. शरयू नदीमधील अनेक कार सेवकांची प्रेते तरंगत असल्याचे दूरदर्शनवर दाखवले जात होते. त्या सर्व कार सेवकांचा आत्मा आता शांत झाला असेल, असे म्हणत राज ठाकरे आणि राम मंदिर उभारण्याच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. इतक्या वर्ष प्रलंबित असलेला राम मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला तरी देखील उभे राहिले नसते, असे म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामाचे कौतुक केले आहे. अनेक विषय अद्यापही पेंटिंग आहे तसाच राम मंदिराचा विषय देखील पेंडिंग राहिला असता, असे देखील राज ठाकरे यांनी म्हणाले. राम मंदिर असेल किंवा कलम 370 असो, अशा सर्व महत्त्वाच्या निर्णयांचे मी आधी देखील गत केले असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

एका बाजूला कडगुळ आणि एका बाजूला खंबीर नेतृत्व त्यामुळे मी आणि पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. मोदी यांना पाठिंबा देताना महाराष्ट्रासाठी आमच्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत. त्या पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचतीलच, अशी अपेक्षा देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली. यामध्ये मराठी भाषेला राज भाषेचा दर्जा देणे, महाराष्ट्रातील गड किल्यांचे संवर्धन मादी महत्त्वाचे विषय असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र हे पूर्णपणे पुढारलेले राज्य आहे. उद्योग धंद्यामध्ये उद्योजकांना प्राधान्य द्यावे वाटेल, असे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना समान पाहणे आवश्यक असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे असल्याने त्या राज्याबद्दल त्यांच्या मनात विशेष प्रेम असणे हे साहजिक आहे. मात्र महाराष्ट्राकडे देखील तेवढ्याच तळमळीने लक्ष देणे आवश्यक असल्याची अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

कावीळ झालेल्या व्यक्तीला जग पिवळे दिसते. त्यामुळे जे आत्ताच जेलमधून बाहेर आले आहेत त्यांचा तसा विचार असू शकतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना कावीळ झाल्यामुळे त्यांना सर्व पिवळे दिसत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील काही महत्वाचे मुद्दे… राज ठाकरे यांच्याच शब्दात पहा….

२०१४-२०१९ या काळात, मी नरेंद्र मोदी सरकारवर जी टीका केली ती व्यक्तिगत टीका नव्हती तर मुद्द्यांवरची टीका होती. आणि गेल्या ५ वर्षात ज्या चांगल्या गोष्टी मोदींच्या सरकारने केल्या, त्याचं कौतुक देखील मी केलं.
काश्मीरमधून ३७० कलम हटवणं, अयोध्येत राम मंदिर उभारल्यावर त्याचं कौतुक पण मीच केलं होतं. धर्माच्या आधारावर आपल्याला राष्ट्र उभं नाही करायचं आहे, परंतु १९९२ पासून २०२४ पर्यंत राम मंदिर रखडलं होतं, जे २०२४ ला उभं राहिलं ह्याचा निश्चित मला आनंद आहे आणि ह्याचं कौतुक पण मी केलं.
१९९२ च्या आंदोलनाच्या वेळेला टीव्हीवर कारसेवकांना घातलेल्या गोळ्या, कारसेवकांची शरयू नदीत वाहणारी प्रेतं ही दृश्य लोकांनी पाहिली होती. ती दृश्य खूप चीड आणणारी होती. ह्या राम मंदिरासाठी कार सेवकांनी स्वतःच्या आयुष्याची आहुती दिली. त्यामुळे इतक्या त्यागानंतर मंदिर उभं राहिलं त्याच्याबद्दल मला प्रचंड आनंद आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो की जरी राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी जर नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते हे राम मंदिर उभंच राहिलं नसतं.
एनआरसीचा विषय असेल, ३७० कलमाचा विषय असेल किंवा राम मंदिराचा विषय असेल, नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते, तर हे विषय प्रलंबितच राहिले असते. त्यामुळे मी अनेक वेळा मोदींना फोन करून त्यांचं चांगल्या कामांसाठी व्यक्तिशः अभिनंदन देखील केलं आहे. त्यामुळे अजून काही चांगल्या गोष्टी घडवायच्या असतील तर एका बाजूला कडबोळं नेतृत्व आणि दुसरीकडे एक सक्षम नेतृत्व असा पर्याय असताना नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वाला अजून एक संधी मिळायला हवी असं मला वाटलं आणि त्यातून नरेंद्र मोदींना पाठींबा द्यायचा निर्णय आमच्या पक्षाने घेतला.
महाराष्ट्रासाठी आमच्या नरेंद्र मोदींकडे काही मागण्या आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यापासून ते महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचं संवर्धन करणं आणि तसंच मी सभेत म्हणलं तसं की तरुण-तरुणींना उत्तम शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात ह्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आणि सर्व राज्यांना एकसमान वागणूक मिळायला हवी.
भाजप-शिवसेना- राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आमच्या पक्षातील कोणाशी प्रचारासंबंधी संपर्क करायचा आहे ह्याची यादी लवकरच पक्षाकडून संबंधितांना कळवली जाईल, त्यांनी त्यांच्याशीच संपर्क करावा. आणि माझ्या सहकाऱ्यांना, ह्या उमेदवारांनी मानानेच वागवलं पाहिजे.
प्रचारासाठी सभा घ्यायच्या, कुठे घ्यायच्या ह्याचा निर्णय चर्चेअंती घेतला जाईल.
मी जो पाठींब्याचा निर्णय घेतला आहे, तो पक्षाचा विचार करून घेतला आहे, ज्यांना तो समजतच नसेल त्यांनी त्यांना वाटेल तो निर्णय घ्यावा.

हा भा X खाऊ जनता पक्ष आहे … उद्धव ठाकरे म्हणाले

उद्धव ठाकरेंना संपवून दाखवा

उद्धव ठाकरेंचे घणाघाती भाषण

मुंबई- उद्धव ठाकरे म्हणाले की, मिंधे मांडतात ते बाळासाहेबांचे विचार नाहीत. बाळासाहेबांचा एक फोन गेला की, दिल्ली चळा चळा कापायची मात्र आता दिल्लीचा एक फोन आला की दाढी थरथरायला लागते. शिंदे आजपर्यंत आपल्या मुलाची आणि पालघरची जागा घोषित करू शकले नाहीत.ज्याचा घोटाळा मोठा त्याचा मान मोठा अशी परिस्थिती सध्या भाजपमध्ये सुरु आहे. भाजपत सगळे उपरे येत आहेत. मिंधे उपरे, पवार साहेबांकडून आलेले उपरे आहेत.भाजपला गाडायचं असेल तर आत्ताच गाडा, कारण आता हे नम्र आहेत. त्यांना गाडण्याची हीच योग्य वेळ आहे. गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रात फिरत आहेत. निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने ते देशात फिरत आहेत. मी देशाच्या पंतप्रधानांवर नाही तर नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणार. शिवसेनेला तुम्ही नकली शिवसेना म्हणतात. मग ही काय तुमची पदवी आहे का जी नकली आहे.भारतीय जनता पक्ष हा भाXखाऊ जनता पक्ष आहे. भेकड म्हणण्यामागे काहीतरी कारण आहे. आता यापुढे कोण गद्दार गुजरातला जाणार हे मी पाहतो. त्याासाठीच मी पालघरला आलोय. माझ्या वडिलांना तुम्ही चोरण्याचा प्रयत्न केला. भगव्याच्या बरोबरीनेच आज कम्युनिस्टांचा लाल झेंडा फडकतोय.भाजपला गाडायचं असेल तर आत्ताच गाडा, कारण आता हे नम्र आहेत. त्यांना गाडण्याची हीच योग्य वेळ आहे. गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रात फिरत आहेत. निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने ते देशात फिरत आहेत. मी देशाच्या पंतप्रधानांवर नाही तर नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणार. शिवसेनेला तुम्ही नकली शिवसेना म्हणतात. मग ही काय तुमची पदवी आहे का जी नकली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मिंधे मांडतात ते बाळासाहेबांचे विचार नाहीत. बाळासाहेबांचा एक फोन गेला की, दिल्ली विचार करायची. मात्र आता दिल्लीचा एक फोन आला की दाढी थरथरायला लागते. शिंदे आजपर्यंत आपल्या मुलाची आणि पालघरची जागा घोषित करू शकले नाहीत.ज्याचा घोटाळा मोठा त्याचा मान मोठा अशी परिस्थिती सध्या भाजपमध्ये सुरु आहे. भाजपत सगळे उपरे येत आहेत. मिंधे उपरे, पवार साहेबांकडून आलेले उपरे आहेत.

जो यांना देईल साथ,त्यांचाच करतील हे घात… हा भाजपचा स्लोगन आहे. ज्यांचा आम्ही मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून याआधी प्रचार केला. तेच आज आम्हाला नकली म्हणत आहेत. आज अमित शहांच्या गाडीत खरे कार्यकर्ते किती आहेत आणि स्टेपनी किती आहेत. ते सांगा.उद्धव ठाकरे म्हणाले- निवडणुकीच्या तोंडावर येतील आणि सांगतील भाई और बहनो मेरा पालघर से बहोत पुराना रिश्ता है. पण हे फक्त सांगून चालणार नाही. तर ते नाते तुम्हाला जपावे पण लागतील. तसेच, वाढवण बंदर कोणासाठी केलं जात आहे, असा सवालही ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. मोदींचा परिवार म्हणजे सुटाबुटातली लोक आहेत.

निवडणुकीत दोष आणि आरोप करण्यापेक्षा जनतेत या आणि मी अडीच वर्षात काय केलं ते सांगतो. मोदींनी त्यांच्या दहा वर्षात काय केलं ते सांगावं. मोदींना त्यांच्या प्रत्येक भाषणात उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय भाषण पूर्ण होत नाही. उद्धव ठाकरेंना संपवून दाखवा हे माझं आव्हान आहे. देशाचे शत्रू संपवण्यासाठी निवडून दिलं. पण तुम्ही देशातील शत्रू संपवण्यासाठी निघाले आहेत.

अमोल कीर्तिकर यांचं नाव जाहीर होताच ईडीची कारवाई
अमोल कीर्तिकर यांनी कोरोना काळात खिचडी घोटाळा केला असा आरोप लावता. नाव जाहीर होताच त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्याच्यामागे ईडी लावली जात आहे. हीच तुमची लोकशाही आहे का. पीएम केअर फंडाचा घोटाळा झाला. त्याची चौकशी कधी होणार, असा सवालही त्यांनी केला.पीएम केअर फंड म्हणजे प्रभाकर मोरे फंड आहे का? महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील प्रभाकर मोरे यांचा केला उल्लेखही ठाकरेंनी यावेळी पीएम केअर फंडातील घोटाळ्याबाबत बोलतांना केला.तुम्हाला देशात मोदी सरकार पाहिजे की भाजप सरकार पाहिजे. कारण ते देशात मोदी सरकार अशी जाहिरात करतात. जे देशाच्या सरकारला आपलं नाव लावतात. ते उद्या देशाला आपलं नाव लावतील मग तेव्हा काय करणार… जेव्हा तुम्ही पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हाल तेव्हा तुम्ही कुठेही हे नाव लावा. पण या देशाला तुमचे नाव लावा.अबकी बार भाजपला तडीपार करून टाका. ईव्हीएममध्ये घोळ न करता एकदा आमनेसामने येऊन जनतेचा निकाल होऊन जाऊ द्या. असा थेट इशारा ठाकरे यांनी मोदींना दिला आहे.

ED, CBI व IT केंद्राची राजकीय शस्त्रे: एकीकडे स्वातंत्र्य आणि समता, दुसरीकडे RSS आणि मोदी

तिरुनेलवेली-काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी (12 एप्रिल) तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथे निवडणूक रॅली घेतली. राहुल म्हणाले की, भारतात विचारधारेचे युद्ध सुरू आहे. एका बाजूला न्याय, स्वातंत्र्य आणि समता आहे. दुसऱ्या बाजूला RSS, PM मोदी आणि त्यांचे सरकार आहे.

काँग्रेस खासदार म्हणाले- आज केंद्र सरकार ईडी, सीबीआय आणि आयटीचा राजकीय हत्यार म्हणून वापर करत आहे. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान स्वतः करतात. निवडणुकीच्या दोन महिने आधी काँग्रेसची बँक खाती गोठवली जातात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहेत.

राहुल म्हणाले- भारतात अनेक भाषा, संस्कृती आणि इतिहास आहे. आपल्यासाठी सर्व काही समान आणि महत्त्वाचे आहे. मात्र, मोदी म्हणतात एक देश, एक नेता आणि एक भाषा. यावरून लढा सुरू आहे. तमिळ, बंगाली आणि देशातील इतर भाषांशिवाय भारत पूर्ण होऊ शकत नाही.

राहुल पुढे म्हणाले- भाजपचे नेते उघडपणे सांगतात की ते पुन्हा सत्तेत आले तर ते संविधान बदलतील. पंतप्रधान मोदींना फक्त या देशाच्या अर्थ आणि दळणवळण व्यवस्थेवर आपली मक्तेदारी आहे याची काळजी आहे. पूर्वी संपूर्ण जग भारताला लोकशाहीचा दीपस्तंभ म्हणायचे. ते आज म्हणतात की भारताची लोकशाही ही आता लोकशाही राहिलेली नाही.

राहुल म्हणाले- आमचे सरकार झाले तर केंद्रात 30 लाख नोकऱ्या देऊ

तरुणांना प्रशिक्षण देण्याचे आणि केंद्र सरकारमधील 30 लाख रिक्त पदांवर नोकऱ्या देण्याचे आश्वासनही राहुल गांधींनी दिले. ते म्हणाले- केंद्रात इंडिया ब्लॉकची सत्ता आल्यास तरुणांना रोजगार देण्याच्या दिशेने मोठी पावले उचलली जातील.

केंद्रात 30 लाख पदे रिक्त आहेत. यावर तरुणांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. सर्व पदवीधर आणि पदविका पदवीधारकांसाठी राईट टू ॲप्रेंटिसशिप कायदा संसदेत मंजूर केला जाईल.

खरगे म्हणाले- लोकसभेचा निकाल इंडिया ब्लॉकच्या बाजूने लागला

दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकातील कलबुर्गी येथे त्यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी यांच्या समर्थनार्थ निवडणूक रॅली काढली. यावेळी ते म्हणाले- लोकसभा निवडणुकीचा प्रवाह इंडिया ब्लॉकच्या बाजूने आहे. मोदींना याची भीती वाटते. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर रॅली आणि रोड शो घेत आहेत.

खरगे म्हणाले- देशातील जनतेला प्रत्येकी 15 लाख रुपये, कोट्यवधी नोकऱ्या आणि शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. त्यांनी अयोध्येतील राममूर्तीवर शपथ घेऊन किती आश्वासने पूर्ण केली ते सांगावे.

पीएम देवाचे नाव घेतात आणि गरिबांना महागाईने चिरडतात. काँग्रेसची मनरेगा योजना आणि कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या पाच गॅरंटीमुळे आज गरीब जनता जिवंत आहे.

मोदी-शहांच्या वॉशिंग मशिनमध्ये सर्वकाही स्वच्छ होते – खरगे

खरगे म्हणाले- पीएम मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे, ज्यामध्ये केवळ कपडेच नाही तर माणसांनाही टाकले जाते. एकदा आपण एखाद्या व्यक्तीला त्यात टाकले की ते स्वच्छ बाहेर येतात.

काँग्रेस अध्यक्ष म्हणाले- ज्यांच्यावर भाजपने खटला दाखल केला होता, ते त्यांच्या पक्षात जाऊन स्वच्छ झाले. तुम्ही (मोदी) म्हणाले होते की भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही, पण आज तेच लोक तुमच्या शेजारी बसले आहेत. तुम्ही भ्रष्ट लोकांसोबत सरकार चालवत आहात.

जात पडताळणी समितीकडून जातवैधता प्रमाणपत्राकरिता विशेष मोहीम

पुणे, दि.१२: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यामध्ये आयोजित ‘समता पंधरवडा’ निमित्त सन २०२३-२४ बारावी विज्ञान आणि पदवी अभ्यासक्रम प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

नुकत्याच बारावीच्या परीक्षा झाल्या असून एमएचटीसीईटी, नीट, जेईई, एमबीए, पी.एचडी, बीएस्सी अॅग्री, बी-फार्म, बीएस्सी नर्सिंग आदी व्यवसायिक अभ्यासक्रम तसेच अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्षाला प्रवेशोत्सुक विद्यार्थांना जात प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक असते. मागासवर्गीय विद्यार्थांना सांविधानिक आरक्षणातून लाभ मिळत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बार्टी च्या https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रत जिल्हा जात पडताळणी समिती पुणे -३ विश्रांतवाडी येरवडा येथील कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावी.

अर्जासोबत अर्जदाराचे जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, महाविद्यालयाचे शिफारस पत्र, शपथपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट आदी नियमानुसार लागणाऱ्या पुराव्याच्या साक्षांकित प्रती जोडून आपल्या जात पडताळणीचा परिपूर्ण अर्ज तात्काळ वेळेत सादर करावा. अर्ज वेळेत सादर न केल्यास विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशासाठी वंचित राहण्याची शक्यता आहे.

जात वैधता प्रमाणपत्राकरिता अगोदर अर्ज सादर केलेल्या व त्रुटी अभावी अर्ज प्रलंबित असलेल्यांना समितीने मोबाईल/ ई-मेल द्वारे संदेश पाठविले आहेत. अशा अर्जदारांनी देण्यात आलेल्या सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रे घेऊन व आपली त्रुटीची पूर्तता करण्यासाठी प्रत्यक्ष जिल्हा जात पडताळणी कार्यलयात उपस्थित रहावे. महाविद्यालये, विद्यार्थी व पालकांनी जात पडताळणी प्रस्ताव कार्यालयाकडे जमा करावेत, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त तथा जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. दिनेश डोके, उपायुक्त तथा सदस्य डॉ.दीपक खरात आणि संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव संतोष जाधव यांनी केले आहे.

जिल्ह्यातील शस्त्रपरवानाधारकांना शस्त्र जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे दि. १२: भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७४ चे कलम १४४ तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम १७(३)(ए) व (बी) नुसार छाननी समितीच्या बैठकीत निर्णय झाल्याप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी लोकसभा निवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून जिल्ह्यात ३३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३ हजार ३१८ शस्त्रपरवानाधारकांना त्यांच्याकडील ३ हजार ३५९ शस्त्रे सबंधित पोलीस ठाण्यांना जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

हे आदेश ६ जूनपर्यंत लागू राहतील. संबंधित पोलीस विभागाने शस्त्र परवानाधारकांना त्यांचे परवान्यावरील शस्त्र जमा करण्याबाबतचा आदेश बजावावेत. शस्त्र परवानाधारकांनी अशाप्रकारचे आदेश प्राप्त होताच कोणत्याही परिस्थितीत सात दिवसाच्या आत त्यांच्याकडील शस्त्र जमा करावीत. पोलीस विभागाने शस्त्रे जमा करून घेण्याची व्यवस्था करावी. जमा केलेल्या शस्त्रांचे कोणतेही नुकसान होणार नाही तसेच ज्या स्थितीत शस्त्रे जमा केली होती त्याच स्थितीत धारकास परत करण्याची दक्षता घ्यावी. ६ जून नंतर ७ दिवसाच्या आत संबंधितांना त्यांची शस्त्रे परत करावीत. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मोदी पुन्हा सत्तेत आल्यास राजासारखे वागतील व जनतेला गुलाम बनवतील.

लोकसभेची निवडणूक स्वातंत्र्याची दुसरी लढाई, हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारला सत्तेतून पायउतार करा: नाना पटोले.

काँग्रेसचे सरकार आल्यास ३० लाख पदांची नोकरभरती, गरिब महिलांना वर्षाला १ लाख रुपये तर जीएसटीमुक्त शेती करणार.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भंडारा जिल्ह्यात प्रचार.

भंडारा, दि. १२ एप्रिल
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाचे उमेदवार मोदींच्या नावाने मताचा जोगवा मागत आहेत. मोदींना मतदान का करायचे? मोदींनी महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, शेतकरी उद्धवस्त केला, गरिबी वाढवली, आपले जवान सीमेवर दररोज शहिद होत आहेत म्हणून मतदान करायचे का? असा सवाल विचारात मोदींना मतदान मागण्याचा काही अधिकार नाही. मोदी पुन्हा सत्तेत आल्यास ‘वन नेशन, नो इलेक्शन’ करुन राजासारखे वागतील आणि जनतेला गुलाम बनवतील, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील ब्रम्ही, सावरला, भुयार, वलनी, मांगली, आसगाव, कोंडा, चिंचाळ गावांना भेटी दिल्या व जनतेशी संवाद साधला. यावेळी नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी भरघोस आश्वासने दिली होती, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देणार, शेतीचे उत्पन्न दुप्पट करणार, महागाई कमी करणार परंतु यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदींनी नोकऱ्या तर दिल्या नाहीतच पण ज्या नोकऱ्या होत्या त्याही गमवाव्या लागल्या. राज्यातील तरुण शिक्षित मुले विविध स्पर्धा परीक्षा देतात पण पेपर फुटण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांचे स्वप्न भंग होत आहे. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास केंद्र सरकारची ३० लाख सरकारी पदे भरणार, पेपरफुटीला लगाम घालणारा कायदा केला जाईल, पदवीधर किंवा डिप्लोमा धारकाला प्रशिक्षण देऊन वर्षाला १ लाख रुपये विद्यावेतन देणार, गरीब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार तर शेतमालाला एमएसपीचा कायदा, कर्जमाफी आणि शेती जीएसटीमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. जातनिहाय जनगणना करणार तसेच आदिवासींना जल, जंगल, जमीनचा अधिकार देणार.
नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर ते वन नेशन, नो इलेक्शन करुन राजासारखे वागतील व जनतेला गुलामासारखे वागवतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानही संपवू असे भाजपचे नेते रोज म्हणत आहेत. लोकसभेची यावेळची निवडणूक ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून मोदींच्या तानाशाही सरकारला सत्तेतून पायउतार करा आणि काँग्रेस, इंडिया आघाडीला विजयी करा, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.

महाराष्ट्रासाठी २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्यांची तरतूद

लोकसभा निवडणूक २०२४

मुंबई, दि. १२ : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्या लागणार आहेत. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात आले आहे.

राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांमध्ये ९८ हजार ११४ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे १ लाख ९६ हजार २२८ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. याशिवाय १ लाख ९६ हजार २२८ शाईच्या बाटल्यांबरोबरच १० टक्के अधिक अशा एकूण २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्या त्याचबरोबर मतदानासाठी आवश्यक ते साहित्य येत्या काही दिवसात पोहोच करण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत प्रयत्न सुरु आहेत.

या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकरिता राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये ९ कोटी २४ लाख ९१ हजार ८०६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. या सर्व बाटल्या राज्याला प्राप्त झाल्या असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते.

मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे.

मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलींग ऑफीसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.

लोकशाही वाचवण्यासाठी व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी धंगेकरांना संसदेत पाठवा-वंदना चव्हाण

पुणे : देशात लोकशाही संपवण्यासाठी सर्व प्रयत्न होत असून भाजपा देशाला हुकूमशाहीकडे नेत आहे.  भ्रष्टाचारी लोकांना वाशिंग मशीन मध्ये टाकून स्वच्छ करण्याचा वाव ते  आणत आहे, हे सामान्य जनता कदापिही खपवून घेणार नाही. लोकशाही वाचवण्यासाठी व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना संसदेत पाठवण्याचा  आवाहन माजी खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी केले. तळागाळातील जनतेने त्यांना पाठींबा दिला असून  वकिलांनी देखील पाठींबा देऊन त्यांचा विजय निश्चित केला आहे, असा विश्वास माजी खासदार वंदना चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

स्वातंत्र्य लढ्यात वकिलांचे मोठे योगदान होते. आता हे स्वातंत्र्यभाजपा हिरावू पाहत आहे हा त्यांचा डाव कदापिही यशस्वी होणार नाही.  जनता भाजपाला घराचा रस्ता दाखवून देणार आहे असेही यावेळी ऍड. वंदना चव्हाण यांनी नमूद केले.

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी शुक्रवारी शिवाजी नगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील विविध विभागाला भेटी दिल्या. या वेळी वकिलांनी धंगेकर यांना पाठिंबा जाहीर करून लोकशाही जिवंत ठेवणारा उमेदवार आम्ही संसदेत पाठवणार असल्याची ग्वाही वकिलांनी दिली. निवृत्त माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. अभय छाजेड, माजी खासदार ऍड. वंदना चव्हाण यावेळी उपस्थित होते.

   काँग्रेस लीगल सेल, राष्ट्रवादी लिगल सेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात धंगेकर यांचा सत्कार करण्यात आला. 

काँग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष ऍड. राहुल ढाले, ऍड.विभा सिंग, ऍड. राशिदा सय्यद, अंजू डिसूजा, संजय साळवी, अश्विनी गवारे, अलका कडलक, फय्याज शेख, राजेंद्र शिंदे, अमोल नलगे, रवींद्र शिंदे, रेश्मा शिकलगार, मोहन वाडेकर, चंद्रशेखर जाधव, विठ्ठल आरुडे, संतोष जाधव, अजय नवले, हैदर पटेल, नाथा शिंगाडे, सतीश संचेती, सतीश कांबळे यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येक न्यायालयात जाऊन वकिलांच्या भेटी धंगेकर यांनी घेतल्या. त्यांचे आपुलकीने स्वागत करण्यात येत होते. जनसामान्यांतला नेता  आम्ही संसदेत पाठवणार आहोत. सामान्यांचे प्रश्न संसदेत मांडणारा लोकशाही जिवंत ठेवणारा पक्षाचा माणूस आम्ही देणार आहोत त्यामुळे आम्हाला आनंदच आहे, आशा भावना वकिलांनी व्यक्त केल्या. पुणे बार असोसिएशन, दि पूना वकिलांची ग्राहक सहकारी सोसायटी, दि पुणे लॉयर्स सोसायटी, जिल्हा महिला बार असोसिएशन, दिवाणी व फौजदारी न्यायालय, स्थानिक बार असोसिएशन, पूना बार क्लब, महिला वकील क्लबच्या वकील व सदस्यांशी धंगेकर यांनी संवाद साधला. लोकशाही वाचवणारा व आमचा चेहरा आम्हाला मिळाला आहे, विजय तुमचा निश्चित आहे, अशा भावना यावेळी वकिलांनी त्यांच्याशी बोलतांना व्यक केल्या. तसेच समाजामध्ये लोकोपयोगी खासदार धंगेकर यांच्या रुपात आम्ही पाहतो आहे, अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

धंगेकर म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या वकिलांची ताकत मला मिळाली आहे. त्यामुळे मला हत्तीचे बळ आले आहे. हीच ताकद मी लोकशाही वाचवण्यासाठी वापरणार आहे. सध्या लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे सामान्य पेक्षा वकिलांना जास्त लढावे लागणार आहे. पुढील पिढीला वाचवण्यासाठी परिवर्तनाचा लढा आपल्याला द्यावा लागणार आहे. नागरिकांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. मी जनसामान्यांतून पुढे आलो आहे मी आलो त्यामुळे त्यांचे प्रश्न मला माहित आहे, ते सोडवण्यासाठी मी 24 तास आपल्याला उपलब्ध आहे. निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील म्हणाले, सर्व वकील वर्गांनी लोकशाही वाचवण्यासाठी धंगेकर यांना पाठींबा दिला आहे.

धंगेकर यांच्या प्रचार कार्यासाठी काँग्रेसभवन येथे प्रेस रूमचे उद्घाटन

पुणे –

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार कार्यासाठी काँग्रेस भवन येथे प्रेस रूमचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष व समन्वयक अरविंद शिंदे, उमेदवार रवींद्र धंगेकर आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष, माजी आमदार व प्रचार प्रमुख मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आनंद, माध्यम समन्वयक प्रवीण प्र वाळिंबे व राज अंबिके, सुधाकरन पणीकर, विनोद निनारीया, दीपक निनारीया तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. 

          या प्रेस रूम मधून रोज सर्व प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया व सोशल मिडिया यांना दरोजच्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे मेळावे, पदयात्रा, जाहीर सभा, कोपरा सभा, पत्रकार परिषदा, आदीच्या बातम्या व फोटो पाठवले जाणार आहेत.

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचा इशारा, बाबासाहेबांचे संविधान जपण्याची ही शेवटची संधी:’वंचित’ला मतदान न करण्याचे आवाहन

मुंबई- सत्ताधारी भाजपची युती गद्दारांची आहे. या गद्दारांच्या युतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा विजय होणे महत्त्वाचे आहे. यासाठी कुणीही एमआयएम व वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये, असे आवाहन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनावर वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप घेत त्यांची टीका फेटाळून लावली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसोबतची जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे त्यांनी एकला चलो रेची भूमिका घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यांनी मविआविरोधात उमेदवारही दिले. आता त्यांच्या निर्णयावर तुषार गांधी यांनी टीकेची झोड उठवली आहे. तुषार गांधी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, भाजपची युती ही गद्दारांची युती आहे. तिचा पराभव झाला पाहिजे. यासाठी मतदारांनी एमआयएम व वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नये. महाविकास आघाडीला मतदान करावे, असे ते म्हणाले.

यापूर्वी जी चूक झाली तीच पुन्हा होण्याची भीती आहे. त्यामुळे आमची कितीही चांगली मैत्री असली तरी चुकीला चूक म्हणण्याची वेळ आला आली आहे. कारण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्याची ही शेवटची संधी आहे, असे तुषार गांधी म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीचे प्रत्युत्तर

दुसरीकडे, तुषार गांधी यांच्या या टीकेला वंचित बहुजन आघाडीने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, प्रस्थापित पक्ष व त्या पक्षांच्या राजकारणाला मदत करणाऱ्या सहयोगी घटकांची शोषित व वंचितांचे राजकारण उभे राहू नये अशी इच्छा आहे. त्यामुळे ते सातत्याने असे प्रयत्न करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही असाच विरोध झाला. त्यांच्यावरही इंग्रजांचे हस्तक असल्याचे आरोप झाले. तेच नरेटिव्ह आता प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी वापरले जात आहे. प्रकाश आंबेडकर लोकशाहीचा वास न पोहोचलेल्या पालापर्यंत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ते येथील प्रस्थापितांना सहन होत नाही, असे ते म्हणाले.

तुषार गांधींचे भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या व काँग्रेसमधून भाजपत गेलेल्या पलटूरामांवर काय विचार आहेत? महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांपैकी एखादा पक्ष उद्या भाजपसोबत जाणार नाही याची खात्री त्यांना देता येईल का? आम्हाला बी टीम म्हणणे सोपे आहे. पण यांच्याकडील नेते कधी जातील हे सांगता येत नाही. तुषार गांधी ज्या काँग्रेसच्या बाजूने नेहमी बोलतात, त्या काँग्रेसचा एक प्रवक्ता परवा शिंदे गटात गेला. त्यावर तुषार गांधींचे काय म्हणणे आहे? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये जातात आणि एकनाथ खडसे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून पुन्हा भाजपत जातात यावरही त्यांचे काय विचार आहेत? अशा विविध प्रश्नांचा भडिमार सिद्धार्थ मोकळे यांनी या प्रकरणी तुषार गांधी यांच्यावर केला.

पिंपरीतील सात वर्षीय मोहम्मद अलीने पूर्ण केले रमजान चे ३० रोजे

पिंपरी (दि.१२) मुस्लीम धर्मात रमजान महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. बहुतांशी मुस्लिम धर्मीय या महिन्यात सलग ३० दिवस दररोज उपवास करून नमाज अदा करतात. या निर्जल उपवासांना फार महत्व आहे. पिंपरीतील नेहरूनगर परिसरात राहणाऱ्या मोहम्मद अली मोतसिम दळवी या सात वर्षांच्या चिमुकल्याने यावर्षी ३० उपवास पूर्ण केले. एवढ्या लहान वयात त्याने केलेल्या उपवासांबाबत त्याचे मुस्लिम बांधवांकडून कौतुक केले जात आहे.
मोहम्मद अली हा पिंपरीतील ज्युडसन हायस्कूलचा विद्यार्थी असून तो इयत्ता पहिली मध्ये शिकत आहे. त्याचे वडील पिंपरीत वाहनचालक म्हणून काम करतात तर आई समिया या गृहिणी आहेत. मोहम्मद अली याने गतवर्षी देखील सलग २० दिवस रमजानचे उपवास केले होते. कोवळे वय आणि कडक उन्हाळा अशा परिस्थितीत त्याने हे उपवास पूर्ण केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इस्लामिक कॅलेंडर नुसार नववा महिना रमजानचा असतो. या महिन्याला मुस्लीम समाजात सर्वात पवित्र महिना मानला जातो. रमजानच्या महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत निर्जल उपवास केला जातो. पहाटे सूर्योदयाला सहेरी करून उपवास ठेवला जातो आणि सूर्यास्त झाल्यानंतर खजूर खाऊन उपवास सोडणे सुन्नत मानले जाते. इस्लामिक मान्यतेनुसार, खजूर हे पैगंबर हजरत मोहम्मद यांचे आवडते फळ होते. ते देखील खजूर खाऊनच रोजा सोडायचे. त्यामुळे मुस्लिम धर्माचे लोकही उपवास सोडण्यासाठी आधी खजूर खातात आणि त्यानंतर इतर पदार्थांचे सेवन करतात.
मोहम्मद अली ने देखील दररोज दिवसाचे १४ तासांहून अधिक काळ उपवास केला. शाळेची दिनचर्या सकाळी ७ ते २ सांभाळून त्याने कुठेही न ढळता हे उपवास पूर्ण करीत तसेच महिनाभर नमाज अदा करीत अल्ल्हाची इबादत केली आहे. त्याने केलेले व्रत समाजातील इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे त्याचे शहरभर कौतुक होत आहे.

डॉ. कुमार सप्तर्षी यांना “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज सुधारक पुरस्कार

भिमजयंती साठी पुणे शहरात मध्यवर्ती समितीची स्थापना अध्यक्षपदी राहुल डंबाळे तर कार्याध्यक्षपदी शैलेंद्र मोरे यांची नियुक्ती शहरातील मंडळांसाठी आदर्श भिमजयंती स्पर्धा

डॉ. कुमार सप्तर्षी यांना “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज सुधारक पुरस्कार
दरम्यान महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्ष पुरोगामी चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या युवक क्रांती दलाचे संस्थापक व माजी आमदार ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांना यावर्षी नव्याने देण्यात येणारा “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज सुधारक पुरस्कार “ मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे . सदर कार्यक्रम 13 एप्रिल रोजी सायं. पाच वाजता गांधी भवन , कोथरुड येथे होणार आहे.

पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त पुणे शहरातील विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी राहुल डंबाळे व कार्याध्यक्षपदी शैलेंद्र मोरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

१४ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वा. ठिक पुणे शहरातील प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी , सामाजिक चळवळीतील नेते , प्रशासकीय अधिकारी व जयंती समितीचे सभासदांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे संयुक्त अभिवादन करण्यात येणार आहे.

अभिवादनासाठी येणार्या अनुयायांना पालिकेकडून सुविधा
नव्याने स्थापन झालेल्या समितीच्या वतीने पुणे शहरांमध्ये भीम जयंती साजरी करणाऱ्या सुमारे सहाशे मंडळ व संस्थांसाठी “ आदर्श भीम जयंती स्पर्धा “ आयोजित करण्यात आली आहे. उत्कृष्ट देखावा , समाज प्रबोधनपर कार्यक्रम , मिरवणूक इत्यादींसाठी स्वतंत्रपणे लाखो रुपयांची बक्षीसे देण्यात येणार आहेत. समितीच्या वतीने यापूर्वी पोलीस आयुक्त अमितेश कुमार , मनपा आयुक्त राजेंद्र भोसले व पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदने सादर करण्यात आली होती. निवेदनाच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे येणाऱ्या लक्षावधी अनुयायांना उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून मंडप व्यवस्था , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , शौचालयाची व्यवस्था तसेच पुतळा परिसराची सजावट करून घेण्यात आलेली आहे.

कार्यक्रमांना रात्री बारापर्यंत परवानगी
कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून भिमजयंतीच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर परवाना असल्याने 14 एप्रिल रोजी कोणत्याही मिरवणुका अथवा कार्यक्रम रात्री बारापर्यंत चालू ठेवण्यास कोणीही विरोध करू नये , असे आदेश सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी कळविले आहे. तसेच आचारसंहितेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त सूचना विचारात घेऊनच जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे व त्याबाबतच्या सूचना सर्व मंडळांना समितीच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत.

आदर्श भीम जयंती स्पर्धे अंतर्गत मंडळाकडून साजरी केले जाणार्या जयंतीचा आढावा व अहवाल नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या विशेष परीक्षण समितीच्या माध्यमातून प्राप्त करून घेऊन त्याद्वारे तीन गटांमध्ये सुमारे लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. सदर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा मे महिन्यातील बुद्ध जयंतीच्या दिवशी समारंभ पूर्वक करण्यात येणार आहे.

उन्हाची काळजी घ्यावी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्ण कृती पुतळ्याला अभिवादन करायला येणाऱ्या नागरिकांनी उन्हाचे प्रमाण लक्षात घेऊन त्यापासून संरक्षण करणारी टोपी , छत्री व अन्य साहित्याचा उपयोग करावा, असे आव्हान समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

राहुल गांधी उद्या शनिवारी १३ एप्रिलला भंडाऱ्यात तर मल्लिकार्जून खर्गे रविवारी १४ ला नागपुरात.

मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधींच्या प्रचार सभेला मविआचे प्रमुख नेते उपस्थित राहणार.

मुंबई, दि. १२ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरु असून काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभांचा झंझावातही सुरु झाला आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांच्या प्रचारार्थ न्याययोद्धा राहुल गांधी यांची उद्या शनिवार दिनांक १३ एप्रिल रोजी दुपारी ३ वा. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील गजानन महाराज मंदिराच्या मैदानात जाहीर सभा होत आहे. या प्रचार सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.

रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे नागपुरातील गोळीबार चौक येथे दुपारी ४ वाजता प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा होत आहे, त्याआधी सकाळी मल्लिकार्जून खर्गे हे दिक्षाभूमीला भेट देणार आहेत.
नागपुर, रामटेक, भंडारा-गोदिया, गडचिरोली-चिमूर व चंद्रपूर या विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील निवडणुक होत असून या पाचही मतदारसंघात काँग्रेस व महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतलेली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुनिल केदार यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचार सभा, रॅली, चौकसभा यासह घरोघरी जाऊन मतदारांना भेटण्यावरही भर दिला जात आहे. या पाच मतदारसंघात दिनांक १९ एप्रिलला मतदान होत आहे.

राज्य अजिंक्य स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूंना ‘पुनीत बालन ग्रुप’कडून इलेक्ट्रिक बाईक

पुणे :
रोहा (जि. रायगड) या ठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या ४२ व्या कुमार – मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२२-२३ या स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूंना ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने इलेक्ट्रिक बाईक बक्षीस देण्यात आली.

धाराशिव येथील अश्विनी शिंदे आणि ठाणे जिल्हयातील रूपेश कोंडाळकर (जि. ठाणे) अशी या दोन्ही खेळाडूंची नावे आहेत. या दोघांना ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते या बाईक नुकत्याच सुपूर्द करण्यात आल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पुनीत बालन यांनी स्पर्धेतील दोन सर्वोत्कृष्ट खेळाडूंना इलेक्ट्रिक बाइक देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही बक्षिसे देण्यात आली.

पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून युवा खेळाडूना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. यापूर्वी विविध खेळ खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना दत्तक घेण्यात आले असून त्यांची संपूर्ण जबाबदारी ‘पुनीत बालन ग्रुप’ने घेतली आहे. यामध्ये होतकरु आणि गुणी खेळाडूंचा समावेश असल्याने या खेळाडूंच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्यासाठी या मदतीचा मोठा उपयोग होतो.


‘‘खेळाडूंमध्ये असलेल्या गुणांची कदर करून त्यांना योग्य वेळी योग्य मदत केली तर आपल्यामागे कुणीतरी आहे असा विश्वास त्यांच्यात निर्माण होतो आणि त्यांच्याकडून अधिक चांगली कामगिरी होऊ शकते. याच भावनेतून हे बक्षीस देण्यात आलं आहे. हेच युवा खेळाडू भविष्यात क्रिडा क्षेत्रात राज्याचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करतील असा विश्वास आहे.’’
– पुनीत बालन, युवा उद्योजक.