पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) स्वमालकीच्या बसमुळे अपघात होऊन वैयक्तिक अथवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास संबंधित मालमत्ताधारकांना नुकसानभरपाई देण्याचे धोरण प्रथमच निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी बस अपघातात मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये आणि जखमी झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याची तरतूद होती. आता मृतांच्या वारसांना देण्यात येणारी मदत तीन लाख रुपये, तर जखमींसाठीची मदत एक लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली.
पुणे महापालिकेच्या सभागृहात पीएमपीएमएलची विशेष सभा झाली होती. त्यावेळी नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेबाबत पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने हा प्रस्ताव मान्य केला.
या बैठकीस पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पुणे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक मारणे, पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड आदी उपस्थित होते.
पीएमपीएमएलच्या स्वमालकीच्या बसना तृतीय पक्ष दायित्व विमा उतरविण्यातून शासनाने सूट दिलेली आहे. त्यामुळे बस अपघातात व्यक्तीचा मृत्यू किंवा जखमी झाल्यास आर्थिक मदतीसाठी २०१५ मध्ये संचालक मंडळाने स्वतंत्र धोरण निश्चित केले होते. मात्र, अपघातात दुकान, घर, वाहन किंवा अन्य वैयक्तिक अथवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास भरपाई देण्याबाबत कोणतेही निश्चित धोरण नव्हते. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये प्रशासनास अडचणी येत होत्या.
या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलने आता मालमत्ता नुकसानभरपाईसाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. अपघातानंतर झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष मूल्यांकन बाह्य संस्था किंवा तज्ज्ञांकडून करण्यात येणार आहे. तृतीय पक्ष दायित्व विमा कंपन्या ज्या पद्धतीने नुकसानीचे मूल्यांकन करतात, त्याच धर्तीवर मूल्यांकन करणारी संस्था किंवा व्यक्ती नियुक्त अथवा मान्यताप्राप्त केली आहे. नुकसानभरपाईची रक्कम देताना संबंधित मालमत्ताधारकाकडून प्रतिज्ञापत्रही घेण्यात येणार आहे.
दरम्यान, अपघातग्रस्ताने मोटार वाहन कायद्यानुसार स्वतंत्र नुकसानभरपाईचा दावा दाखल केल्यास पीएमपीएमएलने दिलेली रक्कम न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. न्यायालयाने निश्चित केलेल्या अंतिम भरपाईतून पीएमपीएमएलकडून आधी दिलेली रक्कम वजा करून उर्वरित रक्कम अदा केली जाणार आहे. हे धोरण पीएमपीएमएलच्या बससेवेसाठी कार्यरत असलेल्या खासगी बस पुरवठादारांनाही लागू राहणार आहे.
या धोरणानुसार २१ एप्रिल २०२६ रोजी अप्पा बळवंत चौक, प्रभात टॉकीजजवळ झालेल्या बस अपघातात नुकसान झालेल्या दोन दुकानांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. ओ. व्ही. शेवाडे अँड असोसिएट्स या चार्टर्ड इंजिनिअर्स व शासकीय मूल्यांकनकर्त्यांकडून करण्यात आलेल्या मूल्यांकनानुसार मे. प्रकाश कार्ड्सचे मालक विनोद पतंगे यांना ४ लाख ७० हजार ५३१ रुपये, तर बालाजी कार्ड्सचे मालक आकाश धनसिंग नायकडा यांना ४५ हजार ९६२ रुपये नुकसानभरपाई देण्यात येईल.या धोरणाला मान्यता मिळाल्याने अशा अपघातग्रस्त मालमत्ताधारकांना भरपाई देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना अशा प्रकरणांमध्ये आवश्यक मंजुरी आणि निर्णय घेण्याचे अधिकार राहणार आहेत.
…..

