पुणे- सर्व घरकुल योजनांमधुन लाभार्थ्यांना लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी घरकुल योजने अंतर्गत चालु असणाऱ्या सर्व बांधकामाकडे लक्ष द्यावे तसेच वंचित लाभार्थ्यांना देखील तातडीने घरे मिळतील यासाठी प्राधान्य देऊन काम करावे अशा सूचना विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी दिल्या.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात घरकूल योजनांच्या संबंधीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण चे संचालक धनंजय माळी तसेच पुणे विभागातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. म्हैसेकर म्हणाले, सर्व घरकुल योजनांच्या अंतर्गत 2016-17 सालच्या घरकुलाच्या बांधकामांची सूरुवात झाली किंवा मंजूरी मिळाली अशा घरकुलांची अपूर्ण कामे पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करा. तसेच काही कारणास्ताव जर घर रद्द करण्यात आले असेल तर संबंधीतांनी दिलेले पहिले हफ्ते देखील परत घ्या. प्रलंबित कामांमध्ये सुधारणा न झाल्यास संबंधीतांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या तसेच सोलापूर व सातारा जिल्ह्यातील उत्कृष्ट कामासाठी श्री. म्हैसेकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन देखील केले.
यावेळी त्यांनी इंदिरा आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी, पारधी आवास योजना, तसेच पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजना अशा विविध केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांचा आढावा घेताला.