पुणे- पुण्याचे पालकमंत्री ,आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्याकडे त्यांच्या पक्षाचे पुण्याचे नेतृत्व असताना बारामतीच्या खासदार असलेल्या सुप्रियाताई यांना हल्ली चुकीची वक्तव्ये करत का होईनात पण चर्चेत राहावं असं का वाटू लागलं आहे ? असा सवाल करत महापालिकेतील भाजपचे गटनेते आणि सभागृहनेते गणेश बिडकर यांनी सुप्रिया सुळे यांच्या पुण्यातील वाढत्या फेऱ्यांनी त्यांच्या पक्षाचेच कार्यकर्ते बुचकळ्यात पडतील अशी शक्यता असल्याचे म्हटले आहे.
बिडकर यांनी असेही म्हटले आहे कि,’पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार वंदना चव्हाण यांचा पुण्याच्या विकासाकडे पाहण्याचा एक विचार आहे. तर दुसरीकडे सुप्रियाताईंना मात्र आरोप करण्याची घाई लागली आहे. यामुळे पुणेकरांचे नुकसान होऊ शकते. केवळ चर्चेत राहण्यासाठी सुप्रियाताई अशी चुकीची वक्तव्य करत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी महापौर यांचा राजीनामा मागितला. आज कचरा प्रकल्पाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. उद्या याच प्रकारे शहरातील मेट्रो आणि इतर विकास प्रकल्पही बंद पाडण्याचा त्यांचा विचार दिसतोय.
राज्य सरकारच्या अचानक आदेशाने अनेक महत्वाचे विषय प्रलंबित -बिडकर
अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करून निर्णय करण्यासाठी सोमवारी पालिकेची सर्वसाधारण सभा (जीबी) घेण्यात आली होती. मात्र आज सकाळी अचानक अकरा वाजता सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी, असे आदेश राज्य सरकारचे आले. याची माहिती सर्व सभासदांना देऊन ऑनलाईन पद्धतीने जीबी चे नियोजन करणे प्रशासनाला शक्य नव्हते. त्यामुळे जीबी तहकूब करून पुढे ढकलण्यात आली असेही सभागृहनेते बिडकर यांनी स्पष्ट केले.
‘ स्वच्छ ‘ संस्थेकडून त्यांचे काम काढून घेण्याचा कोणताही विचार नाही
शहरात वर्षानुवर्षे स्वच्छतेचे काम करणाऱ्या ‘ स्वच्छ ‘ संस्थेकडून त्यांचे काम काढून घेण्याचा कोणताही विचार नाही. यापूर्वी देखील भाजपने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. स्वच्छचे काम काढून घेणार असल्याची अफवा विनाकारण पसरविल्या जात असून याला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन पालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केले.
शहरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगारांवर कोणताही अन्याय होणार नाही. स्वच्छ ही चळवळ असून कचरा वेचकांना आवश्यक ते सर्व साहित्य पुरविले जाईल. शहर स्वच्छ ठेवण्याचे काम मोठे कठीण असून ‘स्वच्छ’ शिवाय हे काम होणार नाही. आम्ही स्वच्छ बरोबर आहोत, अशी ग्वाही यावेळी बीडकर यांनी दिली. ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छ संस्थेच्या कामगारांनी पालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर विविध मागण्यासाठी आंदोलन केले.
या आंदोलनामध्ये उपस्थिती लावून सत्ताधारी पक्ष म्हणून सभागृह नेते बिडकर यांनी आपली भूमिका मांडली. पुढील दोन महिन्यात स्वच्छ च्या कामाचा सविस्तर अभ्यास करून त्याचा प्रस्ताव देण्याच्या सूचना बिडकर यांनी प्रशासनाला केल्या.