महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला काँग्रेसकडून अभिवादन; भाजप सरकारवर टीकेची झोड, फुले विचारांचा जागर करण्याचे आवाहन
पुणे : महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. आज पुण्यात दहा ते बारा लाख विद्यार्थिनी शिक्षण घेत असून, १२ ते १५ लाख महिला रोजगारासाठी घराबाहेर पडतात. मात्र, शहरातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेमुळे महिलांना रस्त्यावरून जातानाही सुरक्षित वाटत नाही. दुसरीकडे, ऐतिहासिक भिडेवाडा स्मारकाच्या पुनर्विकासाबाबत राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिकेची अनास्था दिसून येत आहे. केवळ समाजसुधारकांची नावे घेण्यापेक्षा त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याची गरज आहे, अशी टीका माजी मंत्री तथा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केली.
सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा फुले पेठेत अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पाटील बोलत होते.
कार्यक्रमापूर्वी मान्यवरांनी महात्मा फुले वाड्यात जाऊन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे विशेष व्याख्यान झाले. याप्रसंगी विविध शाळांतील प्राचार्य आणि शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; मात्र मराठी शाळा बंद पडत आहेत!
सतेज पाटील यांनी महिला प्रतिनिधित्व, मतदारसंघांची पुनर्रचना, संविधान, महागाई आणि सामाजिक सलोखा या मुद्द्यांवरून केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. मतदारसंघांची चुकीच्या पद्धतीने पुनर्रचना करण्याचा प्रयत्न होत असून, संविधान बदलण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण केली जात असून, त्याला शासनस्तरावरूनही पाठबळ मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना दुसरीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत, या विसंगतीकडेही त्यांनी लक्ष वेधले.
महापालिकेने पुरस्कार बंद केले असतील, तर काँग्रेसने सुरू करावेत!
फुले दाम्पत्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सत्याची बाजू घेत समाजात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणले. त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. पुणे महापालिकेने महात्मा फुले यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार बंद केले असतील, तर पुणे शहर काँग्रेसने पुढील वर्षापासून हे पुरस्कार सुरू करावेत, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.
मोठी वैचारिक लढाई उभारावी लागेल : विश्वजित कदम
माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले, फुले दाम्पत्याने प्रचंड अवहेलना सहन करून शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात क्रांतिकारी कार्य केले. शिक्षणाच्या माध्यमातून उपेक्षित समाजही प्रगती करू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. मात्र, आज सत्ताधारी फुले आणि आंबेडकरांचे विचार बाजूला सारण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाहीच्या माध्यमातून सर्व घटकांना सोबत घेऊन आगामी काळात मोठी वैचारिक लढाई उभारावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
फुले यांच्या विचारांचा योग्य अर्थ समाजापर्यंत पोहोचवा : संजय आवटे
ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय कार्याचा वेध घेत सांस्कृतिक राजकारणाचे महत्त्व अधोरेखित केले.
फुले दाम्पत्याने पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, तेव्हा त्यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. आज त्यांचेच नाव विद्यापीठाला देण्यात आले आहे, ही त्यांच्या कार्याची ताकद आहे. महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते उत्तम उद्योजक, अभ्यासक आणि राजकारणीही होते, असे आवटे म्हणाले.
फुले हे ब्राह्मणविरोधी होते, असा चुकीचा संदेश पसरविला जात असल्याचे सांगत त्यांच्या विचारांचा योग्य अर्थ समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने आपली वैचारिक व सांस्कृतिक भूमिका अधिक प्रभावीपणे मांडावी, असे आवाहनही त्यांनी केले.
वैचारिक विरोधकांना शत्रू समजणे लोकशाहीसाठी घातक : उल्हास पवार
ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक संघर्षाला उजाळा दिला. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी काँग्रेस सरकारने पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.
लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्यातील वैचारिक मतभेदांचा संदर्भ देत मतभेद असले तरी विरोधकांना शत्रू समजण्याची प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आबेदा इनामदार यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आजही व्यापक जागृती आणि पाठबळाची आवश्यकता असल्याचे सांगितले. कौशल्य शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कार रुजविण्याचे आवाहन त्यांनी केले.
यशपाल भिंगे यांनी फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार केवळ घोषणांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणण्याची गरज व्यक्त केली.
फुले दाम्पत्याला भारतरत्न द्या; भिडेवाड्यासाठी आंदोलनाचा इशारा
पुणे शहर काँग्रेसच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. ऐतिहासिक भिडेवाडा स्मारकाचे काम आगामी तीन वर्षांत मार्गी लागले नाही, तर सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
१६ हजार कोटींचे बजेट; फुले यांच्या गौरवासाठी महापालिकेचा पुढाकार का नाही? : प्रशांत जगताप
पुणे शहर काँग्रेसच्या पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने विशेष कार्यक्रम आयोजित न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
महापालिकेचे १६ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असतानाही महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पुढाकार घेतला जात नसल्याची टीका त्यांनी केली. तसेच २०१७ पासून भाजपने महात्मा फुले यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार बंद केल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी माजी मंत्री रमेश बागवे, अरविंद शिंदे, अविनाश बागवे,सौरभ अमराळे, बाळासाहेब अमराळे, शेखर कपोते, रफीक शेख, सुनील शिंदे, अमीर शेख, सायरा शेख, अजित दरेकर, स्वाती शिंदे, विरेंद्र किराड, सुरेश चौधरी, कैलास गायकवाड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरजा आपटे यांनी केले, तर अविनाश बागवे यांनी आभार मानले.

