लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, बेळगावच्या महापौर सरिता पाटील, उपमहापौर संजय शिंदे, लोकमान्य सोसायटीचे किरण ठाकूर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, नागरी सहकारी बँका आणि क्रेडिट सोसायटीनी केलेल्या वित्तीय पुरवठ्यामुळे अनेक संस्था, उद्योग प्रकल्प उभे राहिले आहेत. या संस्थांच्या वित्त पुरवठ्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळाला आहे. सहकाराचा संस्कार जपणाऱ्या संस्थांनी या कामात आपली भूमिका प्रभावीपणे वटवली आहे. राज्यातील अशा प्रमुख संस्थांमध्ये लोकमान्य क्रेडिट सोसायटीचा आवर्जून समावेश करावा लागेल.
सहकाराच्या संस्कारातून विकसित झालेल्या लोकमान्य सोसायटीने समाजाच्या विकासात योगदान दिले आहे. पण काही संस्थांकडून सहकाराच्या हेतूला बाधा येईल, असे वर्तन झाले, असेही त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळक यांच्या विचाराचा वारसा घेऊन कार्यरत असणाऱ्या लोकमान्य क्रेडिट सोसायटीने समाजाच्या विविध स्तरातील लोकांसाठी भरीव योगदान द्यावे. लोकमान्य सोसायटीसारखे काम इतर संस्थांनीही करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
लोकमान्य टिळक यांचे विचार आजच्या परिस्थितीतही दिशादर्शक आणि उपयुक्त आहेत. लोकमान्य टिळक यांचा पुतळा दिल्लीतील महाराष्ट्र सदनात उभारण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पालकमंत्री श्री.बापट यांचेही यावेळी भाषण झाले. यावेळी लोकमान्य क्रेडिट सोसायटीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 50 लाख रुपयांचा धनादेश श्री. ठाकूर यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला. सोसायटीच्या विभागीय कार्यालयाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या प्रवीण बावडेकर, शैलेश टिळक, सचिन देशपांडे, मोहन देशपांडे, नीता तळवलीकर आणि दिलीप पाडगावकर यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. किरण ठाकूर यांनी प्रास्ताविक तर सुशील जाधव यांनी आभार मानले.