पुणे – कोविड साथ, टाळेबंदी याकारणांनी आर्थिक तडाखा बसलेल्या हॉटेल, रेस्टाॅरंट्स आणि जिम उद्योग व्यवसायाला (हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री) वीज बिलात ४० टक्के सूट मिळावी अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
गेल्या सव्वा वर्षात हॉटेल, रेस्टॉरंट, अॅम्युझमेंट पार्क, फिटनेस सेंटर, जिम अशा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला मोठा आर्थिक दणका बसलेला आहे. या व्यवसायावर पुण्यातील मालक, चालक, कामगार अशा सुमारे तीन लाख लोकांचे जीवनमान अवलंबून आहे. गेल्या आठ ते दहा महिन्यांत काही रेस्टॉरंट्स, जिम्स कायमची बंद पडली आहेत, काही त्याच मार्गावर आहेत. ही इंडस्ट्री सावरायची असेल तर राज्य सरकारने विविध प्रकारे प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. याकरिता राज्य सरकारच्या ऊर्जा खात्याने वीज बिलात ४०टक्के सूट द्यावी आणि बिलांवर लावलेले व्याज पूर्णपणे कमी करावे, असे आमदार शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.
शहरातील काही हॉटेल व्यावसायिकांनी आमदार शिरोळे यांची भेट घेऊन व्यवसायातील अडचणींविषयी चर्चा केली. राज्य सरकारकडे आपण याचा पाठपुरावा करु असे आश्वासन शिरोळे यांनी या व्यावसायिकांना दिले. तसेच केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ हॉटेल व्यावसायिकांनी घ्यावा असेही शिरोळे यांनी त्यांना सुचविले.