सांगली : एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी पुनर्विकास योजना म्हणजेच आय.एच.एस.डी.पी. अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरकुलांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू नका. कामाच्या दर्जाबाबत चौकशी करून दहा दिवसात अहवाल सादर करा, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी म्हाडाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सर्व्हे क्रमांक 253/1 येथील नियोजित गीता सहकारी हौसिंग सोसायटी जिजामाता कॉलनी स्थळ पाहणी तसेच बालहनुमान कॉलनी येथे एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत बांधण्यात येत असलेल्या घरकुलांची पाहणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरकुलांच्या दर्जा व सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर दिलीप कांबळे, महानगरपालिका आयुक्त अजीज कारचे, म्हाडाचे उपअभियंता विजयदत्त गायकवाड, शाखा अभियंता आबासाहेब भोसले, सहायक अभियंता शितल पाटील, मंगेश नायकवडी आदी उपस्थित होते.
घरकुलांच्या बांधकाम साहित्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून श्री. वायकर यांनी या कामांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, कामाच्या दर्जाबाबत दहा दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.
महानगरपालिका क्षेत्रात दोन टप्प्यात ही योजना राबवण्यात येणार होती. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात बालहनुमान कॉलनी येथील 175 घरांचा समावेश आहे. त्यातील 80 घरे बांधून पूर्ण असून 95 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. 2009 साली सुधारित योजनेंतर्गत अन्य चार ठिकाणांचा समावेश करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात एकूण 3798 घरांची योजना मंजूर झाली. त्यापैकी 1395 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे आयुक्त अजीज कारचे यांनी सांगितले.