पुणे/ पिंपरी:अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत राज्य शासन लवकरच महत्त्वपूर्ण (Chinchwad)निर्णय घेणार आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शनिवारी) दिली.
खासदार बारणे यांच्या प्रचारासाठी उद्योजक तात्या आहेर यांच्या निवासस्थानी(Chinchwad) वाल्हेकरवाडी व चिंचवडेनगर भागातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बारणे बोलत होते. बैठकीस माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शामराव वाल्हेकर, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद भावसार तसेच श्रीधर वाल्हेकर, सुरेश चिंचवडे, शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, राजेंद्र चिंचवडे, बिभिषण चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर आपण मंत्रालयावर मोर्चा नेला होता, याची आठवण करून देत खासदार बारणे म्हणाले की, अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी सरकार वेगळा मार्ग काढत आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच होईल.
पवना व इंद्रायणी नदी शंभर टक्के स्वच्छ होईल, अशी ग्वाही देत नदीत सांडपाणी थेट सोडले जाऊ नये यासाठी 650 कोटी रुपये खर्च करून मैलाजल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या दहा वर्षात खासदार म्हणून मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा बारणे यांनी यावेळी सादर केला.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा देण्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने श्रीधर वाल्हेकर यांनी बारणे यांना धन्यवाद दिले. खासदार बारणे यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल सचिन चिंचवडे यांचा यावेळी बारणे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. श्रीधर वाल्हेकर यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र चिंचवडे यांनी आभार मानले. बिभीषण चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.