Home Blog Page 1096

रेड झोनचे क्षेत्र कमी केल्याने किवळे-रावेतच्या रहिवाशांना दिलासा – श्रीरंग बारणे

पुणे/पिंपरी: देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या भोवतीचे प्रतिबंधित क्षेत्र (Redzone)अर्थात रेड झोन कमी करण्याचा निर्णय घेऊन केंद्रातील मोदी सरकारने किवळे, रावेत भागातील रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे, असे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शनिवारी) सांगितले.

खासदार बारणे यांनी आज रावेत परिसरातील काही लोकप्रतिनिधी व मान्यवरांची (Redzone)घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. नामवंत उद्योजक नंदकुमार भोंडवे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.‌

त्यावेळी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहर प्रमुख नीलेश तरस, युवा सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, देहूगाव शहर प्रमुख सुनील हागवणे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार तसेच प्रकाश भोंडवे, दिवाणजी भोंडवे, बाळासाहेब भोंडवे, सोमनाथ भोंडवे, राम भोंडवे, सुनील भोंडवे, दीपक भोंडवे, शांताराम भोंडवे, अतुल भोंडवे, सुनील मोरे आदी उपस्थित होते.खासदार बारणे म्हणाले, रेड झोनचा प्रश्न बराच गुंतागुंतीचा होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य पटवून दिल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने रेड झोनचे क्षेत्र कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रावेत, किवळे भागातील रेड झोन बाधित रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत लवकरच महत्वपूर्ण निर्णय – खासदार श्रीरंग बारणे

पुणे/ पिंपरी:अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत राज्य शासन लवकरच महत्त्वपूर्ण (Chinchwad)निर्णय घेणार आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शनिवारी) दिली.

खासदार बारणे यांच्या प्रचारासाठी उद्योजक तात्या आहेर यांच्या निवासस्थानी(Chinchwad) वाल्हेकरवाडी व चिंचवडेनगर भागातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बारणे बोलत होते. बैठकीस माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शामराव वाल्हेकर, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद भावसार तसेच श्रीधर वाल्हेकर, सुरेश चिंचवडे, शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, राजेंद्र चिंचवडे, बिभिषण चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शहरातील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर आपण मंत्रालयावर मोर्चा नेला होता, याची आठवण करून देत खासदार बारणे म्हणाले की, अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी सरकार वेगळा मार्ग काढत आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच होईल.

पवना व इंद्रायणी नदी शंभर टक्के स्वच्छ होईल, अशी ग्वाही देत नदीत सांडपाणी थेट सोडले जाऊ नये यासाठी 650 कोटी रुपये खर्च करून मैलाजल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या दहा वर्षात खासदार म्हणून मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा बारणे यांनी यावेळी सादर केला.

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा देण्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने श्रीधर वाल्हेकर यांनी बारणे यांना धन्यवाद दिले. खासदार बारणे यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल सचिन चिंचवडे यांचा यावेळी बारणे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. श्रीधर वाल्हेकर यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र चिंचवडे यांनी आभार मानले. बिभीषण चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ.आंबेडकर समाज सुधारक पुरस्कार डॉ. कुमार सप्तर्षी यांना प्रदान

पुणे:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज सुधारक पुरस्कार ‘ डॉ. कुमार सप्तर्षी यांना प्रदान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पुर्वसंध्येला म्हणजे दि.१३ एप्रील २०२४ रोजी सायंकाळी हा पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मुरलीधर जाधव यांच्या हस्ते देण्यात आला. जमियत उलमा ई हिंद चे अध्यक्ष मोहम्मद कारी इद्रिस आणि रिपब्लिकन युवा मोर्चा च्या अध्यक्ष सुवर्णा डंबाळे , समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, कार्याध्यक्ष शैलेंद्र मोरे, उत्सव प्रमुख नागेश भोसले, उपाध्यक्ष संजय आल्हाट,जांबुवंत मनोहर, संदीप बर्वे,आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन शैलेंद्र मोरे यांनी केले.आभार जुबेर मेमन यांनी मानले.गांधी भवन , कोथरुड येथे हा कार्यक्रम झाला.या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे.

मुरलीधर जाधव म्हणाले, ‘पूर्वी आंबेडकर चळवळी समोरील शत्रू हे मनुस्मृतीच्या रुपात समोर होते,आताचे शत्रू हे सोशल मीडियाचा रूपात आहेत,त्यामुळे आजचे आव्हान मोठे आहे.आजच्या सरकारला घटना बदलण्यासाठी चारशे पार खासदार हवे आहेत, राहुल डंबाळे म्हणाले,’गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांचा कालानुरुप समन्वय डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या कार्यात आहे. त्यामुळे समितीचा पहिल्या वर्षीचा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे’.या वेळी इद्रीस कारी ,जांबुवंत मनोहर यांचीही भाषणे झाली.

सत्काराला उत्तर देताना डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले,’महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासाने सामाजिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या योग्य-अयोग्य याचे विश्लेषण करून निर्णय घेता येतात. सध्या ब्राह्मणवादालाच हिंदुत्व म्हणणारे हे सरकार घालवणं हेच राजकीय दृष्ट्या योग्य आहे.त्यामुळे सर्व भारतीयांनी हे सरकार घालवण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.कुणी जातीचा, धर्माचा अभिमान बाळगत असेल तर त्याची खऱ्या भारतीयांना दुर्गंधी येते, कंटाळा येतो, तेव्हा सर्वांनी खरं मानवता धर्म आणि भारतीय जात मानण्यातच शहाणपण आहे’.संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क प्रत्येक भारतीयाला दिलेला आहे , या हक्कावर गदा आल्यास एकटा व्यक्ती याचिका दाखल करू शकतो, ही बाबासाहेबांची दूरदृष्टी होती’.

भारताच्या मालकीची किती बेटे आहेत,हे परराष्ट्र मंत्र्यांना माहिती आहे का ?

– काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार यांचा सवाल

– अपयश झाकण्यासाठी भाजप नेते खोटा इतिहास‌ सांगत आहेत

पुणे : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या परदेशी नितिवर भाष्य करणारे देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना भारताच्या मालकीची किती बेटे आहेत, हे माहिती आहे का ? असा‌ सवाल काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार यांनी उपस्थित केला. गेली दहा वर्षात केंद्र सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून खोटा इतिहास सांगितला जात असल्याचा आरोपही पवार यांनी केला.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बालगंधर्व रंग मंदिरातील कार्यक्रमात शुक्रवारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या परदेश नितीवर भाष्य केले. या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेस भवन येथे उल्हास पवार यांनी पत्रकार परिषद घेवून जयशंकर व भाजपच्या कारभाराचा समाचार घेतला. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड उपस्थित होते.

पवार म्हणाले, पंडीत नेहरूंनी 100 पेक्षा अधिक देशांशी संवाद ठेऊन समन्वय ठेवला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया अशा दोन गटात जग विभागले गेले होते. अशावेळी नेहरू यांनी या दोन्ही पासून अलिप्त असणाऱ्या देशांची मोट बांधली होती. परराष्ट्र सचिव राहिलेल्या जयशंकर यांना सर्व इतिहास माहिती असतानाही त्यांनी पुण्यात तरुण आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न  केला आहे. अमेरिकेने युनोचे पद देऊ केले पण नेहरूंनी स्वीकारलं नाही, असे जय शंकर  म्हणाले. मुळात युनोमध्ये सर्व देशांचे मत मिळाल्याशिवाय सदस्यत्व देता येत नाही. मग केवळ अमेरिका अथवा रशिया कसे सदस्यत्वाची ऑफर कशी देऊ शकतात? असा‌ सवालही पवार यांनी उपस्थित केला.

उलट 10 वर्षात नेपाळ, मालदीव यांसारखे देश आपल्या विरोधात गेले. श्रीलंकेलगतच्या बेटाचा विषय सत्तेतील 10 वर्षानंतर समोर आणला जातो. चीनने गिळंकृत केलेल्या  40 हजार चौ. की.मी.  जागेबाबत भाजप नेते अवाक्षर काढत नाहीत. भाजपची पायाखालची वाळू सरकली असल्याने ते दिशाभूल करीत आहेत.

केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून नेहरू यांची बदनामी करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. नेहरू आणि गांधी घराण्याची बदनामी केल्याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नाही. गेल्या दहा वर्षात सरकारला आलेले अपयश लपवण्यासाठी खोटा इतिहास सांगितला जात आहे. अफवा पसरवण्यामध्ये आरएसएस सुरुवातीपासून आघाडीवर आहे. स्वातंत्र्य लढ्यात देश विरोधी भूमिका घेणारे आज स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर आरोप करून बदनामी करत आहेत.

निवडणुक जिंकण्यासाठी भाजपने कुठल्याही स्तराला जाऊ नये, अशी विनंती आहे, असेही पवार म्हणाले.

“माझे आरोग्य-माझा मूलभूत अधिकार “गांभीर्याने अंमलबजावणी आवश्यक!

प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पिण्याचे पाणी,  शुद्ध हवा, आवश्यक पोषणमूल्य युक्त आहार,  चांगले घर,  चांगले वातावरण आणि काम करण्यासाठी सकारात्मक परिस्थिती  असणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार किंवा हक्क असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने वारंवार सांगितले आहे.

दि.  7 एप्रिल रोजी ‘जागतिक आरोग्य दिन’ साजरा करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने  ‘आरोग्य’ हा  मूलभूत मानवी अधिकार असल्याचे  जाहीर केले आहे. “माझे आरोग्य – माझा अधिकार” ही या वर्षाची संकल्पना (थीम) आहे. या महत्त्वपूर्ण संकल्पनेमध्ये  सहभागी होऊन आपण  देशभरात सर्वंकष आरोग्य सेवा सुविधा निर्माण करण्याची नितांत गरज आहे. त्याचा घेतलेला हा धांडोळा.

जागतिक आरोग्य दिन दरवर्षी 7 एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. यानिमित्ताने आरोग्याशी संबंधित असलेल्या समस्या व त्याबाबतच्या अधिकारांबाबत जनजागृती केली जाते. 1950 मध्ये पहिल्यांदा हा जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेबरोबरच जागतिक आरोग्य दिनाची पायाभरणी करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी एक वेगळी संकल्पना ( थीम) घेऊन हा जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो.  करोना महामारीच्या कालावधीमध्ये जगभरातील एकूणच आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले होते. भारत, अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांमध्ये  कार्यान्वित असलेली आरोग्य सेवा यंत्रणा कुचकामी असल्याचे आढळले.  या महामारीमुळे जगभरातील पर्यावरणाचे संकट व वाढती सामाजिक, आर्थिक दरी जास्त स्पष्ट होऊन सर्वसामान्यांना आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. 2024 या वर्षाची “माझे आरोग्य माझा अधिकार “अशी थीम आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीला अत्यावश्यक आरोग्य सेवा, आरोग्य शिक्षण व त्या संबंधित सर्व माहिती मिळावी असा  या संकल्पने मागचा  उद्देश आहे. प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पिण्याचे पाणी,  शुद्ध हवा, आवश्यक पोषणमूल्य युक्त आहार,  चांगले घर,  चांगले वातावरण आणि काम करण्यासाठी सकारात्मक परिस्थिती  असणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार किंवा हक्क असल्याचे मान्य करण्यात आले आहे.

जगातील 140 पेक्षा जास्त देशांनी आरोग्य हा मूलभूत हक्क असल्याचे मान्य केलेले असले तरीही जागतिक आरोग्य परिषदेच्या ताज्या अहवालावरून जगातील 50 टक्के लोकसंख्येलाही अद्याप  योग्य किंवा आवश्यक किमान आरोग्य सेवा सुविधा मिळत नसल्याचे स्पष्टपणे नमूद  करण्यात आले आहे. सामाजिक न्याय किंवा कायदेविषयक बदल यांच्या पलीकडे जाऊन जगातल्या प्रत्येक व्यक्तीला वाजवी आरोग्य सेवासुविधा पुरवल्या गेल्याच पाहिजेत असा आग्रह जागतिक आरोग्य संघटनेने या निमित्ताने धरलेला आहे. त्यासाठी आरोग्यविषयक  समानता प्रत्येक देशात निर्माण झाली पाहिजे अशी यामागे धारणा आहे.

भारताने 1983, 2002, व 2017 मध्ये राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर केले.देशात सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे मोठ्या प्रमाणावर आहेत. या पार्श्वभूमीवर  सध्याची  आरोग्य सेवा “सर्वंकष आरोग्य सेवा” निर्माण करून देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा लाभ दिला जाईल यासाठी सर्व म्हणजे राष्ट्रीय, राज्य, स्थानिक अशा सर्व पातळ्यांवर एक दिलाने, एक विचाराने प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. समाजातील विविध आर्थिक व भिन्न समुदायांमध्ये आरोग्य सेवा सुविधांबाबत मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. त्यादृष्टीने सर्व समावेशक आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन योग्य ती पावले टाकण्याची गरज आहे. भारतातील आरोग्य सेवा सुविधांचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की देशातील तळागाळात असलेले दारिद्र्य, गरीबी, वाढती आर्थिक असमानता, त्यांच्याबाबत केला जाणारा भेदभाव, त्यांना कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसणे, त्याचबरोबर आरोग्यवर्धक अन्नधान्य, स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ व शुद्ध हवा, व निवासासाठी योग्य घरे हीच प्रमुख वाजवी किंवा सर्वसमावेशक आरोग्य सेवा सुविधा न मिळण्याची कारणे आहेत.

या देशातील प्रत्येक नागरिकाला आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा तसेच समान आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचा मूलभूत घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे केंद्र किंवा राज्य सरकारांनी केवळ कायदे करून  किंवा कागदी घोडे नाचवून काही होणार नाही तर प्रत्यक्षात सर्व पातळ्यांवर आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध होतील किंवा कसे याची अत्यंत बारकाईने, काळजीपूर्वक आखणी, नियोजन व अंमलबजावणी करण्याची गरज आहे.  शासनाच्या जोडीला वैद्यकीय व सेवा क्षेत्रात खाजगी उद्योगाला परवानगी दिल्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर रुग्णालये उभी राहिली आहेत. किंबहुना भारतात आरोग्य सेवा सुविधा देणे हा मोठा नफा कमवण्याचा धंदा कॉर्पोरेट जगतासाठी झालेला आहे. या तुलनेत शासकीय पातळीवरील रुग्णालयांमधील अनास्था, प्रशासकीय दुर्लक्ष, औषधांचा तुटवडा आणि एकूणच आरोग्य व रुग्णांबाबतची  उदासीनता मोठ्या प्रमाणावर दुर्दैवाने जाणवते. खाजगी आरोग्य सेवा क्षेत्र व औषध निर्माण क्षेत्रानेही याबाबत सामाजिक जबाबदारी व बांधिलकी लक्षात घेऊन योग्य ते सहकार्य सरकारला करण्याची गरज आहे.

जागतिक पातळीवरील कोट्याधिश श्रीमंतांची  यादी नुकतीच प्रसिद्ध झाली. त्यात भारतातील 200 कोट्याधिशांचा समावेश आहे. त्यापैकी तब्बल 36 कोट्याधीश देशाच्या आरोग्य सेवा सुविधा क्षेत्रातील आहेत. त्यात गेल्या दोन-चार वर्षात त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. भारतातील खाजगी  आरोग्य सेवा सुविधा क्षेत्राला भरमसाठ नफा मिळवण्यासाठी कोणतीही आडकाठी,  निर्बंध नाहीत.

केंद्र शासनाने जन स्वास्थ्य अभियान हाती घेतले आहे त्यात अनेक सेवा सुविधांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.सार्वजनिक आरोग्य सेवा, खाजगी आरोग्य सेवा सुविधा, औषध निर्माण क्षेत्र व प्रत्येक नागरिकाचा सार्वजनिक सेवा सुविधा मिळवण्याचा अधिकार याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.  त्यात खऱ्या अर्थाने पारदर्शकता व प्रमाणीकरण याचा अभाव आहे.वैद्यकीय व्यवसाय हा केवळ नफ्याचे साधन म्हणून न वापरता त्यांनी सामाजिक बांधिलकी जपणे तेवढेच आवश्यक आहे.  रुग्णांच्या हक्काचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे.

याबाबतचे अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर पुण्यातील सर्वात जुन्या व मोठ्या ससून सर्वोपचार रुग्णालयातील स्थिती म्हणजे अनास्थेचा कळस आहे. या रुग्णालयात काही दिवसापूर्वी आयसीयू मधील रुग्ण उंदीर चावल्याने मृत्युमुखी पडल्याची अत्यंत वेदनादायक घटना घडली. एवढेच नाही तर समाजाला व्यसनाधीन बनवणाऱ्या ड्रग रॅकेटचे गुन्हेगार या रुग्णालयात राजरोसपणे मुक्कामाला होते, यासारखी दुसरी शरमेची गोष्ट नाही. त्यामध्ये केवळ वैद्यकीय यंत्रणाच नाही तर पोलीस यंत्रणाही किती भ्रष्ट झालेली होती हे चव्हाट्यावर आलेले आहे. संपूर्ण राज्यात किंवा देशभरात यापेक्षा काही वेगळे चित्र कोणत्याही शासकीय  रुग्णालयात असेल अशी शक्यता जवळपास नाही. किंबहुना देशातील आरोग्य सेवा सुविधा यंत्रणा ही भ्रष्टाचाराचे, अकार्यक्षमतेचे अड्डे बनावेत यासारखी दुसरी दुर्दैवी घटना नाही. करोना महामारीच्या काळातही अनेक राजकीय पक्षांनी यामध्ये हात धुवून घेतले ही गोष्ट तर आपल्याला लाज आणणारी होती. त्याचे कोणालाही सोयर सुतक नाही.

देशाच्या ग्रामीण भागांमध्ये जिल्हा परिषदा किंवा ग्रामपंचायतच्या पातळ्यांवर चांगल्या दर्जाची प्राथमिक आरोग्य सेवा सुविधा केंद्रे निर्माण करून तेथे  योग्य त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, परवडणाऱ्या किमतीमध्ये औषधे उपलब्ध करणे ही काळाची गरज आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा योजना,  प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, राज्य विमा योजना यांचे देशभरातील जाळे व्यापक आहे. मात्र तेथील कर्मचारी, वैद्यकीय  अनास्था, भ्रष्टाचार, अकार्यक्षमता देशाच्या आरोग्य सेवांच्या मुळावर आलेली आहे. अर्थात हे केवळ भारतातीलच आव्हान नाही तर जागतिक पातळीवरही आरोग्य सेवा सुविधांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. केवळ श्रीमंतांनाच सर्वच आरोग्यपूर्ण सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि गोरगरिबांना किंवा तळागाळातल्या नागरिकांना वंचित रहावे लागणे हे भारतासारख्या खंडप्राय देशाला भूषणावह नाही. एका बाजूला जागतिक पातळीवरील मोठी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारताला प्राथमिक मूलभूत गरजा पुरवणारी सक्षम आरोग्य सेवा सुविधा निर्माण करणे हे अशक्य तर नाहीच परंतु अग्रक्रमाने निर्माण करणे अत्यावश्यक आहे. देशातील औषध निर्माण उत्पादन क्षेत्र जगासाठी खूप महत्त्वाचे ठरत असले तरीही ज्याप्रमाणे केंद्र सरकारने करुणा महामारी बाबत सर्व जनतेला मोफत लस उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे सर्व प्रकारची महत्त्वपूर्ण औषधे उपलब्ध करून देणे यासाठी योग्य ते धोरणात्मक बदल केलेच पाहिजेत. त्यादृष्टीने केंद्र सरकारने हाती घेतलेले “राष्ट्रीय एक आरोग्य अभियान”  याकडे सर्वांनीच गांभीर्याने पाहून योग्य ती अंमलबजावणी करावी ही अपेक्षा. त्यासाठीच हा लेखन प्रपंच.

प्रा. नंदकुमार काकिर्डे

*(लेखक पुणे स्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार व बँक संचालक आहेत).

१० वर्ष मोदी अदानीसाठी काम करत आहेत.

भंडारा/मुंबई, दि. १३ एप्रिल

काँग्रेस पक्षाने जाहिरनाम्यात सर्वात महत्वाचे ५ मुद्दे दिले आहेत. हा जाहीरनामा खूप विचार करुन बनवला असून बंद खोलीत नाही तर देशभरातील लाखो लोकांना भेटून तो बनवला आहे. काँग्रेसचा जाहिरनामा खऱ्या अर्थाने ‘जन की बात’ आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, जीएसटीमुक्त शेती, स्वामिनाथन समितीच्या अहवालानुसार एमएसपीचा कायदा, ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणे, अग्निवीर योजना बंद करणार तसेच हिंदुस्थानातील गरिब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार असल्याचे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे.

विदर्भातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची भंडारा जिल्ह्यातील साकोलीत भव्य जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खासदार चंद्रकांत हंडारे, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, माजी मंत्री सतीष चतुर्वेदी, भंडारा गोंदिया लोकसभेचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे गडचिरोली चिमूरचे काँग्रेस उमेदवार ड़ॉ. नामदेव किरसन, नागपूरचे उमेदवार आ. विकास ठाकरे, चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोकर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, आ. अभिजीत वंजारी, आ. सहसराम करोटे, माजी खा. मधुकर कुकडे, माजी खा. खुशाल बोपचे, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, यांच्यासह विदर्भातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, एससी एसटी, आदिवासी, ओबीसी समाजाची सरकारमध्ये भागिदारी अत्यल्प आहे. जेवढी लोकसंख्या तेवढाच अधिकार त्या समाजाला मिळाला पाहिजे यासाठी काँग्रेस सरकार सत्तेत येताच जातनिहाय जनगणना व आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण करण्याचे क्रांतीकारी काम करणार आहे. मोदी सरकारवर हल्लाबोल करत राहुल गांधी म्हणाले की, सरकार मोदींचे नाही तर अदानीचे आहे, एका अरबतीचे सरकार आहे व नरेंद्र मोदींनी १० वर्षात त्यांच्यासाठीच काम केले. आज देशातील विमानतळे, बंदरे, रस्ते, खाण, कोळसा, सौरऊर्जा सर्वकाही अदानी यांचेच झाले आहे.

नरेंद्र मोदी २४ तास धर्म, हिंदू-मुस्लीम यावरच बोलतात, एका समाजाला दुसऱ्याविरोधात लढवतात व तुमची संपत्ती अदानीच्या घशात घालतात. जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकारने जनतेला लुटले आहे. नरेंद्र मोदी यांनी ओबीसी, शेतकरी, छोटे व्यापारी, कामगार, गरीब, आदिवासी यांच्यासाठी काय केले? देशात सर्वात मोठा प्रश्न महागाई व बेरोजगारीचा आहे पण मोदी त्यावर कधीच बोलत नाहीत. कोरोना काळात गंगा नदीत हजारो मृतदेह दिसत होते पण नरेंद्र मोदी मात्र जनतेला टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, मोबाईल टॉर्च लावा असे सांगत होते. कधी ते समुद्राच्या तळात जातात व पुजा करतात, मोदींनी देशाची थट्टा चालवली आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, काँग्रेसच्या जाहिरनाम्यात जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच मागास, आदिवासी, ओबीसी समाजाच्या हितासाठी आर्थिक, सामाजिक सर्वेक्षणही केले जाणार आहे. याचा लाभ भंडारा जिल्ह्याला होणार असून या जिल्ह्यात एससी, एसटी, भटके विमुक्त, आदिवासी व ओबीसी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. काँग्रेसच्या जाहिरनाम्यात शेतकरी, कामगार, तरुण, महिला व गरिबांसाठी आश्वासने दिली आहेत त्याबद्दल राहुल गांधी यांना मनापासून धन्यवाद देतो.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, जेंव्हा जेंव्हा समतेचा विचार अडचणीत आला, राज्यघटना, लोकशाही अडचणीत आली, काँग्रेस पक्ष अडचणीत आला तेंव्हा तेंव्हा विदर्भाची जनता काँग्रेस सोबत राहिली आहे. युपीए सरकार असताना अनेक विकास कामे केले पण भाजपाने धर्माच्या नावावर मते मागून समाजात वाद निर्णाम केला. भाजपा धर्माच्या नावावर मते मागत आहे त्याला फसू नका काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. राहुल गांधी यांनी देशभर पदयात्रा काढून न्यायपत्र आणले आहे, जनतेसाठी गॅरंटी घेऊन आले आहेत. या गॅरंटीमधून सर्वसामान्य जनतेच्या जिवनात आनंद निर्माण होणार आहे. राहुल गांधी हे जनतेची गॅरंटी घेऊन आले आहेत. काँग्रेस पक्षाला मतदार करुन विजयी करा असे आवाहन थोरात यांनी केले.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, मोदी सरकारने महागाई प्रचंड वाढवली, काँग्रेस सरकारच्या काळात असेलला ४०० रुपयाचा सिलेंडर भाजपाला महाग वाटत होता पण आज तो ११०० रुपये झाले तरी भाजपाला तो महाग वाटत नाही. वीज बिल १० टक्के वाढवून वीजही महाग केली आहे. अदानीच्या स्मार्ट मीटरच्या सामान्य जनतेला लुटले जाणार आहे. या लुटारू सरकारला सत्तेतून खाली खेचा व काँग्रेसला साथ द्या, काँग्रेस, महाविकास आघाडीचे सरकार केंद्रात आणा असे वडेट्टीवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या, दररोज ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. केंद्र सरकारने तीन काळे कायदे आणले त्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले, त्यात ७०० शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा फायदा केवळ विमा कंपन्यांना झाला. राज्य सरकारची १ रुपयात पीकविमा योजना सुद्धा फसवी आहे. भाजपा सरकार जनतेची कामे करत नाही म्हणून या सरकारचा पराभव करा व काँग्रेस, इंडिया आघाडीचे सरकार आणा.

यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी : मुरलीधर मोहोळ

  • गिर्यारोहक, गिरीप्रेमी, दुर्गप्रेमी, सायकलपटू, क्रीडापटूंचा स्नेहमेळावा
  • मेळाव्यातून यशाचे ‘शिखर’ गाठण्याचा निर्धार

पुणे (प्रतिनिधी) – ऐतिहासिक वारसा जतन करण्यात गिरीप्रेमी आणि दुर्गप्रेमींचे योगदान खूप महत्वपूर्ण आहे. गिर्यारोहक आणि सायकलपटूंचा उत्साह पाहून नक्कीच मला प्रेरणा मिळते. पण या मेळाव्यात येऊन निसर्ग संपन्न पुण्याची नव्याने ओळख मला या निसर्गप्रेमींकडून झाली आहे. या मेळाव्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या आहेत त्या सर्व पूर्ण करण्यासाठी मला तुम्ही सगळे साथ द्या. कारण इथे येऊन निसर्वप्रमींची जी साथ मला मिळाली आहे. ती मला यशाचे शिखऱ गाठण्यासाठी उर्जा देणारी आहे असे भाजप– शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) व मित्र पक्षांच्या महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी येथे सांगितले.

सिंहगड परिवार फाउंडेशन, नरवीर पिलाजीराव गोळे प्रतिष्ठान, गरुडझेप आणि झेप गिर्यारोहण संस्था अशा संस्थाच्या संयुक्त विद्यमाने गिर्यारोहक, गिरीप्रेमी, दुर्गप्रेमी, सायकलपटू, क्रीडापटूंच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मोहोळ बोलत होते. यावेळी मोहोळ यांचा गिर्यारोहकांच्या वतीने अनोखे स्वागत करण्यात आले. यावेळी गिरीप्रेमी संस्थेचे अध्यक्ष उमेशजी झिरपे, ज्येष्ठ गिर्यारोहक सुनिताताई नाडगीर, पाच ग्रिनीज रेकॉर्ड होल्डर प्रीती मस्के, निरूमा भावे, डॉ नंदकिशोर मते, सुरेंद्र दुग्गड, लहु उघडे, हर्षल राव, मोहन ओगले, विकास करवंदे, नारायण बतुल, प्रकाश केदारी, सौरभ करडे, मारुती आबा गोळे यांच्यासह सर्व गिरीप्रेमी, दुर्गप्रेमी, सायकलपटू आणि क्रीडापटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, ‘मी स्वत: खेळाडू असल्याने खेळामुळे मानसिक आणि शारिरीक जडणघडण कशी होते?, ते मी अनुभवलं आहे. आता आमच्यावेळच्या खेळात साहसी खेळांचीही भर पडली आहे. इथे सह्याद्रीपासून एव्हरेस्टपर्यंत झेप घेणारे अनेकजण मला दिसत आहेत. यापुढे साहसी खेळांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल याबद्दल विश्वास बाळगा’.

या जोखमीच्या क्षेत्रात वावरतांना अनेक बांधवांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या या सगळ्या धाडसीवीरांना मोहोळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी खेळाडूंच्यावतीने पुणे शहर हे निसर्गाशी जवळीक साधणारे शहर असून येथे गेल्या काही वर्षात साहसी खेळांची आवड तरूणांच्यात वाढत आहे. पुणे हे सह्याद्रीच्या कुशीत असल्याने येथे साहसी खेळांच्या सुविधा वाढवल्या तर त्याचा फायदा निसर्ग पर्यटनाला होऊ शकतो. दुर्गप्रेमींनी राज्यातील सर्व किल्यांवर प्लास्टिक वापराला बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली.

पी जोग शाळा बंद होणार असल्याने विद्यार्थी वाऱ्यावर!

पुणे- आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी येथे म्हटलेले आहे की,’पी बी जोग प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी कोथरूड तसेच सिंहगड रोड येथील शाळा दोन वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने बंद करणार असे शाळा संचालक अमोल जोग यांनी डिसेंबर २०२३ रोजी सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात आत्ताच शाळा बंद केली गेली असून या शाळेमध्ये आरटीई राखीव जागा मार्फत गरीब आणि वंचित घटकातील शिकत असलेल्या मुलांना वाऱ्यावर सोडून दिले गेले आहे. पुणे शहरामध्ये सीबीएससी अभ्यासक्रम शिकवणाऱ्या खूपच कमी शाळा आहेत तसेच इंग्रजी शाळा सुद्धा कमी आहेत. अशातच आर टी इ मार्फत सीबीएससी चा अभ्यासक्रम शिकलेला मुलांना आता आरटीई मधून कुठे प्रवेश मिळणार याची मोठी अडचण झालेली आहे. या दोन्ही शाळा मिळून साधारण 132 विद्यार्थी हे शाळा प्रवेशासाठी वाट पाहत आहे.


मुकुंद किर्दत यांनी असेही सांगितले कि,’ यासंदर्भात शाळेतील पालकांनी शिक्षण आयुक्त यांना लेखी निवेदन दिले होते. 5 मार्च रोजी शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी या विद्यार्थ्यांचे नजिकच्या खाजगी विनाअनुदानित शाळांमधील रिक्त जागांवर समायोजित करण्यास मान्यता दिली. परंतु त्यानंतर पालक शिक्षण मंडळ तसेच विविध अधिकाऱ्यांकडे चकरा मारत होते.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ही शाळा बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यातच आर्थिक दुर्बल असणाऱ्या पालकांना इतर शाळांमध्ये प्रवेश मिळवणे परवडणारे नाही.
यासंदर्भात पी जोग शाळेतील पालक आणि आम आदमी पार्टीचे/आप पालक युनियनचे मुकुंद किर्दत, ऍड अमोल काळे आदींनी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची भेट देऊन या विषयाचे गांभीर्य त्यांना लक्षात आणून दिले.त्यासंदर्भात समायोजन करण्याचे आदेश निघूनही पुढील कार्यवाही झालेली नसल्यामुळे पालकांनी जिल्हा शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांची भेट घेऊन तातडीने इतरत्र इंग्रजी शाळांमध्ये आरटीई मधून च्या तोट्यामधील रिक्त जागांची आकडेवारी जमा करण्याचा आग्रह धरला.सर्वच पालक मध्यमवर्गीय आणि नोकरदार असल्यामुळे रजा घेऊन यासाठी पाठपुरावा करणे अवघड जात असल्याने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा असा आग्रह पालकांनी धरलायावर तातडीने यावर्षीच्या रिक्त जागांची आकडेवारी तपासून 23 व 24 एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे समायोजन केले जाईल असे आश्वासन शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांनी दिले आहे.

या संदर्भात बोलताना मुकुंद किर्दत म्हणाले ‘अचानक शाळा बंद करण्याची पद्धत घातक असून हा शिक्षणाच्या खाजगीकरणाचा मोठा धोका आहे. यामुळे हजारो मुलांना मोठा शैक्षणिक फटका बसतो. गरीब पालकांच्या बाबतीत तरी समस्या अधिकच गंभीर आहे. शिक्षण ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असून त्यासाठी दर्जेदार आणि सर्व सुविधायुक्त शाळा सरकारने उभ्या करायला हव्यात.

या संदर्भात शाळेचे संचालक अमोल जोग अथवा कोणाशी संपर्क होऊ शकला नाही

शामकांत माटे यांचे निधन

पिंपरी (दि. १३) पिंपरी गावातील ज्येष्ठ नागरिक शामकांत विनायकराव माटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते सत्तर वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पिंपरी गावातील पवना नदीकाठी स्मशानभूमीत संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोथरुड येथे प्रशिक्षण

पुणे,दि.१३ : पुणे लोकसभा मतदार संघांतर्गत कोथरुड विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी नियुक्त १ हजार ३० अधिकारी- कर्मचाऱ्यांना यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊ गलांडे, तहसीलदार अंजली कुलकर्णी, नायब तहसीलदार स्वप्नील खोल्लम उपस्थित होते.

प्रशिक्षणादरम्यान सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गलांडे यांनी मतदान प्रक्रियेविषयी माहिती दिली. मतदान केंद्राध्यक्षांनी मतदानाच्या दिवशी करावयाचे मशीन सिलिंग, करावयाचे घोषणापत्र व घ्यावयाची काळजी आदीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी व्हीव्हीपॅट व ईव्हीएमबाबत माहिती देऊन हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

यावेळी क्षेत्रीय अधिकारी, समन्वय अधिकारी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे केंद्रप्रमुख व सहायक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

‘ताई, वहिनी, मावशी, आजी मतदानाला चला’ उपक्रम राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पुणे, दि.१३: जिल्ह्यात निवडणुकीतील महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी आता घरोघरी भेट देऊन महिलांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. मागील निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावरील मतदानाची टक्केवारी वाढावी आणि येत्या ७ मे रोजी बारामती व १३ मे रोजी पुणे, मावळ आणि शिरूर मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्व वयोगटातील महिलांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी ‘ताई, वहिनी, मावशी, आजी मतदानाला चला’ हा अभिनव उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे जिल्हा परिषद, पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून मतदान जनजागृतीसाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘ताई, वहिनी, मावशी, आजी मतदानाला चला’ या उपक्रमांतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी, पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख, पिंपरी चिंचवड तसेच उपआयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, बचत गटातील महिला, समूह संघटिका यांचे गट तयार करुन मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देणार आहेत.

महिला मतदारांचा मतदानात कमी सहभाग असलेल्या केंद्राची माहिती घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात येईल. जिल्ह्यातील ४ हजार ९०० पेक्षा जास्त मतदान केंद्र परिसरात ही मोहीम राबविण्याचे नियोजन आहे. महिलांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जिल्ह्यात २१ महिला संचालित मतदान केंद्र असणार आहेत. मतदान केंद्रांवर महिलांसाठी स्वतंत्र रांग, पाळणाघर, पाळणाघरात अंगणवाडी सेविका, स्वतंत्र स्वच्छतागृह आदी आवश्यक मूलभूत सुविधादेखील असतील.

हा उपक्रम राबविताना घरोघरी भेटीदरम्यान महिला, वृद्ध, दिव्यांगांना मतदानाचे महत्त्व सांगण्यात येईल. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या आणि मतदान सुलभ व समावेशक व्हावे यासाठी मतदानाच्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. नेमून दिलेल्या भागातील कोणतीही वस्ती, नागरिक दुर्लक्षित राहणार नाहीत याची काळजी घ्यावी, घरभेटी दरम्यान मतदारांशी नम्रता व सौजन्यपूर्वक संवाद साधावा, आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत, अशी माहिती स्वीप समन्वयक अर्चना तांबे यांनी दिली आहे.

डॉ.सुहास दिवसे, जिल्हा निवडणूक अधिकारी-जगातील अनेक देशात महिलांना मताधिकारासाठी लढा द्यावा लागला. मात्र आपला देश स्वतंत्र झाल्यावर लगेचच महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. लोकशाही प्रक्रियेत महिलांचाही सहभाग महत्वाचा आहे. महिला मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्रांवर महिला मतदारांसाठी आवश्यक सुविधा आहेत. महिला मतदारांनी मोठ्या संख्येने लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग घेत मतदान करावे, विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी मतदार नोंदणी करून मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभागी व्हावे आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करावे

मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चोखपणे जबाबदारी पार पाडावी – डॉ.स्वप्नील मोरे

पुणे,दि.१२ :- शिरुर लोकसभा मतदारसंघांतर्गत निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून कामाचे स्वरूप जाणून घ्यावे आणि आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशी सूचना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे यांनी केली.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर नियुक्त १ हजार १२० क्षेत्रीय अधिकारी, समन्वय अधिकारी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे केंद्रप्रमुख व सहाय्यक अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी मतदान प्रक्रिया, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीबाबत वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे दोन दिवसीय प्रशिक्षणास सुरुवात झाली त्यावेळी श्री.मोरे बोलत होते. प्रशिक्षणाला तहसीलदार नागनाथ भोसले, नायब तहसीलदार जाई कोंडे, समन्वय अधिकारी रविंद्र कदम, प्रदीप आव्हाड आदी उपस्थित होते.

दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राच्या पहिल्या दिवशी मार्गदर्शन करताना श्री.मोरे यांनी अधिकारी व कर्मचारी यांची मतदानाच्या आदल्या दिवशी व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचे कर्तव्य व अधिकार याबाबत सविस्तर माहिती दिली. निवडणूक कामकाज करताना होणाऱ्या चुका टाळण्याबाबत मार्गदर्शन करतांना निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे सर्वांनी पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मतदान प्रक्रिया निष्पक्ष व खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान करणाऱ्या मतदाराला केंद्रस्थानी मानून आपले राष्ट्रीय कर्तव्य प्रत्येकाने पार पाडावे असे आवाहन त्यांनी केले.

कर्तव्य करतांना प्रत्येक अधिकाऱ्याने गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणीही प्रशिक्षण व प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रात्यक्षिक टाळू नये , असे आवाहनही श्री.मोरे यांनी केले.

समन्वय अधिकारी श्री.कदम यांनी मतदान यंत्राबाबत माहिती दिली. प्रशिक्षण सत्रांमध्ये प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्रे स्वतः हाताळावीत. प्रशिक्षणार्थींनी प्रात्यक्षिकाच्या आधारे मतदान प्रक्रियेची माहिती करून घ्यावी, यामुळे प्रत्यक्ष मतदानावेळी चुका होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. सादरीकरणाच्या माध्यमातून यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करा – डॉ. सुहास दिवसे

पीसीईटी आयोजित दोन दिवसीय युथ कॉन्फरन्सचे उद्घाटन

पिंपरी, पुणे (दि.१३ एप्रिल २०२४)लवकरच लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यामध्ये तरुणांनी मतदार नोंदणी करून भरघोस मतदान करावे आणि लोकशाही सुदृढ करावी. ग्रामीण भागांमध्ये मतदानासाठी उत्साह असतो मात्र शहरात निरुत्साह दिसून येतो; ही नकारात्मक भावना दूर करून तरुणांनी आपल्यासह समाजातील सर्व घटकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक कार्यालय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक साक्षरता मंडळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड, वर्शिप अर्थ फाउंडेशन, इन्फिनिटी ९०.४ एफ एम यांच्या संयुक्त सहकार्याने दोन दिवसीय युथ कॉन्फरन्सचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी, उपायुक्त अण्णा बोदडे, वुईचे राज्य समन्वयक अल्ताफ पिरजादे, जिल्हा समन्वयक स्नेहल खानोलकर, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, एस. बी. पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, समन्वयक डॉ. केतन देसले आदी उपस्थित होते.
या दोन दिवसीय परिसंवादामध्ये लोकशाही सुदृढ करण्यासाठी युवकांचा सहभाग, लोकशाहीची मूल्ये समाजाच्या विकासामध्ये आणि निवडणुकीमध्ये माध्यमांचा सहभाग आणि महत्त्व, राष्ट्र उभारणीत तरुणांची भूमिका या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांशी संवाद तसेच विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थिती विद्यार्थ्यांनी शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेतली.
पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. पण खेदाची बाब म्हणजे पुणेकर मतदान करण्यात उणे आहेत. सुशिक्षित भागात नागरिक मतदानाचा हक्क बजावत नाहीत; मग आपण सुशिक्षित कसे म्हणणार, हा प्रश्न आहे. निवडणुकीत अधिक मतदान होण्यासाठी निवडणूक आयोग अनेक उपक्रम राबवीत असून भरपूर काम करत आहे. त्याला नागरिकांनी प्रतिसाद देण्याची गरज आहे. मतदान न करता केवळ टीका टिप्पणी, समाज माध्यमातून व्यक्त होण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे उपायुक्त विठ्ठल जोशी म्हणाले.
आण्णा बोदडे, डॉ. गोविंद कुलकर्णी, अल्ताफ पिरजादे यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान दुपारच्या सत्रात पुणे उपजिल्हाधिकारी व स्वीप च्या नोडल ऑफिसर अर्चना तांबे यांनी विद्यार्थ्यांशी मतदानाचे महत्त्व आणि तरुणांचा सहभाग या विषयावर संवाद साधला.
तसेच सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी देखील भारतीय लोकशाही आणि मतदान या विषयावर मार्गदर्शन केले. याबरोबरच ६ विद्यार्थी वक्त्यांनी आपले मत मांडले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू चे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास पीसीईटी सह पिंपरी चिंचवड शहरातील अन्य महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले. स्वागत डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले. आभार डॉ. केतन देसले यांनी मानले.

विद्यार्थ्यांना एकाच छताखाली मिळाल्या परदेशी शिक्षणाच्या अनेक संधी

‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’ला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

पुणे : परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’मध्ये एकाच छताखाली अनेक संधी व पर्याय उपलब्ध झाल्या. ‘स्टडी स्मार्ट’च्या वतीने ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’चे आयोजन करण्यात आले. यामध्ये इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई येथील जवळपास 40 हून अधिक सर्वोत्तम विद्यापीठाच्या प्रतिनिधींशी चर्चा करता आल्याने विद्यार्थ्यांनी येथे मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. विद्यार्थी आणि पालकांना याठिकाणी निशुल्क मार्गदशन मिळाले. 

12 वी बोर्डाच्या परीक्षा मागील महिन्यात  संपल्या असून पदवी परीक्षा देखील संपत आल्या आहेत. या टप्प्यावर अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्याची इच्छा असते. मात्र कोठे योग्य संधी उपलब्ध आहेत? एज्युकेशन लोन कसे मिळू शकते का? परदेशी जाण्यासाठी कोणत्या स्कॉलरशिप असतात? हे सगळे प्रश्न विद्यार्थ्या सोबत त्यांच्या पालकांना देखील पडतात. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘स्टडी स्मार्ट’च्या वतीने  ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’ भरवण्यात आले आहे. या फेयरचे हे 14 वे वर्ष आहे.

यावेळी ‘स्टडी स्मार्ट’च्या नवीन संकेतस्थळाचे आणि  लोगोचे अनावरण ‘स्टडी स्मार्ट’चे संचालक चेतन जैन यांच्या हस्ते करण्यात आले.

घार फिरते आकाशी … गरोदर माता आणि पोटातल्या बाळाचं शोषण कराल तर..याद राखा …

पुणे- शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आज हडपसर दौऱ्यावर आहेत . पण या दौऱ्यावर असताना त्यांना एक वाईट बातमी समजली आणि त्यांनी सरळ सरळ सरकारला इशारा दिला. गरोदर माता आणि त्यांच्या पोटाला बाळाचं शोषण कराल तर याद राखा .. अशी तंबीही दिली . यानंतर मात्र माध्यमांशीबोलताना ते अगदी सोबर भाषेत म्हणाले,’
शिरूर तालुक्यात आमळे गावी पोषण आहारात अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.बाजारातून एक्सप्राइरी डेड जवळ आलेला खराब होऊ शकणारा जुना माल खरेदी करायचा आणि तो चढ्या दराने कंत्राटातून विक्री करायचा अशी साखळी समोर येतीयेत्यामुळे हे नेमकं पोषण कोणाचं कंत्राटदाराच की गरोदर माता आणि पोटातल्याबाळाचं असा प्रश्न निर्माण होतोयया प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी आग्रही मागणी आहे
.

सत्ताधाऱ्यांचं लक्ष केवळ आणि केवळ निवडणूकिवर असल्यामुळे प्रशासन वाऱ्यावर सोडलं आहे. नेमकं पोषण कोणाचं सुरू आहे हा प्रश्न आहे. गरोदर मतांचे आणि पोटातील बाळांचे पोषण होण्यासापेक्षा सत्ताधाऱ्यांच्याजवळच्या कंत्राटदारांचे पोषण सुरू आहे. बाजारातून जुना माल पडलेल्या भावाने उचलून चढ्या भावाने विकायचा अशा कंत्राटदारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली आहे. बाजारातून एक्सप्राइरी डेड जवळ आलेला खराब होऊ शकणारा जुना माल खरेदी करायचा आणि तो चढ्या दराने कंत्राटातून विक्री करायचा, अशी साखळी समोर येतीयेत्यामुळे हे नेमकं पोषण कोणाचं कंत्राटदाराच की गरोदर माता आणि पोटातल्या बाळाचं असा प्रश्न, अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अमोल कोल्हेंनी केली आहे.
शिरुर तालुक्यातील आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा गरोदर महिलेला दिल्या जाणाऱ्या शिद्यांमध्ये अळ्या व सोनकीडे आढळले आहेत. शासनाचे उद्दिष्ट हे त्या गरोदर मातेचे आणि बाळाचे आरोग्य तंदुरुस्त चांगले राहावे. तसेच त्यांची चांगली काळजी घेण्यासाठीच हा उपक्रम आहे. परंतु शिरुर तालुक्यातील आंबळे येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आहारातील गुळ आणि काजुमध्ये किडे दिसून आले. हाच पोषण आहार गरोदर महिलांना दिल्याचंदेखील समोर आलं आहे. गरोदर महिलांना योग्य पोषण देण्यासाठी ही उपाययोजना सुरु करण्यात आली आहे. त्यात असे प्रकार सुरु असेल गरोदर महिलांचं आरोग्य आणि बाळाचं आरोग्यदेखील धोक्यात येण्याची शक्यता आहे परिणामी हे किडे विषारी असतील तर गरोदर महिलांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.