महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाच्यावतीने येरवडा येथील तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय कवायत मैदानावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार भीमराव तापकीर, आमदार जगदीश मुळीक, प्रधान सचिव विजय सतबीर सिंग, अप्पर पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक संजयकुमार, पोलीस आयुक्त के.के. पाठक, तुरुंग उपमहानिरीक्षक स्वाती साठे, तुरुंग विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल कार्यरत असते. तथापि, कारागृह विभाग कैदी सुधारण्याचे कार्य करीत असतो. हे काम करताना कारागृह प्रशासनाला वेगवेगळ्या प्रवृत्तींना सामोरे जावे लागते. कैद्यांना सामावून घेऊन ते तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांना सन्मानाने जगण्याचा आदर्श कारागृह प्रशासन घालून देते. पुढील काळात कारागृह कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येतील.
कारागृह कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे. कारागृहामध्ये अवैध वस्तू सापडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. कारागृह कर्मचाऱ्यांनी खिलाडू वृत्ती जोपासून या क्रीडा स्पर्धेत आपले कौशल्य दाखवावे, असे आवाहन करून त्यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रपती पदकप्राप्त कारागृह अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी आर. टी. धामणे, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील हवालदार ए.आर. लोंढे, पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील रक्षक ए.टी. पाटील, येरवडा कारागृहातील रक्षक एन. एच. बिडवे, तसेच उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यात येरवडा कारागृहातील नितीन वायकर, तुरुंग अधिकारी प्रकाश उतरंडे, कल्याण जिल्हा कारागृहातील हवालदार गणेश घोडके, कोल्हापूर जिल्हा कारागृहातील शिपाई भरत सोनार, मुंबई कारागृहातील शिपाई प्रशांत कोलते यांचा समावेश होता.
कारागृहात निर्माण झालेल्या वस्तुंची विक्रमी विक्री केल्याबद्दल प्रथम क्रमांक येरवडा कारागृहाने तर द्वितीय क्रमांक कोल्हापूर जिल्हा कारागृहाने पटकावला. यासाठी येरवडा कारागृहाचे तुरुंग अधीक्षक यु.टी. पवार तर कोल्हापूर जिल्हा कारागृहाचे तुरुंग अधीक्षक शरद शेळके यांचाही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या स्पर्धांमध्ये तुरुंग विभागाच्या पाच विभागातील २८३ खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा चार दिवस चालणार आहे.