पिंपरी (दि.१२) मुस्लीम धर्मात रमजान महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. बहुतांशी मुस्लिम धर्मीय या महिन्यात सलग ३० दिवस दररोज उपवास करून नमाज अदा करतात. या निर्जल उपवासांना फार महत्व आहे. पिंपरीतील नेहरूनगर परिसरात राहणाऱ्या मोहम्मद अली मोतसिम दळवी या सात वर्षांच्या चिमुकल्याने यावर्षी ३० उपवास पूर्ण केले. एवढ्या लहान वयात त्याने केलेल्या उपवासांबाबत त्याचे मुस्लिम बांधवांकडून कौतुक केले जात आहे.
मोहम्मद अली हा पिंपरीतील ज्युडसन हायस्कूलचा विद्यार्थी असून तो इयत्ता पहिली मध्ये शिकत आहे. त्याचे वडील पिंपरीत वाहनचालक म्हणून काम करतात तर आई समिया या गृहिणी आहेत. मोहम्मद अली याने गतवर्षी देखील सलग २० दिवस रमजानचे उपवास केले होते. कोवळे वय आणि कडक उन्हाळा अशा परिस्थितीत त्याने हे उपवास पूर्ण केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इस्लामिक कॅलेंडर नुसार नववा महिना रमजानचा असतो. या महिन्याला मुस्लीम समाजात सर्वात पवित्र महिना मानला जातो. रमजानच्या महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत निर्जल उपवास केला जातो. पहाटे सूर्योदयाला सहेरी करून उपवास ठेवला जातो आणि सूर्यास्त झाल्यानंतर खजूर खाऊन उपवास सोडणे सुन्नत मानले जाते. इस्लामिक मान्यतेनुसार, खजूर हे पैगंबर हजरत मोहम्मद यांचे आवडते फळ होते. ते देखील खजूर खाऊनच रोजा सोडायचे. त्यामुळे मुस्लिम धर्माचे लोकही उपवास सोडण्यासाठी आधी खजूर खातात आणि त्यानंतर इतर पदार्थांचे सेवन करतात.
मोहम्मद अली ने देखील दररोज दिवसाचे १४ तासांहून अधिक काळ उपवास केला. शाळेची दिनचर्या सकाळी ७ ते २ सांभाळून त्याने कुठेही न ढळता हे उपवास पूर्ण करीत तसेच महिनाभर नमाज अदा करीत अल्ल्हाची इबादत केली आहे. त्याने केलेले व्रत समाजातील इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे त्याचे शहरभर कौतुक होत आहे.