एआयच्या वापरात सुशासन, पारदर्शकता आणि मानवी हस्तक्षेप महत्वाचा असल्याचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांचे मत.

Date:

मुंबई, दि. २७ : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करताना मानवी क्षमतांना पर्याय निर्माण करण्याऐवजी त्या अधिक सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे. शासनाच्या निर्णय प्रक्रियेत एआयचा वापर सहाय्यक म्हणून व्हावा; मात्र महत्वपूर्ण निर्णय घेताना मानवी हस्तक्षेप आणि पडताळणी अनिवार्य असावी. एआयचा वापर सार्वजनिक हित, जबाबदारी आणि सुशासनाच्या तत्वांवर आधारित असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.

हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल, परळ येथे आयोजित ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’मध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तथा ‘मित्रा’चे सीईओ प्रवीण परदेशी, सर्विस नाऊच्या वरिष्ठ संचालक गरिमा बब्बर, ओपन टेक्स्टचे देश संचालक मनीष बलूजा, डेलॉइट इंडियाचे पार्टनर जय गुहा, गव्हकनेक्टचे संचालक फहीम हक तसेच केंद्र व राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शासनाच्या कामकाजात एआयच्या वापराचे महत्व स्पष्ट करताना प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘महा एआय’ या स्थानिक पातळीवर होस्ट केलेल्या सर्वम मॉडेलचा अनुभव सांगितला. मसुदा तयार करताना या मॉडेलची मदत घेतली. शासन निर्णय, पूर्वीचे संदर्भ, प्रशासकीय तरतुदी, खर्चाच्या मर्यादा आणि विविध भाषांमधील जनसंपर्काचे स्वरूप यांची माहिती उपलब्ध असल्यामुळे या प्रणालीने उपयुक्त मसुदा तयार करून दिला. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना संदर्भ शोधणे आणि प्राथमिक मसुदा तयार करणे अधिक सुलभ होऊ शकते. तथापि, अंतिम मसुद्याची पडताळणी आणि मान्यता ही अधिकाऱ्यांनीच करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. डिजिटायझेशनपासून डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंतच्या भारताच्या प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी आधार, यूपीआय आणि डिजीयात्रा यांसारख्या सुविधांचे उदाहरण दिले. देशाने उभारलेली डिजिटल सार्वजनिक पायाभूत व्यवस्था ही जागतिक स्तरावर आदर्श ठरली असून, आता त्यावर संमती आधारित व्यवस्था आणि एआय सक्षम व्यवहार प्रणाली विकसित करण्याची संधी भारतासमोर असल्याचे त्यांनी सांगितले. एआयमुळे रोजगाराच्या संधी कमी होण्याबाबत भूमिका मांडताना ब्रिजेश सिंह म्हणाले की, भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात मानवी श्रम आणि कौशल्यांना महत्व आहे. ‘डार्क फॅक्टरी’ किंवा चालकविरहित वाहनांसारख्या संकल्पनांचा स्वीकार करताना देशाच्या सामाजिक आणि आर्थिक गरजांचा विचार करणे आवश्यक आहे. एआयने माणसाची जागा घेण्याऐवजी त्याच्या कामाची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता वाढविण्यास मदत केली पाहिजे. एआयच्या वापरातील संभाव्य धोके स्पष्ट करताना त्यांनी ऑस्ट्रेलियातील ‘रोबोडेब्ट’ प्रकरणाचा उल्लेख केला. कल्याणकारी योजनांमधील लाभार्थ्यांची स्वयंचलित पडताळणी करताना एआय प्रणालीतील त्रुटींमुळे चुकीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आणि अखेर ही प्रक्रिया बंद करावी लागली. त्यामुळे महत्वपूर्ण शासकीय निर्णय पूर्णपणे एआयवर सोपविणे धोकादायक ठरू शकते. एआयने दिलेल्या निष्कर्षांची मानवी स्तरावर पडताळणी करूनच निर्णय घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात सुरू असलेल्या ‘महा क्राइम ओएस’ या प्रायोगिक उपक्रमाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, गुन्हेगारीच्या घटनांमध्ये विशिष्ट पद्धती आणि प्रवृत्ती आढळतात. वाहनचोरी, घरफोडी, पाकीटमारी यांसारख्या गुन्ह्यांच्या कार्यपद्धतींचे विश्लेषण एआयच्या मदतीने करता येऊ शकते. या प्रणालीद्वारे विचारलेल्या प्रश्नांना माहितीच्या आधारे उत्तरे मिळू शकतात. मात्र, त्यांची सत्यता तपासून पुढील जबाबदार निर्णय घेण्याची भूमिका मानवी अधिकाऱ्यांचीच असेल. शासकीय यंत्रणांमध्ये एआयचा वापर करताना त्याची खरेदी, स्वदेशी अथवा परदेशी तंत्रज्ञानाची निवड, स्वतः प्रणाली विकसित करणे की उपलब्ध प्रणाली स्वीकारणे, संगणकीय क्षमता आणि संसाधनांचे योग्य नियोजन या बाबींचा जोखमीच्या दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. भाषणाचा शेवट करताना ब्रिजेश सिंह म्हणाले, ‘एआयचा वापर जबाबदारीने, जोखमींचे मूल्यमापन करून आणि सार्वजनिक हिताला केंद्रस्थानी ठेवून करणे, हाच एआय सुशासनाचा मूलमंत्र आहे,’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अतिक्रमणे हटवताय, पण पुण्यातील पदपथांचे ऑडिट केले का? विरोधी पक्षनेते निलेश निकम यांचा आयुक्तांना सवाल!

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार रस्ते सुरक्षेसाठी अंदाजपत्रकातील एक टक्का निधी...

पुण्यात बिसलेरीच्या बाटलीसारखे सहज मिळतात ड्रग्ज; माणसे मारली जात असताना सरकार अतिक्रमणाच्या चर्चेत व्यस्त : सतेज पाटील

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरही गंभीर सवाल; डिलिमिटेशनचे ‘गाजर’ स्वीकारणे म्हणजे...

पुण्यात महिलांना सुरक्षित वाटत नाही; भिडेवाडा स्मारकाबाबतही सरकारची अनास्था : सतेज पाटील

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला काँग्रेसकडून अभिवादन; भाजप सरकारवर...