भिमजयंती साठी पुणे शहरात मध्यवर्ती समितीची स्थापना अध्यक्षपदी राहुल डंबाळे तर कार्याध्यक्षपदी शैलेंद्र मोरे यांची नियुक्ती शहरातील मंडळांसाठी आदर्श भिमजयंती स्पर्धा
डॉ. कुमार सप्तर्षी यांना “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज सुधारक पुरस्कार
दरम्यान महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्ष पुरोगामी चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या युवक क्रांती दलाचे संस्थापक व माजी आमदार ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांना यावर्षी नव्याने देण्यात येणारा “ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज सुधारक पुरस्कार “ मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे . सदर कार्यक्रम 13 एप्रिल रोजी सायं. पाच वाजता गांधी भवन , कोथरुड येथे होणार आहे.
पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त पुणे शहरातील विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी राहुल डंबाळे व कार्याध्यक्षपदी शैलेंद्र मोरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
१४ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वा. ठिक पुणे शहरातील प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी , सामाजिक चळवळीतील नेते , प्रशासकीय अधिकारी व जयंती समितीचे सभासदांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे संयुक्त अभिवादन करण्यात येणार आहे.
अभिवादनासाठी येणार्या अनुयायांना पालिकेकडून सुविधा
नव्याने स्थापन झालेल्या समितीच्या वतीने पुणे शहरांमध्ये भीम जयंती साजरी करणाऱ्या सुमारे सहाशे मंडळ व संस्थांसाठी “ आदर्श भीम जयंती स्पर्धा “ आयोजित करण्यात आली आहे. उत्कृष्ट देखावा , समाज प्रबोधनपर कार्यक्रम , मिरवणूक इत्यादींसाठी स्वतंत्रपणे लाखो रुपयांची बक्षीसे देण्यात येणार आहेत. समितीच्या वतीने यापूर्वी पोलीस आयुक्त अमितेश कुमार , मनपा आयुक्त राजेंद्र भोसले व पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदने सादर करण्यात आली होती. निवेदनाच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे येणाऱ्या लक्षावधी अनुयायांना उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून मंडप व्यवस्था , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , शौचालयाची व्यवस्था तसेच पुतळा परिसराची सजावट करून घेण्यात आलेली आहे.
कार्यक्रमांना रात्री बारापर्यंत परवानगी
कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून भिमजयंतीच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर परवाना असल्याने 14 एप्रिल रोजी कोणत्याही मिरवणुका अथवा कार्यक्रम रात्री बारापर्यंत चालू ठेवण्यास कोणीही विरोध करू नये , असे आदेश सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी कळविले आहे. तसेच आचारसंहितेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त सूचना विचारात घेऊनच जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे व त्याबाबतच्या सूचना सर्व मंडळांना समितीच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत.
आदर्श भीम जयंती स्पर्धे अंतर्गत मंडळाकडून साजरी केले जाणार्या जयंतीचा आढावा व अहवाल नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या विशेष परीक्षण समितीच्या माध्यमातून प्राप्त करून घेऊन त्याद्वारे तीन गटांमध्ये सुमारे लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. सदर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा मे महिन्यातील बुद्ध जयंतीच्या दिवशी समारंभ पूर्वक करण्यात येणार आहे.
उन्हाची काळजी घ्यावी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्ण कृती पुतळ्याला अभिवादन करायला येणाऱ्या नागरिकांनी उन्हाचे प्रमाण लक्षात घेऊन त्यापासून संरक्षण करणारी टोपी , छत्री व अन्य साहित्याचा उपयोग करावा, असे आव्हान समितीच्या वतीने करण्यात येत आहे.