कसबा गणपतीचा आदर्श निर्णय -दुष्काळामुळे पाच वर्षांसाठी हे गाव दत्तक घेतले….
पुणे – शहरातील मानाचा पहिला गणपती असलेल्या “कसबा गणपती मंडळा‘ने आपल्या कामातून निर्णायातून -कामातून आदर्श घालून दिला आहे नगर जिल्ह्यातील खंडोबावाडी (ता. पाथर्डी) हे गाव दत्तक घेऊन समाजकार्यातही अग्रस्थानी असल्याचे या मंडळाने सिद्ध केले आहे. उत्सवाच्या खर्चात सुमारे पन्नास टक्के कपात करून हा निधी गावाच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी सहसचिव भूषण रुपदे उपस्थित होते.
यंदा दुष्काळामुळे खर्चात कपात केली असून, पुरस्कारालाही फाटा देण्यात आला आहे. यामुळे सुमारे नऊ लाख रुपयांची बचत होणार असून हा निधी खंडोबावाडीतील विकासकामांसाठी खर्च करण्यात येणार आहे.
मंडळाचे कार्यकर्ते गावकऱ्यांच्या साथीने रस्ते, पाणीपुरवठा, वैद्यकीय, कृषी, शिक्षण, स्वच्छताविषयक प्रकल्प राबविणार आहेत. पुढील पाच वर्षांसाठी हे गाव दत्तक घेतले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मंडळाने यंदा पर्यावरणपूरक कागदी लगद्यापासून देखावा तयार केल्याचेही त्यांनी सांगितले.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून दुष्काळग्रस्तांसाठी एक मूठ धान्य घेण्यात येणार आहे. त्यासाठी भाविकांनाही दर्शनाला येताना एक मूठ गहू, ज्वारी, तांदूळ, साखर आणि तूरडाळ हे धान्य आणावे, असे आवाहन त्यांनी केले. जमा होणाऱ्या धान्याच्या दुप्पट किंवा चौपट धान्य मंडळाकडून दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.