पुणे-दांडेकर पुलाजवळील आंबील ओढा येथे 14 वर्षांचा मुलगा अडकला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मुलाचा शोध सुरू केला.
गणेश किशोर चांदणे असे या मुलाचे नाव आहे. येथील अंबिल ओढा झोपडपट्टीच्या परिसरात हा प्रकार घडला. याठिकाणी असणाऱ्या नाल्याच्या भिंतीला भगदाड पडले होते. तेथून या मुलाला नाल्यातून वाहत जाणार चेंडू दिसला. चेंडू बाहेर काढण्यासाठी मुलाने नाल्याच्या काठावर उभे राहून त्याठिकाणी असणाऱ्या बांबूच्या सहाय्याने चेंडू बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नेमक्या याचवेळी नाल्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. पाण्याच्या लोंढ्यामुळे बांबू काहीसा हालला आणि त्यामुळे मुलाचाही तोल जाऊन तो नाल्यात पडला. त्यानंतर तो मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला आणि तीन ते चार फुट अंतरावर असणाऱ्या चेंबरमध्ये फेकला गेला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालिकेचे अधिकारी याठिकाणी दाखल झाले असून त्यांनी शोधकार्य सुरू केले आहे. काही कर्मचारी झोपडपट्टीलगतच्या नाल्यात मुलाचा शोध घेत आहेत. या नाल्यातील सांडपाणी मुळा आणि मुठा नदीत सोडले जाते. याठिकाणीही काही अधिकारी मुलाचा कसून शोध घेत आहेत. अंबिल ओढा झोपडपट्टी ही सदाशिव पेठेत आहे. या ओढ्याजवळ पुरग्रस्त चाळ, महापालिका सेवकांची चाळ आहे. त्याचबरोबर दांडेकर पूल झोपडपट्टी आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक मुले इथे खेळण्यासाठी येतात.